लॉन, पिसारे आणि झहावी 

- डॉ. मंदार दातार 
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

कव्हर स्टोरी

राणी एलिझाबेथच्या कालखंडात मॉर्निंग वॉक करायच्या जागा म्हणून लॉन पुढे आली आणि मोठे मोठे वाडे, पॅलेस आणि त्याच्याभोवती खास राखलेली मोठमोठी लॉन हे चित्र सर्रास दिसू लागले. पुढे मध्ययुग सरले आणि लॉन लावण्याची परंपरा बहरतच राहिली. नंतरच्या औद्योगिक क्रांतीने गरिबीतून वर येऊ पाहणाऱ्या लहान मुलाच्या डोळ्यासमोरही मी मोठा होईन, भरपूर पैसे कमवीन आणि हिरवेगार ‘लॉन’ असलेले मोठे घर घेईन हेच स्वप्न तरळू लागले... 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये शेवटच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या भारताची अदिती अशोक भाग घेत असलेल्या गोल्फच्या सामन्याकडे. एका विस्तीर्ण पसरलेल्या आणि काळजीपूर्वक राखलेल्या गोल्फ कोर्सवर ही स्पर्धा सुरू होती. ऑलिम्पिकमधल्या इतर कुठल्याही स्पर्धेच्या मैदानापेक्षा गोल्फ स्पर्धेत वापरले जाणारे मैदान मोठे आणि कदाचित देखभाल करण्यासाठी सर्वाधिक खर्चिक असते, तरीही जगभर जवळपास सर्वच देशांमध्ये मिळून गोल्फची तब्बल चाळीस हजार मैदाने आहेत. माणसाला रोजच्या जगरहाटीतून विरंगुळा मिळवण्यासाठी ही खेळाची हिरवीगार विस्तीर्ण मैदाने प्रिय वाटतात. लॉन टेनिस, क्रिकेट, सॉकर यांसारखे लक्षावधी चाहते असलेले खेळ लॉनवरच खेळले जातात. ‘लॉन’ नावाच्या गवताच्या पट्ट्यावर माणसाचे अतोनात प्रेम आहे, आणि ते जाहीर होते या मैदानांपासून ते घरांच्या समोर असलेल्या लॉनच्या आवडीतून. मनुष्यप्राणी सुसंस्कृत होण्याच्या आरंभीच्या इतिहासात आपल्याभोवती असीम गवताळ कुरणेच होती. आदिम अन्नसंकलकाच्या अवस्थेपासूनच भोवताली असलेल्या गवताळ कुरणांमध्ये आपल्याला आनंदी वाटते. ही लॉन म्हणून राखलेली गवताळ कुरणेच आजही आपल्याला बेहद्द पसंत आहेत. 

इतिहास 

मनुष्यजातीचा उगम आणि प्राथमिक उत्क्रांती आफ्रिकेच्या गवताळ कुरणांमध्ये झाली. आता जिथे टांझानिया आहे तिथल्या ‘ग्रेट रिफ्ट व्हॅली’त होमो सेपियन्स नावाच्या माणूसप्राण्याने पहिली पावले टाकली. त्याच्यासोबत आसपासच्या गवताळ कुराणांमध्ये-सॅव्हानामध्ये त्याला शिकार करता येतील असे अनेक प्राणी बागडत होते; अन्न म्हणून भरपूर कंद, वनस्पती होत्या. या गवताळ कुरणांच्या भोवतीने असलेल्या गुहांमध्ये त्याने वास्तव्य केले आणि अन्न शोधण्यासाठी, शिकारीसाठी याच कुरणांमध्ये संचार केला. या अन्नसंकलक अवस्थेत कमी उंचीच्या गवतामध्ये फिरणे या आदिमानवाला जास्त सुरक्षित वाटत असे. आपल्याला ज्याची शिकार करायची आहे तोही आपल्या दृष्टीत राहील आणि आपल्यावर हल्ला करू शकतील असे प्राणीही दिसणे शक्य होईल, असा या बुटक्या गवताच्या कुरणांचा त्याला दुहेरी फायदा होता. उत्क्रांतीच्या इतिहासातला बहुतांश काळ माणसाने याच बुटक्या कुरणांमध्ये घालवला. त्यामुळे आसपास गवताळ कुरण असणे ही माणसाची आनुवंशिक आवड आणि गरज त्याच्या जनुकांमध्येच घट्ट नोंदली गेली. 

