शकुनाचा पदार्थ - करंजी  

उमाशशी भालेराव 
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
आपल्याकडे कोणत्याही शुभकार्यात शकुनाचा पदार्थ हवाच! हा शकुनाचा पदार्थ म्हणजे गोड करंजी! ही मानाची शकुनाची करंजी दिवाळीच्या फराळात तर नक्कीच हवी. दिवाळीत नैवेद्याला व खासकरून लक्ष्मीपूजनाला करंजी असते. असे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या करंजीच्या विविध रेसिपीज...

ओल्या नारळाची पारंपरिक करंजी 
साहित्य : एक वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा, थोडे दूध, ४ चमचे तूप, १ चमचा तांदळाची पिठी, १ नारळ खोवून, पाव किलो साखर, वेलदोड्याची पूड, तळण्यासाठी तूप किंवा रिफाइंड तेल. 
कृती : रवा, मैदा एकत्र करून त्यात किंचित मीठ घालून ४ चमचे तूप गरम करून घालावे. सर्व एकत्र कालवावे व नंतर जरुरीप्रमाणे दूध वा पाणी घालून घट्ट भिजवावे. तासभर ठेवावे व नंतर पुन्हा चांगले कुटून घ्यावे अथवा मळून घ्यावे. दुसरीकडे खोबरे व साखर एकत्र करून शिजवावे. मऊसर सारण करावे. सारण शिजत आल्यावर त्यात १ चमचा तांदळाची पिठी घालून पुन्हा थोडे शिजवावे, म्हणजे सारण छान एकजीव होते. शेवटी त्यात वेलदोड्याची पूड घालावी. सारण थंड करून घ्यावे. कालवलेला रवा, मैदा तासभर ठेवताना तो गोळा वाळू देऊ नये. बंद डब्यात ठेवावा अथवा त्यावर ओला कपडा झाकावा. (कपडा पाण्यात भिजवून, घट्ट पिळून मग तो ओला कपडा वापरावा.) तासाभराने मळून घेतलेल्या गोळ्याच्या पुरीला घेतो त्याप्रमाणे लाट्या करून घ्याव्यात. या लाट्यापण वाळू नयेत, म्हणून ओल्या कपड्याखाली झाकून ठेवाव्यात. लाटताना वर कोणतेही पीठ लावू नये. नाहीतर तळणीचे तेल खराब होईल. पोळपाटाला अथवा लाटीला तेलाचा हात लावून पुरीप्रमाणे लाटावे. त्यावर तयार सारण चमचाभर घालून नीट दुमडून घ्यावे. पुरीच्या कडेला दुधाचे वा पाण्याचे बोट फिरवावे व करंजी दाबून नीट बंद करावी. कातण्याने कडा कापून चंद्रकोरीसारखा छान आकार द्यावा. कातण्याने कापण्याऐवजी हाताने मुरड घालूनही करंजी छान दिसते. नंतर मंद आचेवर तुपात अगर रिफाइंड तेलात गुलाबी रंगावर तळून घ्यावे. तळण्यासाठी तेलात टाकण्यापूर्वी प्रत्येक करंजी कडेने नीट दाबून घ्यावी. तळलेल्या करंज्या प्रथम कागदावर काढाव्यात म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल. एकावर एक ठेवू नये. गार झाल्यावर मग डब्यात भरून ठेवाव्यात. 
सारणात थोडा बदल हवा असल्यास पुढीलप्रकारे करता येईल 

  • ओला नारळ आणि साखरेच्या मिश्रणात काजू, बदाम, पिस्ते यांचे बारीक तुकडे घालावेत. 
  • ओला नारळ आणि साखरेच्या मिश्रणात चमचाभर गुलकंद घालून गुलाबाच्या स्वादाच्या करंज्या करता येतील. 
  • व्हॅनिला इसेन्स आवडत असल्यास सारणात २-३ थेंब व्हॅनिला इसेन्स घालावा. 
  • ओला नारळ आणि साखरेच्या मिश्रणात थोडा आंब्याचा मावा अथवा मॅंगो पल्प मिसळावा म्हणजे आंब्याच्या स्वादाच्या करंज्या होतील. 
  • आंब्याऐवजी स्ट्रॉबेरी क्रश अथवा स्ट्रॉबेरी जॅम मिसळावा. 
  • ताजा अननस उपलब्ध असेल, तर सारणात अननसाच्या बारीक फोडी मिसळाव्यात. 
  • सफरचंदाचा स्वाद हवा असेल, तर सफरचंदाची साल व बिया काढून त्याच्या फोडी करून थोड्या तुपावर शिजवून मग सारणात मिसळावे. 
  • चॉकलेटच्या स्वादाच्या करंज्या करायच्या असतील, तर सारणात २ चमचे चॉकलेट पावडर मिसळावी. 
  • गाजराचा हलवा अथवा दुधी हलवा भरूनही करंज्या मस्त होतात. मात्र, हलवा दाट व घट्ट असावा.

