पौष्टिक सूप आणि चवदार आमटी

उषा लोकरे 
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी फराळ
छोटीशी भूक भागवण्यासाठी आणि सर्वप्रकारच्या भाज्या पोटात जाण्यासाठी सूप हा उत्तम पर्याय आहे; शिवाय कडधान्यांपासून केलेली आमटीही तेवढीच पौष्टिक असते... अशाच काही सूप आणि आमटीच्या रेसिपीज... 

मशरूम सूप 
साहित्य : एक पॅकेट फ्रेश मशरूम्स (२५० ग्रॅम), २ कांदे बारीक चिरून, ४-५ लसणाच्या पाकळ्या ठेचून, २ मॅगी व्हेज क्‍यूब्ज (ऐच्छिक), १ चमचा बटर, २ कप दूध, ५ कप पाणी, कॉर्नफ्लोअर, मीठ व मिरपूड, साखर. 
कृती : मशरूम्स थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवावे व नंतर स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्यावेत. त्याचे बारीक तुकडे कुसकरून करावेत. कढईत लोणी वितळवून त्यात कांदा व लसूण थोडे परतून घ्यावे. त्यात नंतर मशरूम्सचे तुकडे परतावे व शिजवावे. (थोडे तुकडे वेगळे ठेवून घ्यावे व ते तयार सूपमध्ये घालावे.) मशरूम्सचे मिश्रण मिक्‍सरमधून अगदी एकजीव करून काढावे. एका भांड्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात मॅगी क्‍यूब्ज विरघळून घ्यावे. या उकळत्या मिश्रणात मशरूम्सचे एकजीव मिश्रण घालून मिश्रण ढवळावे. त्यात दूध घालावे व सूप उकळावे. २ चमचे कॉर्नफ्लोअर, पाव कप पाण्यात कालवून वरील सूपमध्ये घालावे व घट्टसर सूप करावे. उकळत असताना मीठ, मिरपूड व चवीला १ चमचा साखर घालावी. शेवटी उकळत्या सूपमध्ये मशरूम्सचे बारीक तुकडे घालून सर्व्ह करावे. 


पोटॅटो नट सूप  
साहित्य : दोन बटाट्याच्या पातळ चकत्या, १ कांदा बारीक चिरून, ४ पातीचे कांदे पातीसकट चिरून, ४-५ सेलरी काड्या, २०० ग्रॅम क्रीम, १ टेबलस्पून बटर, मीठ, मिरपूड, १ चीज क्‍यूब किसून, १५-२० बदामाचे थोडे भाजलेले तुकडे, थोडे किसमीस/सीडलेस द्राक्ष. 
कृती : कढईत बटर गरम करून त्यात कांदा व पातीचा कांदा परतून घ्यावा. नंतर त्यावर सेलरी घालून परतावी. शेवटी बटाटे परतावे व ५ कप पाणी घालून शिजवून घ्यावे. मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व गाळून घ्यावे. खूप उकळून त्यात ३/४ क्रीम फेटून मिसळून घ्यावे. मीठ व मिरपूड मिसळावी. उरलेले क्रीम, किसलेले चीज, बदामाचे तुकडे व किसमीस घालून सर्व्ह करावे. 


मिलॅनीज सूप 
स्टॉकसाठी : तीन बटाटे, ३ कांदे, ३ टोमॅटो, ७ कप पाणी. 
साहित्य : एक बारीक चिरलेला कांदा, १ कप बारीक चिरलेला कोबी, १ चिरलेला टोमॅटो, १ टेबलस्पून उकडलेली मॅकरोनी, १ कप शिजवलेला राजमा, अर्धा कप टोमॅटो सॉस, १ टेबलस्पून बारीक चिरलेली तुळशीची पाने, मीठ, मिरपूड, २ कप किसलेल्या चीज क्‍यूब्ज, २ टेबलस्पून रिफाइंड तेल. 
कृती : तेल गरम करून त्यात कांदा परतावा. नंतर कोबी परतावा. स्टॉक करण्यासाठी कांदे, बटाटे, टोमॅटो बारीक चिरून कुकरमध्ये शिजवून घ्यावे व मिश्रण मिक्‍सरमधून एकजीव बारीक करून काढावे. त्यात पाणी घालून स्टॉक करावे. हा स्टॉक परतलेला कांदा, कोबी मिश्रणात मिसळावा. टोमॅटोच्या फोडी घालून मिश्रण उकळावे. त्यात मॅकरोनी, राजमा व टोमॅटो सॉस, तुळशी पाने, मीठ व मिरपूड घालून उकळावे. किसलेले चीज घालून गरम सूप सर्व्ह करावे. (बेक्ड‌ बीन्सचा डबा असल्यास ती राजमा व टोमॅटो सॉसऐवजी घालावी.) 