सत्तर हजार वर्षांपूर्वी मानव प्राण्याच्या आयुष्यात एक महत्त्वाचे स्थित्यंतर आले, ते म्हणजे कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन किंवा संज्ञानात्मक क्रांती. या क्रांतीमुळे भाषा विकसित झाली आणि वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये संवाद सुरू झाला. अग्नीच्या वापराचेही आकलन झाले. अन्नसंकलन झाल्यावर या माणसाकडे पुरेसा रिकामा वेळ असे. याच मोकळ्या वेळात गवताळ कुरणांमध्येच शेकोटीच्या सोबतीने माणसाने अनेक गोष्टी रचल्या, आपल्या सवंगड्यांना सांगितल्या, ऐकल्या. याच कथा सांगण्यामुळे आणि कथांवर विश्वास ठेवण्यामुळे माणसात टोळीतल्या इतर सदस्यांबद्दल परस्पर विश्वास आला आणि टोळीत एकसूत्रता आली. 

बारा हजार वर्षांपूर्वी हवामान बदलामुळे ग्रेट रिफ्ट व्हॅलीमधून त्याला विस्थापित व्हावे लागले आणि माणूस सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशात म्हणजे आताच्या टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यांत, प्राचीन काळच्या मेसोपोटेमियात पोहचला. या प्रदेशात माणसाने प्रथम शेती करायला सुरुवात केली. शेतीतले आपले पहिले पीक होते गहू. आज आपण ज्याला गहू म्हणतो त्यापेक्षा त्यावेळचा गहू फारच अविकसित आणि रानटी स्वरूपाचा होता. मात्र गहू या पिकामुळेच माणूस अन्नसंकलकाचा शेतकरी झाला. माणसाच्या या सर्वात मोठ्या स्थित्यंतराच्या वेळीही गवताळ कुरणांनी त्याची साथ सोडली नाही. कारण गहू आहे एक प्रकारचे गवतच, आणि त्याचे पहिले शेत एखाद्या कुरणासारखेच होते. पुढे मानवाच्या टोळ्या जगभर पसरल्या आणि त्यांना वेगवेगळ्या भागात शेती करायला वेगवेगळी धान्ये मिळाली. आफ्रिकेतच ज्वारी आणि बाजरी, भारतात तांदूळ आणि दक्षिण अमेरिकेत मका. 

कृषक माणसाच्या पुढच्या बारा हजार वर्षांत अनेक संस्कृती विकसित झाल्या आणि लयास गेल्या, लिप्या विकसित झाल्या, विनिमयाची नवी साधने आली, धर्मसंस्था, राज्यसंस्था उदयास आल्या पण या तृणांची आणि पर्यायाने गवताळ कुरणांची साथ आपण सोडलीच नाही. आजही आधुनिकतेची प्रतीके असणारे मोठमोठे प्रासादही सजलेले असतात ते त्याच्यापुढच्या विस्तीर्ण गवताळ कुरणामुळे - लॉनमुळे. आपले मनोरंजनात्मक खेळ खेळले जातात तेही अशाच मोठ्या लॉनवर, पदवीदान समारंभापासून ते विवाह सोहळ्यापर्यंत कोणत्याही कार्यक्रमासाठी आपल्याला ही आधुनिक गवताळ कुरणे जवळची वाटतात. गवताच्या विविध जाती असलेली वैविध्यपूर्ण कुरणे, ते एकच पीक असलेली हंगामी शेते इथपासून वर्षभर हिरव्या राहणाऱ्या विस्तीर्ण लॉनपर्यंत आपल्या मानवजातीचा प्रवास झाला आहे. लॉन राखण्याचा हा मनोरंजक प्रवास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडे मध्ययुगातल्या युरोपात डोकावले पाहिजे. 

