हरतऱ्हेचे लाडू

निशा गणपुले-लिमये 
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
दिवाळी फराळासाठी खास नावीन्यपूर्ण व पारंपरिक पद्धतीने करावयाचे लाडवाचे प्रकार व त्यांच्या पाककृती...

रव्याचे लाडू (पाकाशिवाय)  
साहित्य : दोन फुलपात्रे अगदी बारीक लाडूचा रवा, दीड फुलपात्र पिठीसाखर (गुळी साखरपण चालेल), १ फुलपात्र भरून नारळाचा पांढरा शुभ्र चव, १ भांडे खवा, ७-८ वेलदोड्यांची पूड, अर्धी वाटी साजूक तूप, अगदी थोडी गूळ पावडर वा नेहमीचा काळा गूळ. (बारीक चिरून मिक्‍सरमधून काढावा.)
कृती : प्रथम नारळ चव नुसताच बदामी रंगावर भाजून घ्यावा. खवा मंदाग्नीवर परतून मोकळा करून घ्यावा. आता रवा तुपावर खमंग, छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर खाली उतरवून त्यावर दुधाचा हबका मारावा व थोडा परतावा. नंतर भाजलेला रवा, पिठीसाखर, खवा व खोबरे तसेच वेलचीची पूड सर्व घटक पदार्थ एकत्र करून त्यावर पातळ केलेले साजूक तूप घालून मिश्रण कालवावे व ते गरम आहे तोवरच लाडू वळावेत.


रवा-बेसन-खव्याचे लाडू  
साहित्य : दोन वाट्या अगदी बारीक लाडूचाच रवा, २ वाट्या खवा, १ वाटी बेसन, ४ वाट्या साखर, १ वाटी तूप, १ चमचा वेलदोड्याची पूड, अर्धी वाटी पाणी, १५-१६ बेदाणे, अर्धी वाटी दूध, बेसन भाजण्यासाठी पाव वाटी तूप. 
कृती : प्रथम बेसन तुपात चांगले खमंग व तांबूस भाजून घ्यावे. त्यावर दुधाचा हबका मारावा. बेसन छान फुलून येईल. हे बाजूला ठेवावे. आता तुपात रवा बदामी रंगावर भाजावा. तसेच खवापण चांगला परतून घ्यावा किंवा खव्याचा रवा करून घ्यावा. मग साखरेत पाणी घालून चांगला चिकट होईपर्यंत पाक करावा. त्यात भाजलेले मिश्रण घालावे. चांगले ढवळावे. तसेच वेलची पूडपण घालावी. मिश्रण घट्ट होत आले, की त्यात दुधाचा हबका मारावा व चांगले ढवळून मिश्रण झाकून ठेवावे. आता मिश्रण पाकात छानपैकी मुरेल. मिश्रण हाताला चिकटत नाही ना पाहून लाडू वळावेत. या लाडूंना बेसनाची वेगळीच चव येते.


मुखविलास लाडू  
साहित्य : पाचशे ग्रॅम हरभरा डाळ, ५०० ग्रॅम साखर, अर्धा लिटर दूध, २०० ग्रॅम खवा, २०० ग्रॅम तूप, १५-२० वेलदोडे, ५० ग्रॅम बेदाणे. 
कृती : दूध उकळून गार करावे. नंतर त्यात हरभऱ्याची स्वच्छ धुतलेली डाळ भिजत घालावी. डाळ ३-४ तास भिजू द्यावी. नंतर वाटावी. वाटलेली डाळ तुपावर भाजून घ्यावी. थोडा जास्त वेळ लागेल. तरीपण मंद आचेवरच भाजावी. नंतर साखरेचा एकतारी पाक करावा. त्यात खवा घालून जरा उकळू द्यावे. नंतर त्यात परतलेली डाळ, वेलदोडा पूड व बेदाणे घालावेत व जरा ढवळावे. नंतर खाली पातेले घेऊन मिश्रण मधून मधून ढवळावे. मिश्रण चांगले घट्ट झाले, की लाडू वळावेत. हे मुखविलास लाडू चवीला अतिशय सुरेख लागतात.


