टेंडर मोमेंट्स 

- शिरीन म्हाडेश्‍वर
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

कव्हर स्टोरी

‘रोमँटिकचा ‘र’ नाही या माणसात.. डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त काम एके काम, आणि उरलेल्या वेळात पोटोबा नाहीतर टीव्ही नाहीतर फोन. श्यॅ! किती टिपिकल झालंय आपलं आयुष्य!..’ मीराची चिडचिड सुरूच होती. संसाराच्या, ऑफिसच्या रगाड्यात आणि मुलांच्या गदारोळात ‘ॲस्ट्रो टुडे’मध्ये म्हटलं होतं त्याप्रमाणे काही प्रेमळ मृदू क्षण तिच्या वाटेला येतील का...?

मऊ दुलईच्या आडून किलकिल्या डोळ्यांनी अलार्म बंद करण्यासाठी मीरानं फोन हातात घेतला आणि सवयीप्रमाणं रोजचं राशिभविष्य वाचण्यासाठी ‘ॲस्ट्रो टुडे’ ॲप उघडलं. 

‘Tender moments with loved ones await for you today.’

आजचं भविष्य वाचून तिच्या चेहऱ्यावर नकळत एक मंद हसू आलं. बारा वर्षांपूर्वी सार्थकशी लग्न झालं होतं, त्यानंतरच्या मधुचंद्री दिवसांच्या आठवणी येऊन ती अलवार स्वप्ननगरीतही गेली. पण संसाराच्या, ऑफिसच्या रगाड्यात आणि मुलांच्या गदारोळात काही प्रेमळ मृदू क्षण आता आपल्या वाट्याला येतील अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःचाच हिरमोड होणार याची तिला पूर्ण खात्री होती. मधे झोपलेल्या दोन मुलांच्या पलीकडच्या बाजूला सार्थक अजूनही मंद पट्टीत घोरत होता. अंथरुणात पडून थोड्याशा नाराजीनंच मग ती मोबाईल स्क्रीनकडे एकटक बघत राहिली.. 

‘अरे बापरे! साडेसहा वाजले. अलार्म बंद केल्यावर ती ॲस्ट्रोवाणी वाचता वाचता माझा डोळा लागला की काय!’

ताडकन उठून मीरानं अंथरूण गुंडाळून ठेवलं आणि आपल्या बछड्यांचा हलकेच पापा घेऊन ती बाथरूमकडे पळाली. 

‘किती उशीर झाला आज.. वर्क फ्रॉम होम असलं म्हणून काय झालं.. घरातली कामं काय चुकली आहेत का! चौघंजण सदासर्वदा घरी असतात म्हणून उलट जास्तच. भारतातल्या सगळ्या मैत्रिणींना वाटतं यूएसमध्ये राहते तर हिची काय मज्जा असणार. इथं सगळी कामं स्वतःची स्वतः करावी लागतात, ते बघायला कोण आलंय. सगळ्यांचा नाश्ता, दोन वेळेचं जेवण, डिशवॉशर लोड करा.. कपड्यांच्या घड्या घाला.. घराची साफसफाई.. मुलांचा अभ्यास.. विचार करूनदेखील दमायला होतं. आणि हे सगळं सगळं मलाच करावं लागतं. साधा खेळण्यांचा पसारासुद्धा आवरायला मुलांना आई हवी.’ ब्रश करता करता तिच्या डोक्यातलं विचारचक्र अविरत सुरू होतं.. 

‘..आणि सार्थक तर काय नुसता नावापुरता मदतीला. ‘मी करतो ना’ असं म्हणत उगीचच पुढे येतो आणि दर दुसऱ्या मिनिटाला ‘आता काय करू’ विचारत ढिंबासारखा एका जागी उभा राहतो. तिसऱ्या मिनिटाला खिशातून मोबाईल बाहेर काढून अंगठा वर-खाली सरकवणं सुरू. साधी कोथिंबीर दे म्हटलं तरी फ्रिजमधली काढून फक्त बाहेर ठेवणार.. मग पंधरा मिनिटांनी धुणार.. नि थोड्या वेळानं पुन्हा कोथिंबिरीचं स्टेटस विचारल्यावर चिरून देणार.. त्यातही चॉपिंग बोर्ड आणि सुरी तिथंच टाकून पसार.. ही कसली मदत. त्यापेक्षा तद्दन न केलेली बरी..’  

मनातली चिडचिड चेहऱ्यावर उमटू लागली तसं कोमट पाण्याचे हबके मारत तिनं स्वतःला थोडं शांत केलं. तेवढ्यात कमरेभोवती टॉवेल गुंडाळलेला सार्थक अर्धवट झोपेत डोळे चोळत, पाय ओढत बाथरूमच्या दारातून आतमध्ये आला.

‘अजूनही किती क्युट दिसतो हा अशा भरकटलेल्या अवस्थेत’ मीराला स्वतःशीच हसू आलं. सार्थक मात्र तिच्या तिथं बाथरूममध्ये असण्याची दखलही न घेता शॉवरचं काचेचं दार उघडून बंद डोळ्यांनीच पाण्याखाली उभा राहिला. मुलं होण्याआधी अशा एखाद्या थंडीच्या सकाळी ऑफिसला निघायची घाई असतानाही त्यानं आत यायचं गुलाबी आमंत्रण दिलं असतं. आपणही खोटे आढेवेढे घेत त्याच्याकडे गेलो असतो. मग लाडानं त्याच्याकडे पाहिल्यावर आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांना ‘मॅकरुन्स’ म्हणत त्यानं शॉवर सुरू केला असता आणि ‘कपडे भिजलेच आहेत तर..’ अशी प्रस्तावना करून भलता खट्याळपणा केला असता.