मध्ययुगीन कालखंड 

मध्ययुगात युरोपात अनेक व्यवस्था, अनेक संस्था उत्कर्षास आल्या होत्या. नव्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि लष्करी व्यवस्था प्रत्यक्षात येत होत्या. आधीच अस्तित्वात असलेली सरंजामशाही अधिक घट्ट झाली. मात्र याच दरम्यान संपत्तीचेही असमान वाटप होत राहिले. बहुतांश युरोप छोटे आणि गरीब शेतकरी आणि छोट्या-छोट्या गावांनी तयार झालेला असताना मोठ्या नगरात राहणाऱ्या राजेरजवाडे, अमीर उमराव यांच्याकडे अगणित संपत्ती जमा होत राहिली. सगळ्या आर्थिक नाड्या याच शहरी उमरावांच्या हातात होत्या. या उमरावांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस जसजशी गब्बर होत गेली तसतशी वाढत राहिली या संपत्तीची शेखी मिरवण्याची वृत्ती. याच शेखीतून, मिरवण्याच्या डामडौलातून लॉनचा जन्म झाला आहे. एकीकडे युरोपभर पसरलेल्या छोट्या शेतांमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या वाट्याच्या अपुऱ्या जमिनीत भरपूर मशागत करावी लागत होती. पाणीपुरवठ्याची, बी-बियाणांची सोय करावी लागत होती. शेतीच्या व्यवहारात हातातोंडाची गाठ पडणे कठीण असल्याने थोडीही शेती पडीक ठेवून चालणार नव्हती आणि राहिलीच तर परिणामवश उपासमार होण्याचीच शक्यता जास्त होती. त्यामुळे शेती करताना शक्यतो काही वाया जाऊ न देणे याकडेच या शेतकऱ्यांचा कल होता. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या या काटकसरीच्या एकदम विसंगत वागणूक होती, शहरात वसलेल्या श्रीमंतांची. दागदागिने, रेशमी कपडे, उच्चभ्रू जीवनशैली, मोठमोठे सोहळे यातून दिमाख दाखवण्याची वृत्ती त्यांच्याकडे होतीच; त्यात भर पडली ती घराभोवती मोठमोठी लॉन ठेवण्यामुळे. लॉन ठेवण्याची प्रथा पहिल्यांदा सुरू झाली सोळाव्या आणि सतराव्या शतकात, ट्यूडर काळातील इंग्लंडमध्ये. लॉन हा शब्दच सेल्टिक भाषांमधून सोळाव्या शतकाच्या मध्यावर इंग्रजीत आला आहे, असे मानले जाते. सुरुवातीला ही लॉन पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या शेतांपासून आणि जनावरे चारण्याच्या क्षेत्रातून खास वेगळी राखली जात. राणी एलिझाबेथच्या कालखंडात मॉर्निंग वॉक करायच्या जागा म्हणून लॉन पुढे आली आणि मोठे मोठे वाडे, पॅलेस आणि त्याच्याभोवती खास राखलेली मोठमोठी लॉन हे चित्र सर्रास दिसू लागले. 

सजावट की पांढरा हत्ती? 

