शुभ्र वाळवंटातील हिरवाई

- डॉ. राधिका टिपरे
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

वैराण वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या लडाखच्या भूमीत असूनही हिरव्या कंच हिरवाईचा वरदहस्त लाभलेल्या निसर्गसुंदर आर्यन व्हॅलीला भेट देण्याचे ठरवले. ज्या लडाखचे लाल रंगात रंगलेले उघड्या बोडक्या पर्वतांनी नटलेले वैराण रूप पाहत आम्ही तिथवर पोहोचलो होतो, त्याच्या अगदी उलट असे हिरव्यागार वृक्षांनी नटलेले सुंदर गाव आम्ही पाहत होतो. 

लडाखमधील झंस्कार नदीच्या खोऱ्‍यात भटकंती करण्यासाठी पुण्यावरून विमानानेच लेह गाठले. मुख्य प्रवासाला निघण्यापूर्वी लेहपासून तीन तासाच्या अंतरावर असणाऱ्‍या टेमिसगाव इथे तीन दिवस नमरा लॉज नावाच्या अतिशय सुरेख घरगुती हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. अ‍ॅक्लमटायझेशनसाठी याची नितांत गरज होती. हे हॉटेल म्हणजे आमच्यासाठी पृथ्वीवरचा स्वर्गच होता जणू... हे हॉटेल म्हणजे अक्रोड आणि जर्दाळूच्या वृक्षांनी वेढलेले लडाखी पद्धतीचे बैठे घर होते. छान स्वच्छ खोल्या, टापटीप आणि लालसर केशरी रंगांच्या जर्दाळूंनी लगडलेल्या वृक्षांच्या सावलीत सजवलेली बैठक... त्यावर आरामात बसून केलेल्या गप्पाटप्पा, यामुळे तिथे राहण्याचा अनुभव अतिशय आनंददायी ठरला होता. जेवणही खूप छान असायचे. या तीन दिवसांत आजूबाजूच्या परिसरात लहानसहान ट्रेक करणे, बौद्ध मठांना भेट देणे सुरू होते. माझ्या मनात मात्र वेगळीच इच्छा होती. आमच्या या ट्रिपचा आयोजक मिलिंद याला मी आधीच कल्पना देऊन ठेवली होती की शक्य झाल्यास सिंधू नदीच्या काठावर राहणाऱ्‍या दार्द जमातीच्या वस्तीला भेट देता आली तर फार छान होईल. अर्थातच मिलिंदने या विनंतीचा मान ठेवला आणि या आर्यन व्हॅलीला भेट देण्यासाठी गाडी आणि गाइड यांची सोय करून दिली. यासाठी मिलिंदचे मनापासून आभार मानले हे सांगणे न लगे...!

नमरा हॉटेलपासून आर्यन व्हॅली जवळपास नव्वद किमी अंतरावर असल्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट होताच हॉटेल सोडले. लेह कारगिल हा महामार्ग काही काळ सिंधू नदीच्या सोबतीनेच पुढे जातो. खालत्सेनंतर मात्र सिंधू आणि राष्ट्रीय महामार्ग यांची साथसंगत संपते आणि मार्ग वेगळे होतात. आम्ही सिंधू नदीच्या काठाने जाणारा रस्ता धरला. सिंधू नदीच्या काठाने होणारा हा प्रवास म्हणजे नजरेसाठी मेजवानीच होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सिंधूच्या प्रवाहात भरपूर पाणी होते. लालसर रंगाच्या पाण्याचा प्रचंड जलौघ आपल्या आगोशात सामावून घेत खोल खोल दरीतून वाहणारी सिंधू आपल्याला सदासर्वकाळ संमोहित करत राहते. लाल तांबड्या महाकाय पर्वत शिखरांनी नटलेल्या डोंगररांगा... आणि खाली खोल दरीतून वाहणारी सिंधू... तिच्या प्रत्येक वळणांवर तयार होणारी निसर्गचित्राची देखणी, परंतु तितकीच रौद्रभयानक चौकट मनाला उसवणारी... मोहात पाडणारीच असायची...! फोटो तरी किती काढायचे? उघडे बोडके लालबुंद रंगाचे महाकाय पर्वत जणू आकाशाशी स्पर्धा करताहेत असे वाटायचे. गवताचे लहानसे पातेही उगवणार नाही इतके वैराण असणारे या डोंगररांगाचे रूप पाहून मनात धडकी भरायची. कधीमधी हिमालयाच्या पलीकडील हा हिमालय आपल्याला अनोळखी वाटत राहतो... भयकारी वाटतो... पण मग आपल्या लक्षात येते... अरे, ही सिंधू नदी तर आपलीच आहे ना? तिच्या नावावरूनच तर आपल्या या भारतवर्षाला ‘इंडिया’ हे नाव मिळाले आहे.

