‘... मोठा पल्ला गाठायचाय!’

लेखादिव्येश्वरी चंद्रात्रे
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

-

मी  ‘यूट्युब’चा प्रवास सीएच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला होता. २०१९मध्ये सीए आणि एमबीए हे विषय सोडून काही तरी वेगळं करून बघावं, असा विचार आला. त्यावेळी मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी शेअर मार्केट या विषयावर लेक्चर सीरीज घेतली होती. ती पूर्ण सीरीज मी रेकॉर्ड केली. ते रेकॉर्डिंग माझ्या काही विद्यार्थ्यांनी बघितलं आणि त्यांना आवडलं. त्यावर त्यांनीच सुचवलं, ‘ही सीरीज तुम्ही यूट्युबवर का नाही टाकून बघत.’ त्यानंतर मीदेखील विचार केला आणि यूट्युबवर माझा पहिला व्हिडिओ फेब्रुवारी २०१९मध्ये पोस्ट केला. अगदी योगायोगानं ही सुरुवात झाली. यूट्युबर होण्याचा माझ्या काही विचार नव्हता.  

यूट्युब मनोरंजनासाठी सुरू झालं असलं, तरी आता यूट्युबचं रूप खूप बदलतं आहे. शिक्षणासाठीदेखील लोक त्याचा वापर करत आहे. यूट्युबमध्ये झालेला हा बदल नक्कीच चांगला आहे. विविध विषयांबद्दल माहिती आणि शिकण्यासाठी त्याचा वापर होतो आहे. यूट्युब स्वतःदेखील त्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यांनी एक नवीन टर्म सुरू केली आहे, त्यानुसार आता यूट्युब न म्हणता एड्युट्युबर(EduTuber) असा शिक्षण देणाऱ्या यूट्युबरचा उल्लेख होतो आहे.  

स्टॉक मार्केट हा विषय थोडा रूक्ष आहे. त्यामुळे या विषयात लोकांचा रस वाढवा या दृष्टीनं मी मनोरंजन आणि शिक्षण या दोन्हीच्या मिश्र स्वरूपानं व्हिडिओ करत असते, त्यासाठी कधी विनोद करते, तर कधी बॉलिवूड फ्लेव्हर देते. व्हिडिओवर निगेटिव्ह कॉमेंट्सदेखील येतात. सुरुवातीला एक मराठी मुलगी येऊन इंग्रजीत फाडफाड बोलते आणि चार गोष्टी शिकवते, हेदेखील काही लोकांना खटकलं. निगेटिव्ह कॉमेंट्सचा किती विचार करावा आणि त्या मनाला किती लावून घ्याव्या हे ठरवता येणं गरजेचं आहे. त्यांनी खचून न जाता ‘हाथी चले बजार और कुत्ते भोके हजार,’ या चालीवर स्वतःला समजावणं गरजेचं ठरतं.  

माझ्या आयुष्यात यूट्युबमुळे बरेच बदल झाले. पुण्यामधील अनेक लोक ओळखू लागले; बाहेर फिरत असताना अनेक लोक ओळखतात, सेल्फी काढतात तेव्हा छान वाटतं. माझ्या कामाची पोचपावती मिळते. एकदा मी मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा एका काकूंनी मला हाक मारली. आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर त्या म्हणाल्या, ‘मला अपेक्षित नव्हतं आवाज दिल्यावर तू माझ्यासोबत इतक्या गप्पा मारशील. तुझं तीन कोटी फॉलोअर्स असलेलं चॅनल आहे. मला वाटलं तू फक्त हाय-हॅलो करून निघून जाशील, मात्र तू थांबलीस, गप्पा मारल्यास, बरं वाटलं!’ ही जी भावना आहे, ती मला यूट्युबनं दिली. अशी प्रतिक्रिया मिळाली की नकळत अजून हिरिरीनं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.  

माझी आत्ता कुठं सुरुवात झाली आहे, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आज माझ्या प्रेक्षकवर्गामध्ये ८० टक्के पुरुष आणि २० टक्के महिला आहेत. स्टॉक मार्केट, शेअर्स या विषयांमध्ये महिलांची जागरूकता आणि रस वाढणं गरजेचं आहे. त्यांच्यात बुद्धीची नसून आत्मविश्वासाची कमी आहे. यामध्ये बदल होण्यासाठी वडिलांनी त्यांच्या मुलीला आणि नवऱ्यानी आपल्या बायकोला हा विश्वास देणं गरजेचं आहे की तुम्हीदेखील हे निर्णय घेऊ शकता. वीस वर्षांपुढच्या तरुण गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचणं, त्यांना स्टॉक मार्केटबद्दल कळणं गरजेचं आहे. लहान मुलांनाही त्यांच्या पालकांनी पैसे कमवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे कळू देणं आवश्यक आहे. भारतातील एका मुलानं वयाच्या बाराव्या वर्षापासून गुंतवणूक केली आणि तो बिलेनिअर झाला, असं उदाहरण जगासमोर यायला हवं. या सर्व गोष्टी शक्य करण्याचं माझं स्वप्न आहे. हेच इथून पुढील प्रवासाचे ध्येय आहे.

- सीए रचना फडके रानडे

शब्दांकन ः लेखादिव्येश्वरी चंद्रात्रे

संबंधित बातम्या