न झालेले साहित्य संमेलन

संजय नहार
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

‘सरहद’ संस्था अथवा मी घुमान साहित्य संमेलनाचे संयोजक नव्हतो, केवळ व्यवस्थापक होतो. पहिल्या संमेलनानंतर दुसरे संमेलन दिल्लीत घेण्याचा विचार आल्यावर काय घडलं? न झालेल्या या संमेलनाच्या निमित्ताने पडद्यामागे आणि प्रत्यक्ष घडलेल्या काही घटनाही मराठी साहित्यप्रेमींसमोर आल्या पाहिजेत म्हणूनच हा लेखनप्रपंच.

साहित्य संमेलन हे व्यासपीठ टोकाच्या मतभेदांसाठी प्रसिद्ध आहे, किंबहुना विरोध हीच या व्यासपीठाची शक्तीसुद्धा आहे. या संस्थांचा ताबा साहित्यबाह्य, अनिष्ट प्रवृत्तींनी घेतल्याचा आरोप अनेक वर्षे अनेक लेखक आणि साहित्यिकही करीत आहेत. बदनामी आणि व्यक्तिगत अहंकार, द्वेष आणि खोटेपणा याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान नाही, असा समज झाल्याने मी एका लेखाच्या संदर्भाने बदनामीचा खटला दाखल करण्याचा विचार करत होतो; पण इतिहासाकडे पाहताना अशा घटनासुद्धा या संमेलनाचाच एक भाग आहे, याची जाणीव झाली आणि मराठीबद्दलच्या टोकाच्या प्रेमामुळे हा विचार त्याक्षणी सोडून दिला.

खरेतर घुमान साहित्य संमेलनाच्या व्यवस्थापनाची संधी मिळाल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला, असे मला कधीच वाटत नव्हते. पण ‘दिल्ली’, ‘पानिपत’, ‘अटकेपार’ अशा शब्दांचा एका विशिष्ट वयात मोठा परिणाम होता म्हणूनच कोणीही घ्यावे, मात्र एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे, अशी तीव्र भावना होती आणि आहे. तसेही संमेलन साहित्य महामंडळाचेच असते. संयोजक व्यवस्थांपुरता मर्यादित असतो. तीही नीट झाली नाही तर त्याला साहित्यिकांच्या नाराजीला तोंड द्यावे लागते, त्यामुळे साहित्य संमेलनाचा संयोजक दुसऱ्यांदा ते धाडस शक्यतो करीत नाही. मराठी माणसाच्या मनात दिल्लीबद्दल एकाच वेळी आकर्षण आणि भीतीची किंवा गोंधळाची भावना असते. याचा प्रत्यय दिल्लीत न झालेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा आला.

मराठीसाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून काम करणाऱ्या संस्थांची एक मध्यवर्ती शिखर संस्था असावी या उद्देशाने ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’ची स्थापना झाली. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या धोरणांमध्ये आणि कामामध्ये एकसूत्रीपणा निर्माण करणे, मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी कार्य करणे ही महामंडळाची उद्दिष्टे आहेत. विशेष म्हणजे, या उद्दिष्टाला धरूनच दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केली जावीत, असा संकेत आहे. 

****
संत नामदेव खऱ्या अर्थानं व्रतस्थ कवी आणि साहित्यव्रती होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध पंजाबमध्ये व्यतीत केला. तिथल्या लोकांमध्ये रमले. तिथलेच झाले. इतके की ‘गुरु ग्रंथसाहीब’मध्ये संत नामदेवांच्या एकसष्ट पदांचा समावेश केला गेला आहे. संत नामदेवांच्या कार्याचा दीर्घ प्रभाव उत्तरेतल्या संत परंपरेवर, साहित्यावर आणि वैचारिक जडणघडणीवर झाला आहे. 

