1971 मधील गौरवशाली क्षण

ले.ज. (नि.) एस.एस. मेहता, पीव्हीएसएम, एव्हीएसएम अॅण्ड बार, व्हीएसएम
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

कव्हर स्टोरी

डिसेंबर १९७१मधील बांगलादेश मुक्तिसंग्रामाला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रहित, परराष्ट्र धोरण अशा महत्त्वपूर्ण घटकांच्या पलीकडे जाऊन निव्वळ मानवतावादी दृष्टिकोनामधून एका देशाने आपल्या शेजारी देशास मदत केल्याचे दुर्मीळ व अपूर्व उदाहरण म्हणजे बांगलादेश निर्मिती होय. भारतीय लष्कराच्या पश्चिम विभागाचे माजी प्रमुख आणि बांगलादेश मुक्तिसंग्रामादरम्यान ढाका शहरात प्रवेश केलेल्या भारतीय रणगाड्यांच्या पहिल्या तुकडीचे नेतृत्व केलेले लेफ्टनंट जनरल एस.एस. मेहता यांनी या युद्धावर टाकलेला एक दृष्टिक्षेप..

विसाव्या शतकातील जागतिक राजकारणाचा इतिहास हा एका बाजूला अनेक युद्धांचा इतिहास आहे. याच काळात दोन जागतिक महायुद्धेही घडली. रक्तपात झाला. लक्षावधी मृत्यूही झाले. भारतीय उपखंडाच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टिकोनामधून तर गेले शतक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. भारत व पाकिस्तान या दोन देशांना मिळालेले स्वातंत्र्य; यानंतर काही वर्षांतच पाकिस्तानची झालेली 'दुसरी फाळणी'... धर्म, संस्कृती, भाषा, वंश अशा अनेक घटकांसंदर्भात प्रचंड वैविध्य असलेल्या, कोट्यवधींची लोकसंख्या असलेल्या या भूभागाच्या राजकीय इतिहासात घडलेली ही उलथापालथ निव्वळ अतुलनीय आहे. १९७१मध्ये घडलेल्या मुक्तिसंग्रामानंतर एक स्वतंत्र देश म्हणून बांगलादेशचा झालेला जन्म हा याच जगड्व्याळ घडामोडीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

बांगलादेश निर्मितीचे वेगळेपण ते काय? या प्रश्नाचे महत्त्व एक भारतीय म्हणून तर समजावून घ्यावयास हवेच; मात्र जागतिक राजकारणाच्या अभ्यासकांसाठीही हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. याचे कारण म्हणजे, बांगलादेशची निर्मिती ही निव्वळ इतर अनेक घडामोडींसारखी एक घडामोड नव्हे; तर जागतिक राजकारणाकडे पहावयाच्या विविध दृष्टिकोनांस या देशाच्या निर्मितीमधून एक नवा आयाम मिळाला आहे. राष्ट्रीय हित, परराष्ट्र धोरण उद्दिष्टे, पारंपरिक राजकीय विचारसरणी अशा एखाद्या देशाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक घटकांच्या पलीकडे जाऊन निव्वळ मानवतावादी दृष्टिकोनामधून एका देशाने आपल्या शेजारी देशास मदत केल्याचे दुर्मीळ व अपूर्व उदाहरण म्हणजे बांगलादेश निर्मिती होय.

बांगलादेश निर्मितीचे प्रत्यक्ष महानाट्य समजावून घेण्याआधी एका बाब ध्यानी घ्यावयास हवी. बांगलादेश या नव्या देशाची परिणती ज्या काळात झाली तो काळ एक स्वतंत्र देश म्हणून भारतासाठी अत्यंत कठीण व कसोटीचा होता. भारतासमोरही १९६० व ७०च्या दशकांत अनेक जटिल प्रश्न अक्षरशः आ वासून उभे होते. गरिबी, बेरोजगारी, आरोग्य अशा अनेक प्रश्नांच्या गर्तेत अडकलेला भारत याच काळात आर्थिक विपन्नावस्थेचा सामना करत होता. याशिवाय राजकीय स्थैर्यास आव्हाने निर्माण होऊ लागली होती. नव्या धोरणांमधून नवे सामाजिक प्रश्न तयार झाले होते. जुने सामाजिक प्रश्न चिघळत होते. थोडक्यात, कोणत्याही देशाच्या; विशेषतः शेजारी देशाच्या अंतर्गत प्रश्नामध्ये ढवळाढवळ करावी अशी तत्कालीन नेतृत्वाची वैचारिक धारणाही नव्हती; वा अंगी तसे बळही नव्हते. मात्र अशा परिस्थितीमध्ये लक्षावधी बांगलावासीयांच्या रुदनास भारताने मानवतावादी प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व संकेत धाब्यावर बसवून, मानवतेच्या मूल्यांची राजरोस पायमल्ली करून घडत असलेल्या निर्मम मानववंश विच्छेदास रोखण्याकरिताच भारतीय लष्कराने बांगला भूमीत प्रवेश केला.

