चमचमीत शेव

सविता कुर्वे, नागपूर
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
 

चांगल्या शेवेसाठी टिप्स - 
शेव डाळीच्या पिठाची (बेसनाची) करतात. पीठ मात्र ताजेच हवे. पण चव बदल म्हणून, मका, मटकी, कुळीथ, तांदळाचे पीठ, मैदा घालूनपण शेव करता येते. पीठ भिजवताना तिखट, मीठ, ओवापूड, जिरेपूड, मिरेपूड सर्व बारीक चाळणीने चाळून पिठात घालावे, म्हणजे शेव करताना सोऱ्यात जाडसर कण अडकत नाही. शेवेचे पीठ फार घट्ट असेल, तर शेव पाडायला त्रास होतो व ती कडक होते. जर, सैल असेल तर त्याच्या गुठळ्या पडतात. भिजल्यावर लगेच शेव केली, तर जड जात नाही. १० ते १५ मिनिटांहून जास्त वेळ पीठ भिजवून ठेवू नये. कुरकुरीत शेव करण्याकरिता १-२ चमचे साबुदाणा पीठ घालता येते. पुदिना, पालक, टोमॅटो, बीटरूट अशा वेगवेगळ्या चवींची शेव छान लागते, पण हे वाटून गाळून मात्र घ्यावे लागते. शेव तळण्याकरिता कढईत जरा जास्त तेल असावे, म्हणजे ती चांगली फुलते. प्रथम मोठ्या गॅसवर, नंतर मध्यम आचेवर शेव तळली, की ती चांगली कुरकुरीत राहते. शेव तयार झाल्यावर आजकाल त्यावर थोडा मसाला टाकतात. त्याने चव टिकून राहते. 

मसाला : एक चमचा जिरे, १ चमचा मिरे, २ चमचे ओवा, १ चमचा पुदिना पावडर, अर्धा चमचा सुंठपूड, अर्धा चमचा पिठीसाखर, पाव चमचा सायट्रिक ॲसिड, २ चमचे आमचूर, १ चमचा काळे मीठ, साधे मीठ, १ सुकी लाल मिरची, ४ लवंगा. सर्व मिक्‍सरमधून फिरवून घ्यावे व बाटलीत भरून ठेवावे. 


साधी शेव 
साहित्य : चार वाट्या बेसन, १ वाटी तेल, १ वाटी पाणी, चवीप्रमाणे हळद, तिखट, ओवापूड, तळण्यासाठी तेल. 
कृती : परातीत १ वाटी तेल व पाणी घ्यावे व हाताने चांगले पांढऱ्या रंगाचे होईपर्यंत फेसून घ्यावे. मग त्यात तिखट, मीठ, ओवा पूड, हळद घालून लागेल तसे बेसन घालावे व पीठ भिजवावे. गरम तेलात शेव पाडून कुरकुरीत तळावे. फार लाल तळू नये. तिखट टाकले नाही, तर या शेवेचा रंग फार छान येतो. हाताने न फेसता मिक्‍सरमध्येसुद्धा आपण हे फेसून घेऊ शकतो. 


बॉम्बे शेव/नायलॉन शेव 
साहित्य : अर्धा किलो बेसन, अर्धा किलो मैदा, मीठ, खायचा पिवळा रंग, अर्धी वाटी कडकडीत तेल. 
कृती : बेसन, मैदा एकत्र करून त्यात मीठ, रंग व तेल घालावे. जसे पाणी लागेल तसे घालून घट्टसर भिजवावे. ही शेव बारीक जाळी लावून पाडावी व मध्यम आचेवर तळावी. 


हिरवी मिरची मसाला शेव 
साहित्य : चार वाट्या बेसन, १ वाटी गरम तेल, चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद, अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा आमचूर पावडर, ४-५ हिरव्या मिरच्या तळून व ठेचून, १ चमचा ओवा. 
कृती : बेसनात गरम तेल, ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, आमचूर व सोडा घालून एकत्र करावे. जसे लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवावे. गरम तेलात मध्यम आचेवर शेव तळावी. 


