‘उभय देशातील संबंध असेच राहावेत...’

अनंत बागाईतकर
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

कव्हर स्टोरी

बांगलादेश मुक्तिसंग्राम, बांगलादेश स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि बांगलादेशाचे निर्माते, राष्ट्रपिता ‘बंगबंधू’ शेख मुजिबुर रहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष असा सुयोग यावर्षी (२०२१) जुळून आला आहे. त्यानिमित्त बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त मुहम्मद इम्रान यांची विशेष मुलाखत...

बां गलादेशाचे भारतातील उच्चायुक्त मुहम्मद इम्रान यांना पुण्याची माहिती आहे. बांगलादेश प्रशासनात त्यांच्या पर्यावरणविषयक संचालक म्हणून जबाबदारी असताना काही वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यातील नदी व जलविषयक संशोधन संस्थेला भेट दिली होती. बांगलादेशाला महापुरांच्या संकटाशी सदोदित सामना करावा लागत असल्याने त्यासंदर्भात ते अध्ययनासाठी आले होते. त्यावेळी संस्थेने यमुना नदीच्या पुराबाबत एक मॉडेल तयार केले होते. त्या मॉडेलमध्ये संशोधकांनी यमुना नदीच्या प्रवाहाच्या वेगाने पाणी सोडून त्याच्या परिणामांचे अध्ययन केले होते. ते प्रात्यक्षिक पाहून आपण प्रभावित झालो होतो अशी आठवण त्यांनी सांगितली. अलीकडेच त्यांनी मुंबईबरोबरच लोणावळा-खंडाळा या पर्यटनस्थळांना भेट दिली आणि पावसाळ्यात त्या परिसरातील ‘नभ उतरु’ निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला होता. त्यांच्याशी मारलेल्या या खास गप्पा..

बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि भारताची त्यामधील भूमिकेविषयी सांगाल... 
मुहम्मद इम्रान : आमचे राष्ट्रपिता, ‘बंगबंधू’ शेख मुजिबुर रहमान हे गेल्या शतकातील एक वलयांकित नेते होते आणि तेच स्वतंत्र व सार्वभौम बांगलादेशाचे निर्माते व शिल्पकार होते. प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी हे त्यांच्या ठाम व निर्णायक नेतृत्वाचे प्रमुख गुण होते व कोणतीही तडजोड न स्वीकारण्याच्या त्यांच्या नेतृत्वामुळेच बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले. आपला देश आणि देशवासीयांबद्दलच्या त्यांच्या निस्सीम प्रेमामुळेच बांगलादेशातील जनतेने त्यांना स्वयंस्फूर्तीने ‘बंगबंधू’ ही पदवी दिली. २६ मार्च १९७१ रोजी बांगलादेशाचा कब्जा केलेल्या सेनेने निरपराध-निःशस्त्र अशा सामान्य जनतेचा नरसंहार सुरू केला. बंगबंधूंना ते सहन होणे कदापि शक्‍य नव्हते. त्यांनी बांगलादेश स्वातंत्र्याची घोषणा केली आणि मुक्तिसंग्राम सुरू झाला. मुक्तिसंग्राम नऊ महिने चालला. या काळात असंख्य निरपराध लोकांचे बळी गेले, रक्ताचे पाट वाहिले. नऊ महिन्यांनंतर १६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेश स्वतंत्र झाला. 

यावर्षी आम्ही आमच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे साजरी करीत आहोत. बंगबंधूंचे हेच जन्मशताब्दी वर्षही आहे, हा एक विशेष योगायोगाचा भाग आहे. त्यामुळेच बांगलादेशात हे ‘मुजिब वर्ष’ म्हणूनही मानले जाते. त्याचबरोबर बांगलादेश व भारतादरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापनेस पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने त्याचा सुवर्णमहोत्सवही आम्ही साजरा करीत आहोत. 