त्याकाळात बांगलादेश प्रश्नी अनेकानेक वेळा चर्चा घडून, नवनवे प्रश्न सातत्याने उभे राहत असूनही संयुक्त राष्ट्रसंघ वा संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समिती अशा जागतिक पातळीवरील अनेक महत्त्वपूर्ण संस्थांनी भरीव प्रतिसाद दिला नाही. किंबहुना, भारतीय हस्तक्षेप जर वेळीच झाला नसता तर बांगलावासीयांचा हाहाकार हे इतर अनेक प्रश्नांसारखे अरण्यरुदनच राहिले असते, असे म्हणावयास पुरेसा वाव आहे. कोणत्याही शेजारी देशाने एखाद्या देशास अशा प्रकारे मदत केल्याचे उदाहरण नाही. तेव्हा, बांगलादेश निर्मिती ही गेल्या शतकातील एक अत्यंत अपवादात्मक घटना आहे. बांगलादेश निर्मितीचा संदर्भ हा अशा पद्धतीने समजावून घेणे अत्यावश्यक आहे.

बांगलादेशमधील भारताचा विजय हा राजकीय नेतृत्वाचा तर होताच; मात्र तो भारतीय लष्कराचाही देदीप्यमान विजय होता. भारतीय लष्कराने थेट ढाक्यापर्यंत धडक मारून पाकिस्तानी सैन्यास व जगास स्तिमित केले. अर्थात, काही दिवसांत मिळालेला लष्करी विजय हा वर्षानुवर्षांच्या कठोर प्रशिक्षणाचा व कष्टांचा परिपाक असतो, ही बाब विसरून चालणार नाही. बांगलादेश निर्मितीमागील भारतीय लष्कराच्या या विजयाचे महत्त्वदेखील समजावून घेण्यासाठी लष्करामधील मूलभूत तत्त्वप्रणालीची काहीशी तोंडओळख असणे आवश्यक आहे.

ही तत्त्वे वैयक्तिक व सामूहिक अशा दोन्ही पातळ्यांवर ध्यानी घेणे आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवर प्रथमतः देशहित, संरक्षण, राष्ट्रप्रतिष्ठा; नंतर कोणत्याही अधिकाऱ्याच्या हाताखालील सैनिकांचे जीवित आणि त्यानंतर तुमचे प्राण असा प्राधान्यक्रम असावयास हवा. सामूहिक पातळीवरील तत्त्वप्रणाली ही तीन महत्त्वपूर्ण मूल्यांवर आधारलेली आहे. लष्करी प्रशिक्षणाचे मूलभूत अंग असलेली ही मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत १. आपल्या नेतृत्वाखालील सैनिकांनी उत्तम कामगिरी करावी, यासाठी अधिकाऱ्याने सातत्यपूर्ण पद्धतीने काम करावयास हवे. २. आपल्या भूमिकेची सैनिकांना नेमकी जाण असणे आवश्यक आहे. लष्करास सोपविण्यात येत असलेल्या कामगिऱ्या निखळ यश संपादन करण्यासाठीच असतात. यशाखेरीज दुसरे काहीही अपेक्षित नसते. यामुळे आपली कामगिरी व आपल्याकडून असलेल्या अपेक्षा या पूर्णतः समजणे अत्यावश्यक असते. ३. याचबरोबर, अधिकारी व सैनिक हा भेद विसरुन उद्दिष्टप्राप्तीसाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असते. या मूलभूत तत्त्वांनुसार भारतीय लष्कराची जडणघडण सतत चालू ठेवणे, हेच खरे शांतता काळातील मुख्य काम असते. या पायाभूत कामाचा बांगलादेश युद्धावेळी प्रचंड फायदा झाला.