‘सरहद’च्या पुढाकाराने घुमानमध्ये २०१५ साली झालेले ८८वे साहित्य संमेलन याच सूत्रात गुंफले होते. आपल्या प्रदेशाच्या पलीकडे आपली भाषा, संस्कृती घेऊन जाण्याच्या या संत विचारानेच आपल्या देशाची वैचारिक जडणघडण झाली आहे. 

शाळेपासून सुरू झालेल्या वाचन प्रवासात भगतसिंग भेटला. नुसता भेटला नाही, तर तो मेंदूत शिरला. इतका की आपणही समाजासाठी काही केले पाहिजे आणि देशासाठी बलिदान केले पाहिजे, असे वाटू लागले. देशासाठी काही करायचे असेल तर लोक काय करतात, तर एखादे नियतकालिक काढतात, अशी त्याकाळी माझी एक धारणा होती. त्याच धारणेतून ‘राष्ट्रीय विचार दर्शन’ नावाचे एक मराठी नियतकालिक काढले. तेही वय वर्षं पंधरा-सोळाच्या आसपास. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंपासून ते माधवराव गडकरींपर्यंत ज्या मंडळींचे वाचत- ऐकत आम्ही मोठे होत होतो, या मंडळींनी हा उपक्रम उचलून धरला होता. प्रसंगी या नियतकालिकासाठी ते लेखही देत.

आपल्यामुळे समाज बदलेल अशा गैरसमजातून रात्रंदिवस बेभान होऊन काम केले, समाज बदलला नाही आणि आजारपणं मात्र वाट्याला आली. पण ते दिवस मंतरलेले होते. नंतर माधव गडकरींच्या सूचनेप्रमाणे सुरू केलेल्या ‘चौफेर’ अंकाचीही वैचारिक वर्तुळात चांगली चर्चा झाली. साहित्याच्या अनुषंगाने सुरू केलेल्या या सगळ्याच उपक्रमांमुळे आणि माझे चुलते धनराज नहार यांच्यामुळे दत्तो वामन पोतदार, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, ग. दि. माडगुळकर, सरोजिनी बाबर, शांताबाई शेळके, मालती बेडेकर, दुर्गाबाई भागवत, डॉ मा. पं. मंगुडकर, चंद्रकांत घोरपडे, शंकर पाटील, शंकरराव खरात, रा. चिं. ढेरे, सुरेश भट, कवी ग्रेस, ‘सकाळ’चे श्री. ग. मुणगेकर, एस. के. कुलकर्णी अशा कितीतरी मान्यवरांशी संपर्क आला. नंतर माझ्या एका पुस्तकाला ग. दि. माडगुळकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला, तो मला साहित्य अकादमी पुरस्कारापेक्षा मोठा वाटला.

महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, गोपाळकृष्ण गोखले, न्या. महादेव गोविंद रानडे ते शंकर पांडुरंग पंडित यांच्यासारखे देशाला दिशा देण्याचे काम करणारे कितीतरी थोर नेते उदयाला आले. विशेष म्हणजे, या सगळ्यांचा साहित्य हा एक समान धागा होता. 

त्या वयात मात्र साहित्य संमेलन ही वैचारिक मंडळींची जागा आहे; आपल्या सारख्या कृतिशील कार्यकर्त्यासाठी नाही, असा एक न्यूनगंड मनात असल्याने संमेलनात श्रोता म्हणूनही मी कधी सहभाग घेतला नाही. घुमानचा विचार येईपर्यंत संमेलन, त्यातल्या निवडणुकांचे राजकारण या गोष्टींबाबतही मी पूर्णतः अनभिज्ञ होतो, किंबहुना या फंदात पडू नये असाच डॉ. सतीश देसाई ते रामदास फुटाणे (नाना) यांच्या सारख्या ज्येष्ठांचा त्यांच्या अनुभवांनंतरचा सल्ला होता. 