ओव्हनमध्ये भाजलेली करंजी 
करंजी न तळता ओव्हनमध्ये बेक करून घ्यावयाची असेल, तर वरची पारी फक्त मैद्याची करावी. 
साहित्य : दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, चिमूटभर मीठ, ओल्या खोबऱ्याचा कीस, साखर, वेलचीपूड
कृती : मैद्यात अर्धी वाटी तूप गरम करून घालावे. नंतर मीठ घालावे. मैदा व तूप प्रथम कालवून घ्यावे. नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून मऊसर भिजवावे. हा गोळा तासभर झाकून ठेवावा व नंतर पुन्हा मळून घ्यावा. नंतर त्याच्या लाट्या करून, नेहमीप्रमाणे प्रत्येक लाटीची पुरी लाटून त्यावर खोबरे, साखर, वेलचीपूड यांचे केलेले सारण भरून करंजी करावी. (किंबहुना आवडीचे कोणतेही सारण भरावे.) सर्व करंज्या भरून झाल्या, की आधीच १८० अंश तापमानावर गरम करून ठेवलेल्या ओव्हनमध्ये ठेवाव्यात. १५ मिनिटांनी उघडून बघावे. गुलाबी रंगावर भाजल्या गेल्या असल्यास करंज्या उलटून ठेवाव्यात. दुसऱ्या बाजूस ५-७ मिनिटांनी करंज्या भाजल्या जातील. नंतर काढून घ्याव्या. या करंज्या खूप खुसखुशीत होतात.


खव्याच्या करंज्या  
वाटीभर खवा परतून घ्यावा. त्यात पिठीसाखर, काजू-बदाम-पिस्ते यांचे तुकडे घालून वेलचीपूड घालावी. हे सारण भरून छोट्या छोट्या करंज्या कराव्यात. 


पुरणाच्या करंज्या 
दिवाळीत आपण एखाद्या दिवशी पुरण घातले असेल, तर पुरणपोळीऐवजी पुरण भरून करंज्या कराव्यात. या करंज्या फार स्वादिष्ट लागतात. कर्नाटकात यांना ''कडबू'' म्हणतात व जेवणात पक्वान्न म्हणून वाढतात. 


सुक्‍या खोबऱ्याच्या करंज्या
दोन वाट्या सुक्‍या खोबऱ्याचा कीस, त्यात १ वाटी पिठीसाखर, पाव वाटी खसखस भाजून व पाव वाटी रवा भाजून मिसळावा. वेलचीपूड घालावी. आवडीप्रमाणे काजू बदामाचे बारीक काप घालावेत. हे सुक्‍या खोबऱ्याचे सारण भरून करंज्या तळून घ्याव्यात. या करंज्या खूप दिवस टिकतात. 


खाजाच्या करंज्या 
साहित्य : खोवलेला नारळ, साखर, वेलची पूड, ४ चमचे तूप, पाऊण वाटी तांदळाची पिठी आणि करंजीच्या लाट्यांसाठी नेहमीसारखे तयार पीठ.
कृती : नेहमीप्रमाणे नारळ खोवून, साखर, वेलचीपूड घालून सारण करून घ्यावे. आपल्या आवडीनुसार कोणत्याही स्वादाचे सारण करून घ्यावे. एका ताटात तूप घेऊन हाताने छान फेटावे. फेटून तूप हलके झाल्यावर त्यात तांदळाची पिठी मिसळून दोन्ही मिळून पुन्हा फेसून ठेवावे. 
याला साट म्हणतात. नेहमीच्या करंजीप्रमाणे रवा-मैदा भिजवून घ्यावा. थोडे सैल भिजवावे. तासानंतर तुपाचा हात लावून पुन्हा मळून घ्यावे. मोठा गोळा घेऊन पोळपाटभर पोळी लाटावी. त्यावर फेटून ठेवलेले साट पसरून लावावे. पोळीची घट्ट वळकटी करावी. त्याचे एक एक इंचाचे तुकडे कापावेत. 
प्रत्येक तुकडा हातात घेऊन दोन्ही बाजूंनी हलके दाब देऊन गोळी करून घ्यावी व नेहमीप्रमाणे लाटून, सारण भरून करंजी करून मंद आचेवर तळावी. या करंजीला छान पदर सुटतात व करंजी अतिशय खुसखुशीत होते. 