सन १९७१मधील बांगलादेश मुक्तिसंग्रामातील भारताचे, तत्कालीन भारत सरकार आणि भारतीय जनतेने दिलेल्या योगदानाचे बांगलादेश कृतज्ञतेने स्मरण करतो. भारताने व भारतातील जनतेने आम्हाला नैतिक पाठिंबा दिला आणि साधनसामग्रीची मदतही केली. बांगलादेशाच्या सुमारे एक कोटी निर्वासितांना भारताने आश्रय दिला होता. बांगलादेश मुक्तिसंग्रामातील अंतिम विजयाची प्रतीक्षा न करता भारताने ६ डिसेंबर १९७१ रोजीच बांगलादेशाला अधिकृत मान्यता देऊन बांगलादेशाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केल्याची घोषणा केली होती. बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात आमच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या भारतीय सैनिकांना, तसेच या मुक्तिसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांना आम्ही कृतज्ञ श्रद्धांजली वाहतो. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी एप्रिल २०१७मधील भारतभेटीत बांगलादेश मुक्तिसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला होता. या सैनिकांनी त्यांच्या प्राणांची आहुती देऊन केलेल्या सर्वोच्च बलिदानाची ती कृतज्ञ पावती होती. भारतीय जवानांच्या हौतात्म्य व बलिदानाचा सन्मान करण्यासाठी बांगलादेशात विशेष स्मारक उभारण्यात येत असून नुकतीच त्याची आधारशिला ठेवण्यात आली आहे. आमच्या न्याय्य लढ्यात साथ देणाऱ्या जगातील सर्व मित्रांबद्दल बांगलादेशाने नेहमीच कृतज्ञतेची भावना राखलेली आहे. बांगलादेशाच्या या मित्रांचा आम्ही विशेष सन्मान केलेला असून त्यातील बहुसंख्य भारतीय आहेत. 

बांगलादेश मुक्तिसंग्रामात भारतातील जनता आणि भारत सरकार यांनी दिलेल्या अमूल्य योगदानातूनच उभय देशात भावनिक संबंध निर्माण झाले आहेत. भारत व बांगलादेशादरम्यानच्या द्वीपक्षीय संबंधांचा तो मजबूत पाया असल्याचे आम्ही मानतो. ‘१९७१ची ती भावना’ आमच्या टिकाऊ व मजबूत द्वीपक्षीय संबंधांसाठी सदैव मार्गदर्शक राहणार आहे, अशी आमची ठाम धारणा आहे. 

भारत व बांगलादेशादरम्यानचे प्रारंभिक संबंध आणि बंगबंधूंनी या संबंधांचा घातलेला पाया यावर प्रकाश टाकू शकाल?

मुहम्मद इम्रान : बांगलादेश व भारतादरम्यानच्या सौहार्दपूर्ण संबंधांचा पाया राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांनी घातला. त्यांनी भारतीय नेतृत्वाबरोबर निकटचे व व्यक्तिगत संबंध प्रस्थापित केले. त्यातूनच परस्परहितासाठी अत्यंत निकटच्या आणि सहकार्याच्या संबंधांची चौकट तयार करण्यात आली. संवादाच्या माध्यमातून अनिर्णित मुद्यांच्या सोडवणुकीचा निर्णय त्यांनी केला. त्याचबरोबर भविष्यातील सहकार्य व भागीदारीचे मुद्दे व विषयही त्यांनी निश्‍चित केले. पाकिस्तानी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ढाक्‍याला जाताना बंगबंधू दिल्लीत थांबले (१० जानेवारी १९७२) होते. त्यांची पहिली परदेश भेट भारतालाच होती. ६ ते ८ फेब्रुवारी १९७२ला त्यांनी कोलकता येथे भेट दिली आणि भारत सरकार व जनतेने दिलेल्या साथीबद्दल अधिकृत व औपचारिक कृतज्ञता व्यक्त केली. या भेटीच्या पाठपुराव्यादाखल तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशास भेट दिली (१७-१९ मार्च १९७२). उभय देशांच्या नेत्यांच्या या भेटींदरम्यान व्यापार, नदी-जलवाटप, भू-सीमा रेखांकन आणि सांस्कृतिक मुद्दे यासंबंधीच्या सहकार्याबाबत अनेक करार करण्यात आले आणि तोच द्वीपक्षीय संबंधांचा पाया ठरला. १५ ऑगस्ट १९७५रोजी बंगबंधूंच्या दुर्दैवी हत्येमुळे या प्रक्रियेला मोठा धक्का बसला आणि उभय देशातील फलदायी सहकार्य विकसित होण्याच्या प्रक्रियेची ती दुर्घटना पीछेहाट ठरली. 

