खमंग चिवडा

सुजाता नेरूरकर
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
दिवाळीचा फराळ म्हणून लाडू, करंजी, अनरसे, चिवडा असे बरेच खाद्यपदार्थ केले जातात... पण प्रत्येक पदार्थ करण्याची पद्धत व चव वेगळी असते. त्यात तिखट, चटपटीत, कुरकुरीत, मसालेदार चिवडा तर सर्वांच्याच आवडीचा असतो. चिवड्याच्या अशाच काही खमंग रेसिपीज...

खमंग भाजके पोहे चिवडा
साहित्य : पाव किलो ग्रॅम (२५० ग्रॅम) भाजके पोहे, २ कप शेंगदाणे, अडीच कप सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, दीड कप पंढरपुरी डाळ, २ टेबलस्पून पिठीसाखर, मीठ चवीनुसार 
फोडणीसाठी : अर्धा कप तेल, १ टेबलस्पून मोहरी, १ टेबलस्पून जिरे, २०-२५ कढीपत्ता पाने, १ इंच आले तुकडा, १२ लसूण पाकळ्या, १० हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून धने-जिरे पावडर, १ टीस्पून हळद, १ टेबलस्पून मिरची पावडर, १ टेबलस्पून कसुरी मेथी (सुकलेली).
कृती : प्रथम भाजके पोहे निवडून चाळून घ्यावेत. आले-लसूण-हिरवी मिरची ठेचून बारीक करून घ्यावे. खोबऱ्याचे पातळ काप करून घ्यावे. मोठ्या कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, आले-लसूण-हिरवी मिरची, कसुरी मेथी, कढीपत्ता पाने घालून थोडेसे परतून घ्यावे. मग धने-जिरे पावडर घालून शेंगदाणे घालून खमंग परतून घेऊन खोबऱ्याचे काप घालून गुलाबी रंगावर मंद विस्तवावर परतावे. त्यामध्ये मिरची पावडर, हळद, फुटाणा डाळ, मीठ घालून लगेच भाजके पोहे घालावेत व मिक्स करून पिठीसाखर, मीठ, साखर घालून चिवडा चांगला ढवळावा. थंड झाल्यावरच डब्यात भरावा.


क्रंची कॉर्न फ्लेक्स चिवडा 
साहित्य : अडीचशे ग्रॅम कॉर्न फ्लेक्स, १ कप शेंगदाणे, १ कप सुके खोबरे (पातळ काप), ८-१० काजू (तुकडे करून), थोडे बेदाणे, २ टीस्पून धने-जिरे पावडर, १ टीस्पून आमचूर पावडर, मीठ व पिठीसाखर चवीने, १ कप तेल कॉर्न फ्लेक्स तळण्यासाठी 
फोडणीसाठी : एक टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून मिरची पावडर, १०-१२ कढीपत्ता पाने, ५-६ हिरव्या मिरच्या (चिरून)
कृती : एका मध्यम आकाराच्या कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यावे. नंतर सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यावे. कॉर्न फ्लेक्स तळून घेऊन एका पेपरवर पसरवून ठेवावे. दुसऱ्या एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे घालून तडतडले की त्यामध्ये हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, हळद, मिरची पावडर घालून मग त्यामध्ये तळलेले शेंगदाणे, खोबरे, काजू व कॉर्न फ्लेक्स घालून चांगले मिक्स करून शेवटी मीठ व पिठीसाखर घालावी. चिवडा चांगला हलक्या हातांनी मिक्स करून घ्यावा. कॉर्न फ्लेक्स चिवडा थंड झाल्यावर हवा बंद डब्यात भरून ठेवावा.


टेस्टी हेल्दी ओट्स व पोहे चिवडा 
साहित्य : दोन कप ओट्स, १ कप पोहे, पाव कप शेंगदाणे, पाव कप पंढरपुरी डाळ, अर्धा कप खाकरा (तुकडे करून), मीठ व पिठीसाखर चवीनुसार 
फोडणीसाठी : दोन टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, ४ हिरव्या मिरच्या (चिरून), १०-१५ कढीपत्ता पाने
कृती : एका मध्यम आकाराच्या कढईमध्ये ओट्स मंद विस्तवावर ४-५ मिनिटे भाजून घ्यावे. पोहेदेखील मंद विस्तवावर ४-५ मिनिटे भाजून घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता पाने आणि शेंगदाणे घालून परतून घ्यावे. मग पंढरपुरी डाळ, हळद, खाकरा तुकडे, घालून ओट्स व पोहे घालून मिक्स करून घ्यवे. पिठीसाखर व मीठ घालून चिवडा २ मिनिटे मंद विस्तवावर परतून घ्यावा. चिवडा थंड झाल्यावर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.