तिखटाच्या करंज्यांचे काही प्रकार  

दिवाळीच्या फराळात आपण नेहमी गोडाच्या करंज्या करतो, पण तिखटाच्या करंज्याही खूप खमंग व स्वादिष्ट लागतात. तिखटाच्या करंज्या करण्यासाठी रवा-मैद्याच्या मिश्रणात थोडे मीठ घालून मळून ठेवावे.


बटाटा करंजी : नेहमीप्रमाणे आपल्या आवडीनुसार कांदाबटाट्याची सुकी भाजी करून ते सारण भरून करंज्या कराव्यात व तळून घ्याव्यात. 


मूग करंजी : याचप्रमाणे मोड आलेल्या मुगाचे सारण करून ते भरून करंज्या करता येतील. 


मटारच्या करंज्या : दोन वाट्या मटारचे दाणे मिक्‍सरमधून ओबडधोबड वाटून घ्यावे. २ चमचे तेलाची फोडणी करून त्यात जिरे, हिंग, हळद, ठेचलेली थोडी मिरची घालावी व मटार घालून परतून घ्यावे. वाफ येऊन थोडे शिजल्यावर धनेपूड, मीठ, थोडी साखर घालावी. पुन्हा परतून शिजवावे. शेवटी एका लिंबाचा चमचाभर रस घालून कालवावे. थोडे खोबरे कोथिंबीर घालावे. हे सारण थंड झाल्यावर भरून नेहमीप्रमाणे करंज्या करून तळून घ्याव्यात.


कणसाच्या करंज्या : दोन वाट्या कणसाचे दाणे आणि पाव वाटी भिजवलेली मूगडाळ यांचे मिक्‍सरमधून घट्ट वाटण करून घ्यावे. वाटतानाच त्यात २  हिरव्या मिरच्यांचे तुकडे, थोडा लहान आल्याचा तुकडा घालावा. (आवडत असल्यास थोड्या लसूण पाकळ्या घालाव्यात.) कढईत ३-४ चमचे तेल तापवून मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात तयार वाटण घालून परतून शिजवावे. त्यात चवीनुसार मीठ, साखर व थोडा लिंबूरस घालावा. शिजल्यावर थोडे खोबरे, कोथिंबीर घालावी. सारण कोरडे होऊ द्यावे. गार झाल्यावर हे सारण भरून करंज्या करून तळून घ्याव्यात.

कांद्याच्या करंज्या : दोन मोठे कांदे किसून घ्यावे. त्यांना मीठ लावून तासभर ठेवावे. पाणी सुटेल. मग ते घट्ट पिळून सर्व पाणी काढून टाकावे. कोरडे झालेल्या कांद्याच्या किसात भरपूर ओले खोबरे, कोथिंबीर घालावे. चवीनुसार तिखट, मीठ, थोडी जिरेपूड व चमचा भर लिंबूरस घालावा. हे सारण भरून करंज्या करून तळून घ्याव्यात.


