प्रवास ऑलिम्पिक पदकापर्यंतचा...

डॉ. आलाप जावडेकर 
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021


कव्हर स्टोरी

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताच्या खेळाडूंनी आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. त्यानिमित्ताने अनेक भावी खेळाडू आणि त्यांच्या पालकांनी ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहिले असेल. म्हणूनच तुमचे मूल उद्या खरेच ऑलिम्पिक पदक आणू शकेल? आणि त्यासाठी पालक अथवा प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय केले पाहिजे? या प्रश्नांची उत्तरे देताहेत ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानूचे फिजिओथेरपिस्ट...

चोवीस जुलै २०२१. टोकियोमध्ये दुपारचे चार वाजत आले होते. उत्कंठेने आख्खा भारत एक इतिहास घडताना बघत होता. मीराबाई चानू निर्धार करून भारोत्तलन मंचावर आली. तिच्या चेहऱ्यावर एक जिद्द होती, आत्मविश्वास होता. तिच्या समोरच्या ११५ किलो वजनाकडे तिने एकदा नीट बघितले. वजनाला नेहमीप्रमाणे वाकून नमस्कार केला आणि एक शेवटचा दृढ निश्चय करून वजन उचलण्यासाठी तिने पाऊल पुढे टाकले. तिच्या समोर दूर प्रेक्षागृहातल्या एका कोपऱ्यात मी जीव मुठीत धरून बसलो होतो. इथवरच्या प्रवासात, आजवर मी फिजिओथेरपिस्ट म्हणून जे काही केले, ते सगळे पणाला लागले होते. मीरा वजन उचलायला वाकली आणि तिने कमालीच्या ताकदीने आणि कौशल्याने क्षणार्धात वजन डोक्याच्या वर उचललेदेखील. बझर वाजला आणि समालोचकाने ‘गूड लिफ्ट’ असे म्हणायच्या आधीच मीराच्या चेहऱ्यावरचे हसू आणि समाधान तिच्या पराक्रमावर शिक्कामोर्तब करत होते. माझ्यासमोर इतिहास घडत होता. मी या इतिहासाचा साक्षीदार होतो. इतक्या वर्षांच्या सगळ्यांच्याच अथक परिश्रमांचे आज चीज झाले होते. त्या क्षणी माझ्या मनात असंख्य विचार गर्दी करू लागले आणि डोळ्यातले पाणीदेखील सगळे निर्बंध सोडून वाहू लागले. मीराबाई चानूने भारतासाठी भारोत्तलन या अवघड खेळात पहिले रौप्यपदक मिळवले होते. २०२०च्या ऑलिम्पिक खेळांच्या पहिल्याच दिवशी इतिहास घडला होता. 

मीराबाई चानूबरोबर मला भारतीय भारोत्तलन संघाचा फिजिओथेरपिस्ट म्हणून टोकियो ऑलिंपिकला जायची संधी मिळाली ती ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ (Olympic Gold Quest - OGQ) या संस्थेमुळे. मी OGQ बरोबर २०१५पासून फिजिओथेरपिस्ट म्हणून ऑलिम्पिक खेळांसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंबरोबर काम करत आहे. गेल्या सात वर्षांत मला (बॉक्सिंग), नेमबाजी, तिरंदाजी, बॅडमिंटन आणि आता भारोत्तलन अशा विविध खेळांतील विश्वविख्यात खेळांडूंबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. फिजिओथेरपिस्ट म्हणून आमचे काम जितके सोपे, तितकेच ते अवघड म्हणता येईल. खेळाडूला इजा होऊ न देणे हे खरेतर सोपे वाटणारे काम वाटत तितके सोपे नाही. खेळाडूच्या शरीरातील बारीक हालचालींपासून ते त्याच्या स्वभावापर्यंत सगळ्याचा आम्हाला एक सतत अंदाज घ्यावा लागतो. रोज सरावामुळे शरीरात झालेले बदल तेव्हाच्या तेव्हा लक्ष देऊन दुरुस्त नाही केले, तर मग ते कधीतरी दुखापतीला निमंत्रण देणारे ठरू शकतात. दरवेळी ते शक्य होतेच असे नाही, पण आमचा प्रयत्न तोच असतो. खेळाडूंकडून सरावाव्यतिरिक्त रोज काही वेळ त्यांच्या खेळासाठी आणि शरीराच्या तंदुरुस्तीसाठी काही ठरावीक व्यायामप्रकार करून घेणे हेदेखील आमचे काम. सरावादरम्यान रोज बदलत्या शारीरिक आणि मानसिक संतुलनामुळे ह्या व्यायामाचे स्वरूपदेखील कधीकधी रोजच्या रोज बदलावे लागते. ऑलिम्पिक खेळांसारख्या शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सर्वकाही पणाला लावणाऱ्या खेळांमध्ये इजा होऊ न देणे, हेदेखील कमालीचे कौशल्याचे, जिकिरीचे आणि अतिशय अवघड आव्हान आहे. विशेषतः भारोत्तलनासारख्या अवघड खेळात, ज्या खेळात कधीही इजा होऊ शकते! या दृष्टीने मी मीराबाई चानूच्या चमूतील फिजिओथेरपिस्ट असताना तिला हे रौप्यपदक मिळाले आणि तिला ते वजन उचलताना तिथे मी बघितले हे मी माझे भाग्य समजतो. तिच्या यशामध्ये माझे तिच्याबरोबरचे काम हा खारीचा वाटा ठरल्याचा मला अभिमान आहे.

