... मेरे यार जुलाहे।

प्रवीण टोकेकर
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

कव्हर स्टोरी

गुलज़ारसाहेब कबीराला ‘मेरे यार जुलाहे’ असं मोठ्या जिव्हाळ्यानं पुकारतात. निदान आपल्या पिढीसाठी गुलज़ार हेच त्या विणकराचं दुसरं नाव आहे. ‘पुखराज’नंतर गुलज़ार बऱ्याच ठिकाणी भेटत राहिले. गुलज़ारसाहेब आणि त्याची आता उत्तम जान पहचान झाली आहे. दोघंही अधूनमधून भेटत राहातात. कधी गाण्यातून, कधी पुस्तकातून...कधी आसपासच्या गुलज़ारी प्रतिमानांमधून. तो त्यांना हल्ली प्रेमानं ‘मेरे यार जुलाहे...’ अशी हाक मारतो. तेदेखील ‘ओ’ देतात. हे सगळं त्याच्या मनातल्या मनात घडत राहातं. 

माणसानं कायम निगरगट्टपणानं जगत राहावं. इथं हुळहुळेपण काही कामाचं नाही. या जालिम दुनियेत तलम वृत्तीचा माणूस किती टिकाव धरणार? मग लोक हसतात. चिडवतात.

लोकांनी आपल्याला हुळहुळ्या म्हणू नये, म्हणून तो आयुष्यभर धडपडला. घट्टमुट्ट चेहरा ठेवून जगत राहिला. हुळहुळ्या मित्र-मैत्रिणींना स्वतःच चिडवत राहिला. त्याच्या बेदरकार अस्तित्वाची सावली रडुबाईच होती. त्याच्या अंगालगतच वावरायची. उन्हाची दिशा बघून पाय पसरणारी. 

काहीही चांगलं वाचलं, बघितलं की आपले डोळे लग्गेच ओलसर होतात, हे गुपित त्याला खूप लहानपणीच कळलं होतं. म्हणून तो आजन्म सावध राहिला. साधं सिनेमातलं कढ आणणारं दृश्य बघताना तो जीभ दातात धरून घशातला आवंढा रोखून धरायचा. हे वागणं बरं नव्हं!  माणसानं कसं धश्चोट असलं पाहिजे.

...अजूनही त्याला स्पष्ट आठवतं. खूप लहानपणीचे दिवस. त्या दिवसांना आजोळच्या घरातल्या चुलीत भाजलेल्या खरपूस कांद्याचा वास असे. आज्जीच्या नऊवारी साडीच्या फलकाऱ्याचा, आणि हातातल्या कांकणांचा नाद असे. 

शेतातल्या पायबुडी चिखलामध्ये मनसोक्त खेळता खेळता दिवाळीची सुटी भोरड्या-पकुर्ड्यांसारखी भर्रकन उडून जायची. तिथं अंगणातल्या सोनचाफ्याच्या बुडाशी खाटल्यावर झोपल्या झोपल्या त्याच्या कानावर कुठून तरी रेडिओवरचे लताचे सूर कानावर पडले. ‘जाडोंऽऽ की नर्म धूप ओढ आंगन में लेऽऽटकर...’ 

तो तस्साच दुलईत पडून राहिला. अर्थ-अन्वर्थासकट त्या सुरांची कोवळी ऊब दुलईत हलकेच शिरली. शब्दांचं गारुड त्या भल्या सकाळच्या अंतरंगात साकळलं होतं, ते नकळत त्याच्या मनात उतरलं...नव्हेंबरातली थंडी, अंगणात उतरलेलं कोवळं, खेळकर ऊन. खाटल्यावर तो. त्याला वाटलं, आपण  स्वतःच एका कवितेची ओळ झालो आहोत. आपल्याला एक सुंदर चाल आहे, आणि कुठलातरी अनिर्वचनीय गळा ते गाणं गातो आहे...चाफ्याच्या हडमुड्या फांदोट्यांच्या कडेवरचे नुकते उमलते सोनकळे पाहात तो कितीतरी वेळ तसाच पडून राहिला...