घुमानच्या चर्चेदरम्यान प्रकाशक राजीव बर्वे यांचा एक दिवस मला फोन आला, ते म्हणाले, ‘मला आणि कादंबरीकार भारत सासणे यांना तुम्हाला भेटायचं आहे.’ पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरच्या वैशाली हॉटेलमध्ये आमची भेट झाली. त्या भेटीत सासणेंचे असे म्हणणे होते, की ‘माझी निवडणुकीसाठीची जिंकण्याच्या दृष्टीनं तयारी पूर्ण झाली आहे. मी आयएएस अधिकारी होतो, त्यामुळं माझा पंजाबमधील घुमानच्या विकासासाठी नक्की उपयोग होईल.’ 

नामदेवांच्या कर्मभूमीत संमेलनाध्यक्ष तुकारामांचा वंशज असावा या भावनेने पत्रकार राजीव खांडेकर, गिरीश गांधी आणि महामंडळाचे प्रकाश पायगुडे यांनी, घुमानसाठी डॉ. सदानंद मोरे यांच्यासारखा संत तुकारामाचा वंशज असलेला तत्त्वज्ञ आणि विचारवंत या संमेलनाचा अध्यक्ष असावा अशी भूमिका मांडली. घुमान संमेलनाचे कर्ताधर्ता भारत देसडला आणि महामंडळाचे सुनील महाजन यांनीही ती उचलून धरली. त्याला माधवीताई वैद्य यांनीही मूक संमती दिली.   

खरेतर मी प्रारंभी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांच्या संमेलनाध्यक्ष पदाबाबत सकारात्मक होतो. मात्र ज्यांचा सर्व संमेलनांवर अदृश्य असा मोठा परिणाम नेहमीच असतो त्या शरद पवार साहेबांनाही डॉ. सदानंद मोरे संमेलनाध्यक्ष ही कल्पना आवडली. पवार साहेबांना एखादी कल्पना आवडली की ते बोलून दाखवत नाहीत, थेट कृतीतून दाखवतात. पंजाबचे त्यावेळचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याशी बोलून त्यांनी घुमान संमेलनाला पंजाब सरकारची सर्वोतपरी मदत मिळवून दिली. पंजाब सरकारने हा राज्य सरकारचा उत्सव आहे असे घोषित केले. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले. एकूणच आमचा हेतू शंभर टक्के निर्मळ होता. डावपेच अथवा कारस्थाने करण्याचा स्वभाव नसल्याने ज्येष्ठ साहित्यिक सासणे यांना मदत करणे शक्य नसल्याची स्पष्ट कल्पना सासणे, राजीव बर्वे आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना तेव्हाच दिली. मात्र, भारत सासणे हेच अध्यक्ष झाले पाहिजेत, असा आग्रह ज्या पद्धतीने ठाले-पाटील करत होते, तेव्हा त्यांचे या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळवून देण्याच्या क्षेत्रातले ‘नेमके वजन’ माझ्या लक्षात आले. अर्थात ते वेळोवेळी सिद्धही झाले आहे. 

घुमान संमेलनासाठी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. सदानंद मोरे आणि भारत सासणे यांच्यासह डॉ. अशोक कामत हेही रिंगणात होते. निवडणुकीत डॉ. सदानंद मोरे निवडून आले, तेव्हा मतांमध्ये काहीतरी गडबड करून डॉ. मोरे यांना निवडून आणले गेले आहे, कारण भारत सासणे यांची अमुक एक मते निश्चित होती, असे ठाले पाटील यांचे म्हणणे आमच्यापर्यंत पोहोचले.

****
दिल्लीतील संमेलनाच्या चर्चांच्या आणि प्रस्तावाच्या काळात सर्वात चांगला अनुभव आला तो महाराष्ट्र साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांचा. त्यांनी जाहीरपणे वेळोवेळी दिल्लीला संमेलन झाले पाहिजे ही भूमिका मांडली, तीच त्यांनी महामंडळाच्या व्यासपीठावरही मांडली. यावर ठाले पाटलांचे उत्तर अजब होते. ते म्हणाले पुण्यातल्या आणि मुंबईतल्या घटक संस्थांनी मला त्रास दिला, मात्र आम्ही मराठवाड्यातले आहोत रेटारेटीत मागे पडत नाही असे सांगून ठाले पाटील यांनी त्यांचा पुण्या-मुंबईवर राग आहे हे स्पष्ट केले.         