सन १९९६७मध्ये बंगबंधूंच्या सक्षम व कर्तृत्ववान कन्या शेख हसीना सत्तारूढ झाल्यानंतर त्यांनी परस्पर विश्‍वास व सहकार्य निर्माण करण्यात यश मिळविले. गंगा जलवाटपाच्या दीर्घकालीन करारासह त्यांनी अनेक द्वीपक्षीय मुद्यांवर तोडगे काढण्यातही यश मिळविले. २००९मध्ये शेख हसीना यांनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आणि परस्परविश्‍वास आणि सहकार्याची प्रक्रिया पुन्हा पुढे सुरू केली. उभय बाजूंमधील मनोवृत्तीमध्येदेखील त्या अनुषंगाने बदल घडणेही स्वाभाविक होते. परस्परांचे शेजारी असलेल्या आपल्या दोन्ही देशांचे भविष्य अपरिहार्यपणे एकमेकांशी जुळलेले आहे आणि ती बाब लक्षात ठेवूनच त्या संबंधांमध्ये वृद्धी होणे आवश्‍यक आहे हे दोन्ही देशातील लोकांना समजलेले आहे. भौगोलिक समिपता, निकटता आणि जमिनी-वास्तव विचारात घेऊन परस्पर संबंध व सहकार्य मजबूत करण्यानेच दीर्घकालीन लाभ प्राप्त होऊ शकतील याची जाणीवही उभय देशांना आहे. 

राजकीय स्थैर्यानंतर बांगलादेशाने चमकदार प्रगतीचे एक ‘मॉडेल’ कसे विकसित केले? बांगलादेशाच्या आर्थिक यशस्वीतेबद्दल विस्ताराने सांगाल? 

मुहम्मद इम्रान : एकेकाळी बांगलादेशाबद्दल बोलताना गरिबी, नैसर्गिक आपत्ती, मदत-साह्य, देणग्या हे मुद्देच त्यामध्ये प्रामुख्याने येत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. गरिबीशी लढा, महिला सबलीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन याचा एक आदर्श नमुना (रोल मॉडेल) म्हणून बांगलादेशाला विचारात घेतले जाते. अर्थव्यवस्था (मॅक्रो इकॉनॉमी), कृषी, शिक्षण, आरोग्य, दळणवळण व दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत क्षेत्र, वीज आणि ग्रामीण आर्थिक विकास अशा अनेक क्षेत्रात बांगलादेशाने फार मोठी प्रगतीची भरारी मारली आहे. लोकसंख्या वाढ आणि नैसर्गिक आपत्ती व संकटे असूनही बांगलादेशाने अन्न-सुरक्षेच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाखाणण्यासारखी प्रगती केली आहे. मोठमोठ्या प्रकल्पांचा खर्च स्वतःच्या आर्थिक बळावर उचलण्याची क्षमता बांगलादेशाने आता प्राप्त केली आहे. आपल्या स्वतःच्या आर्थिक साधनसंपत्तीतून पद्मा नदीवर बहुउपयोगी-बहुउद्देशीय असा ६.५ किलोमीटर लांबीचा आणि चार अब्ज डॉलर खर्चाचा पूल बांगलादेशातर्फे बांधण्यात येत आहे. खोल समुद्राची बंदरे, मेट्रो रेल्वे, एलएनजी टर्मिनल्स, मोठ्या क्षमतेची वीज निर्मिती केंद्रे असे महा-प्रकल्प बांगलादेशातर्फे स्वखर्चाने केले जात आहेत. यामुळे अनेक मित्र देशांना तसेच विकासातील भागीदारांना गुंतवणुकीच्या संधीही प्राप्त होत आहेत. 

बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार ३५३ अब्ज डॉलर इतका आहे. जागतिक क्रमवारीत आता बांगलादेशाची अर्थव्यवस्था ४१व्या क्रमांकावर आहे. दरडोई उत्पन्न २२२७ डॉलर्स इतके आहे. कोविड-१९ येण्यापूर्वी बांगलादेशाचा विकासदर ८.१५ टक्के होता. २०२०मध्ये कोविड-१९ची साथ सुरू असतानादेखील बांगलादेशाने ५.२४ टक्के विकासदराची नोंद केली. दक्षिण आशियातील हा सर्वाधिक विकासदर होता आणि बांगलादेशाच्या परकीय चलनाची गंगाजळीदेखील उल्लेखनीय म्हणजे ४८ अब्ज डॉलर्स इतकी होती. तयार कपड्यांच्या क्षेत्रात बांगलादेश जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर तांदूळ उत्पादनात बांगलादेशाचा जगात चौथा क्रमांक लागतो.  बांगलादेशाने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी आरोग्य व वैद्यकीय सेवा वितरणाची सुविधा निर्माण केली आहे. त्यामुळे बांगलादेशातील लोकांचे सरासरी आयुष्यमान वाढून ७३ वर्षांपर्यंत पोहोचले आहे. दक्षिण आशियातील अनेक देशांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. औषधनिर्मितीतदेखील बांगलादेशाने आघाडी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित औषधनिर्मिती उद्योगाची उभारणी करण्यात आली असून त्या क्षेत्रात स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट प्राप्त करण्यात यश आले आहे. कोविड साथीच्या काळात बांगलादेशाने उच्च दर्जाच्या कोविड औषधांची निर्मिती करून त्यांचा पुरवठा भारतासह अनेक शेजारी देशांना केला होता. जगात बांगलादेशात उत्पादन करण्यात आलेल्या औषधांना चांगली मागणी आहे. वैद्यकीय शिक्षणाचीदेखील उत्कृष्ट व्यवस्था विकसित करण्यात बांगलादेशाने यश मिळविले आहे. उत्तम वैद्यकीय शिक्षण संस्थादेखील उभारण्यात आल्या आहेत आणि भारतासह अनेक शेजारी देशांमधील विद्यार्थ्यांना या वैद्यकीय संस्था व तेथील शिक्षणाचा लाभ मिळत आहे. 

१९७२ ते २०२० या कालावधीत बांगलादेशातील अन्नधान्य उत्पादन चौपटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढलेले आहे. १९७२मध्ये धान्योत्पादन केवळ एक कोटी टन होते, ते वाढून आता साडेचार कोटी टनांवर गेले आहे. बांगलादेशातील ९० टक्के जनतेला वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोबाईलधारकांची संख्या १६ कोटी आहे. दहा कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. २०१८पासून बांगलादेशाचा स्वतःचा उपग्रह अवकाशात आहे. लवकरच दुसरा उपग्रह सोडण्याची तयारी सुरू आहे. 

२०२१ हे वर्ष बांगलादेशाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरले. एका नव्या अध्यायाची ही सुरुवात आहे. फेब्रुवारी २०२१मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास धोरण विषयक समितीने ‘किमान विकसित देश’ (लीस्ट डेव्हलप्ड कंट्री किंवा अतिमागास देश) या श्रेणीतून बांगलादेशाला ‘विकसनशील देश’ म्हणून बढती देण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या दशकातील अविरत मेहनत, कष्ट, नियोजन याचे फळ म्हणूनच बांगलादेशाच्या या उद्दिष्टप्राप्तीकडे पाहिले जाते. अनेक आव्हानांचा मुकाबला करीत बांगलादेशाची प्रगतिपथावर वाटचाल सुरू आहे. बांगलादेशाच्या वर्तमान नेतृत्वाने हे सिद्ध करून दाखविले आहे की नेमका दृष्टिकोन, प्रबळ इच्छाशक्ती आणि बिनचूक मनोवृत्ती राखल्यास अवघड लक्ष्याचीदेखील प्राप्ती करणे शक्‍य होते. 

बांगलादेश-भारत मैत्री व सहकार्यवृद्धी कशी 

होऊ शकते? 