मिश्रभाज्या व चीजच्या करंज्या : ही करंजी ओव्हनमध्ये बेक करून छान तयार होते. त्यासाठी वरची पारी फक्त मैद्याची करावी. २ वाट्या मैद्यात अर्धी वाटी तूप गरम करून घालावे व थोडे मीठ घालावे. हे सर्व प्रथम कालवून घ्यावे व नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून भिजवून, मळून तासभर हा गोळा झाकून ठेवावा व नंतर पुन्हा मळून घ्यावा. फ्लॉवर, बीन्स, गाजर, बटाटा या भाज्या बारीक चिरून शिजवून घ्याव्यात व नंतर निथळून ठेवाव्यात. दुसरीकडे व्हाईट सॉस करण्यासाठी २ चमचे बटरमध्ये १ कांदा बारीक चिरून परतावा. नंतर २ चमचे मैदा घालून परतावे. नंतर वाटीभर दूध घालून सतत ढवळत शिजवावे. गाठी होऊ देऊ नये. मीठ, मिरपूड घालावे व वाटीभर किसलेले चीज घालावे. सर्व मिश्रण दाट घट्ट असावे. हे मिश्रण मैद्याच्या पारीत भरून करंज्या कराव्यात व ओव्हनमध्ये बेक करून घ्याव्यात. 


इंद्रधनुषी करंजी 
साहित्य : दोन वाट्या रवा, २ वाट्या मैदा, मोहनासाठी तूप, आवडीनुसार खायचे रंग, ओल्या नारळाचा चव, साखर, वेलचीपूड.
कृती : रवा आणि मैदा एकत्र करून त्यात तुपाचे मोहन घालून व नंतर पाणी घालून कालवून घ्यावे. त्याचे सहा भाग करावेत. ३ भाग पांढरेच ठेवावेत. एकात खाण्याचा हिरवा रंग, एकात लाल रंग व एकात केशरी वा पिवळा रंग मिसळावा. हे गोळे तासभर ठेवून वेगवेगळे मळून घ्यावेत. नेहमीप्रमाणे ओल्या नारळाचा चव, साखर, वेलचीपूड घालून सारण करावे. दुसरीकडे ताटात ४-५ चमचे तूप फेटून त्यात वाटीभर तांदळाची पिठी घालून पुन्हा खूप फेटून घ्यावे. असे 'साट' करून घ्यावे. प्रथम मळून ठेवलेल्या गोळ्यांपैकी एक पांढरा गोळा घेऊन पोळपाटभर मोठी पोळी लाटावी. त्यावर फेटलेले तूपपिठीच्या साट्यापैकी थोडे लावावे. त्यावर एक रंगीत पोळी लाटून पसरावी. पुन्हा तूपपिठीचे थोडे साट लावावे. पुन्हा पांढरी पोळी, पुन्हा फेटलेली तूपपिठी, पुन्हा दुसऱ्या रंगाची पोळी असे करून सर्वांत शेवटी एकावर एक ठेवलेल्या पांढऱ्या व रंगीत पोळ्यांची घट्ट वळकटी करून घ्यावी व त्याचे अर्धा इंचाचे तुकडे कापावेत. प्रत्येक तुकड्यात सर्व रंगाचे थर आले असल्याची खात्री करून घ्यावी. नंतर प्रत्येक तुकडा घेऊन त्याचे पदर दिसतात, ती बाजू पोळपाटाकडे ठेवून पुरी लाटावी. नेहमीप्रमाणे सारण भरून करंजी नीट बंद करून आचेवर तळावी. ही इंद्रधनुषी करंजी फार आकर्षक दिसते.


नूडल्सच्या करंज्या 
या करंज्याही बेक करावयाच्या असल्याने वरीलप्रमाणे पारीसाठी मैद्याचे मिश्रण मळून ठेवावे. आपल्याला हव्या त्याप्रमाणे हाक्का नूडल्स घेऊन भरपूर पाणी घालून शिजवाव्यात. नंतर चाळणीत निथळून, वर थंड पाणी ओतावे म्हणजे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. दुसरीकडे २ चमचे तेलात ७-८ लसूण पाकळ्या बारीक चिरून परतावे. सिमला मिरची, बीन्स, गाजर यांचे छोटे तुकडे थोडे थोडे घेऊन तेलात मोठ्या आचेवर भरभर परतावे. नंतर मीठ, नूडल्स, १ चमचा सोया सॉस, एक चमचा चिली सॉस व २ चमचे टोमॅटो सॉस घालून सर्व हळुवारपणे एकत्र करावे. थंड झाल्यावर हे नूडल्सचे मिश्रण भरून करंड्या कराव्यात व ओव्हनमध्ये छान गुलाबी रंगावर बेक करून घ्याव्यात. मुलांना निश्‍चितच आवडतील.

संबंधित बातम्या