***
या युद्धादरम्यान शत्रूच्या मुख्य फौजेस बगल देऊन मेघना नदी ओलांडण्याचा घेण्यात आलेला निर्णय हे प्रत्यक्ष युद्धक्षेत्रावरील ऑपरेशनल नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे. मेघना नदी ओलांडण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले होते. त्यावेळी मी मेजर पदावर होतो. पीटी ७६ रणगाड्यांचा समावेश असलेल्या ५ इंडिपेंडंट आर्मर्ड स्क्वाड्रनचे (६३ कॅव्हलरी) नेतृत्व माझ्याकडे होते. आगरताळ्यापासून काही किलोमीटरवर असलेल्या लालमई टेकड्यांच्या परिसरात तैनात असलेल्या ६१ माउंटन ब्रिगेडला साहाय्य करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. माझ्या तुकडीमधील सोव्हिएत बनावटीचे पीटी७६ रणगाडे ‘उभयचर’ असले तरी ते प्रामुख्याने युरोपातल्या जेमतेम २०० ते ३०० मीटर रुंदीच्या नद्या ओलांडण्याकरिता बनवण्यात आले होते. युरोपातल्या नद्यांच्या तुलनेत मेघना नदी एखाद्या सागराप्रमाणे अवाढव्य होती. माझ्या कमांडिंग ऑफिसरचा निर्धार कातळाप्रमाणे अभेद्य होता. अशा आव्हानात्मक वातावरणात मला मेघना नदी ओलांडण्याविषयी विचारणा झाल्यानंतर माझे उत्तर फक्त होकारार्थीच होते.

बंगालच्या उपसागरानजीक येताच या भागातल्या नद्यांचा वेग वाढू लागतो. पीटी ७६ रणगाड्यांच्या क्षमतेपेक्षा नदीच्या पाण्याचा वेग कितीतरी अधिक होता. सुदैवाने, या नदीच्या पलीकडील तीरावर शत्रूचा तळ नव्हता. ही नदी सरळ रेषेत ओलांडणे शक्य नसल्याने काही अंतर प्रवाहाच्या दिशेने वाहत जावे लागणार, हे स्पष्ट झाल्यानंतर मी या नदीचे हवाई परीक्षण करू देण्याची परवानगी मागितली. याबरोबरच, आमच्या तुकडीचे ट्रूप लीडर लेफ्टनंट राज खिंद्री यांनी स्थानिकांच्या मदतीने नदीचे परीक्षण केले आणि दलदल नसलेली एक जागा शोधून नदीमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग शोधून निश्चित केला. नदीच्या हवाई परीक्षणामधून नदी प्रवाहातील छोट्या बेटांविषयी माहिती मिळाल्यानंतर आधी एक बेट, त्यानंतर दुसरे बेट असे करत आम्ही नदी ओलांडण्यात यश मिळविले.

मेघना नदी ओलांडणे हे अभूतपूर्व यश होते. यामुळे पाकिस्तानी नेतृत्वास मोठा धक्का बसला. याचबरोबर, पाकिस्तानी सैन्याकडून केल्या जात असलेल्या अत्याचारांचे केंद्रस्थान असलेले ढाका शहरही या यशामुळे दृष्टिपथात आले. याआधीच आमचे कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांनी हवाई दलाचे कमांडर ग्रुप कॅप्टन चंदन सिंग यांच्याशी चर्चा करून ढाका शहराच्या दिशेने कूच करण्यासाठी हेलिकॉप्टर्समधून एक पूर्ण बटालियन मेघना नदीपलीकडे उतरविण्याचे आदेश दिले होते. याआधीच्या लढायांनी दृष्टिपथात आलेल्या ढाका शहराकडे दुर्लक्ष करणे शक्यच नव्हते. भारतीय लष्कर ही सुवर्णसंधी गमावणे निव्वळ अशक्यकोटीतील बाब होती.

भारतीय लष्कराचा बांगलादेशमधील विजय हा केवळ सामर्थ्याचा वा साधनसंपत्तीचा नाही. अचूक व्यूहरचना आणि परिपूर्ण अंमलबजावणी हे या विजयाचे मुख्य रहस्य आहे. 

भारतीय लष्करामधील विविध विभागांच्या या संयोजनाबरोबरच आपल्या गुप्तचर संस्था व राजनैतिक अधिकारी तत्कालीन अमेरिकी सरकारच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. ऑगस्ट १९७१ मध्येच करण्यात आलेल्या भारत सोव्हिएत युनियन कराराचा फायदा भारतास संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीमध्ये झाला. तत्कालीन भारतीय राजकीय नेतृत्वासही या प्रकरणी जागतिक पातळीवर प्रचंड दबावाचा सामना करावा लागला. अशा पद्धतीने लष्करी, राजनैतिक, राजकीय, व्यूहात्मक अशा विविध पातळ्यांवरील सुसूत्रतेची परिणती ढाका शहरावरील ऐतिहासिक विजयामध्ये झाली. ‘‘ढाका हे स्वतंत्र शहर हे एका स्वतंत्र देशाची राजधानी आहे,’’ हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे संसदेमधील वक्तव्य हे विसाव्या शतकामधील सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करत राबविण्यात आलेल्या मानवतावादी हस्तक्षेपावरील कळसाध्याय आहे.