मुहम्मद इम्रान : भारत-बांगलादेश संबंधांचा सध्या ‘सोनेरी अध्याय’ सुरू आहे. शेजारी राष्ट्रांदरम्यानच्या संबंधांसाठीचा तो एक आदर्श नमुना किंवा वस्तुपाठ (रोल मॉडेल) म्हणून सर्वत्र पाहिला जात आहे. उभय देशांच्या चैतन्यशील पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमधील संबंधांनी एक नवी उंची गाठली आहे. हे संबंध व्यूहात्मक भागीदारीच्या (स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप) पुढे गेले आहेत आणि द्वीपक्षीय सहकार्याशी निगडित बहुतेक सर्व अंगांना स्पर्श करणारे असे ‘बहुस्पर्शी’ झालेले आहेत. २०२० हे वर्ष सर्वांसाठीच अनिश्‍चितता व अस्थिरतेचे होते. तरीही अशा कठीण काळातदेखील उभय देशातील उच्चस्तरीय संवाद व संपर्कात खंड पडला नव्हता. दोन्ही देशांमधील शिखर पातळीवरील प्रत्यक्ष आणि आभासी भेटी सुरू राहिल्या होत्या. 

मैत्रीपूर्ण शेजारी आणि विश्‍वासू भागीदार या नात्याने भारत व बांगलादेशादरम्यान नियमित संवाद, संपर्क सुरू आहे. व्यापार, संपर्क (कनेक्‍टिव्हिटी), जलवाटप, सीमा व्यवस्थापन, सांस्कृतिक सहकार्य यांसारख्या विविध क्षेत्रातील द्वीपक्षीय हिताच्या मुद्यांवर दोन्ही देशात नियमित वार्तालाप सुरू आहे. संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान उत्कृष्ट सहकार्य चालू आहे. २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात १२२ सैनिकांचा समावेश असलेल्या बांगलादेशाच्या सैन्य पथकाने घेतलेला सहभाग हे या निकट सहकार्याचे ठळक उदाहरण आहे. 

बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारताच्या पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आले होते. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिलेल्या या आमंत्रणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकार केला. कोविडकाळानंतर प्रथमच भारताबाहेर त्यांनी हा दौरा केला आणि या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले. सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमांच्या उपस्थितीबरोबरच दोन्ही पंतप्रधानांनी द्वीपक्षीय संबंधांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करून आढावा घेतला. त्याचप्रमाणे कोविड काळानंतरच्या परिस्थितीत भावी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या मुद्यांवरही चर्चा केली. 

भारताबरोबरची मैत्री बळकट करण्यासाठी बांगलादेशातर्फे परस्पर विश्‍वास वृद्धीसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?

मुहम्मद इम्रान : नेतृत्वाच्या तसेच जनतेच्या पातळीवर सहकार्य, विश्‍वास, भरोसा-खात्रीची भावना निर्माण करून इतर देशांसाठी एक उदाहरण निर्माण करण्यात बांगलादेश आणि भारताने यश संपादन केले आहे. उच्चस्तरीय संवाद व संपर्कानंतर अधिकारी पातळीवर त्याचा पाठपुरावा आणि यशस्वी व ठोस अंमलबजावणी यामुळे हे यश प्राप्त झाले. ही प्रक्रिया पुढेही सुरू ठेवावी लागेल. अधिकाधिक उच्चस्तरीय भेटीगाठी तसेच विचारविनिमयातून संवादाची नवी दालने खुली होतील आणि सहकार्याच्या विस्तारासाठी ती उपयुक्त होतील. संवादाच्या द्वीपक्षीय यंत्रणा सदैव सक्रिय राखणे उभय हिताचे आहे. एखाद्या किरकोळ प्रसंग, घटना किंवा अडचणीमुळे गैरसमज निर्माण होणार नाहीत यासाठी उभय देशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे

भारत व बांगलादेशादरम्यानच्या संबंधांचा कशारीतीने विस्तार होऊ शकतो? आपले याबद्दलचे मत! 

