‘माझ्यासाठी कथानक महत्त्वाचे...’

संतोष भिंगार्डे
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

प्रीमियर

‘बदला’, ‘पिंक’, ‘सांड की आँख’... अशा वेगळ्या पठडीतल्या चित्रपटांमध्ये काम केलेली आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू हिच्याबरोबर मारलेल्या दिलखुलास गप्पा..

तापसी पन्नूला हिरॉईन व्हायचेच नव्हते. शिकत असताना पॉकेटमनीसाठी तिने मॉडेलिंग सुरू केले. मॉडेलिंग करत असतानाच तिला दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर आल्या. एक किंवा दोन वर्षे काम करावे या हेतूने या ऑफर्स तिने स्वीकारल्या. सुरुवातीचे तिचे चित्रपट यशस्वी ठरले आणि काही अयशस्वी. त्यानंतर पॅकअप करावे आणि सरळ दिल्ली गाठावी असे तिला वाटले. परंतु तिच्या नशिबात काही वेगळेच लिहिलेले होते. तिला हिंदी चित्रपटाची ऑफर आली आणि आता ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. दिल्ली-हैदराबाद ते मुंबई असा तिचा प्रवास झाला आहे. ‘पिंक’ चित्रपटातील मीनल अरोरा या भूमिकेमुळे तिच्या करिअरला कलाटणी मिळाली. एक अभिनेत्री ते निर्माती असा तिचा करिअरचा आलेख नेहमीच उंचावत राहिला आहे. तिच्या एकूणच कारकिर्दीबद्दल मारलेल्या मनसोक्त गप्पा...

तापसी, तुझा ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट नुकताच पाहिला. ही एका अॅथलिटची कहाणी आहे. या चित्रपटामध्येदेखील कोर्ट ड्रामा आहे. तुझ्या आधी आलेल्या ‘पिंक’ आणि ‘बदला’ या चित्रपटातही कोर्ट ड्रामा होता. तुला रिअॅलिस्टिक विषयांवरील आणि विशेष म्हणजे कोर्ट ड्रामा असलेले चित्रपट करायला आवडतात का?
तापसी पन्नू ः मला भूमिका अशाच मिळत गेल्या आणि मी काम करत गेले. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून या इंडस्ट्रीत आले आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या घटना आणि घडामोडी मी पाहिल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबाची सुखं आणि दुःखं जवळून पाहिली आहेत. अशा काही व्यक्तिरेखा मी अवतीभवती पाहिल्या आहेत. त्यामुळे अशा भूमिका साकारताना मला काही फारसे अवघड वाटत नाही. प्रेक्षकांनीही मी साकारत असलेल्या अशा भूमिकांवर प्रेम केले. कारण ती भूमिका त्यांना आपल्या जवळची वाटली. मुळात आज लोकांना आपल्या जीवनातील कहाणी ऐकायला आणि बघायला आवडते. आज संपूर्ण माहोल बदलला आहे. प्रेक्षकांना सत्य घटनांवरील चित्रपट पाहायला आवडत आहेत. तसेच कोर्ट ड्रामाचे म्हणाल, तर कोर्ट ड्रामावरील चित्रपट मी काही ठरवून केलेले नाहीत. त्या त्या चित्रपटांची कथाच तशी होती. त्यामुळे मी ते चित्रपट केले आणि आज मला याचा खूप आनंद होत आहे की कोर्ट ड्रामा असलेले माझे चित्रपट अधिक यशस्वी ठरलेले आहेत. कोर्ट ड्रामा असलेले चित्रपट माझ्यासाठी लकी ठरलेले आहेत.