मध्ययुगाचा काळ समृद्ध युरोपमध्येही अन्न महाग असण्याचा काळ होता. शेतीमधून थोडेफार उत्पादन मिळाले तरी त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागत असे. त्याचवेळी मोठमोठ्या महालांभोवती लॉन राखण्याची प्रथा सुरू झाली. व्यवस्थित राखलेल्या लॉनला चांगली जमीन आणि भरपूर मशागत लागते. विशेषतः आजच्यासारखे लॉनमोवर्स आणि पाणी शिंपडण्याचे स्वयंचलित स्प्रिंकलर्स त्या काळात उपलब्ध नव्हते. नोकरचाकरांची मोठी फौज बाळगून लॉन चांगल्या अवस्थेत राखणे ही सोपी गोष्ट नव्हती. एवढी सारी मेहनत घेऊन, ऊर्जा, मनुष्यबळ घालवून त्या बदल्यात तुमच्या नजरेला तजेला देण्याव्यतिरिक्त लॉनचा तसा फारसा फायदाही होत नव्हता. एवढे छान हिरवेगार गवत असूनही लॉनवर प्राण्यांना चरायला कोणी सोडेल अशी शक्यताही नव्हती. प्राण्यांनी गवत खाऊन तुडवलेले लॉन कोणाच्याच सौंदर्याच्या व्याख्येत बसणारे नव्हते. ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठात तर विद्यार्थ्यांना या हिरवळीवर वर्षातील एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता पायही ठेवायला मिळत नसे. 

लॉनचा खरा उपयोग होता दिमाख दाखवण्यात. मध्ययुगात युरोपातल्या एखाद्या भांडवलदारांच्या, सरदाराच्या प्रवेशद्वाराजवळून जाताना आत दिसणारे लॉन ज्याच्या मालकीचे आहे, तो खूप श्रीमंत आणि सामर्थ्यवान आहे, त्याच्याकडे कितीतरी एकर अशी जमीन आहे की जी त्याला नापिक ठेवली तरी चालते, असे सांगण्यासाठीच होते. मालकाकडे इतकी मुबलक धनसंपत्ती आहे की तो ही हिरवी उधळपट्टी सहज करू शकतो. लॉन राखण्यासाठी त्याच्याकडे भरपूर नोकरचाकर आहेत याचीच ही जाहिरात होती. याउलट एखाद्या सरदाराचे लॉन खराब अवस्थेत दिसले तर तर्काने कोणीही सहज जाणू शकायचे की हा सरदार नक्की आर्थिक अडचणीत आहे. उमरावांच्या या उधळपट्टी विरुद्ध कोणत्याही गरीब शेतकऱ्याला लॉनखालची मौल्यवान सुपीक, वस्तुतः शेती वापरासाठीची जमीन वाया जाऊ देणे परवडणारेच नव्हते. किंबहुना लॉन तयार करायला आणि त्याची निगा राखायला लागणारा वेळ आणि खर्च कोणत्याही शेतकऱ्याच्या वेळापत्रकात आणि अंदाजपत्रकात बसणाराच नव्हता. थोडक्यात एकीकडे कष्टाने इंचभर उत्पादक जमीनही वाया न जाऊ देणारे शेतकरी आणि दुसरीकडे भरपूर उधळपट्टी करून लॉन राखणारे सरंजाम-सामंत ही विसंगती युरोपात त्या वेळी अगदी प्रकर्षाने जाणवेल अशीच होती. या लॉनच्या उधळपट्टीची संगतवारी कशी लावायची? यामागे काय जीवशात्रीय प्रेरणा होती हे जाणण्यासाठी आपल्याला थोडे जनुकात डोकावून बघावे लागेल. 