शिंगाडा पिठाचे उपवास लाडू 
साहित्य : दोन वाट्या शिंगाडा पीठ, २ वाट्या तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, पाव वाटी गुळाची पावडर, १ वाटी तळलेला मोती साबुदाणा, १ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे भरड कूट, १ मोठा चमचा दूध. 
कृती : प्रथम कल्हईच्या पातेल्यात तूप घालून घ्यावे. तूप पातळ झाले, की त्यात शिंगाड्याचे पीठ घालावे व छानपैकी खमंग भाजावे. छान खरपूस वास आला की त्यात दूध घालावे. आता पीठ फुलेल, ते ढवळत राहावे. मग पातेले खाली उतरवावे. गॅस बंद करावा. त्यात पिठीसाखर, गुळाची पावडर घालून मिश्रण ढवळावे. ते कोमट झाले की मिक्‍सरमधून फिरवावे. चांगले एकजीव होईल. आता त्यात मोती साबुदाणा व दाण्याची भरड घालावी. चविष्ट लाडू वळावेत.


मोती साबूदाणा लाडू (उपवासाचे लाडू)  
साहित्य : दोन फुलपात्रे मोती साबूदाणा, अडीच फुलपात्रे साखर, १ मोठा चमचा साजूक तूप.
टीप ः (मोती साबूदाणा आपण साबूदाण्याच्या खिचडीसाठी साबूदाणा भिजवतो तसा भिजवावा. तो कडकडीत उन्हात खडखडीत वाळवावा. मग तो भाजावा. भाजलेला साबूदाणा तळावा. हा तळल्यावर छान फुलतो. अगदी पांढरेशुभ्र मोतीच जणू. वजनाला हलका आणि टप्पोरा साबूदाणा मोत्यांसारखाच दिसतो.)  
कृती : एका पातेल्यात साखर व तूप एकत्र घ्यावे. पातेले मंद आचेवर ठेवून कालथ्याने साखर एकसारखी ढवळत राहावी. ती हळूहळू ओलसर होईल. एकसारखे ढवळत राहिले म्हणजे साखर पूर्ण वितळेल व तिचा पाक तयार होईल, म्हणजेच कॅरॅमल होईल. लगेचच पातेले खाली घेऊन गॅस बंद करावा आणि त्यात मोती साबुदाणा व काजू तुकडे घालून भराभर मिश्रण एकजीव करून जाड प्लॅस्टिकवर अथवा ओट्याला वा पोळपाटाला तूप आधीच लावून ठेवावे व त्यावर वरील मिश्रणाचे लहान लिंबाएवढे गोळे चमच्याने पटापटा ठेवावेत. हे लाडू खूपच कुरकुरीत व एकदम केशरी रंगाचे होतील. खुसखुशीत असल्याने सर्वांना खूप खूप आवडतील.


साबूदाणा-वरी पिठाचे उपवासाचे लाडू  
साहित्य : साबूदाणा व वरीचे तांदूळ मिळून ३ फुलपात्रे, साडेतीन फुलपात्रे पिठीसाखर वा बुरा साखर वा गुळाची पावडर, १ चमचा वेलदोड्याची पूड, तेवढीच जायफळपूड, ३०० ग्रॅम साजूक तूप (पिठे चांगली भाजता येतील तसे तूप घ्यावे). 
पिठाची कृती ः साबूदाणा व वरीला पाण्याचा हात लावून अर्धा तास तसेच ठेवून नंतर दोन्ही छान तांबूस भाजावे व मिक्‍सरवर त्याचे पीठ करून घ्यावे व चाळावे. 
कृती : प्रथम पातेल्यात तूप घ्यावे. अर्धे बाजूला भांड्यात काढून ठेवावे. मंद आचेवर वरील पिठे भाजावीत. फार भाजावे लागणार नाही. कारण आपण आधीच साबू दाणा, वरी भाजूनच पिठे केली आहेत. मग त्यात पिठीसाखर वा गूळ पावडर घालावी. तसेच वेलची व जायफळपूड घालावी आणि लागेल तसे गरम तूप घालून मिश्रण एकजीव करून लाडू वळावेत. हे लाडू अतिशय सुरेख लागतात आणि खूप दिवस राहतात.