रिअॅलिस्टिक चित्रपटांमध्ये काम करताना तयारी खूप करावी लागते. त्या त्या व्यक्तिरेखांचा बारकाईने विचार करावा लागतो आणि वेगळा अभ्यासही करावा लागतो. तू प्रत्येक भूमिकेची तयारी कशी काय करतेस?
तापसी पन्नू ः  प्रत्येक भूमिकेसाठी निराळी तयारी करावी लागते. प्रत्येक भूमिकेचे वाचन आणि मनन करावे लागते. ती भूमिका समजावून घेतल्यानंतर आत्मसात करावी लागते आणि आपल्या परीने साकारावी लागते. प्रत्येक भूमिकेकरिता तेवढीच मेहनत घ्यावी लागते. जेव्हा मी एखाद्या चित्रपटाची कथा ऐकते तेव्हा हा चित्रपट आपण करावा असे मला वाटते. परंतु नंतर त्या भूमिकेची तयारी करताना मला खूप अवघड जाते. कधी कधी मनात असाही विचार येतो की मी ही अवघड भूमिका का स्वीकारली...? मी स्वतःला का संकटात टाकले...? परंतु हा विचार क्षणभरच असतो. कारण आपण अधिक मेहनत घेतली नाही तर आपल्याला फळ मिळणार नाही, हे मला ठाऊक आहे. माझ्या करिअरला मी सुरुवात केली तेव्हापासून मी जादा मेहनत घेते आहे आणि पुढेही घेणार आहे. कारण येथे यश काही सहज मिळत नाही. त्याकरिता अपार कष्ट घ्यावे लागतात. तेवढाच आत्मविश्वास आणि जिद्द असावी लागते. कारण मी काही कोणत्याही फिल्मी बॅकग्राउंडमधून येथे आलेले नाही किंवा माझा कोणी गॉडफादर नाही वा मोठा वशिला नाही. त्यामुळे या इंडस्ट्रीत टिकून राहायचे असेल तर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे आणि काही तरी वेगळे काम करावे लागणार आहे. आज माझ्या मनाची मी पक्की तयारी केली आहे की या इंडस्ट्रीत लंबी इनिंग खेळायची असेल तर जादा मेहनत आणि नावीन्यपूर्ण भूमिका  कराव्याच लागतील.

येथे सगळ्यांनाच काही स्टारडम मिळत नाही. तुला ते मिळालेले आहे असे तुला वाटत नाही का?
तापसी पन्नू ः माझ्या आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटात अधिक मेहनत घेतली म्हणूनच आज मला नावलौकिक प्राप्त झाला आहे. तसे पाहिले तर मी काही मोठ्या बॅनर्सचे आणि बिग बजेटवाले चित्रपट केलेले नाहीत. मी आत्तापर्यंत जे काही चित्रपट केले, त्या चित्रपटाच्या कथा आणि माझ्या भूमिका नेहमीच्या पठडीतील सिनेमांसारख्या नव्हत्या. ते चित्रपट नावीन्यपूर्ण होते... अर्थपू्र्ण होते. त्या चित्रपटातून काही तरी विचार मांडण्यात आलेला होता. त्यामुळे माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिली. ‘पिंक’ चित्रपटामध्ये मी साकारलेल्या ‘मीनल अरोरा’च्या भूमिकेमुळे माझी खऱ्या अर्थाने या इंडस्ट्रीतील इनिंग सुरू झाली. या भूमिकेमुळेच माझ्या करिअरला टर्निंग पॉइंट मिळाला. माझ्या कामाचे सगळ्यांनी कौतुक केले. त्यानंतरही मी विविध चित्रपट केले आणि भूमिकाही साकारल्या. परंतु तरीही स्टारडमचे म्हणाल, तर अजूनही दिल्ली दूर आहे असेच मी सांगेन. कारण जेव्हा प्रेक्षक तुमच्या नावावर विश्वास ठेवून चित्रपट पाहायला थिएटरात येतात आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना समाधान मिळते, तेव्हा स्टारडम प्राप्त झाले आहे असे म्हणता येईल. 

आजचा प्रेक्षक हुशार आणि चाणाक्ष आहे. कोणता चित्रपट पाहावा आणि कोणता नाही याची त्याला बरोबर माहिती आहे. पहिल्यांदा तो चित्रपटाचा ट्रेलर पाहतो आणि त्यानंतर त्या त्या चित्रपटाची समीक्षा काय आली आहे हे पाहतो व त्यानंतरच चित्रपट पाहायचा की नाही हे तो ठरवतो. त्यामुळे सर्वप्रथम प्रेक्षकांचा आपल्यावर विश्वास बसणे आवश्यक आहे. अमुक अमुक कलाकाराचा चित्रपट आहे म्हटल्यानंतर नक्कीच काही तरी आगळेवेगळे व अर्थपूर्ण पाहायला मिळणार याची खात्री त्यांना झाली पाहिजे व ते चित्रपट पाहायला थिएटरात आले पाहिजेत.... आपल्यावर विश्वास ठेवून जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात येतात, त्याला स्टारडम म्हणतात.