 ***

भारतातील क्रीडाक्षेत्र फार जवळून बघायला मिळणे हा एक योगायोगच. बाहेरून जितके हे जग झगमगीत (अथवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये ‘ग्लॅमरस’ म्हणू) वाटते, तितकेच ते कमालीचे खडतर आहे. खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि साहाय्यक या सगळ्यांसाठीच ते अतिशय धकाधकीचे आणि तितकेच थरारकही! ऑलिम्पिकसारख्या खेळांमध्ये यश मिळणे ही अतिशय अद्‍भुत, पण म्हणूनच दुर्मीळ गोष्ट आहे. कित्येक खेळाडूंच्या आयुष्यात अमाप परिश्रम आणि कित्येकदा अगदी अवास्तव पैसे खर्च करूनही ऑलिम्पिकला जायचे नशिबी नसते. असे का होते? २०२४ पॅरिस ऑलिम्पिक खेळांमध्ये कोणाला पदक मिळू शकेल याचा आपल्याला अंदाज लावता येईल का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्याला २०२८ आणि २०३२च्या खेळांसाठी आत्तापासून काय करता येईल, जेणेकरून आपण जास्तीत जास्त खेळांमध्ये पदक मिळवू शकू? असे अनेक प्रश्न सध्या देशातल्या क्रीडा क्षेत्रापुढे आहेत. अगदी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खरे म्हणाल तर हा, की माझा मुलगा/मुलगी किंवा माझा खेळाडू उद्या खरेच ऑलिम्पिक पदक आणू शकतो/शकते का? आणि त्यासाठी पालक अथवा प्रशिक्षक म्हणून मी काय केले पाहिजे? या लेखामार्फत वरील काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न.

‘माझं मूल खूप छान बॅडमिंटन खेळतं. त्याला मला राष्ट्रीय पातळीवर खेळवायचं आहे जेणेकरून तो नॅशनल कॅम्पमध्ये जाऊ शकेल. मी त्यासाठी काय करू शकतो/शकते?’ असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याचे उत्तर देणे सोपे नसते. सगळ्याच पालकांना असे वाटते की त्यांच्या मुलाकडे/मुलीकडे जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आहे. पण ते तितके सरळ नसते. देशासाठी खेळण्यापूर्वी, करोडो लोकांमध्ये अव्वल स्थान मिळवण्याची सर्वप्रथम क्षमता हवी. त्या खेळासाठी लागणारे कौशल्य आपल्या मुलाकडे/मुलीकडे खरेच आहे का, याचा अंदाज पालकांना असण्याची खूप गरज आहे. प्रत्येक बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू होईलच असे नाही, प्रत्येक बॉक्सर मेरी कोम होईलच असे नाही, हे आपण जाणून घेतले पाहिजे. किंबहुना याच कारणासाठी या काही दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या क्षेत्रामध्ये जगात एक अव्वल स्थान प्राप्त केले आहे. पण मग आपण प्रयत्नच करायचा नाही का? तर असे मुळीच नव्हे! आपल्या मुलाला/मुलीला एखाद्या खेळात गती असेल तर अगदी सुरुवातीपासून फार अपेक्षा न करता मुलाला खेळू द्यावे. एखाद्या खेळाडूला वयाच्या बाराव्या वर्षी कदाचित हे कळणार नाही की त्याला हा खेळ व्यावसायिक स्तरावर खेळायचा आहे की नाही; पण इतके नक्की कळू शकते की त्याला तो खेळ खेळायला आवडते की नाही. एक यशस्वी खेळाडू होण्यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या खेळाडूने त्या खेळाच्या प्रेमात पडणे, पालकांनी त्या खेळाच्या प्रेमात पडणे नव्हे! त्या बारा वर्षांच्या खेळाडूने तो ज्या खेळात तरबेज आहे, त्या खेळाच्या प्रेमात पडणे गरजेचे आहे. कोणताही मोठा खेळाडू घ्या, एका यशस्वी खेळाडूला आयुष्यातील साधारण वीस वर्षे, दिवस-रात्र, उठता-बसता अक्षरशः केवळ या खेळाचाच विचार करावा लागतो. अशात जर आपले मूल खूप छान बॅडमिंटन खेळते, पण त्याला बॅडमिंटन खेळायला तितके आवडत नसेल तर त्याने व्यवसाय म्हणून बॅडमिंटन खेळणे योग्य नव्हे. जर त्याला कधीच तो खेळ तितका आवडला नाही, तर त्यात यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असेल. 