नायलॉन पोहे चिवडा 
साहित्य : अडीचशे ग्रॅम नायलॉन पोहे, पाऊण कप शेंगदाणे, पाऊण कप सुके खोबरे (काप), अर्धा कप पंढरपुरी डाळ, पाव कप काजू तुकडे, पाव टीस्पून सायट्रिक अॅसिड, ३ टेबलस्पून पिठीसाखर, मीठ चवीनुसार
फोडणीसाठी : दोन टेबलस्पून तेल, २ टीस्पून मोहरी, २ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हळद, ४-५ हिरव्या मिरच्या (चिरून), १५ कढीपत्ता पाने
कृती : सर्व प्रथम नायलॉन पोह्यांना चांगले ऊन द्यावे. सुक्या खोबऱ्याचे काप करून घ्यावे. मिरची चिरून घ्यावी. साखर व सायट्रिक अॅसिड मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता पाने, हिरव्या मिरच्या घालून शेंगदाणे व खोबरे काप, काजू  घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावे. त्यामध्ये हळद, पंढरपुरी डाळ व पोहे घालून मिक्स करून घेऊन त्यामध्ये मीठ व पिठीसाखर घालून मिक्स करून मंद विस्तवावर चिवडा परतून घ्यावा. हा चिवडा झटपट होतो व चिवडा करताना तेलपण कमी लागते. चिवडा थंड झाल्यावर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावा.


नाशिकचा लोकप्रिय कोंडाजी चिवडा 
साहित्य : अडीचशे ग्रॅम भाजके पोहे, अर्धा कप सुके खोबरे (पातळ काप), अर्धा कप शेंगदाणे, अर्धा कप पंढरपुरी डाळ, पाव किलो कांदे, २ आमसूल, तिखट, मीठ व पिठीसाखर चवीनुसार, १ कप तेल 
चिवडा मसाला : प्रत्येकी ५ ग्रॅम लवंग, दालचिनी, जिरे, शहाजिरे, धने, तमालपत्र, दगडफूल, मिरे, बडीशेप, तीळ, हिंग, अर्धा चमचा तेल 
कृती : कांदे सोलून उभे पातळ चिरून घ्यावे. कडकडीत उन्हात वाळवून घ्यावे. 
चिवडा मसाला करण्यासाठी : एका कढईमधे थोडे तेल गरम करून मसाला थोडासा भाजून घ्यावा. थंड झाल्यावर बारीक कुटून घ्यावा. एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाळवलेले कांदे तळून घ्यावे व बाजूला ठेवावे. खोबऱ्याचे काप तळून घ्यावे. शेंगदाणे तळून घ्यावे. मग आमसूल तळून घ्यावे. थंड झाल्यावर चुरून घ्यावे. त्याच तेलात हळद, तिखट, मीठ, चुरलेली आमसुले, चवीनुसार चिवडा मसाला, शेंगदाणे, खोबरे, पंढरपुरी डाळ, कांदा, पोहे घालून मिक्स करावे मग पिठीसाखर घालून परत मिक्स करावे. चिवडा थंड झाल्यावर प्लॅस्टिक पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावा.


कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा
साहित्य : पाचशे ग्रॅम पातळ पोहे (पोहे २ मिनिटे गरम करून घ्यावे), ५० ग्रॅम मुरमुरे (चुरमुरे), १०० ग्रॅम शेंगदाणे (भाजून, साले काढून), १०० ग्रॅम सुके खोबरे (काप करून), १०० ग्रॅम पंढरपुरी डाळ, ५० ग्रॅम काजू, ५० ग्रॅम मनुके. पिठीसाखर व मीठ
फोडणीसाठी ः तीन-चार कप तेल, २ टीस्पून मोहरी, २ टीस्पून जिरे, पाव कप कढीपत्ता, ५० ग्रॅम हिरवी मिरची (तुकडे करून), १ मोठा कांदा (किसून), १ टीस्पून हळद.
कृती : एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये पोहे दोन मिनिटे मंद विस्तवावर परतून घेऊन मग पेपरवर पसरवून ठेवावेत. शेंगदाणे भाजून सोलून घ्यावे. हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्यात. कांदा सोलून किसून घ्यावा. कढीपत्ता धुऊन पसरवून ठेवावा. सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेऊन गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करून घेऊन त्यामध्ये मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता व किसलेला कांदा घालून चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यामध्ये हळद, शेंगदाणे, खोबरे, काजू, पंढरपुरी डाळ व मीठ घालून एक मिनिट परतून घ्यावे. मग त्यामध्ये पातळ पोहे व चुरमुरे घालून मिक्स करून ५-७ मिनिटे मंद विस्तवावर परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये पिठीसाखर व किसमिस घालून मिक्स करून पोहे थोडे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावेत. चिवडा झाल्यावर थंड करायला तसाच ठेवावा. चिवडा थंड झाल्यावर प्लॅस्टिक पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावा.