‘रश्मी रॉकेट’ हा स्पोर्ट्‌स ड्रामा होता. अशा प्रकारचा चित्रपट तू पहिल्यांदाच केलास. तर तुला स्पोर्ट्‌सची आवड कितपत आहे?
तापसी पन्नू ः लहानपणापासूनच मला बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन अशा विविध खेळांची आवड आहे. आता मी स्क्वॉश खेळते. मला असे वाटते की फिटनेससाठी खेळणे खूप आवश्यक आहे. लहान असताना टीव्हीवर मी फारसे चित्रपट पाहायचे नाही. परंतु खूप खेळायचे. साधारण पहिली-दुसरी असताना मी शंभर मीटर, दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. आजही मी ऑलिम्पिक, एशियन गेम, कॉमनवेल्थ गेम पाहते. माझ्या मते आपले हे खेळाडू खऱ्या अर्थाने ‘रिअल हिरो’ आहेत.

आतापर्यंत विविध भूमिका तू साकारल्या आहेस. तुझ्या भूमिकेचे कौतुकही झाले आहे. तरी अशी कोणती भूमिका आहे जी तुला साकारणे खूप अवघड गेले?
तापसी पन्नू ः ‘रश्मी रॉकेट’ तसेच ‘सांड की आँख’ या दोन चित्रपटातील भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. तसेच आता येणाऱ्या ‘शाबाश मिथु’ या चित्रपटातील भूमिकादेखील खूप अवघड आहे. मी नेहमीच चित्रपट स्वीकारताना प्रेक्षक म्हणून विचार करते. एक प्रेक्षक म्हणून ही भूमिका कशी आहे.... तिची तयारी काय करावी लागणार आहे.... वगैरे बाबींचा विचार करते आणि मगच चित्रपट घेते.

दिल्लीत शिकत असतानाच मॉडेलिंग करावे आणि चित्रपटसृष्टीत यावे असा विचार मनात होता का तुझ्या?
तापसी पन्नू ः खरे सांगायचे तर मला हिरॉईन व्हायचेच नव्हते. या क्षेत्राची मला फारशी आवडच नव्हती. शिक्षण घेत असताना स्वतःचा काही तरी पॉकेटमनी असावा असा विचार मनात आला. मॉडेलिंगमध्ये चांगले पैसे मिळतात असे मला समजले. त्यामुळे मी मॉडेलिंग करू लागले. मॉडेलिंग करत असतानाच मला दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. खरेतर मला एमबीए करायचे होते. घरच्या मंडळींचीदेखील तीच अपेक्षा होती. मला मॉडेल किंवा हिरॉईन व्हायचे नाही, हेदेखील त्यांना ठाऊक होते. परंतु ऑफर्स येत आहेत तर एक वर्ष करून तर बघूया या उद्देशाने मी चित्रपट स्वीकारले. घरातील मंडळींना एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, असे सांगितले. नाही जमले तर पुन्हा एक वर्षाने एमबीए करायचे असे ठरले. मग त्यांनीही काही हरकत घेतली नाही आणि मला पहिली फिल्म मिळाली तीदेखील मोठी. ‘झुम्माडी नादा’ हा पहिला तेलगू सिनेमा केला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच मला आणखीन दोन ते तीन चित्रपटांच्या ऑफर्स आल्या.