डिंकाचे लाडू  
साहित्य : एक वाटी मध्यम कुटलेला डिंक, अर्धी वाटी खसखस, २ वाटी किसलेले गोटा खोबरे, अर्धी वाटी खारीकपूड, २०० ग्रॅम साजूक तूप, ३ वाट्या बारीक चिरलेला गूळ, १ चमचा जायफळपूड, कणीक व तिच्याबरोबर २-३ वेगळी आवडणारी पिठे. सर्व मिळून २ वाट्या. ही पिठे भाजण्यासाठी १ वाटी तूप. 
कृती : प्रथम खसखस भाजून कुटून घ्यावी. खोबऱ्याचा कीस भाजून चुरडून घ्यावा. मग डिंक तुपात तळून घ्यावा व त्याची पूड करावी. तळणे नको असेल तर मायक्रोव्हेवमध्ये डिंक भाजून चांगला फुलतो. त्याची पूड करावी. एका पातेल्यात गुळात अर्धी वाटी पाणी घालून पाक करायला ठेवावा. (त्या आधी पिठे साजूक तुपात चांगली खमंग भाजून घ्यावीत.) गूळ वितळला की लगेचच पातेले खाली घेऊन त्यात वरील सर्व साहित्य व खमंग भाजलेली पिठे घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे आणि लगेचच लाडू वळावेत. 
टीप : गुळाचा पाक न करता चिरलेला गूळ मिक्‍सरमधून फिरवून सर्व साहित्यासह घ्यावा व वरून गरम तूप घालून लाडू वळावेत. 


आळिवाचे लाडू  
साहित्य : पन्नास ग्रॅम आळीव, ४ वाट्या नारळाचा चव, ३ वाट्या बारीक चिरलेला गूळ, १ चहाचा चमचा जायफळपूड, १ चमचा वेलचीपूड. 
कृती : प्रथम आळीव व्यवस्थित निवडून स्वच्छ करून घ्यावा. मग तो नारळाच्या पाण्यात २ तास भिजत ठेवावा. थोडे दूध घातले तरी चालेल, म्हणजे आळीव चांगला भिजेल. मग त्यात चिरलेला गूळ घालून ढवळून अर्धा तास झाकून ठेवावा. आता एका पातेल्यात नारळ चव, भिजलेला आळीव गुळासह एकत्र करून चांगले कालवावे. या मिश्रणाचे पातेले मंद आचेवर ठेवावे व एकसारखे ढवळत राहावे. गूळ खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. हळूहळू सर्व मिश्रण आळत येईल. त्यात वेलची व जायफळपूड घालून ढवळावे. मिश्रण घट्ट होत आले की पातेले खाली घेऊन त्यावर अर्धवट झाकण ठेवावे. मिश्रण कोमट असताना लाडू वळावेत.  
टीप : हे आळीव लाडू करताना आळीव भिजत न घालता भाजून घ्यावेत. २ दिवस जास्त टिकतात. उपवासाला चालतात.


राजगिरा पिठाचे लाडू  
साहित्य : दोनशे ग्रॅम राजगिऱ्याचे पीठ, २५० ग्रॅम गुळाची पावडर, २०० किंवा १५० ग्रॅम साजूक तूप. 
कृती : प्रथम पातेल्यात तूप घेऊन ते गॅसच्या मंद आचेवर ठेवावे. तूप गरम व्हायला लागले, की त्यात राजगिरा पीठ घालून चांगले खमंग भाजावे. बाजूने तूप सुटायला लागले, की छान वास येईल. गॅस बंद करून पातेले खाली घेऊन त्यात गुळाची पावडर घालावी व मिश्रण खूप एकजीव करावे आणि साजेशा आकाराचे लाडू वळावेत. हे लाडू मस्त लागतात.