वास्तविक पाहता दिल्लीसाठीच्या साहित्य संमेलनाचे हे निमंत्रण देताना शरद पवार साहेब, आणि प्रकाश पायगुडे यांच्याप्रमाणे मी ठाले पाटील यांनाही विचारले होते. संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ठाले पाटील एकदा एकत्र मुंबईकडे जात असताना आमचे फोनवरही बोलणे झाले होते. त्यात आमची कुठलीही अट नाही, संमेलनाध्यक्ष, पाहुणे, इतकेच काय संस्थाही तुम्ही ठरवा, मात्र यंदा दिल्लीला संमेलन झाले पाहिजे अशी सर्वांची भावना आहे असे मी दोघांच्याही कानावर घातले. मग काय घडले? 

मला नंतर जी माहिती मिळाली त्याप्रमाणे नागपूरचे डॉ. श्रीपाद जोशी हे दिल्लीला संमेलन व्हावे यासाठी काही वर्षे प्रयत्न करत होते त्यासाठी ज्ञानेश्वर मुळे, वैभव डांगे, गणेश रामदासी अशा अनेकांनी पुढाकार घेतला. मात्र नितीन गडकरी हे मात्र अनुकूल नसल्याचे आणि वादविवाद होऊ नये अशी त्यांची भूमिका असल्याने संमेलनाचे निमंत्रण  ऐनवेळी माघारी घेण्यात आले. श्रीपाद जोशी हे ‘सरहद’ संस्थेच्या दिल्लीसाठीच्या प्रस्तावावर अनेकांना पाठिंबा देण्याबाबत आग्रह धरू लागले. अर्थात याबाबत मी त्यांना सांगितले नव्हते. मात्र विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी मला फोन करून श्रीपाद जोशी यांना शक्यतो दूर ठेवा असा सल्ला दिला. 

अखिल भारतीय मराठी संमेलनांची परंपरा मोठी आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली १९५४मध्ये हे संमेलन दिल्लीत झाले होते. त्यावेळी काकासाहेब गाडगीळ स्वागताध्यक्ष होते. मात्र संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून एकदाही हे संमेलन दिल्लीत झाले नाही. महाराष्ट्राने नेहमी देशाचा विचार आधी केला आहे, हा संदेश जाण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्थापनेला ६१ वर्षे पूर्ण होत असताना; पराभव झाला मात्र देशाच्या ऐक्याची पुनर्प्रक्रिया सुरू झाली असे ज्या पानिपत लढाईबद्दल म्हटले जाते त्या युद्धाची २६० वर्षे, लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी असे अनेक संदर्भ असल्याने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी साहित्य संमेलन हे उत्तम व्यासपीठ आहे, असे मला वाटत होते.  

दिल्लीत संमेलन होणार असेल तर त्याचे नेतृत्व महाराष्ट्राचे निर्विवाद नेते असणाऱ्या शरद पवार यांनी करावे असे मला वाटत होते. यावर त्यांना याबाबत विचारणा करणारा संदेश व पत्र पाठवले. त्यांचे सकारात्मक उत्तर आले. शरद पवार साहेबांच्या जवळ असलेले आणि ज्यांनी वंदे मातरम संघटना आणि ‘सरहद’च्या काळात नेहमी महत्त्वाची भूमिका बजावली त्या विठ्ठल मणियार यांनी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, पण त्यात तिथल्या मराठी मंडळींचा सहभाग प्राधान्याने हवा. दिल्लीत संमेलन होताना ते दिल्लीतील मराठी भाषिकांच संमेलन व्हायला हवे. पुण्यातल्या मंडळींनी दिल्लीत संमेलन केले, असे त्याचे स्वरूप नको, ही पवार साहेबांची भूमिका आमच्यापर्यंत पोचवली. त्यांच्याकडून हिरवा कंदील आहे, असे समजून आम्ही पुढची पावले टाकली.

