भाताचे वैविध्यपूर्ण प्रकार

सविता माळगे, बार्शी 
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
भात, सर्वांच्या आवडीचा पदार्थ... भात पचायला हलका असतो आणि करतानाही झटपट होतो... भातामुळे भूक तर शांत होतेच पण पोटभरल्याचे समाधानही मिळते... म्हणून रोजच्या जेवणात भात हवाच... भाताच्या अशाच काही चविष्ट रेसिपीज...

मसाले भात 
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, १ वाटी मटार, १ बटाटा, १ टोमॅटो, चमचाभर तिखट, पाव चमचा हळद, १ चमचा मीठ, चमचाभर साखर, ३ चमचे तेल, अर्धे लिंबू, ४ वाट्या गरम पाणी, कढीपत्ता. 
मसाल्यासाठी : दोन चमचे खोबऱ्याचा चव, २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, इंचभर आल्याचा तुकडा, २ चमचे धने, चिमूटभर शहाजिरे, चमचाभर जिरे, अर्धा चमचा खसखस, २ लवंगा, थोडी दालचिनी, २ वेलची. हा मसाला गरम करून त्याची मिक्‍सरमध्ये पावडर करावी. मग ओले खोबरे, हिरवी मिरची वाटून सर्व एकत्र करावे. 
कृती : तांदूळ धुऊन अर्धातास भिजत ठेवावे. टोमॅटो, बटाटे बारीक चिरून घ्यावेत. कुकरमध्ये तेल घालावे. तापल्यावर त्यात हळद, मोहरी, हिंग घालावे. कढीपत्ता, मटार घालून थोडे परतावे. त्यावर तांदूळ घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतावेत. त्यावर बटाटा, 
टोमॅटो, वाटलेला मसाला, हळद, तिखट घालून परतावे. त्यात गरम पाणी, मीठ, साखर, लिंबाचा रस घालावा व ढवळावे. कुकरमध्ये भात शिजवून घ्यावा. 
टीप : भातात साखरेऐवजी गूळ वापरू शकता. मटारबरोबर, तोंडली, वांगी, फ्लॉवर घालू शकता. भाज्या जास्त घातल्यास भाताची पौष्टिकता वाढते. 


मिक्‍स भाज्यांचा भात  
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, १ वाटी तूरडाळ, १ बटाटा, २ कांदे, २ वांगी, २ वाट्या मेथीची पाने, लवंग, मिरे, १ चमचा धने-जिरेपूड, ७-८ लसूण पाकळ्या, ४-५ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, प्रत्येकी १ चमचा हळद, मोहरी, मीठ, साखर, तेल, २ चमचे लिंबाचा रस. 
कृती : तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत. मसाला वाटून घ्यावा. कांदा लांबट, पातळ चिरून घ्यावा. सर्व भाज्या चिरून एकत्र वाफवून घ्याव्यात. तूरडाळीत मेथीपाने घालून अर्धवट शिजवून घ्यावीत. कढईत तेल घालावे. त्यात मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. त्यात कांदा घालून परतावा. त्यात धुतलेले तांदूळ, अर्धवट शिजवलेली तुरीची डाळ, वाटलेला मसाला, मीठ घालावे. वाफवलेल्या भाज्या घालाव्या. आधणाचे घालून ढवळून मंद गॅसवर भात शिजत ठेवावा. अर्धवट शिजल्यावर लिंबाचा रस, साखर घालावी. झाकण ठेवून भात शिजवून घ्यावा. तयार भात वाढताना त्यावर कोथिंबीर, खोबरे घालावे.


नैपायसम (दाक्षिणात्य)  
साहित्य : दीड वाटी तांदूळ, २ वाट्या गूळ, वाडीभर अगदी बारीक चिरलेले आले, खोबरे, वाटीभर साजूक तूप, ५०० ग्रॅम खडीसाखर, १ चमचा वेलची पूड, काजू. 
कृती : भात मऊसर मोकळा करून घ्यावा. गुळात थोडे पाणी घालून पाक करायला ठेवावा. त्यात अधूनमधून तूप टाकत हालवत राहावे. चिकटपणा येईपर्यंत पाक करावा. तयार भात मोकळा करून त्यात घालावा. तुपामध्ये काजू-खोबऱ्याचे तुकडे तळून घ्यावेत. मंद गॅसवर भात १५ ते २० मिनिटे ठेवावा. शिजल्यावर त्यात मध टाकून हालवावे. तळलेले खोबरे, काजू, वेलचीपूड घालावी. हालवून कडेने उरलेले तूप सोडावे. खाली उतरून केळीपानाने झाकावे. 