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सर्वसाधारणपणे जोवर मूल कमीतकमी अकरा-बारा वर्षांचे होत नाही तोवर आपण खेळाकडे एक विरंगुळा आणि व्यायाम या दृष्टीने बघितले पाहिजे. वयाच्या अकरा-बारा वर्षांपर्यंत मुलांनी वेगवेगळे खेळ खेळले असले पाहिजेत. प्रत्येक खेळातून शरीराला वेगवेगळ्या पैलूंची ओळख होते. उदाहरण द्यायचे झाले, तर लहान वयात खूप वेळ सायकलिंग केल्याने कोणत्याही खेळाला अतिशय महत्त्वाची असणारी श्वसनेंद्रिये आणि रक्ताभिसरण संस्था (Cardiovascular System) खूप प्रगत होऊ शकते. पुढे हा खेळाडू कदाचित सायकल चालवणारही नाही, पण त्याचा फायदा टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, मॅरेथॉनसारख्या अनेक खेळांमध्ये या खेळाडूला होऊ शकतो. त्यामुळे कधीकधी फार लवकर एखादा खेळ व्यावसायिक स्वरूपावर खेळण्याकरिता स्वीकारल्यावर त्या खेळाचा लवकर कंटाळा येणे किंवा चार ते दहा या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीसाठी अतिशय महत्त्वाच्या वर्षांमध्ये बाकीचे खेळ न खेळण्याने क्वचित मुलांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. एखादा खेळाडू एका विशिष्ट खेळात वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी विशेष गती दाखवत असेल, त्याच्या वयोगटातील खेळाडूंमध्ये त्याची तुलना जिल्ह्यात, राज्यात चांगला खेळाडू म्हणून होऊ लागली असेल, त्याला योग्य अशी प्रशिक्षण व्यवस्था अस्तित्वात असेल आणि पुन्हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला तो खेळ खेळणे आवडत असेल तर मग त्याने या खेळाकडे व्यवसाय म्हणून बघायला हरकत नसावी. 