१९७१ बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा हा विजय हा निव्वळ लष्कराचा नाही. हा लोकशाही व्यवस्थेचा हुकूमशाही व्यवस्थेवरील विजय आहे. हा मानवतेचा क्रौर्यावरील विजय आहे. हा स्वातंत्र्याचा पारतंत्र्यावरील विजय आहे. हा मूल्यांचा अंधकारावरील विजय आहे...विजयी भारतीय लष्कर हे ढाक्यात प्रवेश करते झाल्यानंतर तेथील स्थानिक जनतेच्या मुखावरील आनंद केवळ अवर्णनीय होता. तत्कालीन बंगाली जनतेने भारतीय लष्कराकडे खऱ्या अर्थी मुक्तिदाते म्हणून  पाहिले. पाकिस्तानी सैन्याचे तीन रणगाडे आम्ही जिंकून घेतले होते. त्यातील एक रणगाडा आमच्या तुकडीने ढाक्यात प्रवेश केल्यानंतर ‘इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल’समोर उभा करून ठेवला होता. रणगाडा वा कोणतेही लष्करी साधन मूलतः दमनकारी नसते; तर त्यामागील विकृत मानवी प्रेरणा हे मूळ कारण असते, असा संदेश या कृतीमधून द्यावयाचा होता. तेरा दिवस चाललेल्या या युद्धानंतर साडेसात कोटी लोकांना वंशविच्छेदाच्या धोक्यामधून वाचविण्यात भारतास यश आले. एकंदर, भारतीय लष्करास सर्वसामान्य बांगलावासीयांचा मिळालेला प्रतिसाद हा भावनापूर्ण होता. 

बांगलादेश मुक्तिसंग्रामाची ही कथा भारतीय तरुणांसाठीही तितकीच प्रेरणादायी आहे. भारतासारखी एक मूल्याधारित सशक्त लोकशाही निव्वळ आपल्यापुरता विचार न करता, शेजारी बांधवांच्या आर्त हाकेस प्राणपणाने प्रतिसाद देते, त्यांना केल्या जाणाऱ्या मदतीमधून स्वतःच्या मूलभूत मूल्यांची जपणूक करते, याची जाणीव आजच्या भारतीय तरुणास झाल्यास या लोकशाही व्यवस्थेचे व मूल्यांचे महत्त्व त्याच्या मनावर बिंबल्याखेरीज राहणार नाही. 

(शब्दांकन : योगेश परळे)

‘न्यूयॉर्क टाइम्स'चे पुलित्झर पुरस्कार विजेते सिडने स्चानबर्ग यांनी भारतीय लष्कराबरोबर ढाक्यापर्यंतचा प्रवास केला. त्यांनी भारतीय लष्कराच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. "मला लष्करे आवडत नाहीत. कारण लष्करांची परिणती युद्धात होते. मात्र भारतीय लष्कर वेगळे आहे. भयामुळे ध्येयापासून ढळलेला एकही भारतीय जवान मला दिसला नाही. भारतीय लष्करातील धैर्य निव्वळ असामान्य होते,” अशी नोंद त्यांनी करून ठेवली आहे.

बांगलादेश मुक्तिसंग्रामाचे हे युद्ध मुक्ती वाहिनीच्या मदतीशिवाय १३ दिवसांत संपणे निव्वळ अशक्य होते. मुक्ती वाहिनीचे अस्तित्व आणि न्याय्य कारणासाठी त्यांच्या लढण्याच्या धैर्यामुळे बांगलादेश मुक्तिसंग्रामास अक्षय्य ऊर्जा मिळाली. वर्तमान काळात साध्य झालेल्या तांत्रिक प्रगतीमुळे प्रत्यक्ष युद्धपद्धती कितीतरी प्रगत झाली आहे. तिच्यामध्ये पारदर्शकता आली आहे. १९७१च्या युद्धात ही पारदर्शकता केवळ मुक्ती वाहिनीमुळे साध्य झाली.

संबंधित बातम्या