बिशी बाकी अन्ना (कर्नाटक)  
मसाल्यासाठी : दोन चमचे धने, १ चमचा जिरे, २ लवंगा, २ मिरे, २ दालचिनी तुकडे, ४ मेथीदाणे, अर्धीवाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस हे सर्व तेलावर परतून पूड करावी. 
साहित्या : एक मोठी वाटी तयार मऊ भात. अर्धी वाटी मेथी घालून शिजवलेले तुरीच्या डाळीचे वरण, एका कांद्याच्या फोडी, एका बटाट्याच्या फोडी, एका वांग्याच्या फोडी, मीठ, १० पाने कढीपत्ता, फोडणीसाठी ४-५ चमचे तेल, हिंग, हळद, जिरे, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा तिखट, १ चमचा तयार मसाला, १ लहान वाटी चिंचेचा कोळ, खोबऱ्याचा कीस. 
कृती : पॅनमध्ये तेल घालावे. त्यात जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून चमचाभर उडीद डाळ घालावी आणि परतावे. चिरलेल्या भाज्या घालून परतावे. वाटीभर गरम पाणी घालावे आणि अर्धा चमचा मीठ घालावे. हालवून झाकण ठेवून मंद आचेवर ५-१० मिनिटे शिजवावे. मग शिजलेल्या भाज्यांमध्ये तयार भात व न हाटता वरण घालावे व सर्व एकत्र करावे. चमचाभर लाल तिखट, तयार मसाला, पाव चमचा मीठ, चिंचेचा कोळ घालून भात सारखा करावा. झाकण ठेवून शिजवावा. 


वडाभात (नागपूर)  
साहित्य : पाव किलो तांदूळ, प्रत्येकी २ चमचे मटकी, तूरडाळ, हरभरा डाळ व उडीद डाळ, तेल, मोहरी, हळद, हिंग, जिरे, १ चमचा धने-जिरेपूड, कढीपत्ता, मीठ चवीपुरते, कोथिंबीर, आले, १ चमचा हिरवी मिरची वाटण, तळण्यासाठी तेल, ७-८ लसूण पाकळ्या इ. 
वडाभात कृती : सगळ्या डाळी आदल्या रात्री स्वतंत्रपणे भिजत घालाव्यात. सकाळी उपसून एकत्र करून वाटताना त्यात मीठ, आले, मिरचीचे वाटण, धने-जिरेपूड घालून कालवावे. वाटताना थोडे थोडे पाणी घालावे. मिश्रण पातळ होऊ देऊ नये. कढईत तेल गरम करून मिश्रणाचे बोराएवढे वडे करून तेलात खमंग तळावेत. दुसऱ्या कढईत थोडे तेल घालून मोहरी, जिरे, हिंगाची खमंग फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. त्यावर धुऊन निथळलेले तांदूळ घालावेत व पसरावेत. नंतर मीठ घालावे. गरम पाणी घालून मऊ मोकळा भात करून घ्यावा. पुन्हा कढईत तेल टाकून ठेचलेल्या लसूण पाकळ्या तळाव्यात. देताना गरम भातात तळलेले वडे मिसळावेत व वरून लसूण, तळलेले तेल घालून सर्व्ह करावे.


पाकातील साखरभात  
साहित्य : एक वाटी बारीक तांदूळ, अडीच वाट्या साखर, २ मोठे चमचे साजूक तूप, ५ लवंगा, १ चमचा वेलदोडापूड, ५ केशर काड्या, १५ बेदाणे, ५ बदाम, मीठ. 
कृती : साखर भात करण्याच्या दोन तास अगोदर तांदूळ धुऊन ठेवावेत. बदाम भिजत घालून त्याची साले काढून पातळ काप करावे. एक ताट तापवून त्यात केशरकाड्या घालाव्यात. नंतर त्या काड्या चुरून चमचाभर दुधात टाकाव्या. केशरी रंग पाण्यात घालून ठेवावा. 
पातेल्यात तूप गरम करून त्यात लवंगा घालाव्यात. नंतर वेलदोड्याचे दाणे घालून थोडे परतून घ्यावे. त्यावर धुऊन ठेवलेले तांदूळ घालून ते पण थोडे परतून घ्यावे. नंतर त्यात गरम पाणी घालून भात मऊसर मोकळा शिजवून घ्यावा. भात शिजत असतानाच साखरेचा पाक तयार करून केशराचे दूध, केशरी रंग, वेलचीपूड, बदामाचे काप व बेदाणे घालावे. शिजवलेला भात आचेवरून खाली उतरवून गरम असतानाच त्यात साखरेचा पाक घालावा. एकत्र करून घ्यावे. हे पातेले पुन्हा आचेवर ठेवावे. थोड्या वेळाने भात आटून पुन्हा मऊ व मोकळा होईल. तेव्हा त्यात बाजूने साजूक तूप सोडून झाकण लावावेत. गॅस बंद करावा. 