आले, लसूण शेव 
साहित्य : अर्धा किलो बेसन, १ वाटी तांदळाचे पीठ, ३ चमचे आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद. 
कृती : सर्व जिन्नस एकत्र करावेत. हाताने एकत्र करून लागेल तसे पाणी घालून जरा घट्टसर भिजवावे. १० मिनिटे झाकून ठेवावे. यात मोहन घालायची गरज पडत नाही. गरम तेलात कुरकुरीत शेव तळावी. 


लसूण शेव 
साहित्य : अर्धा किलो बेसन, २ गाठी लसूण पाकळ्या (जरा पाणी घालून वाटलेल्या), २ चमचे तिखट, १ चमचा जिरेपूड, १ चमचा ओवापूड, मीठ, ३ चमचे गरम तेल. 
कृती : बेसनात गरम तेलाचे मोहन, मीठ, तिखट घालावे. एका वाटीत लसणाची पेस्ट, ओवा, जिरेपूड व अर्धी वाटी पाणी घालावे व हे मिश्रण गाळून घ्यावे. मग तयार पाणी घालून पीठ भिजवावे व गरम तेलात शेव तळावी. 


पालक पुदिना शेव 
साहित्य : पालकाची १५-२० पाने, पाव वाटी पुदिना पाने, थोडी कोथिंबीर, २-३ तिखट मिरच्या, अर्धा चमचा आल्याचा कीस, एका लिंबाचा रस, मीठ, अर्धी वाटी तेल, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धी वाटी तांदळाची पिठी, ३ वाट्या बेसन. 
कृती : पालक, पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, आले, लिंबाचा रस घालून चर्न करावे व गाळून घ्यावे. लागले तर अर्धी वाटी पाणी घालून बारीक करावे. गाळलेल्या पाण्यात तेल, चाट मसाला, मीठ घालून ढवळावे. तांदळाची पिठी घालून एकत्र करावे. लागेल तसे बेसन घालून गोळा तयार करावा. गरम तेलात कुरकुरीत शेव तळावी. 

पुदिना चाट शेव 
साहित्य : एक वाटी पुदिना पाने, १ वाटी कोथिंबीर, ५-६ लसूण पाकळ्या, ३ मिरच्या, २ लिंबांचा रस, अर्धा चमचा मिरेपूड, काळे मीठ, साधे मीठ, २ वाट्या बेसन, २ चमचे मैदा, २ चमचे तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोअर. 
कृती : पुदिना, कोथिंबीर, लसूण, मिरच्या, लिंबाचा रस, मिरेपूड व ४-५ चमचे पाणी घालून पेस्ट करावी व गाळून घ्यावी. त्यात अडीच चमचे तेल, मीठ, काळे मीठ, बेसन, मैदा, कॉर्नफ्लोअर घालून एकत्र करावे. सैलसर पीठ भिजवून १० मिनिटे झाकून ठेवावे. गरम तेलात शेव तळावी. 


टोमॅटो शेव
साहित्य : एक पाव बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, २ चमचे आले लसूण पेस्ट, ३ टोमॅटोचा गाळलेला रस, अर्धा चमचा जलजीरा पावडर, १ चमचा धनेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, तिखट, मीठ, मोहनासाठी २ चमचे तेल. 
कृती : सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करावेत. लागेल तसेच पाणी घालून पीठ भिजवावे व शेव तळावी. 


चीज टोमॅटो शेव 
साहित्य : एक वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाची पिठी, पाऊण वाटी तयार टोमॅटो प्युरी, १ ते दीड क्‍युब चीज, पाव वाटी तेल, मीठ, तिखट, मिरेपूड. 
कृती : तेलात टोमॅटो प्युरी, किसलेले चीज, तिखट, मीठ, मिरेपूड घालावी. त्यात बेसन, तांदूळ पीठ घालून एकत्र करावे व शेव गरम तेलात तळावी. चीज क्‍युबऐवजी दोन चमचा चीज पावडरपण घालू शकता. 


