नवा लाईमलाईट 

इरावती बारसोडे
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

एक काळ असा होता जेव्हा चॅनल फक्त टीव्हीवर दिसायची. पण आता सोशल मीडियावरचा प्रमुख व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्युबवरही कित्येक चॅनल्स आवर्जून बघितली जातात, त्यांना सबस्क्राईब केलं जातं. एवढंच नाही, तर या माध्यमाकडे आता करिअर म्हणून पाहिलं जातंय. 

‘कॅरी मिनाटी कसला क्युट आहे नई...’

‘आशिष चंचलानीचे व्हिडिओज् कसले फनी असतात..’

‘कबिता सिंगच्या रेसिपी बघ. आपल्यालापण करता येण्यासारख्या असतात... किंवा लता वाघच्या चॅनलवर तर मराठी पदार्थ असतात...’

‘आपण लग्नात संगीतचा डान्स ‘टीम नाच’ची कोरिओग्राफी बघून करू. सोपं जाईल...’

हल्ली आसपास या प्रकारची वाक्यं बऱ्याचदा ऐकायला मिळतात. कॅरी मिनाटी, आशिष चंचलानी, कबिता सिंग, लता वाघ, टीम नाच... कोण आहेत हे लोक? ‘जनरेशन झी’ आणि ‘मिलेनियल्स’ना विचारलंत, तर हे सध्याचे नवे स्टार्स आहेत. पण यांना त्यांचं स्टारडम सिनेमे, मालिका या पारंपरिक माध्यमांनी मिळवून दिलेलं नाही, तर सोशल मीडिया आणि विशेषतः ‘यूट्युब’, ‘इन्स्टाग्राम’सारख्या प्लॅटफॉर्मनी मिळवून दिलेलं आहे. भारतातील मोबाईलच्या स्क्रीनवर अंगठा ‘अप ॲण्ड डाउन’ करून सोशल मीडियावर रेंगाळणारा, यूट्युबवर यथेच्छ व्हिडिओज् बघणारा प्रत्येक जण या आणि यांच्यासारख्या आणखी काही यूट्युबर्सना हमखास ओळखतोच! 

काही वर्षांपूर्वी, फार तर दहा-बारा वर्षांपूर्वी म्हणा हवं तर, केवळ चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे कलाकारच लाईमलाईटमध्ये असायचे, त्यांना खऱ्या अर्थानं स्टार म्हटलं जायचं. पण आता नव्या प्लॅटफॉर्मवरून आलेले नवे स्टार्स नव्या लाईमलाईटमध्ये झळकू लागले आहेत. केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकून कोणाला स्टारडम मिळेल, असा तेव्हा कोणी विचार केला असता तर त्याला कदाचित वेड्यात काढलं गेलं असतं. केवळ मनोरंजनाच्या उद्देशानं पोस्ट केल्या जाणाऱ्या व्हिडिओचं स्वरूप आता बदलू लागलं आहे. या माध्यमाकडे नवकलाकार गांभीर्यानं बघू लागले आहेत आणि त्यातूनच स्वतःचं करिअर घडवत आहेत. मालिका, सिनेमामध्ये ब्रेक मिळण्याची वाट न पाहता स्वतःच स्क्रिप्ट लिहून स्वतःची कला लोकांसमोर मांडण्याचं एक उत्तम माध्यम यूट्युबमुळं मिळालं आहे. स्वतःला आवडतील असे विषय मांडण्याची संधी त्यांना मिळते आहे. तसंच आपल्याकडे असलेलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीसुद्धा या माध्यमाचा वापर होतो आहे... आणि बघणाऱ्यांनासुद्धा हे सोईचं वाटू लागलं आहे.

परदेशांमध्ये यूट्युब कल्चर केव्हाच रुजलं होतं. भारतामध्ये ते आत्ता कुठं रुजू लागलंय. यूट्युब हा तसा युनिव्हर्सल व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म, जे सुरुवातीला केवळ मनोरंजनाचं आणि वेळ घावण्याचं माध्यम होतं. पण आता माहिती, ज्ञान, सेल्फ हेल्प, लाइफ स्टाइल अशा अनेक विषयांचे व्हिडिओसुद्धा इथं आहेत. रोज नवीन नवीन विषय घेऊन यूट्युबर्स व्हिडिओ पोस्ट करत आहेत. एक काळ असा होता जेव्हा चॅनल फक्त टीव्हीवर दिसायचे. पण आता यूट्युबवरही कित्येक चॅनल्स आवर्जून बघितली जातात, त्यांना सबस्क्राईब केलं जातं. आज कदाचित यूट्युबवर टीव्हीपेक्षा जास्त चॅनल्स असतील आणि त्यांची व्ह्यूअरशिपही त्याच तोडीची आहे!