काही वेळातच आम्ही ‘आर्यन व्हॅली’मधील दाह नावाच्या लहानशा गावात पोहोचलो. आमच्याबरोबर एक लडाखी मुलगा गाइड म्हणून आला होता. त्याने या दार्द जमातीबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. आम्ही खाली उतरून चालायला सुरुवात केली. गंमत म्हणजे येताना वाटेत ज्या लडाखचे लाल रंगात रंगलेले, उघड्या बोडक्या पर्वतांनी नटलेले वैराण रूप पाहत आम्ही तिथवर पोहोचलो होतो, त्याच्या अगदी उलट असे हिरव्यागार वृक्षांनी नटलेले सुंदर गाव आम्ही पाहत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अक्रोड आणि जर्दाळूंचे वृक्ष सावली देत होते. जर्दाळूच्या झाडांवर पानांपेक्षा जास्त जर्दाळू लगडलेले होते. जर्दाळूचे फळ झाडावरच पिकते... केशरी रंग चढला की ओळखायचे, जर्दाळू पूर्ण पिकलेले आहे! हे जर्दाळू इतके रसाळ आणि गोड होते की कितीही खाल्ले तरी समाधान होत नव्हते. या भागातील जर्दाळू अतिशय गोड आणि चविष्ट असतात. आर्यन व्हॅलीतील जर्दाळूंना आयातदारांकडून बऱ्‍यापैकी मागणी असते.

****

लडाखच्या भूमीला ‘कोल्ड डेझर्ट’ म्हटले जाते. वर्षातील आठ महिने या भागात बर्फ असतो. बहुतेक भूभाग नापिक असून गवताचे पातेसुद्धा उगवत नाही. मात्र ज्या भागात डोंगराच्या उतारावरून वितळलेल्या बर्फाचे पाणी घेऊन येणारे ओहोळ किंवा नाले वाहत येतात त्या ठिकाणी हमखास हिरवळ फुलते. अशाच ठिकाणी लोकांची वस्ती होऊ लागते आणि मग एखादे चिमुकले गाव वसते. लडाखमधील बहुतेक लोकवस्ती अशाच हिरव्या डोंगर उतारावर वसलेल्या लहान लहान गावांत सामावलेली आहे. अशाच गावांपैकी काही गावे दार्द या जमातीची आहेत. लेहपासून साधारण २०० किमी अंतरावर असलेल्या या आर्यन व्हॅलीमध्ये या दार्द लोकांची चार गावे वसलेली आहेत. सिंधू नदीच्या दोन्ही बाजूला ही गावे वसलेली आहेत. ‘दाह’ (दा), ‘हानू’, ‘गारकोन’ आणि ‘दारचिक’ अशी या गावांची नावे आहेत. या गावांचे वैशिष्ट्य हेच, की ही गावे बौद्ध धर्म स्वीकारलेल्या दार्द या जमातीची आहेत. ही मंडळी स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजतात. शुद्ध रक्ताचे समजतात. त्यामुळे या गावामध्ये केवळ त्यांचीच वस्ती आहे. या चार खेड्यांना मिळूनच ‘आर्यन व्हॅली’ असे म्हटले जाते. आपल्याला ‘दा’ आणि ‘हानू’ या दोन गावांना भेट देता येते. दुसऱ्‍या गावात जाण्यासाठी परवानगी नसते. दार्द हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे... ‘दारदस’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘डोंगर उतारावर राहणारे लोक’ असा होतो. दार्द लोक स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजतात, कारण हे लोक सांस्कृतिकदृष्ट्या इतर लडाखींच्यापेक्षा अतिशय वेगळे आहेतच, पण त्यांची बोलीभाषासुद्धा इतर लडाखींच्या बोलीपेक्षा खूपच वेगळी आहे. ती भाषा त्यांच्याशिवाय इतरांना समजत नाही की बोलताही येत नाही. या दार्द जमातीच्या लोकांना ‘ब्रोकपा’ असे म्हटले जाते. असेही म्हटले जाते, की दोन हजार वर्षांपूर्वी या मुलखात अलेक्झांडर द ग्रेट येऊन गेला होता. या जगज्जेत्या अलेक्झांडरने मागे ठेवलेल्या रोमन सैनिकांचे वंशज म्हणजे हे दार्द लोक आहेत, असे म्हटले जाते. अर्थातच या गोष्टीला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही किंवा दार्द लोकांच्याकडे कुठलाही पुरावा नाही. त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपातील लिखित ऐतिहासिक दाखलाही नाही. तसेच अशा कुठल्याही स्वरूपाच्या वस्तू नाहीत, ज्यांचे धागेदोरे त्या काळाशी संदर्भ जोडू शकतील.