शेजवान शेव 
साहित्य : एक वाटी बेसन, अर्धा चमचा चाट मसाला, २ चमचे शेजवान सॉस, ओवा, तिखट, मीठ, १ टेबलस्पून तेल, ४ टेबलस्पून पाणी. 
कृती : पाण्यात तेल, शेजवान सॉस, ओवा, तिखट, मीठ घालून ढवळावे. मग बेसन घालून पीठ भिजवावे व शेव तळावी. 


कॉर्न शेव/मका पीठ शेव 
साहित्य : एक वाटी मका पीठ, पाव वाटी रवा, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, हिंग, हळद, पाव चमचा वाळलेल्या कढीपत्त्याची पावडर, बेकिंग पावडर, तेल. 
कृती : कढईत २ चमचे तेल घालावे. त्यात हिंग व २५० मिली पाणी घालावे. मग कढीपत्ता पावडर, मीठ, तिखट, ओवा जरासा हातावर चोळून आणि रवा घालून ढवळावे. मग त्यात मका पीठ, थोडी बेकिंग पावडर घालून हाय फ्लेमवर घट्ट होईपर्यंत ढवळत राहावे. गोळा तयार झाला, की तो थंड होऊ द्यावा. हाताने जरा मळून घ्यावा. शेवेच्या साच्यात घालून जरा मध्यम जाडीची शेव गरम तेलात तळून घ्यावी. 


कुळथाच्या पिठाची शेव  
साहित्य : दीड वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी कुळथाचे पीठ, ८-१० लसूण पाकळ्या, २ मिरच्या, २ चमचे कोथिंबीर, ४ लवंगा, ३-४ मिरे, १ चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, मीठ, हळद. 
कृती : लसूण, मिरच्या, कोथिंबीर, लवंगा, मिरे, धने, जिरे, ओवा सर्व मिक्‍सरने बारीक करावे. लागेल तसे पाणी घालून सर्व पिठे एकत्र करावीत. हळद, मीठ घालावे. तयार वाटण घालून पाण्याने भिजवावे. १० मिनिटे झाकून ठेवावे. गरम तेलात शेव तळावी. 


टमटम शेव 
साहित्य : एक पाव बेसन, १०० ग्रॅम उडदाचे पीठ, ३ चमचे पिठीसाखर, २ चमचे तिखट, २ चमचे तीळ, १ लिंबाचा रस, काळे मीठ, साधे मीठ, हळद, अर्धा चमचा सोडा, १ वाटी गरम तेल.
कृती : खायचा सोडा अर्धी वाटी पाण्यात भिजवून ठेवावा. बाकीचे सर्व साहित्य एकत्र करावे व पाण्याने भिजवावे. मग खायचा सोडा घालून जरा सैलसर गोळा करावा व गरम तेलात शेव तळावी. ही शेव थोडी जाडसरच काढावी, म्हणजे चांगली चव लागते. 


आलू भुजीया शेव 
साहित्य : दोनशे ग्रॅम बेसन, ३ उकडलेले बटाटे, अर्धा चमचा गरम मसाला, तिखट, मीठ, हळद.
कृती : बेसनात उकडलेले बटाटे किसून घालावेत. त्यात तिखट, मीठ, गरम मसाला, हळद घालून गोळा भिजवून १५ मिनिटे ठेवावा. मग शेव तळावी. यात पुदिना पेस्ट, चाट मसाला, गरम मसाला, जलजीरा पावडर घातली की पुदिना आलू भुजीया तयार.


रतलामी शेव  
साहित्य : अर्धी वाटी बेसन, अर्धा चमचा गरम मसाला, भरडलेल्या ७-८ लवंगा, ७-८ मिरे, तेल. 
कृती : अर्धा किलो बेसनात अर्धी वाटी गरम तेल, अर्धा चमचा गरम मसाला, भरडलेल्या लवंगा, मिरे, अर्धा चमचा पाणी घालून गोळा भिजवावा. गरम तेलात मध्यम आचेवर शेव तळावी. अशाच प्रकारे आपण गोड शेवपण करू शकतो. लोणी घालून बेसन भिजवावे व शेव तळावी. साखरेचा किंवा गुळाचा पक्का पाक तयार करून त्यात तयार शेव घोळवावी. 

संबंधित बातम्या