महाराष्ट्रीयन स्टाइल लोकप्रिय शाही चिवडा 
साहित्य : अडीचशे ग्रॅम जाडे दगडी पोहे, १ कप बटाट्याच्या सळ्या (तळलेल्या), १ कप शेंगदाणे, १ कप सुके खोबरे (पातळ काप करून), ५० ग्रॅम किसमिस, ५० ग्रॅम काजू तुकडे, ५० ग्रॅम बदाम, अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून मिरची पावडर, मीठ व पिठीसाखर चवीनुसार, पोहे तळण्यासाठी वनस्पती तूप.
कृती : कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये प्रथम शेंगदाणे तळून बाजूला ठेवावे. मग खोबरे काप तळून घ्यावे. काजू, बदाम व किसमिस तळून घ्यावे. तळलेले जीन्नस टिश्यू पेपरवर ठेवा म्हणजे जास्तीचे तूप निघून जाईल. मग दगडी पोहे तळून घ्यावे व टिश्यू पेपरवर ठेवावे. सर्व तळलेले जिन्नस एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. मग वरून मीठ, पिठीसाखर, हळद, मिरची पावडर व बटाट्याच्या सळ्या घालून चांगले हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे. हा चिवडा थोडा गोडच लागतो. चिवडा थंड झाल्यावर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावा.


शाही ड्रायफ्रूट मकाने चिवडा 
साहित्य : पाव कप शेंगदाणे, दीड कप मकाने, पाव कप काजू, पाव कप बदाम, अर्धा कप सुके खोबरे (उभे चिरून), पाव कप बेदाणे व मनुके, पाव कप तूप, मीठ व पिठीसाखर चवीनुसार
फोडणीसाठी ः चार-पाच हिरव्या मिरच्या, १५-२० कढीपत्ता पाने, १ टीस्पून जिरे
कृती : मकाने जर आकाराने मोठे असतील, तर त्याचे कापून दोन भाग करून घ्यावे. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शेंगदाणे गुलाबी रंगावर तळून बाजूला ठेवावे. मग बदाम, काजू, सुके खोबरेपण गुलाबी रंगावर तळून घ्यावे. त्याच कढईमध्ये १ टेबलस्पून तूप गरम करून त्यामध्ये जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता फोडणीत घालून त्यात मकाने घालून ४-५ मिनिटे मंद विस्तवावर कुरकुरीत होईस्तोवर परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये तळलेले शेंगदाणे, काजू, बदाम, सुके खोबरे, किसमिस, मनुके घालून मीठ व पिठीसाखर घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे. उपवासाचा मकाने चिवडा छान टेस्टी लागतो.


स्पायसी बाॅम्बे चिवडा 
साहित्य : अडीचशे ग्रॅम जाड पोहे, पाऊण कप शेंगदाणे, पाऊण कप सुके खोबरे (काप), पाव कप काजू तुकडे, ४-५ हिरव्या मिरच्या (चिरून), १ टीस्पून चिवडा मसाला (साहित्य), १५ कढीपत्ता पाने, ५-६ लसूण पाकळ्या, १ टेबलस्पून पिठीसाखर, वनस्पती तूप पोहे तळण्यासाठी 
चिवडा मसाला ः एक टीस्पून आमचूर पावडर, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मेथी दाणे, पाव टीस्पून मिरे, २ लहान दालचिनी तुकडे, अर्धा टीस्पून मिरची पावडर (जिरे, मेथी दाणे, मिरे, दालचिनी थोडी गरम करून सर्व जिन्नस बारीक कुटून घ्यावे).
कृती : सर्व प्रथम मसाला कुटून बाजूला ठेवावा व त्यातील हवा तेवढा काढून घ्यावा. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये पोहे तळून घ्यावे. पोहे तळून झाल्यावर लगेच पोह्याला मीठ, हळद व पिठीसाखर लावून घ्यावे. मग उरलेल्या तुपात शेंगदाणे, सुके खोबरे (काप), काजू तळून घ्यावे. नंतर कढीपत्ता व लसूण ठेचून तळून घ्यावा. एका परातीत पोहे, तळलेले शेंगदाणे, सुके खोबरे (काप), काजू घालून चिवडा मसाला चवीनुसार, कढीपत्ता, लसूण घालून मिक्स करून घ्यावे. चिवडा थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावा.