हे दार्द लोक अतिशय साधे आणि शेती करणारे आहेत. शेळ्यामेंढ्या पाळणे, त्यांचा उपयोग दूधदुभते आणि मांस यासाठी करणे, शेतीमधून मिळणाऱ्‍या उत्पन्नाचा विनियोग उदरनिर्वाहासाठी करणे हेच त्यांच्या जीवनशैलीचे गमक होते. ही मंडळी त्यांच्या पूर्वापार प्रथेनुसार वृक्ष, नद्या आणि पर्वत यांना देव मानून त्यांची पूजा करतात. या रूढी आणि परंपरा हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. असे म्हणतात, की या दार्द जमातीला पाच हजार वर्षांची परंपरा असावी. पण आता पूर्वापार चालत आलेल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल होत आहे. त्यांच्यापैकी तरुण मंडळी आता शिकून सवरून बाहेर पडताहेत. नोकरी धंद्यानिमित्त गाव आणि वस्ती सोडून बाहेर जात आहेत. तरीही गावातील मूळ दार्द लोकांसाठी अजूनही शेती आणि शेळ्यामेंढ्या पालन हाच उदरनिवार्हाचा मुख्य पर्याय आहे. विशेष म्हणजे, आर्यन व्हॅलीमध्ये पिकणाऱ्या जर्दांळूमुळे दार्द मंडळींना भरपूर उत्पन्न मिळते. या खोऱ्‍यात अतिशय उत्कृष्ट प्रकारची द्राक्षे पिकतात. येथे पिकणाऱ्‍या द्राक्षापासून तयार होणारी ग्रेप वाइन अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. येथे बारा प्रकारची द्राक्षे पिकतात आणि ती उत्कृष्ट दर्जाची असतात. आर्यन व्हॅलीमधून सुकवलेल्या जर्दाळूची लेह आणि कारगीलकडे निर्यात केली जाते. जर्दाळूपासून जॅम तयार करून तोसुद्धा निर्यात केला जातो. परंतु कुठल्याही प्रकारची औद्यागिक मदत अथवा साधनसामग्री तिथे उपलब्ध असल्याचे नजरेस पडले नाही. शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे असे आवर्जून सांगावेसे वाटते.

ही दार्द मंडळी स्वतःला अतिशय शुद्ध रक्ताचे आर्यन असल्याचे मानतात. दार्द दिसायला गोरेपान आणि खूप सुंदर असतात. पुरुष अगदी सहा फूट किंवा अधिक उंच असतात. रंग गोरा, अतिशय धारधार नाक, भुरकट रंगाचे केस हे त्यांचे वेगळेपण आवर्जून लक्षात येते. त्यांचे वेगळेपण त्यांच्या डोळ्यांच्या रंगावरून अधोरेखित होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खरे सांगायचे तर ते भारतीय वंशाचे आहेत, असे वाटत नाही. ग्रीक किंवा रोमन लोकांशी साधर्म्य असल्याचे जाणवते हे नक्की. कदाचित ते खरोखरच अलेक्झांडरसोबत आलेल्या रोमन तथा ग्रीक सैनिकांचे वंशज असतीलही... कुणास ठाऊक...! पण मग त्यांनी स्वतःला रोमन म्हणायला हवे. ते स्वतःला आर्यन का म्हणतात? रोमन लोक आर्यन नव्हते. या प्रश्‍नाचा भुंगा उगाचच माझे मन पोखरू लागला. असे म्हणतात, की गिलगिट आणि बाल्टिस्तानमधून अलेक्झांडर माघारी फिरला होता. इ.सन पूर्व तिसऱ्‍या शतकात त्या भागातूनच दार्द लोकांची काही कुटुंबे, काही टोळ्या या भागात आल्या आणि इथेच स्थिरावल्या. यांच्यापैकी काही मंडळी अजूनही पाकव्याप्त कश्मीरमध्ये आहेत. 

या लोकांचे पारंपरिक पोशाख खूप वेगळे असतात. स्त्रियांच्या डोक्यावर रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ असतो. पूर्वी कधीकाळी ताज्या फुलांचा मुकुट डोक्यावर घालणाऱ्‍या स्त्रिया आता प्लास्टिक फुलांचा मोठा गुच्छ डोक्यावर धारण करतात. त्यांचा पेहराव मेंढ्यांच्या कातडीपासून तयार केलेला असतो. त्यांच्या सणवारादिवशी स्त्री आणि पुरुष आपले पारंपरिक वेष धारण करतात. पुरुषांचा पोषाख त्यामानाने साधा असतो.