तमीळ आणि तेलगू चित्रपट करीत असताना तुझ्यावर ‘बॅड लक हिरॉईन’ असाही टॅग लागला असल्याचे ऐकले आहे. त्याबाबत तू अधिक काय सांगशील?
तापसी पन्नू ः माझा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला आणि मला तेथील इंडस्ट्रीत नावलौकिक मिळाला. त्यापाठोपाठ आलेले दोन-तीन चित्रपटही चालले. मात्र नंतरच्या दोन ते तीन चित्रपटांना अपयश आले. माझ्यावर फ्लॉप हिरॉईनचा टॅग लागला. तापसीला चित्रपटात घेतले तर चित्रपट फ्लॉप होईल असे तेथील निर्माते व दिग्दर्शकांना वाटू लागले. माझ्यादेखील ही बाब लक्षात आली. माझ्याबरोबरीच्या नायिका तस्सेच चित्रपट करून उत्तम वाटचाल करीत असताना आपल्या वाट्याला असे का यावे? असा विचार मनात डोकावू लागला. नेमके काय करावे हेच सुचत नव्हते. मला जो फॉर्म्युला सांगण्यात आला होता त्याप्रमाणेच मी काम करीत होते. परंतु अपयश काही माझा पिच्छा सोडत नव्हते. तेव्हा मी हैदराबाद येथे घर घेऊन राहात होते. माझा तो बॅड पॅच होता. हे फिल्ड काही आपल्यासाठी नाही, असा विचार आला. आता तेथून पॅकअप करावे आणि दिल्लीला जावे असा निर्णय घेतला. परंतु त्याच वेळी काय चमत्कार घडला कोणास ठाऊक! मला हिंदी चित्रपटाची एक ऑफर आली. डेव्हिड धवन यांची ती फिल्म. त्यांचे चित्रपट मी पाहिलेले. त्यामुळे ही कॉमेडी फिल्म करूया, असे मनात ठरविले आणि होकार दिला.  

म्हणजे तुलादेखील बॅड पॅचचा सामना करावा लागला ना....
तापसी पन्नू ः नक्कीच! परंतु मी तेव्हा फारशी निराश झाले नाही किंवा अपयशाने खचून गेले नाही. कारण मुळात मला हिरॉईन व्हायचेच नव्हते किंवा मोठमोठे चित्रपट करायचे आहेत असेही काही मनात नव्हते. त्यामुळे या सगळ्या बाबींचा मी हसत-खेळत सामना केला. परंतु एक गोष्ट निश्चित की या बॅड पॅचमधूनच मला बरेच काही शिकायला मिळाले. मोठमोठे स्टार्स आणि डायरेक्टर असलेले चित्रपट करण्यापेक्षा चांगले कथानक असलेले चित्रपट आपण केले पाहिजेत, ही शिकवण यामधून मला मिळाली. आता आपण आपला फॉर्म्युला बदलला पाहिजे, ही बाब माझ्या लक्षात आली आणि मी चांगले कथानक असलेले चित्रपट साईन करायचे असे ठरवले. डेव्हिड धवन यांचा ‘चष्मेबद्दूर’ हा माझा पहिला हिंदी चित्रपट. त्यानंतर एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपट साईन केले.

समांतर सिनेमा आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा यांच्यामध्ये एकेकाळी खूप मोठे अंतर होते. आता असे वाटत आहे की समांतर सिनेमा आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा यांच्यामधील अंतर कमी झाले आहे. याबाबतीत तुला नेमके काय वाटते?
तापसी पन्नू ः एक चित्रपट पाहताना आपल्या बुद्धीला जास्त चालना द्यावी लागत नाही, तर दुसरा चित्रपट पाहताना आपल्या मेंदूला खूप चालना द्यावी लागते. खूप विचार करावा लागतो. मगाशीच मी सांगितले की मला हिरॉईन व्हायचेच नव्हते. त्यामुळे फारसे चित्रपटदेखील मी पाहत नव्हते.  समांतर सिनेमा आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा यांची मला व्याख्या सांगता येणार नाही. मात्र जो चित्रपट मला दोन ते अडीच तास एका ठिकाणी खिळवून ठेवतो तोच चित्रपट माझ्यासाठी खास आहे. मला तशाच प्रकारचे चित्रपट करायला आवडतात. आतापर्यंत माझे प्रदर्शित झालेले चित्रपट याच पठडीत बसणारे होते.

इंडस्ट्रीमध्ये येऊन तुला दहा वर्षे झाली आहेत. या तुझ्या संपूर्ण प्रवासात अनेक चढउतार आले आहेत याचा सामना तू कसा केलास?
तापसी पन्नू ः मी आत्तापर्यंत एकच अजेंडा ठेवून वावरते की कोणत्याही गोष्टीमुळे तुमचे आयुष्य संपणार नाही. जेव्हा तुम्ही ही गोष्ट मान्य करता तेव्हा सगळ्या गोष्टी सहजरीत्या होऊन जातात. जे आता आपल्यासोबत आहे, त्याचा आनंद घ्या. मात्र हा आनंद घेताना डोक्यात हवा जाऊ देऊ नये. कारण काही काळानंतर ही गोष्ट आपल्यासोबत राहणार नाही, हे नक्की. जेव्हा माझ्या आयुष्यात अपयश येते, त्यावेळेस मी एकच विचार करते की ही वेळदेखील निघून जाईल. एखादी गोष्ट माझ्याकडून झाली नाही तर दुसरी गोष्ट करून बघू... सतत वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहाव्यात आणि करत राहाव्यात. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अपयशानंतरही उभे राहण्याची ताकद मिळेल. विशेष बाब म्हणजे अशा वेळी संयमदेखील अतिशय महत्त्वाचा असतो.