कॉर्न सूप  
साहित्य : पाऊण कप स्वीटकॉर्न, १ बारीक चिरलेला कांदा, ३ कप दूध, ३ कप पाणी, दीड चमचा मैदा, १ टेबलस्पून लोणी, मीठ, मिरपूड, २ अंड्यांचा पांढरा बलक. 
कृती : दूध आणि पाण्याच्या मिश्रणात मैदा मिसळून पेस्ट करावी. लोणी गरम करून त्यावर कांदा परतावा. त्यावर स्वीटकॉर्न परतावे. मिश्रण मिक्‍सरमधून थोडे भरडच काढावे. हे मिश्रण वरील मैद्याच्या मिश्रणात घालावे व उकळावे. त्यात मीठ व मिरपूड घालून उकळावे. उकळत्या सुपात अंड्याचा पांढरा बलक फेटून एक धारेने सोडून ढवळत ढवळत मिसळावे. त्यामुळे त्यात श्रेड्स येतील. 
टीप : अंड मिसळल्यावर सूप परत उकळू नये. 


स्वीट अँड सॉअर व्हेज सूप 
साहित्य : सहा कप पाणी, ३ चिकन क्‍यूब्ज, १ बारीक गाजर जाडसर किसून, २ टेबलस्पून लांबसर बारीक चिरलेले फरसबी, २ टेबलस्पून कोबी जाडसर किसून, १ भोंगी मिरची बिया काढून बारीक लांब चिरून, ४ टेबलस्पून पनीरचे तुकडे (चिकनचे शिजवलेले तुकडे), २ अंडी पांढरे बलक फेटून, २ चमचे कॉर्न फ्लोअर. 
सॉससाठी : दोन टेबलस्पून टोमॅटो सॉस, २ चमचे कस्टर शॉयर सॉस, १ चमचा सोया सॉस, २ चमचे शेजवान सॉस, १ चमचा व्हिनेगर, मीठ व तिखट. हे सर्व साहित्य एकत्र करून तिखट स्वीट-सॉअर सॉस करावा. 
कृती : भांड्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात चिकनचे क्‍यूब्ज वितळून घ्यावे. भाज्या मिसळून घ्याव्यात. कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून पेस्ट करावी. ती वरील भाजी मिश्रणात घालावी. सुपात सॉस घालून उकळावे. उकळत्या सूपमध्ये अंड्याचे पांढरे बलक फेटून एकधार सोडून (किंवा झाऱ्यावर बलक घालून सूपमध्ये थेंब पाडावे.) श्रेड्स पाडाव्या व गरमागरम सर्व्ह करावे. 


दालमाखनी  
साहित्य : एक कप शाबूत उडीद (सालीसकट), २-३ टेबलस्पून राजमा, २ चमचे चणाडाळ, २ हिरव्या मिरच्या, अर्धाचमचा बडीशेप, लहान आल्याचा तुकडा एकत्र वाटून गोळी, २ टेबलस्पून तूप, १ टेबलस्पून लोणी/साजूक तूप, १ टेबलस्पून सायीचे दही, अर्धाकप क्रीम, ४-५ बेडगी मिरच्या, कसुरी मेथी ऐच्छिक, २-३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर. 
मसाला : दोन मोठे कांदे बारीक चिरून, १ चमचा आले पेस्ट, १ चमचा लसूण पेस्ट, २ टोमॅटो  
बारीक चिरून, मीठ व तिखट. 
कृती : राजमा व उडीद आदल्या दिवशी वेगवेगळे भिजत घालावे (राजम्यात किंचित सोडा घालावा). त्यात भिजवलेली चणाडाळ मिसळावी. शिजवण्यापूर्वी त्यात मिरची, आले, वाटलेली गोळी घालावी व डाळी चांगल्या मऊ शिजवून घ्याव्यात. कढईत तूप गरम करून त्यावर कांदा चांगला परतून घ्यावा. त्याला आले-लसूण पेस्ट, टोमॅटो घालून चांगले तेल सुटेपर्यंत मसाला परतावा. लोणी, साय, दही घालून मिश्रण उकळावे. त्यात शिजलेल्या डाळी घालून मंद आचेवर शिजवावी. बेडगी मिरच्या व जिरे यांची फोडणी करावी. ती उकळत्या डाळीवर घालावी. कसुरी मेथी असल्यास थोडी कोमट करून त्यात कुस्करावी. डाळ सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर बटर/थोडे क्रीम व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 