या माध्यमाकडे आता करिअर म्हणून पाहिलं जातंय कारण यातून हे यूट्युबर्स बक्कळ पैसेही कमावतात. ‘कॅरी मिनाटी’ म्हणून ओळखला जाणारा अजेय नागर हा सध्या भारतातला सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला आणि यातून श्रीमंत झालेला मुलगा आहे. याची दोन चॅनल्स आहेत. एप्रिल २०२०च्या ‘फोर्ब्स ३० अंडर ३० आशिया’च्या यादीमध्ये याचं नाव होतं. गेली दहा वर्षं तो यूट्युबवर कंटेन्ट पोस्ट करतो आहे, कधी कॉमेडी तर कधी रोस्टिंग. त्याचं वर्षाचं उत्पन्न तीन कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं म्हटलं जातं. यामागे त्याचे कष्ट असणार हे नक्कीच. पण मनावर घेतलं तर हादेखील करिअर एक मार्ग असू शकतो याचं हे चांगलं उदाहरण आहे. 

कॅरी मिनाटीबरोबरच ‘भुवन बाम’, ‘आशिष चंचलानी’, ‘टेक्निकल गुरुजी’ म्हणून ओळखला जाणारा गौरव चौधरी, ‘हर्ष बेनिवाल’, ‘एमिवे बन्टाई’ म्हणून ओळखला जाणारा बिलाल शेख, निशा मधुलिका हेदेखील स्टार यूट्युबर्स आहेत. या प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. भुवन बाम, आशिष चंचलानी यांचा कंटेन्ट कॉमेडी असतो, टेक्निकल गुरुजी टेक्नॉलॉजीशी संबंधित व्हिडिओज् पोस्ट करतो. एमिवे बेन्टाई रॅपर आहे, तर निशा मधुलिका शेफ आहेत. यांच्यात साम्य एवढंच आहे, की हे सगळे ‘मोस्ट पॉप्युलर’ आणि ‘मोस्ट अर्निंग’ यूट्युबर्स आहेत. हे सगळेच कोटींच्या घरात सबस्क्रायबर असलेले यूट्युबर्स आहेत. यांचं उत्पन्नसुद्धा घसघशीत आहे. 

एवढ्या प्रचंड संख्येनं असलेले सबस्क्रायबर्स... प्रत्येक व्हिडिओला लाखोंच्या घरात मिळालेले व्ह्यूज...  हजारो कॉमेंट्स... एवढं विशेष असतं काय या व्हिडिओंमध्ये? का फेमस होतात हे लोक... तेही अगदी ‘स्टार’ म्हणावं इतके?

वर उल्लेख केलेल्या यूट्युबर्सव्यतिरिक्त आणखी कितीतरी यूट्युबर्स आणि चॅनल्स आहेत, जे लोक आवर्जून बघतात. कारण या व्हिडिओंमधले विषय रोजच्या जगण्यातले असतात. ‘अरे हा तर आपल्याच मनातलं बोलतोय,’ असं वाटावं इतकं त्या व्हिडिओशी रिलेट करता येतं. यात मित्रांच्या अड्ड्यावर केले जाणारे विनोद असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटना असतात. आपल्यालाही ज्या गोष्टी खटकतात त्यांचं रोस्टिंग केलं जातं. आपल्याला सहज करता येतील अशा रेसिपीज असतात, लाइफस्टाइल हॅक्स असतात आणि आपल्याला प्रेरणा देणाऱ्या ‘मोटिव्हेशनल’ व्हिडिओजही असतात. शिवाय हे सगळंच घरबसल्या वेगळा खर्च न करता बघायला मिळतं. व्हिडिओच्या मधे मधे छोट्या जाहिराती आत्ता सुरू झाल्या, पण त्यावरही यूट्युब प्रीमियमचा पर्याय यूट्युब आपल्याला देतच असतं. त्यातही या व्हिडिओज लोकांचा अटेंशन स्पॅन लक्षात घेऊन केल्यामुळे कमी वेळाचे असतात. पटकन बघून होतात. ज्यांची लोकप्रियता अधिक त्यांच्या व्हिडिओमध्ये पेड प्रमोशन्सही बघायला मिळतात. यूट्यूबसारख्या समाज माध्यमांनी भाषेला ‘रोस्टिंग,’ ‘रीलर’, ‘इन्फ्लुएन्सर’ असे काही नवीन शब्दही दिले आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती हे समाजमान्य तत्त्व आपण सगळे अनुभवत असतो. हेच ही मंडळी विनोदाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतात. लग्नामध्ये दिसणारे वेगवेगळ्या स्वभावाचे लोक, परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, ऑफिसमधले सहकारी, बहीण-भावाचं नातं, अतर्क्य नातेवाईक, वेगवेगळ्या सवयींची मित्रमंडळी, दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसणारे शेजारी, असे आसपासचेच लोक गमतीदारपद्धतीनं मांडताना. हे यूट्युबर्स सतत नवनवे प्रयोग करत असतात. स्वतःच्या व्हिडिओमध्ये इतर यूट्युबर्सना पाहुणे म्हणूनही बोलावतात. त्यामुळे एखादा फेमस यूट्युबर दुसऱ्या एखाद्याच्या चॅनलवर दिसला तर आश्चर्य वाटायला नको. बॉलिवूड स्टार्सही यामध्ये सहभागी होतात. 