****

खरेतर दा आणि हानू ही दोन्ही गावे मिळूनच वसलेली आहेत. हानू गावामध्ये गेलो असताना आम्हाला एक मध्यमवयीन महिला भेटली. ती आमच्याशी बोलण्यास खूपच उत्सुक होती. तिच्याबरोबर तिचा अतिशय देखणा नातूही होता. आम्हा सर्वांसाठी त्यांचा पारंपरिक वेष घालून दाखवण्यास ती तयार झाली. अर्थातच तिला त्या बदल्यात पैसे हवे होते. आम्ही तिला पाचशे रुपये द्यायला तयार झाल्यानंतर तिने तो पेहराव घालून आम्हाला फोटो काढू दिले. जर्दाळूच्या बागांनी नटलेल्या हिरव्याकंच हानू गावामध्ये काही वेळ घालवल्यानंतर आम्ही दुसऱ्‍या गावात जाण्यासाठी निघालो. दहा मिनिटांच्या आतच आम्ही दाह गावात पोहोचलो. या गावात त्यामानाने भरपूर वस्ती असल्याचे दिसून आले. मुळात जुन्या पद्धतीची दगडमातीने बांधलेली घरे होती. काही घरांची पडझड झालेली होती. मात्र काही घरांमध्ये लोक राहत होते. त्या घरांची अवस्था पाहिल्यानंतर मनातून खरेच आश्‍चर्य वाटत होते. हे लोक या अशा घरात कसे राहत असतील? जेव्हा वर्षातील आठ महिने या प्रदेशावर बर्फाची दाट चादर पांघरलेली असते, तेव्हा या घरात हे लोक थंडीपासून आपला बचाव कशा प्रकारे करत असतील? या माझ्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे मला सहजासहजी मिळणार नव्हती. हे छोटेसे गावसुद्धा हिरवाईने नटलेले होते. जिथे तिथे जर्दाळूच्या बागांमधून पिकलेल्या जर्दाळूंचा ढीग पडलेला दिसत होता. लोकांनी पिकलेले जर्दाळू रस्त्यावर वाळत घातल्याचे दिसत होते. अक्षरशः सर्वत्र जर्दाळूंचा सडा पडलेला होता...! बरेचसे नुकसान होत असल्याचेही लक्षात येत होते. काही घरे नव्या पद्धतीने बांधण्यात आली होती. त्या घरांचे बांधकामसुद्धा लडाखी शैलीप्रमाणेच होती. जवळच शाळा होती. लहान मुले आणि मुली युनिफॉर्म घालून शाळेत जात होते. ही सर्व मुले इतकी देखणी होती, की पाहत राहावे! दाहमध्ये एक लहानसे संग्रहालय आहे. ते आवर्जून पाहण्यासारखे आहे. या संग्रहालयाची काळजी घेणारी व्यक्ती फार आत्मीयतेने संग्रहालयातील वस्तूंची माहिती सांगत होती. त्या उंच आणि देखण्या व्यक्तीचे डोळे, रंग आणि नाक तो वेगळा असल्याची ग्वाही देत होते. निसर्गाच्या कुशीत राहणारे दार्द निसर्गपूजक आहेत. ते आजही वृक्ष, नदी आणि पर्वत यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करतात. पण त्यांचे राहणीमान मात्र फारसे चांगले नाही याची जाणीव तीव्रतेने होत होती. कदाचित ज्यांच्याकडे खूप मोठ्या बागा आहेत ते दार्द श्रीमंत असावेत. त्या छोट्याशा गावात बऱ्‍यापैकी चारचाकी गाड्या दिसत होत्या. पण दगडात बांधलेली घरे, एकूणच गावाचे डोळ्यात भरणारे स्वरूप पाहिल्यानंतर तीव्रतेने वाटत होते की काही झाले तरी हे लोक आपल्या देशाचाच भाग आहेत, त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधांपासून वंचित ठेवणे योग्य होणार नाही. त्यांच्या परंपरा जपणे त्यांच्यासाठी जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यांच्या भावी पिढीला शिक्षण आणि त्यापासून मिळणारे उज्ज्वल भविष्य यांचा लाभ होणेही तितकेच गरजेचे आहे. आपल्या जमातीच्या बाहेर लग्न करण्याची दार्द लोकांना परवानगी नसते. तसे केले तर ते बाहेरच्या व्यक्तीला आपल्या समाजात स्वीकारत नाहीत. पण हल्ली शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडणारी तरुणाई बाहेरच्या समाजातील जोडीदारांची निवड करत आहे. 

वैराण वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या लडाखच्या भूमीत असूनही हिरव्या कंच हिरवाईचा वरदहस्त लाभलेल्या निसर्गसुंदर आर्यन व्हॅलीमधून आम्ही बाहेर पडलो... पण माझ्या मनातील अनेक अनुत्तरीत प्रश्‍न माझ्यासोबतच आले, ज्याची उत्तरे मिळतील अशी आशा मला वाटत नाही.

संबंधित बातम्या