जोखड 

सर्वसामान्य लोकांचा असा समज असतोच की निसर्गात कोणतीही गोष्ट वाया जात नाही. सारेच आटोपशीर, जेवढे गरजेचे तेवढेच असते. पण उत्क्रांतीशास्त्राचे अभ्यासक यालाही अनेक अपवादात्मक उदाहरणे सांगतील. उत्क्रांतीच्या पित्याला, चार्ल्स डार्विनलाही अनेक अशी न सुटणारी कोडी पडली होती. यातील एक कोडे होते मोराच्या पिसाऱ्याचे. उत्क्रांती शास्त्राच्या परिभाषेत मोराचा पिसारा त्याच्यासाठी एका अर्थी जोखड ठरतो. मोराचा पिसारा हे एक प्रचंड लोढणे आहे जे सांभाळण्यासाठी मोराला विशेष परिश्रम घ्यावे लागतात. एकाअर्थी हे जिवावर बेतणारेच दुखणे आहे. उलटपक्षी पिसारा नसलेल्या लांडोरी, शत्रू जवळ आला तर चटकन उडू शकतात. पण मोरांना हे असे उडणे जवळपास अशक्यप्रायच असते. एखाद्या विमानाने थोडा वेळ धावपट्टीवर धावावे आणि मग आकाशात झेप घ्यावी तसे पळत पळत जाऊन वेग पकडूनच मोरांना उडता येते. हा द्राविडी प्राणायाम शत्रू अगदी जवळ असेल तरीही टाळता येत नाही. त्यात भरीस भर म्हणजे मोरांची पिसे दरवर्षी थोडीथोडी गळत राहतात आणि ती सतत नव्याने तयार करण्यासाठी त्यांना आपल्या अन्नातून भरपूर ऊर्जेची बेगमी करावी लागते. चार्ल्स डार्विनला त्याच्या हयातीत मोराच्या पिसाऱ्याच्या प्रयोजनाचे उत्तर काही मिळाले नाही. मात्र पुढे डार्विनच्या नंतर शतकभराने एकोणीसशे पंचाहत्तर साली आमोट्झ झहावी नावाच्या इस्राइली शास्त्रज्ञाने उत्क्रांतीच्या ओघात मोराचा पिसारा कसा अवतरला याचे पहिल्यांदा शास्त्रीय विवेचन केले. 

डार्विनने मांडलेल्या निसर्ग निवडीच्या प्रक्रियेत प्रत्येक सजीवांचे आनुवंशिक गुणधर्म हे सतत पारखले जातात. ज्या गुणांमुळे त्या सजीवांना पुनरुत्पादनासाठी फायदा होतो ते गुण एका पिढीतून पुढच्या पिढीत खात्रीने जात राहतात. याच सूत्रानुसार, मोरांमध्ये पिसाऱ्याच्या लोढण्यामुळे मृत्यूचा धोका जास्त असूनही लक्षावधी पिढ्यांमध्ये हे पिसारे टिकून आहेत. त्या अर्थी या पिसाऱ्याचे काहीतरी खास प्रयोजन आहे. या विसंगतीचे झहावीने दिलेले स्पष्टीकरण हे, की हे पिसारे शत्रूला सहज दिसल्याने धोका वाढतोच पण त्याबरोबरच ते पिसारे एक विशिष्ट जाहिरात करतात. भलामोठा पिसारा फुलवणारे हे मोर भरपूर ताकदवान आहेत, त्यांच्याकडे हे जोखड पेलण्यासाठी पुरेशी ऊर्जा आहे, त्यासाठी लागणारे आवश्यक जनुक आहेत, ही ती जाहिरात आणि ती असते लांडोरींसाठी. आपला नर पसंत करताना लांडोरी असे अंदाज बांधतात की सर्वात मोठा, आकर्षक पिसारा असणारा मोर सर्वात दणकट आहे. नरांच्या निवडीमागचे माद्यांचे हेच सूत्र असते की जास्त दणकट नरांमध्ये जास्त चांगले आनुवंशिक गुण आहेत. या निवडीत लांडोरींचा प्रयत्न चांगले आनुवंशिक गुण आपल्या पिल्लांत उतरण्यासाठी भपकेदार पिसारा असणारे मोर निवडले पाहिजेत असा असतो. जास्त मोठा अन् आकर्षक पिसारा असणाऱ्या मोरांना शत्रूचे भय जरी जास्त असले तरी त्यांना जास्त माद्या मिळाल्यामुळे आणि पर्यायाने जास्त पिल्ले झाल्याने या पिसाऱ्याचे गुण पुढच्या पिढीत जात राहतात आणि पिढी दर पिढी लांडोरींच्या निवडीमुळे मोरांचे पिसारे अधिकाधिक आकर्षक होत राहतात. पण भरभक्कम पिसारे हे एक प्रकारे ओढवून घेतलेले अपंगत्वच आहे, त्यामुळे झहावीने याला नाव दिले ‘हॅन्डिकॅप प्रिन्सिपल’. मराठीत म्हणता येईल जोखडाचा सिद्धांत. 