मधेच जगावर कोविड-१९ एक मोठे संकट आले, सारा देश ठप्प झाला आणि दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिलेल्या प्रस्तावाचे सगळे संदर्भ बदलले.         

कोविडच्या संकटामुळे ९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी आलेले जवळपास सर्व प्रस्ताव रद्द झाले. मात्र ‘सरहद’चा प्रस्ताव कायम आहे, असा पत्रव्यवहार मी महामंडळाकडे केला. एव्हाना मिलिंद जोशी, श्रीपाद जोशी यांच्या दिल्लीबाबतच्या आग्रहामुळे नाराज झालेल्या ठाले पाटील यांनी वृत्तपत्रांकडे, माणसे मरत असताना संमेलनाचा विचार कसा होऊ शकतो आणि असा माझ्याकडे काहीही पत्रव्यवहार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आणि अनेकांनी आमच्यावर टीकेची झोड उठवली.

त्याही वेळी हे संमेलन जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे आम्ही मे २०२१मध्ये घेण्याबाबत बोललो होतो. पुढे कोविडचे संकट हळूहळू कमी होऊ लागले. संमेलनासाठी नाशिकच्याही एका संस्थेचे निमंत्रण कायम होते. मात्र संमेलन छोटे करायचे असेल तर दिल्लीत करूयात आणि कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत नाशिकमध्ये कोविडनंतर मोठे संमेलन घ्यावे, अशी भूमिका आम्ही मांडली. मात्र, ‘माझ्या पत्नीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा दिल्लीत दोन मराठी माणसेही नव्हती, दिल्लीतील मराठी माणसे संमेलन घेण्याच्या योग्यतेची नाहीत, ती स्वमग्न असतात,’ असे सांगून ठाले पाटील यांनी, दिल्लीमधील मराठी माणसाबद्दल, दिल्ली विद्यापीठातील मराठी भाषेचे शिक्षण दिल्लीतील मराठी समूहाने का बंद होऊ दिले? दिल्ली दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या केंद्र सरकारने बंद केल्या तेव्हा दिल्लीतील मराठी समूह का गप्प बसला? त्या सुरू कराव्यात म्हणून त्यांनी कोणते प्रयत्न केले? पहाडगंजमधील मराठी शाळेत किमान तिसरी भाषा म्हणून दिल्लीतील मराठी आईवडील आपल्या मुलामुलींना का शिकवत नाहीत? महाराष्ट्र परिचय केंद्रात दिल्लीतील मराठी माणसे कधी तरी जातात का? ते कोठे आहे हे तरी माहीत आहे का? साहित्य अकादमी पुरस्कार सोहळ्याला इतर भाषिकांइतकी नसली तरी निदान दोन-चारही मराठी माणसे आपल्या लेखकासाठी का येत नाहीत? मग हे साहित्य संमेलन मागण्याचे नाटक कशासाठी? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. इतकेच नाही तर संजय नहार यांना मोठ्या पुढाऱ्यांना बोलावून कोट्यवधी रुपयाचे प्रकल्प मंजूर करायचे आहेत. घुमानमध्ये मला विमानतळावर घ्यायलाही कोणी आले नव्हते, यांचे हेतू स्वच्छ नाहीत आणि मोठ्या नेत्यांची नावे घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी मी दिल्लीत संमेलन होऊ देणार नाही अशी प्रतिक्रियाही दिल्लीतील एका वरिष्ठ पत्रकाराकडे दिली. 