बऱ्याच काळानंतर त्याला कळलं की हे असलं सगळं, म्हंजे आपल्याच आयुष्यातलं, गुलज़ार नावाचा कुणीतरी माणूस लिहितो.

कहीं दूर जब दिन ढल जाए,

सांज की दुल्हन बदन चुराए,

चुपके से आए...

हे असलं काहीतरी ऐकून कायम त्याचा भोज्या व्हायचा. तरीही घट्टमुट्ट चेहरा करत, उगीचच भंकसगिरी करत तो जमेल तसा जगत राहिला. चांगली कविता आवडली तरी त्याची उघड टिंगल करू लागला. कवीलोकांना ‘कवडे’ म्हणू लागला. गल्लोगल्ली कवींचं महामूर पीक निघू लागल्याबद्दल हसू लागला. पण तरीही कवितेतली एखादी सणसणीत ओळ त्याला हादरे देऊन जायची. मर्ढेकरांच्या ‘मागण्याला अंत नाही, आणि देणारा मुरारी...’ या ओळीनं त्याला असंच अबोल करून टाकलं होतं. पु. शि. रेग्यांच्या जिमनॅस्ट नादिया कोमानेसीवरच्या ‘ठाम दांडिवर ठाय जराशी, इकडुनि तिकडे घे कोलांटी’ या ओळींनीही त्याच्यावर जादू केली होतं. विंदांच्या कवितांनी तर मनात ठाण मांडलं होतं. असं बरंच काही. पण हे सगळं मनातल्या मनात. वरकरणी त्याचा भंकसबाजीचा, निगरगट्ट चेहरा कायम होता.

दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन, 

बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किए हुए...

गुलज़ारच्या गाण्यानं गालिबच्या शायरीचा महालच उघडून दिला होता. त्याच्या त्या पंजाबी कनवटीला जणू या अनेक महालांच्या चाव्यांचे जुडगे होते. वेळवखत पाहून तो अचूक चावी काढून महाल उघडून देई. बुल्लेशाच्या ‘थैय्या थैय्या’ च्या सूफी सुरांचा त्यानं ‘छैय्या छैय्या’ मध्ये कायापालट केला. अमीर खुस्त्रोच्या अवघड, क्लिष्ट रचनांची कोडी सुटी सुटी करून दाखवली. 

सगळ्यात मोठं देणं होतं गालिबची ओळख. गुलज़ारनं तेव्हा गालिबचा शायरीपट मालिकेच्या स्वरूपात आणला नसता तर खूप खूप गडबड झाली असती, असं त्याला वाटत राहातं. गालिबसारख्या अभिजात शायराची ओळख एका फिल्मी गीतकारानं करून द्यावी, यातच सारं इंगित दडलेलं आहे. पण जग हे असंच असतं. ‘मिर्झा गालिब’ या मालिकेत गालिबच्या रचना होत्या, त्याला जगजीतसिंगच्या अलौकिक चाली आणि आवाज होता. गालिब उलगडून सांगणारे गुलज़ारसाहेब होते. हे एवढंच करून गुलज़ार थांबले असते तरी चाललं असतं, असं त्याला वाटतं. जसं मदन मोहननं फक्त ‘आप की नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे’ ही एवढीच चाल केली असती, तरी पुरेसं झालं असतं. तसंच. गुलज़ारसाहेबांनी नात्यागोत्यांचे, मनीमानसीचे कितीतरी रंग दाखवले. उदाहरणार्थ, ‘मोरा गोरा अंग लै ले, मोहे शाम रंग दै दे’ मधली नूतन दिसली नसती तर आदिस्त्रीच्या रूपाचा आभास तरी कसा झाला असता? 

गालिबनं तर त्याची संपूर्ण नींद खराब केली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्याला निगरगट्टपणाचा अभिनिवेश समजत होतो, तोच मुळात हळवेपणाचा कळस आहे, याची जाणीव करून दिली.