साखरभात  
साहित्य : दोन वाट्या बारीक तांदूळ, अडीच वाट्या साखर, २ मोठे चमचे साजूक तूप, ५ लवंगा, १ चमचा वेलदोडेपूड, ५ बदाम, ५ केशर काड्या, १५ बेदाणे, चवीनुसार मीठ, केशरी रंग, ४ वेलदोडे. 
कृती : साखरभात करण्याच्या साधारण २ तास आधी तांदूळ धुऊन ठेवावेत. बदाम भिजत घालून त्याची साले काढावीत. त्याचे काप करावेत. एक ताट तापवून त्यावर केशरकाड्या ठेवाव्या. नंतर त्या चुरून दुधात घालाव्यात. केशरी रंग पाण्यात घालून ठेवावा. पातेल्यात तूप गरम करून त्यात लवंगा, वेलदोडे घालून थोडे परतून घ्यावे. त्यावर धुऊन ठेवलेले तांदूळ घालावे. ते पण थोडे परतून घ्यावे. नंतर त्यात गरम पाणी घालून भात मऊसर मोकळा शिजवून घ्यावा. भात आचेवरून खाली उतरवून गरम असताना त्यात साखर घालावी आणि थोड्या वेळाने मंद आचेवर ठेवावा. साखर विरघळल्यामुळे भात थोडा पातळ होईल. त्यात केशराचे दूध, केशरी रंग, बेदाणे, बदाम काप, वेलचीपूड घालून एकत्र करून घ्यावे. थोड्या वेळाने भात आटवून मऊ व मोकळा होईल. तेव्हा त्यात बाजूने साजूक तूप सोडून झाकण लावावे व आच बंद करावी. 


जिरा राईस  
साहित्य : दोन वाट्या बासमती तांदूळ, अर्धा चमचा जिरे, १ चमचा मीठ, २ चमचे तेल, ४ वाट्या गरम पाणी. 
कृती : तांदूळ धुऊन अर्धातास निथळत ठेवावे. पातेल्यात तेल घालावे. त्यात जिरे घालावे. जिरे तडतडल्यावर त्यावर निथळलेले तांदूळ घालून लालसर रंग येईपर्यंत परतावेत. नंतर गरम पाणी व मीठ घालावे. पाणी आटल्यावर भात नीट ढवळून मंद गॅसवर शिजवून घ्यावा. चांगली वाफ आल्यावर खाली घ्यावा. 


मेक्‍सिकन राईस  
साहित्य : आठ मोठे चमचे रिफाइंड तेल, १-२ कांदे बारीक चिरून, ३-४ ठेचलेल्या लसणाच्य पाकळ्या, २५० ग्रॅम बासमती तांदूळ, ५ कप पाणी, ५ चिकन क्‍यूब्स, चवीनुसार मीठ, मिरेपूड, अर्धा कप उकडलेले मटार, २-३ भोपळी मिरचीचे तुकडे, थोडे परतून, थोडे ऍव्हॅकॅडोचे तुकडे, अर्धा किलो साल काढलेले टोमॅटो, २०० ग्रॅम टोमॅटो पेस्ट. 
कृती : एक मोठा चमचा तेल गरम करून त्यात कांदा, लसूण परतून घ्यावा. त्यात टोमॅटो पेस्ट खमंग परतून घ्यावी. उरलेले ३ चमचे तेल गरम करून त्यात तांदूळ परतून भाजून घ्यावेत. त्यात टोमॅटो मिश्रण, मीठ, मिरेपूड घालून चांगली उकळी आणावी. भात १५ मिनिटे मंद आचेवर शिजवावा. उकडलेले मटार घालून एक वाफ आणावी. भोपळी मिरचीचे तुकडे व ऍव्हॅकॅडोचे तुकडे वर पसरून भात सजवावा.


काश्‍मिरी जर्दा  
साहित्य : दोन वाट्या बासमती तांदूळ, अर्धी वाटी साजूक तूप, २ वाट्या साखर, ७-८ लवंगा, ७-८ वेलची, पाव वाटी बदाम, काजू, पिस्त्याचे काप, अर्धी वाटी जर्दाळूचे तुकडे, बेदाणे, ३ कप दूध, पाव चमचा केशर, अर्धी वाटी साय, थोडा चांदीचा वर्ख. 
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धातास भिजवावेत. पॅनमध्ये निम्मे तूप तापवून त्यात काजू, बदाम, पिस्त्याचे काप तळून घ्यावेत. नंतर शिल्लक तुपात लवंग, वेलची फोडणीला टाकावी. त्यावर तांदूळ टाकून परतावेत व बोटचेपा भात करावा. दूध-साखर एकत्र गरम करावी. त्यात केशर घालावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप टाकून त्यावर थोडा भात पसरावा. त्यावर दूध-बदाम-पिस्त्याचे काप, जर्दाळू घालावेत. शेवटी उरलेले तूप, साय घालून घट्ट करावे. झाकण लावावे आणि ते पातेले तव्यावर ठेवून मंद आचेवर काश्‍मिरी जर्दा शिजवून घ्यावा.
 

संबंधित बातम्या