यावर, ‘आमचे नाव नको. आम्हाला निधी देऊ नका. इतकेच काय सर्व गोष्टी महामंडळ ठरवत असते तशाच त्या तुम्ही ठरवा आणि माझ्याबाबत किंवा ‘सरहद’ संस्थेचा हेतू चुकीचा असेल तर ती माहिती महाराष्ट्रासमोर ठेवा. मात्र व्यक्तिगत कारणांमुळे अथवा अहंकारामुळे निर्णय घेऊ नका. तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडेच आहेत. दिल्लीत मराठीची स्थिती वाईट असेल तर महामंडळानेच त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा,’ अशी भूमिका मी मांडली. एव्हाना घुमान संमेलनाबद्दल माझ्या तोंडावर चांगले बोलणारे ठाले पाटील साहित्य संमेलन दिल्लीला होऊ न देण्याची भूमिका जाहीरपणे मांडू लागले. 

खरेतर ‘सरहद’ संस्थेचे सर्वच राजकीय पक्षांशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत. तरीही या संमेलनासाठी महाराष्ट्राचे राष्ट्रीय नेते म्हणून शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यास स्वागताध्यक्ष करून दिल्लीचे संमेलन घेण्याचा प्रस्ताव आम्ही महामंडळापुढे ठेवला. 

एव्हाना कोविडचा प्रभाव कमी होऊ लागला आणि आपला कार्यकाळ ही संपत आला याची जाणीव झाल्याने ठाले पाटील यांनी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने दिलेला प्रस्ताव मागे घेतला. त्यानंतर खरंतर ‘सरहद’चाच एक प्रस्ताव शिल्लक होता, मात्र त्यांनी नाशिकच्या ‘लोकहितवादी मंडळाला’ नाशिक मधील संयोजनासाठी ऐनवेळी प्रस्ताव द्यायला लावला आणि तोच मंजूर करणार असे त्यांना आश्वासनही दिले. 

हे संमेलन दिल्लीत होण्याला एक व्यापक अर्थ होता. ते ‘सरहद’ संस्थेमार्फत व्हावं, अशी आग्रही भूमिका आमची कधीच नव्हती. उलट नाशिकच्या ‘लोकहितवादी मंडळा’ने हे संमेलन दिल्लीत घ्यावे, ही भूमिका कळविण्यासाठी मी स्वतः हेमंत टकले आणि जयप्रकाश जातेगावकर यांच्याशीही बोललो. प्रारंभी हेमंत टकले शरद पवारांशी बोलून सांगतो म्हणाले. पत्रकार अनंत बागाईतकर आणि सुरेश भटेवरा यांनीही दिल्लीकरांच्या भावना त्यांना कळवल्या.

याच काळात मनोहर म्हैसाळकर यांनी दिल्लीला संमेलन घेण्यासाठीचा वाढता पाठिंबा आणि महामंडळाला होणारा विरोध पाहून, मला तीन ते चार वेळा फोन केले. पुढील वर्षी संमेलन दिल्लीला घ्यायला ‘सरहद’ संस्थेला आम्ही पाठिंबा देऊ, किंवा यावर्षी दिल्लीत विशेष संमेलन घ्यावे असे त्यांचे म्हणणे होते. यावर, महामंडळ ही एक घटनात्मक संस्था असून त्यांना संमेलन स्थळ ठरविण्याचा अधिकार आहे आणि तो निर्णय आम्हीही मान्य करू, मात्र पुन्हा कधी अर्ज करणार नाही, विशेष संमेलनही घेणार नाही, अशी प्रतिक्रिया मी दिली. एकूण काय तर आधीच ठरल्याप्रमाणे ८ जानेवारीच्या बैठकीत नाशिकला ९४वे साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय झाला. या बैठकीत घटक संस्थांच्या बहुसंख्य सदस्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्याच्या बातम्या नंतर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. 