समजा आता सोळा वर्षाचे मूल चांगले खेळत असेल, त्याला आत्तापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला मिळाला असेल, क्वचित राज्यासाठी अथवा देशासाठीदेखील खेळायची संधी त्याला मिळाली असेल, तर मग ऑलिम्पिकसाठी तयारी करण्याची पुढली पायरी कुठली? मुळात या पायरीपर्यंतदेखील आपल्या देशात हजारो खेळाडू पोहोचतात. त्यामुळे आपले सोळा वर्षांचे मूल अगदी सरकारच्या पुढच्या ‘ऑलिम्पिक प्रोबेबल्स्’, म्हणजेच ऑलिम्पिकसाठी वेगळ्या तयारी करणाऱ्या गटात गेले असले, तरीही याचा अर्थ असा नाही की ऑलिम्पिक पदक मिळवण्याची पात्रता त्याच्यात उपजतच आहे. आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडू म्हणून स्वतःचे सतत कौशल्य पणाला लावत राहणे गरजेचे आहे. कोणताही खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत राहण्यासाठी आपल्या दिनक्रमाला एक सातत्य आणण्याची अत्यंत आवश्यकता असते; त्याची सवय या वयापासून लागावी लागते. खेळाचा सराव आहेच पण त्या व्यतिरिक्त, आपल्या खेळाला पूरक असा आहार, दररोज योग्य झोप, खेळासाठी आवश्यक अशा मानसिक आणि शारीरिक तयारीची शिस्त या सगळ्याची सवयदेखील याच वयात लागण्याची आवश्यकता असते. अगदी भन्नाट कौशल्य असलेला खेळाडूदेखील बेशिस्त राहून फार काळ जागतिक दर्जाची कामगिरी करू शकत नाही. एकदा एक खेळ व्यावसायिकपणे खेळायचा ठरवले की एक-दोन वर्षांत या तपश्चर्येची सवय आत्मसात करून घ्यावी लागते. ही सवय जितकी लवकर लागेल तितके आपल्या खेळाप्रमाणे आपल्या शरीराला साजेसे बदल करणे पुढे सोपे जाते. सोळा ते पंचवीस या वयात बऱ्याच खेळांमध्ये एखादा खेळाडू जागतिक स्तरावर अथवा ऑलिम्पिकपर्यंत खेळू शकेल की नाही, हे जवळजवळ निश्चित होऊ शकते. या वयात जर या सवयी अंगवळणी पडल्या नाहीत, तर नंतर अवघड होत जाणाऱ्या दिनचर्येत या मूलभूत गोष्टी समाविष्ट करणे अतिशय कठीण होत जाते. आज जेव्हा एकेका सेकंदासाठी ऑलिम्पिक खेळांमधील पदक पटकावण्यात झटापट आहे, तेव्हा सरतेशेवटी सर्वाधिक कौशल्य कोणाकडे आहे, याहीपेक्षा त्या ठरावीक दिवशी सर्वोत्कृष्ट कोण खेळून जातो त्याला पदक मिळते. मीराबाईबद्दलच बोलायचे झाले, तर मीराने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी नॅशनल कॅम्पमध्ये स्थान मिळवले. हिंदीदेखील येत नसताना मणिपूरहून घर सोडून इतक्या लांब पटियालासारख्या गावी येऊन राहायचं, सकाळ संध्याकाळ केवळ सराव करायचा, सरावाला अनुसरूनच आहार घ्यायचा, घरी कोणतेही प्रसंग असले तरी त्याचा सरावावर परिमाण होऊ न देता केवळ सरावाकडे लक्ष द्यायचे, हा केवढा मोठा त्याग म्हणता येईल! अगदी आत्तासुद्धा मीराबाई ऑलिम्पिक खेळांच्या आधी जवळ जवळ दोन वर्षे घरी गेलेली नव्हती. जागतिक पातळीवर खेळलेल्या प्रत्येक खेळाडूला अंशतः तरी स्वतःच्या जीवनशैलीचा, राहणीमानाचा त्याग करावाच लागतो.  

मीराबाईचा भारोत्तलनाचा सराव बघताना बऱ्याचदा उद्‍भवणारा एक प्रसंग मला फार जवळून अनुभवायला मिळाला आहे. सराव करताना, विशेषतः उचलायच्या वजनात वाढ करताना कायमच खूप काळजी घ्यावी लागते. पुरेशी विश्रांती झाली आहे की नाही, ते वजन उचलण्यासाठी शरीर तयार आहे की नाही याची शहानिशा केल्याखेरीज ते वजन उचलण्याचा प्रयत्न करणेसुद्धा घातक ठरू शकते. सराव करताना कित्येकदा एखादे वजन जर मनासारखे उचलता आले नाही तर मीराच्या मनात जी चलबिचल होत असे ती मी फार जवळून पाहिली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक विजय शर्मा यांनी जर एखादे वजन उचलायचे आव्हान मीरासामोर ठेवले, पण काही कारणाने मीराला ते उचलता नाही आले, तर कधीकधी विजयसर पुन्हा वजन उचलण्यास नकार देत असत. अशावेळी सरांना ठामपणे खुणावत, अगदी पुढच्या क्षणी, मनाचा जबरदस्त निर्धार करून मी मीराला ते वजन उचलताना पाहिले आहे. असे काही प्रसंग जेव्हा जवळून बघायला मिळतात, तेव्हा हे कळते की शेवटी जो खेळाडू शेवटच्या क्षणापर्यंत रण सोडत नाही त्यालाच खरेतर पदक मिळते. बाकी सगळ्या गोष्टी जुळून आल्या, पण खेळाडूने जिद्द सोडली तर ते होत नाही. आणि ही क्षमता काही खेळाडूंकडे उपजतच असते कदाचित!