ऑईल फ्री रोस्टेड चिवडा
साहित्य : अडीचशे ग्रॅम जाड पोहे (कांदा पोह्याचे पोहे), १ कप शेंगदाणे, २ कप मखाने, पाव कप काजू तुकडे, १५ कढीपत्ता पाने, १ कप मीठ (भाजण्यासाठी), १ चाळणी (मीठ चाळण्यासाठी), चाट मसाला किंवा मिरची पावडर चवीनुसार 
कृती : प्रथम एक जाड बुडाची कढई गरम करून त्यामध्ये मीठ घालून गरम करून घ्यावे. मग त्यामध्ये थोडे पोहे घालून गुलाबी रंगावर मंद विस्तवावर भाजून घ्यावे. पोह्यांचा रंग बदलला की ते चाळणीमध्ये काढून घ्यावे. मीठ चाळले जाईल व पोहे चाळणीमध्येच राहतील. ते एका मोठ्या बाऊलमध्ये ठेवावे. मग परत तेच मीठ कढईमध्ये घालून बाकीचे सर्व पोहे भाजून बाऊलमध्ये ठेवावे. मग शेंगदाणे मिठामध्ये भाजून घ्यावे. शेंगदाणे भाजून थंड झाल्यावर त्याची साले काढून टाकावीत. मग मखाने भाजून घ्यावे. मखाने भाजून झाल्यावर काजू भाजून घ्यावे. शेवटी राहिलेले मीठ बाजूला ठेवून ते आपण परत पुढच्या वेळी भाजण्यासाठी वापरू शकतो. मीठ काढल्यावर कढीपत्ता कोरडाच भाजून घ्यावा. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये भाजलेले पोहे, शेंगदाणे, मखाने, काजू घालून मिक्स करून त्यावर मिरची पावडर किंवा चाट मसाला घालून चांगले मिक्स करून घ्यावे. मग हवा बंद डब्यात भरून ठेवावा.


चटपटीत चुरमुरे चिवडा
साहित्य : तीन कप चुरमुरे (ताजे), मीठ व पिठीसाखर चवीनुसार
फोडणीसाठी : दोन  टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे , ७-८ कढीपत्ता पाने, ५-६ लसूण पाकळ्या (चिरून), २ हिरव्या मिरच्या (चिरून), २ टेबलस्पून शेंगदाणे, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मिरची पावडर
सजावटीसाठी ः पाव कप बारीक शेव, पाव कप कोथिंबीर, १ छोटा कांदा (बारीक चिरून), १ छोटा टोमॅटो (बारीक चिरून), लिंबू चवीनुसार.
कृती : चुरमुरे ताजे घ्यावेत. एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता पाने, शेंगदाणे घालून एक मिनिट परतून घ्यावे. त्यामध्ये मीठ, मिरची पावडर, हळद घालून चुरमुरे घालून मिक्स करावे. मंद विस्तवावर थोडे परतून घेतल्यावर पिठीसाखर घालून परत १-२ मिनिटे परतून घ्यावे. चुरमुरे चिवडा सर्व्ह करताना वरून कांदा, कोथिंबीर, टोमॅटो व शेव घालून सजवावे.


उपवासाचा बटाट्याचा चिवडा 
साहित्य : आठ मोठ्या आकाराचे बटाटे, १ कप शेंगदाणे, पाव कप काजूचे तुकडे, अर्धा कप बेदाणे, अर्धा कप पिठीसाखर, मीठ चवीनुसार, तूप चिवडा तळण्यासाठी.
फोडणीसाठी ः दोन टेबलस्पून तूप, १ टीस्पून जिरे, ६-७ हिरव्या मिरच्या.
कृती : बटाटे धुऊन, सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घ्यावेत. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सोडा घालून किसलेला बटाट्याचा कीस घालून हालवून पाणी काढून टाकावे. मग बटाट्याचा कीस स्वच्छ कापडावर ५-१० मिनिटे पसरवून ठेवावा. शेंगदाणे भाजून व सोलून घ्यावेत. मिरच्या कापून घ्याव्यात. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये बटाट्याचा कीस गुलाबी रंगावर कुरकुरीत तळून पेपरवर ठेवावा. मग भाजलेले शेंगदाणे, बेदाणे व काजू तळून घ्यावे. नंतर सर्व मिक्स करून घ्यावे.

फोडणीसाठी तूप गरम करून त्यामध्ये जिरे व मिरच्या घालून मिक्स करून फोडणी तळलेल्या किसावर घालून मिक्स करून घ्यावे. मग वरून मीठ व पिठीसाखर घालून हाताने मिक्स करून घ्यावे. चिवडा थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावा. 

संबंधित बातम्या