या बैठकीनंतर ९४व्या साहित्य संमेलन स्थळाची घोषणा करताना ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिल्लीकरांची विशेष साहित्य संमेलनाची संधी ‘सरहद’ने हुकवली, असे जाहीर करताना म्हटले, ‘त्याच बरोबर दिल्लीच्या मराठी संस्थांनी एकदा त्यांना दिलेले व त्यांनी स्वतःहून नाकारलेले साहित्य संमेलन पुन्हा दिल्लीला व्हावे, अशी मागणी गेले काही दिवस पुण्याच्या ‘सरहद’ संस्थेने दिल्लीसाठी दिलेल्या निमंत्रणाचा आधार घेऊन दिल्लीतील मराठी माणसे करीत आहेत. त्यांच्या मागणीचा आदर करून दिल्लीकरांसाठी त्यांची तयारी असली तर एक विशेष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देण्याचा विचार महामंडळ करील, असे ‘सरहद’चे निमंत्रक संजय नहार यांना मी सुचवले होते. तसेच विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनीही त्यांना तसा प्रस्ताव दिला होता पण नहार यांनी महामंडळाचा हा प्रस्ताव नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची संधी हुकवली.’ 

याच पत्रकार परिषदेत आधीच्या दिवशी दिल्लीचा आग्रह धरणारे मोदी व गडकरी यांच्या जवळचे आहेत, अशी प्रतिक्रिया देणाऱ्या ठाले पाटील यांनी नंतर खुलासा केला, दिलगिरीही व्यक्त केली. त्यात ते म्हणाले, ‘काल दि. ७ जानेवारी २०२१च्या काही दैनिकांमध्ये दिल्लीचा आग्रह धरून बसणारे मोदी व गडकरी यांच्या जवळचे आहेत असा उल्लेख असल्यामुळे कोणाला विपरीत वाटण्याची शक्यता गृहीत धरून या दोन्ही मान्यवर व्यक्तींच्या संदर्भात माझे नाव जोडले गेल्याबद्दल त्यांच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.’ अर्थात वस्तुस्थिती यापेक्षा पूर्ण वेगळी होती. 

याला उत्तर म्हणून आम्ही ‘सरहद’च्यावतीने एक पत्रक प्रसिद्धीला दिले आणि सर्व आरोपांचे मुद्देसूद खंडन केले यात नाशिक किंवा दिल्ली हा वाद नव्हताच ही भूमिका मांडून नाशिकचे स्थळ ठरविण्याचे आम्ही स्वागतही केले. त्यावेळी एकीकडे दिल्लीला संमेलन होऊ देणार नाही अशी जाहीर प्रतिक्रिया देणारे ठाले पाटील अनेक नेत्यांबद्दलही अनुद्‌गार काढत होते याबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला वाटले आता विषय संपला. मी ठाले पाटलांना फोन करून शुभेच्छाही दिल्या. मी फोन वर त्यांना म्हणालो, मला एक गोष्ट आवडली तुम्ही दिल्लीला संमेलन होऊ देणार नाही असे म्हणालात, आणि होऊ दिले नाही. आता तुमचा एकच शब्द बाकी आहे आणि मला वाटते तुम्ही तोही पाळणार, तो म्हणजे संमेलनाध्यक्षपदाचा. माझा रोख सासणे यांच्याकडे होता. यावर ठाले पाटील म्हणाले, मी शब्दाला जागणारा माणूस आहे. पुण्या मुंबईच्या लोकांसारखा कारस्थानी नाही. मी जे बोलतो तेच करतो.

प्रत्यक्षात संमेलन स्थळ म्हणून नाशिकची घोषणा झाली आणि संमेलनाध्यक्षपदी अचानकच पुण्या-मुंबईच्या सदस्यांच्या आग्रहाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची निवड झाल्याची घोषणा ठाले पाटील यांना करावी लागली. एवढ्यात कोविडची दुसरी लाटही सुरू झाली. नाशिकचे जाहीर झालेले संमेलन रद्द करावे लागले. त्याचवेळी नागपूरकरांना पुढील ९५व्या संमेलनासाठी शब्द दिलेल्या ठाले पाटलांची अजून एक अडचण झाली, ती म्हणजे नाशिकचे संमेलन पार पडल्याशिवाय नागपूरकरांनी इतक्या कमी अवधीत पुढचे संमेलन घ्यायला नकार दिला.