मुगाची डाळ, उडदाची डाळ, मसुरीची डाळ - त्रिगुण लाडू  
साहित्य ः सर्व डाळी सम प्रमाणात प्रत्येकी १ वाटी, ४ वाट्या साखर, 
२ वाट्या तूप, १ चमचा वेलचीपूड, १ वाटी काजू, बदाम काप, खिसमिस, 
पाव वाटी दूध 
कृती : सर्व डाळी छान खमंग भाजून त्यांचे पीठ करावे. चाळून घ्यावे. ही पिठे तुपात भाजावीत. डाळी भाजलेल्या असल्याने गरम तुपात पिठे थोडी परतावीत. आता साखरेत पाणी घालून चांगला मोती उभा राहील असा पाक करावा. पाक चिकट असावा. मग त्यात भाजलेली पिठे, वेलचीपूड व सुकामेवा घालून चांगले ढवळून मिश्रण एकजीव करावे व लाडू करावेत. मूग व मसूर डाळींचा नैसर्गिक रंग लाडूंना खुलवतो.


मोडाच्या कडधान्याचे लाडू  
साहित्य : पिवळे-हिरवे मूग, मटकी, मसूर, चवळी, सोयाबीन, काळे-हिरवे वाटाणे, हरभरे, राजमा यांसारख्या कोणत्याही ३-४ कडधान्यांना मोड आणून ती धान्य खडखडीत वाळवून सालीसह त्यांचे पीठ करून तयार पिठे ४ वाट्या, ४ वाट्या गूळ पावडर किंवा अर्धे अर्धे पिठीसाखर‌ व गूळ पावडर, २ वाट्या गोटा खोबरे कीस खमंग भाजून त्याचा चुरा, ३ वाट्या तूप व इतर मसाला आपल्या आवडीचा ऐच्छिक घ्यावा. 
कृती : पातेल्यात गरम तुपात सर्व पिठे थोडी थोडी घालून चांगली वास येईपर्यंत भाजावीत. त्यात पिठीसाखर व गूळ पावडर, आवडीचा मसाला, खोबऱ्याचा चुरा घालून व गरज वाटल्यास आणखी तूप घालून लाडू वळावेत. 


बेसन लाडू  
साहित्य : चार वाट्या रवाळ बेसन, ४ वाट्या तूप, ५ वाट्या पिठीसाखर, वेलचीपूड, पाव भांडे दूध, बेदाणे, १ वाटी खमंग भाजलेल्या दाण्याचा कूट, १ वाटी तळलेल्या डिंकाची पूड, १ वाटी गोटा खोबऱ्याचा कीस चुरडून, सुक्‍या मेव्याची थोडी पूड, उदा. काजू-बदाम-अक्रोड-पिस्ते वगैरे, हवा तो मेवा घ्यावा. यातच थोडी मेथी पावडर तुपात खमंग भाजून घालावी. 
कृती : प्रथम पातेल्यात मंद आचेवर तूप तापत ठेवून ते तापल्यावर त्यात थोडे थोडे बेसन घालून एकसारखे तांबूस भाजावे. भाजताना २ चिमटी हळद घालावी. मग त्यात दूध घालून बेदाणे घालावे व पुन्हा परतून घ्यावे. मग कोमट असताना त्यात पिठीसाखर व भाजलेली मेथी पावडर घालून सर्व एकजीव होण्यासाठी मिक्‍सरमधून मिश्रण फिरवावे. एकजीव होईल. आता त्यात वरील इतर सर्व साहित्य घालून पुन्हा एकजीव करावे आणि सुरेख लाडू करावेत.

संबंधित बातम्या