इंडस्ट्रीमध्ये आऊटसायडर्सना अधिक मेहनत घ्यावी लागते. खूप स्ट्रगल करावा लागतो. तूसुद्धा इंडस्ट्रीमध्ये आल्यावर स्ट्रगल केला आहेस; याबद्दल काय सांगशील?
तापसी पन्नू ः प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावीच लागते. त्यात आऊटसायडर्सना इंडस्ट्रीमध्ये जास्त मेहनत करावी लागते. त्यांचा एकूणच प्रवासदेखील मोठा असतो. मात्र तरीही हा स्ट्रगल आपला असतो. आपण स्वतः स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलेले असतो. त्यामुळे या गोष्टीचे क्रेडिट कोणीही घेऊ शकत नाही. ते यश आपले स्वतःचे आहे आणि हे फक्त एक आऊटसायडर करू शकतो. इंडस्ट्रीमधले इनसायडर आहेत त्यांनी कितीही मेहनत केली... कितीही मोठे स्टार झाले, तरीही त्यांना लोक त्या कुटुंबातील असल्यामुळे लोकप्रिय झाला असेच म्हणतात. त्यामुळे इनसायडरचे यश हे त्यांचे नसते. आऊटसायडरला स्वतःचे क्रेडिट असणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटते, आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे. प्रत्येक गोष्टीला नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात आणि मी फक्त सकारात्मक गोष्टी बघितल्या आहेत. मला कोणीही जबरदस्तीने इंडस्ट्रीमध्ये बोलावले नव्हते. मी स्वतःहून इकडे आले आहे. माझ्यासाठी कोणीही फोन फिरवून सांगणार नाही की हिला हिरॉईन करा. कारण मला कोणीही गॉडफादर नव्हता. मला स्वतःला मेहनत करून गोष्टी मिळवायच्या आहेत. आऊटसायडरला स्वतःच्या हिमतीवर यश मिळवावे लागते आणि ते क्रेडीट त्याचे असते. आज मी खूश आहे आणि म्हणूनच मी माझ्या प्रॉडक्शन हाऊसचे नावदेखील ‘आऊटसायडर’ ठेवले आहे. आऊटसायडर्सना संधी देण्याचे काम मी आता माझ्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे करणार आहे.

आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या आहेस. एक अभिनेत्री म्हणून तुला कोणत्या भूमिकेने बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत?
तापसी पन्नू ः ज्या पद्धतीच्या भूमिका मी करते, त्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका साकारल्यानंतर मला स्वतःमध्येच एक वेगळा बदल जाणवतो. माझ्यामध्ये बरेच बदल होत जातात. माझ्या कपड्यांची निवड, बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते. माझी प्रत्येक भूमिका माझ्यावर प्रभाव टाकते. प्रत्येक भूमिकेसाठी तुम्ही तीस ते चाळीस दिवस देता. त्या भूमिकेत जाऊन तयारी करत असता. त्यानंतर तुमच्या बॉडीला वेगळ्या गोष्टी जाणवायला लागतात, कारण सतत तीस ते चाळीस दिवस तुम्ही तेच करत असता. त्यामुळे प्रत्येक भूमिका तुमच्यावर तेवढाच प्रभाव टाकते. त्यानंतर स्वतःला त्यामधून बाहेर काढायला थोडा वेळ लागतो. मला प्रत्येक भूमिकेसाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करावे लागते; तरच मी ती भूमिका उत्तमरीत्या साकारू शकते असे मला वाटते.