मुहम्मद इम्रान : उभय देशांनी व्हिसा जारी करण्यात मोठ्या प्रमाणात सुलभता आणली आहे आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या पातळीवरील संपर्कात अनेकपटीने वाढ झालेली आढळते. यामुळे बांगलादेशातील कारखानदारी क्षेत्र, तसेच सेवा क्षेत्रात अनेक भारतीय काम करीत आहेत आणि बांगलादेशाचे औद्योगिक व सेवा क्षेत्र विकसित करण्यात मदत करीत आहेत. भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक संख्या बांगलादेशाच्या नागरिकांची आहे. दरवर्षी सुमारे वीस लाख पर्यटक बांगलादेशातून भारताला भेट देतात. ही संख्या कोविड साथीपूर्वीची आहे. बांगलादेशातील नागरिकांची क्रयशक्ती किंवा खरेदी करण्याची क्षमता वाढलेली आहे आणि दर्जेदार वस्तू खरेदी करण्याकडे त्यांचा स्वाभाविक झुकता कल असतो. त्यामुळे बांगलादेशातील नागरिक भारतात पर्यटनासाठी येतात आणि भारतीय वस्तू खरेदी करीत असतात. 

व्यापार-उदीम यावर भारत-बांगलादेशादरम्यानच्या संबंधांचा मुख्य भर आहे. दोन्ही देशांमध्ये मध्यमवर्गाचा विस्तार होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे परस्परांकडे असलेल्या दर्जेदार वस्तूंची मागणी वाढते असल्याचे आढळले आहे. परिणामी उभय देशात व्यापार-वृद्धी ही अपरिहार्य ठरते. या उपखंडातील भारत ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर बांगलादेशाने विकासवृद्धीचे ‘इंजिन’ म्हणून स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे उपखंडाच्या विकासवाढीसाठी व शेजारी देशांसाठीही भारत व बांगलादेश मिळून एकत्रितपणे मोठी कामगिरी बजावू शकतात. 

‘नॉलेज इकॉनॉमी ही वर्तमानकाळातली एक महत्त्वाची बाब मानली जाते. माहिती व ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था! बांगलादेशाने हे क्षेत्र विकसित करण्यासाठी आपले सर्व प्रयत्न एकवटण्याचे ठरविले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी बांगलादेशाने आपली लोकसंख्या, माहिती-ज्ञान व बौद्धिकतेच्या आधारे वाढते उपक्रम हाती घेऊन हे क्षेत्र विस्तारण्यास चालना दिली आहे. कारण ही भविष्यातील यशाची गुरुकिल्ली असल्याची बांगलादेशाची धारणा आहे. भारताने या क्षेत्रात अगोदरच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे भावी काळात क्षमतावर्धनाचे पुढाकार घेणे आणि संयुक्त संशोधन प्रकल्प सुरू करणे अपेक्षित आहे. एक विभाग, प्रदेश किंवा उपखंड म्हणून सामूहिक सामर्थ्याचा भावी पाया यामुळे निर्माण होईल अशी बांगलादेशाची भावना आहे. हवामान बदल झपाट्याने घडत आहेत. त्याचा मानवी जीवन व जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होत आहे. हे अप्रिय असले तरी कठोर वास्तव आहे. यासंदर्भात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही देश जागतिक पातळीवर जबाबदारीने भूमिका पार पाडत आहेत. परंतु या समस्येच्या निराकरणासाठी प्रयत्नांची व्याप्ती वाढविण्याची आवश्‍यकता आहे आणि त्यासाठी संयुक्त प्रयत्न अधिक व्यापक करण्यासाठी भारत व बांगलादेशाला परस्पर सहकार्यासाठी भरपूर वाव आहे. 

कोविड-१९ साथीच्या काळात प्रत्येक देशाला सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व विशेषत्वाने पटलेले आहे. राष्ट्रीय व विभागीय सुरक्षिततेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे असल्याची जाणीव देशांना झाली. आरोग्य सुरक्षा विखंडित होण्याची थेट परिणिती आर्थिक आपत्तीत होऊ शकते. या महासाथीचा मुकाबला करण्यासाठी भारत व बांगलादेशाने परस्परांना सहकार्य केले, मदत केली. भविष्यात अशा महाभयंकर संकटापासून या विभागाचा बचाव करण्यासाठी दोन्ही देशांनी मिळून एखादी यंत्रणा विकसित करण्याची आवश्‍यकता आहे असे या निमित्ताने समोर आले आहे. 

