‘आमच्या मनातलं मांडण्यासाठी...’

राजसी वैद्य
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

-

आपण आपलं यूट्युब चॅनल सुरू करावं, ही कल्पना पॉलाला सुचली. मी, पॉला आणि अनुषा ‘भारतीय डिजिटल पार्टी’चे (भाडिपा) फाउंडर आहोत. इंडस्ट्रीमधल्या वातावरणाचं स्वरूप थोडं बदलायला हवं आणि आपल्याला पाहायला आवडतील अशा कथा निर्माण व्हायला हव्यात असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे आम्ही तिघांनी मिळून एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. पण मनासारखं काम मिळालं नाही. तेव्हा आपलं काम, आपला आवाज लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचा आम्ही प्रयत्न करू लागलो. त्यावेळी पॉला म्हणाली, ‘महाराष्ट्राची लोकसंख्या कॅनडाच्या लोकसंख्येएवढी आहे. तिथं जर यूट्युब कल्चर इतकं लोकप्रिय होऊ शकतं, मग आपल्या देशात का नाही?’... आणि मग त्या दिशेनं पावलं उचलली. लोकही ओळखू लागतील आणि जे मोठे शोज, सीरीज करायच्या आहेत त्याही पुढं करता येतील या उद्देशानं ‘भाडिपा’चा जन्म झाला. 

मालिकांच्या पलीकडे जाऊन आम्हाला ज्या छोट्या गोष्टी दाखवायच्या होत्या, त्या प्रेक्षकांना आवडू शकतात यावर सुरुवातीला कोणीही विश्वास दाखवत नव्हतं. त्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टर्स शोधण्यासाठी खूप धडपड करावी लागली. कठीण होतं तरी आम्ही आमच्या कल्पनांवर ठाम राहिलो.

भाडिपा सुरू केल्यावर पहिल्याच आठवड्यापासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. मराठीतले उत्तमोत्तम कलाकार आम्हाला फोन करून त्यांनाही भाडिपाचा भाग व्हायला आवडेल हे सांगू लागले आणि हळूहळू आमच्यावरची जबाबदारी वाढत गेली. सुरुवातीपासूनच एक ट्रॅव्हल, फूड आणि लाईफस्टाईल चॅनल, दुसरा कॉमेडी आणि एन्टरटेन्मेंट चॅनल आणि तिसरा म्युझिक चॅनल अशी चॅनल्स सुरू करायची होती. म्युझिक चॅनलऐवजी ‘विषय खोल’ सुरू करण्याचं ठरवलं. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींबरोबर चर्चा करून त्या विषयाची माहिती प्रेक्षकांना देतो. ‘भाटुपा’च्या माध्यमातून देशातील वेगवेगळी ठिकाणं, तेथील खाणं, लाईफस्टाईल याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असतो. भाडिपाप्रमाणेच भाटुपा आणि विषय खोल या दोन्ही चॅनल्सनाही प्रेक्षकांकडून तितकंच प्रेम मिळतं आहे. यूट्युबर झाल्यानंतर आमचं आयुष्य एकदम बिझी झालं. सतत नवीन काय करायचं हे आमच्या डोक्यात असतं. शूटिंगच्या डेट्स लागलेल्या असतात. आम्ही सतत आमचा फोन बघायला लागलो. कधीकधी वाटतं की फोन बाजूला ठेवावा, पण आपण ज्या क्षेत्रात आहोत त्यातले ताजे अपडेट्स, ट्रेंड्स बघणं हेही तितकंच महत्त्वाचं असल्यानं आता या अॅडिक्शनला काही पर्याय नाही. 

हल्ली प्रत्येकालाच आपली मतं मांडण्याची घाई असते. यूट्युब, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ सुरू असताना मधेच लोकं आपली प्रतिक्रिया देतात, काही वेळा ट्रोल करतात. तेव्हा व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे हे आम्ही प्रेक्षकांना बघायला सांगतो. त्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात येऊन ते आमची माफी मागतात. असं अनेक वेळा घडलं आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्यात ट्रोलिंग हा विषय त्या कामाचाच भाग आहे असं आम्ही समजतो. त्यामुळे कोणत्या कमेंटवर किती व्यक्त व्हायचं हे एकदा लक्षात आलं की त्याचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला आम्ही संयम बाळगण्याचा आणि आपल्याला कामात सातत्य ठेवण्याचा सल्ला देऊ. 

यूट्युबकडे मनोरंजनापलीकडे ज्ञान मिळवण्याचा स्रोत म्हणून आज पाहिलं जातंय. सगळ्या वयोगटातील लोकं त्यांना एखादी गोष्ट अडली की त्यावर आधारित यूट्युब व्हिडिओ बघतात. त्यामुळे भविष्यात फक्त मनोरंजनच नाही तर आपल्या बुद्धिमत्तेत भर घालण्याचंही काम यूट्युब करणार आहे हे नक्की!

- सारंग साठये, संस्थापक, भाडिपा

(शब्दांकन ः राजसी वैद्य)

संबंधित बातम्या