‘इन रेशमी राहों में, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुँचती है...’ या गुलज़ारच्याच गाण्यातल्या ओळी. नेमक्या वेळेला रसिकाच्या ओंजळीत मोजके शब्द टाकण्याची गुलज़ारची ही रीत म्हटलं तर जीवघेणी. विव्हलतेच्या विवराच्या टोकाशी येऊन उभ्या असलेल्या एखाद्याच्या खांद्यावर ही अशी अर्थगर्भ ओळ पारिजाताच्या टप्पोऱ्या फुलासारखी पडली, तर काय होतं?
अंधी आंखो पे तुमने अच्छा किया

हाथ रख के जो रोशनी दे दी

...तेरे हाथों मे खुल गए दो जहाँ

नात्यागोत्यांचे बंध चाचपणारी, त्यात दडलेले अन्वयार्थ उकलून काढणारी गुलज़ारची प्रतिभा भवतालातल्या प्रतिमा वापरते, आणि जगण्याबद्दल खूप काही सांगून जाते. नात्यागोत्यांचे नवे अर्थ सांगू पाहाते. हातातून सुटलेला काळ हा ‘सुटलेला’ नसतो, तर तो आपल्यात सामावलेला असतो, याचं भान त्याच्या कविता आणि गाणी देतात. 

लहानपणी फिरवलेला भोवरा, हुतुतु, डबा ऐसपैससारखे खेळ, त्यांच्या कवितेतून चिंतनाचा गहिरा रंग लेवून येतात.  ‘मेरा वो सामान लौटा दो...’ ही ‘इजाजत’ मधली कविता (होय, कविताच...गाणं नव्हे.) मनींचं अब्द अब्द काही मोजक्या शब्दातच सांगून जाते.

गुलज़ारच्या प्रतिमांची भाषा ही त्याच्याच मनातलं शब्दबद्ध करत राहिली. पुढे तरुण वयात कुणीतरी त्याला ‘पुखराज’ भेट दिलं. हे ‘कुणीतरी’ त्याला चांगलंच ओळखणारं असावं. 

‘पुखराज’च्या पहिल्याच काही पानांत त्याला चक्क कबीर भेटला. एरवी दोह्यांमधून क्वचित कुठेतरी भेटायचा. इथं त्या विणकराचं वेगळंच रूप समोर आलं.

मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे!

अकसर तुझको देखा है कि ताना बुनते

जब कोई तागा टूट गया या ख़त्म हुआ

फिर से बाँध के

और सिरा कोई जोड़ के उसमें

आगे बुनने लगते हो...

...मैंने तो इक बार बुना था एकही रिश्ता

लेकिन उसकी सारी गिरहें

साफ नज़र आती है, मेरे यार जुलाहे!

....साफसुथरं नातं विणण्याचा इल्लम थेट त्या विणकराकडेच मागणाऱ्या कवीचं मागणं मोठं की तो विणकर? गुलज़ारसाहेब कबीराला ‘मेरे यार जुलाहे’ असं मोठ्या जिव्हाळ्यानं पुकारतात. निदान आपल्या पिढीसाठी गुलज़ार हेच त्या विणकराचं दुसरं नाव आहे. पुखराजनंतर गुलज़ार बऱ्याच ठिकाणी भेटत राहिले. कधी कुठल्या एकतर्फी मुलाखतीत. जगजीतच्या आल्बममध्ये, मुशायऱ्यात किंवा पुस्तकांत...

गुलज़ारच्या शायरीनं बरंच काही घडलं, बरंच बिघडवूनही ठेवलं.  ‘पुखराज’ हा गुलज़ारचा काव्यसंग्रह त्याच्याकडे अजूनही आहे. वेष्टनाचा लालुस पुठ्ठा आता थोडा सैलावलाय. त्याच्यासारखाच.

त्यानंतर गुलज़ारसाहेबांची कितीतरी पुस्तकं आली. तीही वाचली, पण ‘पुखराज’ची जादू ओसरणं अशक्य आहे. ते स्वतः म्हणतातच, होय, मी सिनेमे केले, कारण त्यातून माझी कमाई होत होती. घरची चूल पेटत होती. पण सिनेमे झाले की मी परत परत पुस्तकांकडेच वळायचो... आपणही त्यांच्या पुस्तकांकडेच वळावं.