बांगलादेश व भारतादरम्यानच्या संबंधांना प्रोत्साहन देण्याचा दृष्टीने तरुणांचा यामधील सहभाग वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. तसेच बौद्धिक पातळीवरील विनिमयातून उभय देशातील भावी संबंध अधिक दृढ होतील. यादृष्टीने उभय देशांनी शिष्यवृत्त्यांमध्ये वाढ, शैक्षणिक आदान प्रदानाच्या संधींची देवाणघेवाण यांचे प्रमाण वाढविल्यास दोन्ही देशांसाठी ते लाभकारक ठरेल. 

भारताकडून बांगलादेशाच्या अपेक्षा काय आहेत? 

मुहम्मद इम्रान : उभय देशातील संबंधांमधील सध्याचा सुवर्ण अध्याय असाच पुढे सुरू कसा ठेवता येईल यासाठी दोन्ही देशांनी निर्धार करणे आवश्‍यक आहे. एकमेकांच्या गरजेच्यावेळी परस्परांना मदत करणे ही यामधील महत्त्वाची बाब आहे आणि ती विसरून चालणार नाही. बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशातून वाहणाऱ्या ५४ नद्या आहेत. म्हणजेच या सामाईक किंवा संयुक्त नद्या आहेत, असे म्हणावे लागेल. या नद्यांच्या पाणीवाटपाचा व जलव्यवस्थापनाचा मुद्दा अतिशय संवेदनशील आणि नाजूक आहे. कारण दोन्ही देशातील धान्यउत्पादन आणि या नद्यांच्या परिसरात राहणाऱ्या लाखो लोकांच्या जीवनाशी थेट भिडणारा हा मुद्दा आहे. यासंदर्भात जे करार प्रलंबित आहेत ते निकाली काढणे आणि पूर्णत्वाला नेणे यास प्राधान्य देण्याची आवश्‍यकता आहे. कारण यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. 

व्यापाराच्या क्षेत्रातही काही गोष्टी प्राधान्याने करण्याची आवश्‍यकता आहे. दोन्ही देशांमधील व्यापार वृद्धीसाठी तसेच त्यात सुलभता आणण्याच्या दृष्टीने त्या आनुषंगिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ लॅंड कस्टम्स स्टेशन्स किंवा लॅंड-पोर्ट्स‌ची उभारणी केल्यास द्वीपक्षीय व विभागीय व्यापाराला मोठी चालना मिळेल. त्याचबरोबर ‘नॉन टॅरिफ बॅरिअर्स’(एनटीबी) आणि ‘पॅरा टॅरिफ बॅरिअर्स’(पीटीबी)चा मुद्दा अग्रक्रमाने सोडविण्याची आवश्यकता आहे. 

बांगलादेशाला सध्या एका मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. म्यानमारमधून बळजबरीने विस्थापित करण्यात आलेल्या बारा लाख नागरिकांना (रोहिंगे) बांगलादेशाने आश्रय दिलेला आहे. भारताचे बांगलादेश व म्यानमार या दोन्ही शेजारी देशांशी चांगले संबंध आहेत. या नागरिकांना म्यानमारमध्ये परत पाठवण्यासाठी भारताने आपले वजन वापरून म्यानमारबरोबर बोलणी करून मदत करावी अशी बांगलादेशाची अपेक्षा आहे. 

दळणवळण किंवा संपर्क यासंबंधीचे मुद्दे चर्चेत आहेत. या क्षेत्रात दोन्ही देशांनी उल्लेखनीय प्रगतीही केली आहे. आणखी काय करण्याची आवश्‍यकता आहे? 