पुढे जॅरेड डायमंड नावाच्या शास्त्रज्ञाने ही ‘हॅन्डिकॅप प्रिन्सिपल’ची कल्पना थोडी पुढे नेऊन असे सांगितले, की बंजी जंपिंगसारखे माणसाचे काही धोकादायक खेळ आणि त्यासाठी पत्करलेली जोखीम ही ‘हॅन्डिकॅप प्रिन्सिपल’चीच मानवातली अभिव्यक्ती आहे. त्याआधीच अठराशे नव्व्याण्णव साली थोर्स्टाइन व्हेब्लेन या अर्थतज्ज्ञाने मानवी वर्तनातल्या अनेक गोष्टी याच ‘हॅन्डिकॅप प्रिन्सिपल’मध्ये मांडून दाखवल्या होत्या. व्हेब्लेनच्या मते माणूस आपल्या हातात खुळखुळणारे पैसे दर वेळी शहाणपणानेच वापरतो असे नाही. माणसाला पैशाचा विनियोग करताना आपल्याला नेमके काय खरेदी करायचे आहे, आपल्या खऱ्या गरजा नेमक्या काय आहेत याचाच नेमका विसर पडतो. पोटापुरता पैसा पाहिजे म्हणण्यापेक्षा जास्त पैसे कमावून त्याचा दिमाख इतरांना दाखवणे आणि पैशाच्या उधळपट्टीतली बेपर्वाई माणसाला जास्त आनंद देते, अशी व्हेब्लेनची मांडणी आहे. याच चालीवर केवळ शेखी मिरवण्यासाठी सुपीक जमिनीत काहीच उत्पादन न देणारी आणि देखभालीवर भरपूर खर्च करायला लावणारे मोठमोठे लॉन लावले जातात. मोराच्या पिसाऱ्याच्या उत्क्रांतीप्रमाणेच या लॉनची देखभाल ‘हॅन्डिकॅप प्रिन्सिपल’चेच एक उदाहरण मानता येईल. 

आजघडीला 

पुढे मध्ययुग सरले आणि लॉन लावण्याची परंपरा बहरतच राहिली. लॉनमोवरचा शोध लागला आणि लॉन राखणे हा छंद श्रीमंतांबरोबरच उच्च मध्यमवर्गीयांच्याही आवाक्यात आला. नंतरच्या औद्योगिक क्रांतीने युरोपच नाही तर साऱ्या जगाला नवीन दिशा दिली. जगभर नवी स्वप्ने बघणाऱ्या तरुणांच्या आवाक्यात कष्टाच्या गुरुकिल्लीने स्वतःचे भविष्य बदलण्याची क्षमता आली. गरिबीतून वर येऊ पाहणाऱ्या, कष्टात दिवस काढणाऱ्या आणि धूळ, तणांचे साम्राज्य असलेल्या एखाद्या मैदानासमोरच्या घरात राहणाऱ्या एखाद्या लहान मुलाच्या डोळ्यासमोरही, मी मोठा होईन, भरपूर पैसे कमवीन आणि हिरवेगार लॉन असलेले मोठे घर घेईन हेच स्वप्न तरळू लागले. 