नुकतंच त्यांचं ‘बोस्कियाना’ हे नवं पुस्तक बाजारात आलं. त्यात गुलज़ारसाहेबांच्या आठवणी आहेत. त्यात रमावं, त्यांनाच शोधावं. हा शायर कुठल्या मुशीतून बनला, हे हुडकावं. 

खूप वर्ष झाली असतील, गुलज़ार बांदऱ्याला कुठं तरी राहातात, हे त्याला कळलं. एकदा या आजोबांना बघायला तरी हवं, म्हणून तो लोकलगाडी आणि नंतर बस पकडून खारला गेला. झाडाझुडांचा शांत रस्ता. दांडगी कुत्री हिंडवणाऱ्या गोऱ्यापान तरुण पोरी, पोरं. बंगल्यांची उंच उंच फाटकं आणि त्याच्या पुढ्यात प्लास्टिकच्या खुर्चीवर कंटाळत बसून राहिलेला गुरखा. अलीकडे पलीकडे उंच, आलिशान इमारती.

हे लोक कपडे कुठे वाळत घालत असतील? एकाही ग्यालरीत परकर, चड्ड्या, सदरे आणि पलंगपोस वाळत पडलेले नाहीत. कुठल्याही गॅलरीत तुळस का दिसत नाही? डालडाच्या रिकाम्या डब्यांचं हे श्रीमंत लोक काय करत असतील? 

लांबवर तो टुमदार बंगला दिसत होता. अंगावर येणारा नव्हे, छानदार घरासारखा दिसणारा. चिरेबंदी रूप जपणारा. भोवताली झाड झाडोरा होता. फाटकाशी कुणी गुरखाही उभा नव्हता. जावं का आत? पण आत जाऊन सांगायचं काय? मला तुमची गाणी आवडतात हे? मग समजा ते म्हणाले, ‘अच्छा, तो मैं क्या कर सकता हूं?’ तर...?

त्याला भलतंच बावळट वाटू लागलं. तो परत फिरला.

असं अनेकदा घडलं. तू कविता करतोस का? असं कुणी विचारलं तर तो ‘छे’ असं खोटंच सांगायचा. कविता करणं ही बाहेरच्या कोरड्या जगासाठी विकृती आहे, याची त्याला ठाम खात्री झाली होती. त्याचा त्या घरात जाण्याचा कधीच धीर झाला नाही. एक दिवस काय झालं की, गुलज़ारसाहेबांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. किंवा असंच काहीतरी निमित्त. त्यानं मध्यरात्री उठून कागदावर काहीबाही खरडलं. गुलज़ारसाहेबांच्याच लाडक्या प्रतिमांची नक्कल करून त्यानंही एक कवितासदृश काहीतरी लिहिलं. आश्चर्य म्हंजे ते छापूनही आलं.

दोन दिवसांनी त्याच्या हातात एक पत्र पडलं. सुंदर जांभळ्या शाईतली अक्षरं. त्यात कवितेचं कौतुक होतं, आस्था होती. हा कोण संप्रति कवी? असं एक कुतूहलही होतं. खालती ती लपेटेदार सही होती- गुलज़ार.

त्यानं आजही ते पत्र जपून ठेवलंय. त्याचं पुढे काय करायचं हे त्याला अजून कळलेलं नाही. त्यामुळे काही बिघडतही नाही. 

मोड पे देखा है वह बूढा-सा इक पेड कभी?

मेरा वाकिफ है, बहुत सालोंसे हम जानते है...

गुलज़ारसाहेब आणि त्याची आता उत्तम जान पहचान झाली आहे. दोघंही अधूनमधून भेटत राहातात. कधी गाण्यातून, कधी पुस्तकातून...कधी आसपासच्या गुलज़ारी प्रतिमानांमधून. तो त्यांना हल्ली प्रेमानं ‘मेरे यार जुलाहे...’ अशी हाक मारतो. तेदेखील ‘ओ’ देतात. हे सगळं त्याच्या मनातल्या मनात घडत राहातं. 

बाकी त्याची नेहमीची निगरगट्ट भंकस...तीही चालूच आहे.

 

संबंधित बातम्या