मुहम्मद इम्रान : रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गाने दळणवळणाच्या सुविधांची निर्मिती ही परस्परावलंबी आणि परस्पर लाभकारक संबंधांची उभारणी करण्यातील आधारभूत स्तंभ आहेत. दोन देश आणि एका विभागातील देशांसाठी हे लाभकारक ठरते. अलीकडच्या काळात भारत व बांगलादेशाने जुने दळणवळणाचे मार्ग पुनरुज्जीवित करण्याबरोबरच काही नवीन मार्गही सुरू केले आहेत. यासंदर्भात करण्यात आलेल्या करारांनुसार ईशान्य भारतातील राज्यांकडे जाण्यासाठी भारताला बांगलादेशातील रस्ते आणि जलमार्गांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या मार्गांमुळे प्रवासी वाहतूक वाढणार आहेच, परंतु पर्यटन तसेच व्यापारालाही मोठी सुविधा व चालना मिळणार आहे. यातून लोकांच्या पातळीवरील संपर्कातही मोठी वृद्धी होणार आहे. याच्याच जोडीला बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ यांनी पुढाकार घेऊन विभागीय संपर्कवृद्धीसाठी एक उपविभागीय सहकार्य गट स्थापन केला आहे आणि तो एक महत्त्वपूर्ण पुढाकार ठरणार आहे. 

जागतिकीकरणाच्या या युगात वाढते आर्थिक सहकार्य ही काळाची गरज झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत व बांगलादेश या दोन्ही देशांच्या आर्थिक वृद्धीचा दर सातत्याने उच्च पातळीवर राहिला आहे. दोन्ही देशांच्या या आर्थिक ताकदीचा संयुक्तपणे वापर करून केवळ द्वीपक्षीयच नव्हे परंतु संपूर्ण उपखंडाच्या किंवा या विभागाच्या भरभराटीसाठी केला जाऊ शकतो. 

व्हिसाशिवाय दोन्ही देशातील नागरिक कधी प्रवास करू शकतील? नजीकच्या भविष्यात तशी काही

शक्‍यता आहे? 

मुहम्मद इम्रान : तूर्तास डिप्लोमॅटिक आणि सरकारी पासपोर्टधारकांना विना-व्हिसा प्रवासाची मुभा चालू आहे. अर्थात केवळ सरकारी म्हणजेच अधिकृत कामांसाठीच ही सुविधा उपयोगात आणली जाते. परंतु उभय देशांची वाढती प्रगती, लोकांच्या पातळीवरील वाढता संपर्क या बाबी लक्षात घेता भारत व बांगलादेशादरम्यानच्या प्रवासाबाबतच्या अटी शिथिल करण्याबाबत विचार करावा लागेल. 

उभय देशातील द्वीपक्षीय सहकार्यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने अशा कोणत्या मुद्यांवर भर देण्याची किंवा त्याबाबत आणखी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे ? आपल्या मते असे मुद्दे कोणते? 

मुहम्मद इम्रान : विभागीय सुरक्षितता टिकविण्यासाठी आणि आर्थिक सहकार्यवृद्धीसाठी भारत आणि बांगलादेश या दोघांना परस्परांची गरज आहे. 

दोन्ही देशांची भौगोलिक समिपता लक्षात घेऊन आणि त्याचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी व्यापार वाढविणे व त्यासाठी आवश्‍यक व्यापार अनुकूल पायाभूत सुविधांची निर्मिती करावी लागेल. भारताकडून बांगलादेशात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार गुंतवणूक झाल्यास त्याद्वारे उभय देशात दीर्घकालीन आर्थिक संबंध निर्माण होतील. बांगलादेशाने भारतीय गुंतवणूकदारांसाठी स्वतंत्र असे विशेष आर्थिक विभाग (स्पेशल इकनॉमिक झोन) स्थापन केले आहेत. त्याचा लाभ भारतीय गुंतवणूकदारांनी घेणे अपेक्षित आहे. या विभागात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 

दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी सायबर सुरक्षा आणि आपत्ती प्रतिसाद (डिझास्टर रिस्पॉन्स) या क्षेत्रात सखोल आणि विस्तृत अशा सहकार्याची निकड असून येत्या काळात विशेषत्वाने त्याची गरज भासणार आहे. 

आमचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांनी दाखविलेल्या मार्गाने आणि अधिक चमकदार भविष्याकडे आम्ही वाटचाल करू इच्छितो आणि त्यामध्ये आमचे शेजारी, मित्र देश यांची साथ घेऊन आम्ही ते उद्दिष्ट प्राप्त करू इच्छितो. 

संबंधित बातम्या