युरोपातून सुरू झालेल्या लॉन राखायच्या प्रथेला पुढे अमेरिकेत मान्यता मिळाली. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेग घेतला आणि स्वतःची कार, स्वतःचे घर आणि घरासमोर लॉन हेच जणू स्टेटस सिम्बॉल झाले. याच स्वप्नपूर्तीपोटी आज अमेरिका पोआ प्रेटेन्सिस (केंटकी ब्लू ग्रास) या फक्त लॉनसाठी लावल्या जाणाऱ्या गवतावर दरवर्षी तीस अब्ज डॉलर्स खर्च करते. नुसत्या अमेरिकेतच पावणेदोन लाख चौरस किलोमीटरवर लॉन किंवा टर्फ ग्रास पसरलेली आहेत. अमेरिकेतल्याच मका किंवा सोयाबीन लावलेल्या क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र जास्त आहे. लॉनचे वाढते प्राबल्य हा अनेक निसर्ग अभ्यासकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत आणि सगळ्या मोकळ्या जागांवर लॉन लावण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. यामुळे अमेरिकेचे भूषण असलेल्या मोनार्क फुलपाखरांची, पिकांचे परागीभवन करणाऱ्या कीटकांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे. पर्माकल्चर या एका शाश्वत शेतीच्या प्रकाराचा प्रणेता असलेला बिल मॉलिसन सांगतो, की जगातल्या कुठल्याही शेतीआधारित उद्योगापेक्षा अमेरिकेतील लॉन नैसर्गिक स्रोतांचा जास्त चुथडा करतात. किंबहुना भारताइतक्या प्रचंड शेतीप्रधान देशाच्या शेतीपेक्षा जास्त फॉस्फेट्स अमेरिकेत लॉन राखण्यासाठी जमिनीत मिसळली जातात. भारतासारख्या विषुववृत्तीय देशातही लॉन आता बोकाळली आहेत. खरे तर आपल्यासारख्या जैवविविधतासंपन्न देशात एकसुरी लागवड हा अविचारच आहे. निसर्गतः एकाच प्रकारच्या वनस्पतीची लागवड करणे कधीच आणि कुठेच योग्य नव्हे. कारण निसर्गतः कोणत्याही अधिवासात अनेक वेगवेगळे जीव वाढत राहातात. आपण लॉन लावतो, त्यांना पाणी घालतो, खते वापरतो आणि मग अशा स्रोतसंतृप्त जमिनीवर बाकीच्याही इतर काही वनस्पती-प्राणी जाती चंचुप्रवेश करू पाहतात. कीटक, बुरशी, कृमी यांना या भरपूर पाणी दिलेल्या आणि मूलद्रव्य समृद्ध माती असलेल्या लॉनवर येण्यासाठी निमंत्रणाची गरज पडत नाही. मग या नको असलेल्या पाहुण्यांना हाकलण्यासाठी आपण कीटकनाशके, बुरशीनाशके फवारतो आणि परत त्यानिमित्ताने आधीच पांढरा हत्ती असलेल्या लॉनवर अजून खर्च होतो. स्थानिक गवताळ कुरणांमधल्या गवतांसारखी लॉन गवताची मुळे खोलवर जात नाहीत, त्यामुळे जमिनीतून पाणी ओढून घेण्याची लॉन गवतांची क्षमता मर्यादित राहते आणि म्हणून लॉनला वारंवार पाणी घालावे लागते. उथळ मुळांमुळे त्याखालची जमीन घट्ट होते अन मग त्या जमिनीची निसर्गतः मिळणारे पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमीच ठरते. तरीही केवळ स्टेटस सिम्बॉल राखण्यासाठी लॉन लावले जाते आणि ही वसाहतवादी झूल आपल्या अंगावर तशीच पांघरलेली राहते. 

तर अशी आहे लॉनच्या आवडीमागची कहाणी, माणसाच्या जनुकांमध्ये खोल दडलेली, आपल्या उत्क्रांतीच्या काळातील आदिम प्रेरणा. झहावीच्या जोखडाच्या सिद्धांतात चपखल बसणारी, माणसाचे नैसर्गिक स्रोतांच्या उधळपट्टीचे, निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचे सूत्र सांगणारी. आणि कदाचित तुम्ही जर लॉनवर बसून चहा पिता पिता हे वाचत असाल, तर तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणारी. 

(लेखक पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ आहेत.)

संबंधित बातम्या