ऑलिम्पिकला गेलेला जगातला प्रत्येक खेळाडू असे अनेक अडथळे पार करत आलेला असतो. प्रत्येक खेळाडूने त्याच्या आयुष्याची कित्येक वर्षे पणाला लावलेली असतात. पण मग ते सुवर्ण पदक एकालाच कोणालातरी मिळते. खेळामध्ये शास्त्र असते, कौशल्य असते, केवळ खेळाडू नव्हे तर प्रशिक्षक, सहकारी आणि आमच्यासारखे कित्येक लोक एका खेळाडूमागे दिवसरात्र झटतात आणि शेवटी पदक मिळणार की नाही हे कित्येकदा काही सेकंदांवर अवलंबून असते. त्याला निव्वळ योगागोग म्हणावे तरी बरोबर नव्हे, नशीब म्हणावे तर ते केवळ नशीब नव्हे, केवळ खेळाडूची आनुवंशिकता म्हणावे तर तेदेखील पूर्ण सत्य नाही, किंवा योग्य प्रशिक्षण आणि मेहनत म्हणावे तर ती तर सगळेच तेवढीच करतात. मग जिंकणे आणि हरणे यात फरक काय? कदाचित या प्रश्नाचे एक असे उत्तर नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा एका खेळाडूच्या आयुष्यात त्या एका स्पर्धेच्या दिवशी जुळून येतात तेव्हा त्याला ते पदक मिळते असेच म्हणता येईल. मीराबाईच्या उदाहरणात तिला योग्य वेळी तिच्या शरीरातील अद्‍भुत कौशल्याचा शोध लागणे, मग तिने तोच खेळ तिचा व्यवसाय म्हणून निवडणे, तिला सरावापासून स्वास्थ्यापर्यंत योग्य ते मार्गदर्शन लाभणे, तिला सरकार व OGQसारख्या खासगी संस्थांच्या मदतीने परदेशात जाऊन प्रशिक्षण/उपचार घेता येणे, तिने या सगळ्याच्या जोरावर कित्येक वर्षे तपश्चर्येसारखी दिवसरात्र मेहनत करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, २४ जुलैच्या दिवशी टोकियोमध्ये काहीही झाले तरी पदक मिळवण्याची जिद्द न सोडणे, या सगळ्या गोष्टींचे एकत्र येणे हेच कदाचित तिच्या ऑलिम्पिक खेळाच्या रौप्य पदकाचे कारण ठरले असेल. 

अखेर, २०२४ आणि २०२८च्या ऑलिंपिकपर्यंत आपण आपल्या किती खेळाडूंना अशा सगळ्या गोष्टी जुळून येण्याची संधी देतो, किती खेळाडूंचे त्यांचे उपजत असलेले कौशल्य ओळखून, मग त्यांना आपण योग्य ते मार्गदर्शन, योग्य वयात उपलब्ध करून देतो, किती खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची, प्रशिक्षणाची, गरज पडल्यास उपचाराची आपण संधी देतो, त्यावर आपण काय दर्जाचे खेळाडू तयार करू हे ठरेल. त्या दृष्टीने सध्या पार पडलेल्या २०२० ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमधील भारताला मिळालेले यश ही चांगली सुरुवात आहे, असे म्हणायला हरकत नाही. देशाच्या क्रीडा क्षेत्रात अजूनही बऱ्याच सुधारणा होणे गरजेचे आहे. पण दहा वर्षांपूवी जी परिस्थिती होती त्यापेक्षा आता खूप वेगळी आहे. सध्याच्या सरकारने हातात घेतलेल्या उपक्रमातून क्रीडाक्षेत्रात पुढील दहा वर्षांत नक्कीच क्रांती घडू शकेल यात शंका नाही.

संबंधित बातम्या