राजमा  
साहित्य : एक कप राजमा, अर्धीवाटी दही. 
मसाला : एक चमचा आले पेस्ट, १ चमचा लसूण पेस्ट, २-३ लवंगा व मसाला वेलची, काळी मिरीदाणे व लवंगा. 
तडका : दोन टेबलस्पून वनस्पती तूप, २ बारीक चिरलेले कांदे, २ बारीक चिरलेले टोमॅटो, १ चमचा आले व १ चमचा लसूण पेस्ट, २ चमचे धनेपूड, तिखट, हळद, १ चमचा मसाला, २ टेबलस्पून बटर, साजूक तूप. 
कृती : राजमा किंचित सोडा घालून रात्री भिजत घालावा. त्यात अडीच कप पाणी, आले-लसूण पेस्ट व गरम मसाल्याचे साहित्य (थोडे भरडून) घालावे व प्रेशर कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावे. कढईत तूप गरम करून त्यावर कांदा खमंग परतावा. त्यावर आले-लसूण पेस्ट व टोमॅटो परतावे. धनेपूड, तिखट, हळद घालून मसाला तेल सुटेपर्यंत खमंग परतावा. त्यात दही फेटून घालावे व शिजलेला राजमा मिसळावा. थोडे पाणी घालावे व मीठ घालून राजमा मंद आचेवर उकळावा व घट्टसर करावा. शेवटी गरम मसाला घालावा. सर्व्ह करताना वरून बटर/साजूक तूप व कोथिंबीर घालावी. 


पंचरतन दाल  
साहित्य : प्रत्येकी २ टेबलस्पून सालीसकट मसूर, सालीसकट मूग, सालीसकट उडीद, तुरीची डाळ, चण्याची डाळ. 
मसाला : दोन बारीक चिरलेले कांदे, २ टोमॅटोची प्युरी, अर्धाचमचा बडीशेप पावडर, अर्धाचमचा शहाजिरे, २ चमचे धनेपूड, १ चमचा जिरेपूड, तिखट, मीठ, २ टेबलस्पून वनस्पती तूप, २ चमचे बटर, गरम मसाला, थोडी चिरलेली कोथिंबीर. 
कृती : सर्व डाळी ४-५ तास भिजवून उकळून घ्याव्यात व प्रेशरकुकरमध्ये मऊसर शिजवाव्यात. तूप गरम करून त्यावर शहाजिरे व कांदा परतून घ्यावा. त्यात शिजलेल्या डाळी थोड्या घोटून मिसळाव्यात. मसाले घालून डाळ मंद आचेवर शिजत ठेवावी. त्यातच टोमॅटो प्युरी घालून डाळ चांगली मिसळून घ्यावी. त्याला उकळी आणावी. सर्व्ह करण्यापूर्वी गरम मसाला मिसळावा. वरून बटर व कोथिंबीर घालावी. 


छोकार दाल  
साहित्य : दोनशे ग्रॅम चणा डाळ, ५ हिरव्या मिरच्या, हळद, १ कप नारळाचे तुकडे, १ चमचा आल्याचे बारीक तुकडे, २ चमचे बेदाणे, ४-५ बेडगी मिरच्या, ३ चमचे रिफाइंड तेल (बंगालमध्ये मोहरी तेल वापरतात.), २ तमाल पत्रे, मीठ, तिखट, साखर. 
मसाला : पन्नास ग्रॅम जिरे, ५० ग्रॅम बडीशेप, २५ ग्रॅम मेथी, २५ ग्रॅम मोहरी, २५ ग्रॅम कलौंजी हे सर्व कढईत हलके भाजून घ्यावे व मिक्‍सरमधून पावडर करून घ्यावी. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. 
कृती : डाळ धुऊन हळद, मिरचीचे तुकडे, आल्याचे तुकडे, तमालपत्र घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावी. (गोळा होऊ देऊ नये.) तेल गरम करून त्यात मोहरी, लाल मिरचीचे तुकडे, खोबऱ्याचे तुकडे घालून परतावे. त्यातच शिजलेली डाळ, बेदाणे, साखर, मीठ, चवीला घालावे. २ चमचे वरील मसाला घालून डाळ उकळावी. कोथिंबीर पेरून सर्व्ह करावी. 


मंगलोरी सांबार  
साहित्य : अर्धी वाटी उडीद डाळ, १ हिरवी काकडी खिरा (वाळुक), १ वाटी खोवलेला नारळ, पाव वाटी धने, २ चमचे मेथी, २ चमचे जिरे, दीड चमचे मोहरी, ३-४ लाल मिरच्या, पाव वाटी चिंचेचा कोळ, गूळ, मीठ चवीनुसार. 
फोडणीसाठी : दोन टेबलस्पून तेल, मोहरी, मेथी, २-३ सुक्‍या मिरच्या, कढीपत्ता, २ बारीक चिरलेले कांदे, कोथिंबीर. 
कृती : उडीद डाळ, धने, मेथी, जिरे, मोहरी कोरडेच कढईत परतून घ्यावे व मिक्‍सरमधून पावडर करावी. थोड्या तेलात खोवलेले खोबरे परतून घ्यावे व हे वरील मिश्रणात घालून मिक्‍सरमधून एकजीव बारीक वाटून घ्यावे. खिऱ्याचे पातळ लांबसर तुकडे करून ते चिंचेच्या कोळात शिजवून घ्यावे. त्यात वरील वाटलेला मसाला घालून उकळी आणावी. तेल गरम करून त्यात मोहरी, मेथी, सुक्‍या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, चिरलेला कांदा परतून घेऊन ही फोडणी सांबारात घालावी. १-२ उकळ्या आणून कोथिंबीर छिडकून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या