याकाळात महामंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने ‘सरहद’च्या दिल्लीच्या प्रस्तावाबाबत, तो कायम आहे का? अशी विचारणा केली. मात्र आम्ही पूर्वी म्हटल्याप्रमाणे नम्रपणे नकार दिला. आता नाशिकच्या संयोजकांची खूप कुचंबणा झाली. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही ठामपणे माणसे मरत आहेत संमेलनाचा आग्रह धरू नका, असे ठाले पाटलांना निक्षून सांगावे लागले. 

ज्या भूमिका ठाले पाटलांनी वेळोवेळी मांडल्या तिच्या विपरीत त्यांना प्रत्येक वेळी निर्णय घ्यावे लागले. या नैराश्यातून त्यांनी अक्षरयात्रामध्ये त्यांच्या आजवरच्या परंपरेप्रमाणे स्वतःच्याच भूमिकांना आणि निर्णयांना खोडून काढणारा लेख लिहिला. त्यांच्या या लेखाची साहित्य वर्तुळात मोठी चर्चा झाली. एकूण काय तर ९४वे संमेलन कुसुमाग्रजांच्या, सावरकरांच्या, वामनदादा कर्डकांच्या भूमीत नोव्हेंबर महिन्यात पार पडत आहे. मात्र दिल्लीला न झालेल्या संमेलनाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली. अनेकांनी त्यावर लेख लिहिले, पोवाडे केले. सोशल मीडियावर मीम्सही केले गेले. विशेष म्हणजे, दिल्लीत संमेलन व्हायला हवे होते, हाच सूर या सगळ्या पोस्टमध्ये दिसून आला. इतकेच काय न झालेल्या त्या संमेलनाचे बोधचिन्हही तयार झाले होते.

‘राजधानीत नको आहे

करायला आमचा उत्सव

तिथे संमेलन केल्यावर

विचारणार कोण आम्हाला’

श्रीपाद जोशी यांनी केलेली ही कविता तर प्रचंड व्हायरल झाली.

कौतिकराव ठाले पाटील महामंडळाचे अध्यक्ष असल्याने संमेलनाचे कथानक त्यांच्या भोवती फिरते आहे, इतकाच त्याचा संदर्भ आहे. खरेतर हा लेख ठाले पाटील या व्यक्तीबद्दल नाही तर एका प्रातिनिधिक प्रवृत्तीबद्दल आहे. त्याला व्यक्तिगत द्वेषाची किंवा रागाची किनार अजिबात नाही. मी, माझा, माझे आणि माझ्यासाठी या ‘मी’ पणातून सर्वांनी बाहेर पडून मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी प्राणपणाने काम केले पाहिजे. अनेकजण प्रसिद्धी टाळून ते करतही असतात. ‘सरहद’नेही ‘मराठी भाषेचा भारतीय भाषांसाठीचा पुढाकार’ या चळवळीसाठी यथाशक्ती योगदान देण्याचा संकल्प केला आहे. म्हणूनच संत नामदेवांच्या कर्मभूमीत भाषा-भवनाचे काम सुरू झाले आहे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वाईट आहे अथवा सगळेच बिघडलेले आहे, असेही मी म्हणणार नाही. कारण आजही देशाचा विचार करणारे ते मराठी भाषेचे सर्वात प्रभावी व्यासपीठ आहे. त्याचा सन्मान आणि प्रभाव राहिलाच पाहिजे. एखादी संस्था किंवा व्यक्ती या दुय्यम आहेत, विचार मोठा आहे आणि तो दिल्लीला न झालेल्या संमेलनानेही मराठी माणसापर्यंत पोचला आहे किंबहुना तो जास्त प्रभावीपणे पोचला आहे हेच दिल्लीला न झालेल्या संमेलनाचे ‘कौतिक’ आहे. 

(लेखक ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आहेत.)

 

संबंधित बातम्या