एखादी भूमिका साकारताना तू तयारी करतेस हे नक्की जाणवते. परंतु तुझ्या भूमिकेत दिग्दर्शकाचे किती महत्त्व असते?
तापसी पन्नू ः मी ट्रेन्ड अभिनेत्री नाही. त्यामुळे माझ्यासाठी दिग्दर्शक फार महत्त्वाचा असतो. माझी भूमिका कोणत्या दिशेने चालली आहे... नेमकी ती कशी होत आहे.. हे दिग्दर्शक बघत असतो. मुळातच चित्रपट हे माध्यम दिग्दर्शकाचे आहे. त्याच्या डोक्यात संपूर्ण चित्रपट असतो. त्यामुळे त्याच्यावर खूप अवलंबून राहावे लागते. कारण प्रत्येक भूमिकेला आकार देण्याचे काम तो करत असतो. त्यामुळे मी आजपर्यंत कधीही टेक झाल्यानंतर मॉनिटरवर सीन्स पाहिलेले नाहीत. मी माझ्या प्रत्येक भूमिकेच्या यशाचे क्रेडिट दिग्दर्शकाला अधिक देते. तसेच मी माझ्या सहकलाकारांना क्रेडिट देते. कारण जेव्हा ते उत्तम अभिनय करतात, तेव्हा माझ्या भूमिकेलादेखील वेगळीच चमक मिळते. त्यानंतर मी काम कसे केले आहे त्याचे सर्टिफिकेट मला प्रेक्षक देतात आणि मी त्यामध्येच खूश आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत दिवसेंदिवस नवनवीन कलाकार येत आहेत. आज येथे खूप मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेकडे तू कशा दृष्टिकोनातून पाहत आहेस?
तापसी पन्नू ः इतर कलाकार काय करतात आणि कशा पद्धतीने वाटचाल करतात याकडे मी लक्ष देत नाही. कारण गरज नसताना आपण या गोष्टीचा विचार अधिक करायला लागलो, तर आपल्याला त्याचा त्रास अधिक होईल. खरेतर सुरुवातीला मी स्पर्धा म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पाहायचे. त्यानंतर मला खूप टेन्शन यायचे. मी खूप तणावात असायचे. त्यामुळे आता आपले काम सोडून दुसऱ्यांनी काय केले यावर विचार करीत नाही. आपले काम बरे नि आपण बरे असा विचार करते. मात्र मी सगळे चित्रपट पाहते. प्रेक्षकांना आजकाल काय पाहायला आवडते? मग त्या अनुषंगाने आपण आपले काम कसे चांगले करू शकतो? दर वेळेला काय नवनवीन करता येईल? याचाच सतत विचार करत असते. त्यामुळे आता माझी स्पर्धा ही माझ्याशीच आहे!

बऱ्याचदा असे होते की चित्रपटाचा दिग्दर्शक एक कथा ऐकवतो. आपली भूमिका एक सांगतो आणि सेटवर काही तरी वेगळे कथानक घडत असते. संकलकाच्या टेबलवर तर आपल्या भूमिकेला काटछाट दिली जाते. तर असे तुझ्याबरोबर झाले आहे का?
तापसी पन्नू ः हिंदी इंडस्ट्रीमध्ये माझ्याबरोबर असे कधी झाले नाही. हिंदी इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा आले तोपर्यंत दाक्षिणात्य चित्रपटातील माझ्या चुकांपासून मी बऱ्याच गोष्टी शिकलेले होते. एक अनुभव गाठीशी असल्यामुळे कुठे काम करायचे आणि कुठे नाही, हे मला चांगलेच ज्ञात झाले होते. त्यामुळे या चुका माझ्याकडून दाक्षिणात्य चित्रपटांत बऱ्याचदा झाल्या. मात्र हिंदीमध्ये या चुका झाल्या नाहीत. आणि मुळातच स्वतः केलेल्या चुकांमधूनच माणूस शिकत असतो. त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची तो काळजी घेत असतो.