काही यूट्युबर्स एकापेक्षा जास्त मंडळी दाखवायची तर आणखी तीन-चार लोकांना घेऊन शूट करण्याऐवजी स्वतःच कपडे बदलून, विग घालून, प्रसंगी दाढी मिशी लावून (आणि यात मुलीही मागं नाहीत बरं का!), स्वतःच सगळ्या व्यक्तिरेखा साकारून स्किट करतात. अशा प्रकारे स्किट करणारी यूट्युबर प्राजक्ता कोळीसुद्धा स्टार आहे. ‘मोस्टली सेन’ नावाच्या तिच्या चॅनलवर ती व्हिडिओ पोस्ट करते. सध्या नेटफ्लिक्सवर सुरू असलेल्या ‘मिसमॅच्ड्’ या सीरीजमध्येही ती काम करते आहे. ‘बीबी की वाइन्स’ चॅनल चालवणारा भुवन बाम हासुद्धा स्टारडम मिळालेला आणखी एक यूट्युबर. हासुद्धा स्वतःच वेगवेगळे गेटअप्स करून वेगवेगळी कॅरॅक्टर्स निर्माण करतो. अगदी आत्ताच त्यानं ‘ढिंडोरा’ नावाची स्वतः तयार केलेली वेबसीरीज रीलीज केली आहे. या सीरीजमध्ये तो एकटा नऊ भूमिका करतो आहे. भूवन बाम हा सध्याचा फॉलोअर्स आणि कमाईच्या दृष्टीनं आघाडीचा यूट्युबर मानला जातो. 

हे झालं कॉमेडीचं! स्वयंपाकाशी संबंधितसुद्धा अनेक चॅनल्स आणि यूट्युबर्स गाजतायत. कबिता सिंगचं ‘कबिताज् किचन’, यमन अगरवालचं ‘कुकिंगशुकिंग’, लता वाघ यांचं मराठी पदार्थाच्या रेसिपीज शिकवणारं ‘लताज् किचन’ यांच्या चॅनल्सना व्ह्यूअर्सची चांगली पसंती मिळते आहे. भ्रमंती हा आणखी एक लोकांच्या आवडीचा विषय. ‘नोमॅडिक इंडियन’, ‘माउंटन ट्रेकर’, ‘वॉन्डरिंग विथ पेंट’ ही चॅनल्स आपल्याला अनेक ठिकाणी फिरवून आणतात. मराठीमध्ये ‘भाटुपा’, अर्थात ‘भारतीय टुरिंग पार्टी’ हे चॅनलसुद्धा असंच व्हर्च्युअल भटकंती घडवतं. भाटुपाचं पॅरेंट चॅनल असलेलं ‘भाडिपा’ म्हणजेच, ‘भारतीय डिजिटल पार्टी’नंसुद्धा सबस्क्रायबर्सचा दहा लाखांचा टप्पा नुकताच पार केला. 

‘टिकटॉक’ हेदेखील असंच एक समाज माध्यम, जिथं कोणीही येऊन काहीही पोस्ट करू शकतं. भारतामध्ये टिकटॉकवर बंदी आहे, पण भारतात बंदी येण्याआधीपासून या माध्यमातून भारतात आणि भारताबाहेरही अनेक टिकटॉकर्स या नव्या लाईमलाईटमध्ये न्हाऊन निघताहेत. तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता अफाट आहे. म्हणूनच आता चक्क हॉलिवूडची नजरसुद्धा या ‘स्टार्स’कडे वळली आहे. ‘अॅडिसन रे’ म्हणून ओळखली जाणारी रे एस्टर्लिंग आणि चार्ली डमॅलिओ या टिकटॉकवरील प्रचंड फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर्स आहेत. त्यांना आता चित्रपट आणि टीव्हीसाठी विचारणा होत आहे. केवळ वीस वर्षांच्या अॅडिसन रेचे टिकटॉकवर साठेआठ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचा ‘ही‘ज ऑल दॅट’ नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर आलासुद्धा! 

गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये टाइमपास म्हणून व्हिडिओ पोस्ट करणारा असाच एक युझर आख्ख्या जगात फेमस आहे. खाबिन लामे हे त्याचं मूळ नाव. त्याला ‘खाबी’ म्हणूनच लोक जास्त ओळखतात. त्यानं टिकटॉक डाउनलोड केलं, तेव्हा तो कोरोना काळात नोकरी गेलेला आणि म्हणून पुन्हा आई-वडिलांच्या आश्रयाला गेलेला एक बेरोजगार होता. असाच काहीतरी टाइमपास करायचा म्हणून त्यानं स्वतःचे काही व्हिडिओ पोस्ट केले. सुरुवातीला डान्स, कॉमेडी केल्यानंतर त्यानं ‘लाइफ हॅक्स’ म्हणून पोस्ट केल्या जाणाऱ्या व्हिडिओज्‌ची थट्टा करायला सुरुवात केली आणि त्यातून त्याचं करिअरचं घडलं. त्याच्या प्रत्येक व्हिडिओची स्टाइल ठरलेली असते. टिकटॉकर दाखवत असलेल्या गुंतागुंतीच्या लाइफ हॅकसाठी खाबी एकदम स्वाभाविक आणि ‘लॉजिकल’ पर्याय सांगतो, तळहात वर करतो आणि इंग्रजीत ‘डह्’ (Duh) म्हणतात ना, तसे भाव चेहऱ्यावर आणतो; आणि नंतर किती साधं होतं हे आणि तुम्ही काय करत होता, अशा अर्थानं मान हलवतो. 

गंमत म्हणजे त्याच्या व्हिडिओमध्ये तो एक शब्दही बोलत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे भावच सर्वकाही बोलून जातात. खरंतर तो जे काही करतो ते अगदी स्वाभाविक असतं आणि आपणही असेच रिअॅक्ट झालो असतो. पण खाबीचे ‘Duh’वाले भाव लोकांना आवडले आणि खाबी स्टार झाला. आज त्याचे ११४ मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि तो टिकटॉकवर दुसऱ्या नंबरवर आहे. सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तो म्हणतो, ‘मी लाइफ हॅक्सचे हे व्हिडिओ पाहिले आणि त्यात सहजता आणावी ही कल्पना मला आवडली. जेश्चर ठरवून केलेलं नव्हतं पण एक शब्दही बोलायचा नाही हे ठरवलं होतं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं होतं आणि त्यासाठी हाच उत्तम मार्ग वाटला.’ लॉकडाउनच्या काळात लोकांना हसवायचं म्हणून हे सुरू केलं असं तो सांगतो. गेल्या वर्षभरात त्यानं लोकांना हसवता हसवता आता नेटफ्लिक्स, इटालियन फूड कंपनी बारिला आणि इंडियन ड्रीम११ यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर भागीदारी केली आहे. 

‘ग्लॅमर’ची पारंपरिक व्याख्या या यूट्युबर्सनी आता बदलली आहे. कलाकार म्हणून साधारण समाजमान्यता मिळायला तुम्हाला अभिनय, नृत्य यायलाच हवं, ह्या समजाला या मंडळींनी कुठंतरी धक्का दिलाय, पण हां, तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी- कल्पकता आणि उत्तम प्रेझेंटेशन स्किल्स मात्र हवीतच. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो जबरदस्त कन्टेट! हे सगळं गणित जमलं तर आकडेमोडीसारखा क्लिष्ट आणि अवघड विषयसुद्धा लोक आवर्जून बघतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सीए रचना रानडे यांचं फायनान्सशी निगडित असलेलं चॅनल. लोकांना सांगण्यासारखं, दाखवण्यासारखं असेल तर लोकांनाही ते बघायचं आहे, मग विषय काहीही असो! थोडक्यात काय, मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, त्यातून करिअर घडवायचं असेल तर यूट्युबसारखे प्लॅटफॉर्म आहेत. पण त्यासाठी मेहनत करायची तयारी, चिकाटी असावी लागते. आज ज्यांना आपण स्टार म्हणतोय ते गेली कित्येक वर्षं सातत्यानं हेच करतायत. त्यांनाही रिजेक्शन, ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. लोक जेवढे डोक्यावर उचलून घेतात, तेवढेच किंवा त्याहीपेक्षा जास्त ट्रोलही करतात. यातील काहींची सुरुवात खाबीसारखी अपघातानं झाली असेल आणि नंतर स्टारडम मिळालंही असेल. पण ते स्टारडम टिकवणं हे या नव्या लाईटलाईटमधल्या नव्या चेहऱ्यांसमोरचं खरं आव्हान असेल...!

संबंधित बातम्या