करिअरच्या एका वेगळ्या टप्प्यावर असताना निर्माती होण्याचा विचार तुझ्या मनामध्ये कसा काय आला?
तापसी पन्नू ः खरे तर मला निर्माती व्हायचे नव्हते. निर्माती होणे अतिशय कठीण काम आहे. इंडस्ट्रीमधील अनेक निर्माते आणि दिग्दर्शक माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यामुळे त्याचे काम कसे चालते हे मला माहीत आहे. सेटवरदेखील त्यांची कामे मी पाहिली आहेत. त्यामुळे निर्माती होणे हे सगळ्यात कठीण काम आहे असे मला वाटत होते. त्यामुळे मला नेहमी असे वाटायचे की चित्रपटाची निर्मिती करणे हे माझ्याकडून होऊ शकणार नाही. इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच अभिनेत्री अशा आहेत की त्यांना त्यांच्या घरातील व्यक्तीचा सपोर्ट घेऊन त्या निर्मिती क्षेत्राकडे वळलेल्या आहेत. मात्र माझ्या बाबतीत असे होणे कठीण होते. मग ‘सुरमा’ चित्रपटाचा निर्माता प्रांजल खंडडीया याच्याबरोबर माझी चांगली ओळख झाली. त्यानंतर त्यांनी मला एक दिवस विचारले की मी स्वतंत्र निर्माता होणार आहे, तर तू माझ्यासोबत काम करशील का? त्यावेळेस मी विचार केला, की नेहमीच माझ्याकडे वेळ नसतो, तसेच निर्मिती क्षेत्रातला अनुभवदेखील नसल्यामुळे मी सतत ही गोष्ट टाळत होते. तरीही चित्रपट करण्यात आपला सहभाग असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकत्र येऊन चित्रपट केला तर काय हरकत आहे...? असा विचार केला आणि मी निर्माती झाले आहे. नफा कमावण्यासाठी मी निर्माती झालेली नाही, तर आऊटसायडर्सना योग्य संधी द्यावी या हेतूने निर्माती झाली आहे. एक अभिनेत्री म्हणून चांगली स्क्रिप्ट शोधण्याची मला सवय झाली आहे आणि आमच्या प्रॉडक्शन हाऊसमध्येदेखील मी तेच करते आहे. बाकी सगळ्या गोष्टी प्रांजल हाताळतो.

तू फिटनेस फ्रिक आहेस. तसेच तुझी फॅशन अनेकजणी फॉलो करतात. याबद्दल काय सांगशील..?
तापसी पन्नू ः मला फॅशनेबल ट्रेंडी कपडे घालण्याची फार आवड नाही. मला जे ड्रेस आवडतात तेच मी घालते. फॅशन शोमध्येसुद्धा मी माझ्या ओळखीच्या लोकांसाठी रॅम्प वॉक करते. त्यामुळे फॅशनच्या बाबतीत मी खूप जास्त विचार करत नाही. तसेच फिटनेसच्या बाबतीत प्रत्येकाने कोणता ना कोणता तरी खेळ दररोज खेळणे आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण खेळत असतो, तेव्हा शरीरासह आपला मेंदूदेखील तेवढ्याच जलदगतीने काम करत असतो. फिटनेसच्या बाबतीत मी नेहमीच जिमपेक्षा खेळाला प्राधान्य देईन.

सोशल मीडियावर तुझ्या एखाद्या पोस्टमुळे अनेकदा तुला ट्रोल केले जाते. याचा तुला राग येतो का?
तापसी पन्नू ः आता ती सवय झाली आहे. ज्यांना काम नाही ती मंडळी असे नको ते उद्योग करीत असतात. सुरुवातीला ट्रोलिंगबद्दल मला नवल वाटायचे. भीतीही वाटायची. मात्र आता त्याचे काही वाटत नाही. म्हणूनच मी आता ट्रोलर्सना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली आहे. माझ्या शब्दाची किंमत आहे, म्हणून मला ट्रोल केले जाते. आता माझ्यावर अशा नकारात्मक गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही.

सध्या एकापाठोपाठ एक बायोपिक येत आहेत. तुला कुणाचा बायोपिक करायला अधिक आवडेल?
तापसी पन्नू ः सानिया मिर्झा आणि इंदिरा गांधी यांच्या बायोपिकमध्ये मला काम करायला आवडेल. कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा जीवनप्रवास अतिशय खास आणि वेगळा आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये काम करायला मला नक्कीच आवडेल.

आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगशील?
तापसी पन्नू ः यानंतर माझा ‘लुप लपेटा’ हा चित्रपट रीलीज होणार आहे. यानंतर ‘दोबारा’, ‘शाबाश मिथु’ हे चित्रपट येतील. त्यानंतर माझ्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘ब्लर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या