  ती पुन्हा भानावर आली. बाथरूमच्या अर्धवट उघड्या दारातून तिची नजर बेडवर शांत निजलेल्या दोन्ही पिलांकडे गेली. वय वर्षं सहा आणि आठ, पण अजूनही आईबाबांच्या मधेच झोपायचं असतं यांना! दोघंही अजून मध्यरात्र असल्यासारखी गाढ झोपली होती. चहा घेऊन झाला की लगेचच उठवावं लागणार यांना. आज सकाळी टीचर्सची कसलीतरी एक मीटिंग आहे म्हणे. पहिला तास मुलांनी आपापलंच वाचन करायचंय असा टिचरनं काल मेसेज पाठवला होता.. जाऊदे मग थोडी आरामात उठली तरी काय हरकत आहे! 

या विचारसरशी मात्र अचानक तिचे डोळे चमकले. ‘ॲस्ट्रो टुडे’ची वाणी सकाळी सकाळीच खरी होऊ शकते. काय हरकत आहे आपण स्वतःहूनच शॉवरमध्ये जायला. आमंत्रण कशाला हवं.. 

“मीरा.. उद्या खूप मोठं वादळ येणार असं म्हणताहेत गं.. बॅकयार्डमधलं फर्निचर झाकून ठेवायला हवं. ग्रोसरीसुद्धा स्टॉक अप करून ठेवायला हवी. आयत्यावेळी गेलं की सगळे शेल्फ चोरांची धाड पडल्यासारखे असतात.” काचेच्या दारापलीकडून आवाज आला. 

“अच्छा? मला वाटलं होतं पुचुक पाऊस असेल...आता ‘वादळ’ झालं का त्याचं?” तिनं काहीतरी बोलायचं म्हणून उत्तर दिलं. 

“हो ना.. चांगलं फूटभर प्रेसिपिटेशन होणार अशी न्यूज आहे..”

‘कधी नव्हे ती दोन्ही मुलं गाढ झोपलीयेत, बंद बाथरूममध्ये बायको शॉवरबाहेर एक फुटावर उभी आहे पण ते सोडून याला उद्या येणाऱ्या पावसाची, फर्निचरची आणि ग्रोसरीची चिंता. काय म्हणावं आता!!’

“मीरा, प्लीज जरा चहा करतेस का गं पटकन? पंधरा मिनिटांत आज ऑफशोअर टीमबरोबर मीटिंग आहे. उशीर झालाय ऑलरेडी.. मुलांच्या ब्रेकफास्टचं मी बघतो हवंतर नंतर.” 

‘रोमँटिकचा ‘र’ नाही या माणसात.. डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त काम एके काम, आणि उरलेल्या वेळात पोटोबा नाहीतर टीव्ही नाहीतर फोन. श्यॅ! किती टिपिकल झालंय आपलं आयुष्य!’ चहाचं भांडं स्टोव्हटॉपवर जवळजवळ आदळतच तिनं ब्रेकफास्टचीही तयारी करायला सुरुवात केली. 

“वाह! तुझ्या हातचा आल्याचा चहा काय मस्त लागतो गं मीरा! सुबह बन जाती है.. वाह!”

“आयता मिळालेला चहा छानच लागतो.” आवाजात जराही चढउतार नसला तरी मीराच्या सुरातला खोचकपणा सार्थकपर्यंत पोहोचायचा राहिला नाही. 

“काय गं अशी नाराज असतेस सकाळी सकाळी! आणि मी ब्रेकफास्टचं बघतो म्हणालो होतो ना. तू का करतेयस?”

“म्हणे मुलांच्या ब्रेकफास्टचं मी बघतो! दोघांचा ऑनलाइन क्लासेसमधला स्नॅकटाइम ठरलेला असतो सार्थक. त्याआधी ब्रेकफास्ट तयार असावा लागतो. तू तेव्हा तयारी करायला घेणार. मग क्लास सुरू झाल्यावर दोघं बिचारी स्क्रीनवर टीचरला दिसू नये असं लपूनछपून खाणार. जरा मुलांच्या कलानं घेऊन काही करावं तर नाही. तोंडं वाकडी करून खातात बिचारी..” मीराची धुसफूस अखंड सुरूच होती. 

आज हिचं काहीतरी बिनसलंय हे सार्थकला जाणवलं पण नेमकं काय ते त्याला कळलं नाही. स्वतःच्या आईबरोबर वाजलेलं दिसतंय. होईल दुपारपर्यंत ठीक असा विचार करून त्यानं स्वतःला जास्त त्रास करून घेतला नाही. रागावल्यावर तिचे मोठ्ठाले डोळे अजूनही कसे ‘मॅकरुन्स’सारखे दिसतात हा मनातला विचारही त्यानं चहाच्या घोटाबरोबर गिळून टाकला. अशा धुसफुसत्या वेळी कोणत्या शब्दाची ठिणगी कुठे पडेल सांगता येत नाही. मौनं सर्वार्थ साधनम्! 

सर्वांचा ब्रेकफास्ट आवरून, मुलांना आपापल्या क्लासेसना बसवून अखेरीस मीरानं ऑफिसच्या मीटिंगसाठी लॉगइन केलं. जाता जाता फोनवर ग्रोसरीची लिस्टही टाइप करायला सुरुवात केली. फर्निचर झाकायचा रिमाइंडर लावला. मीटिंग पाठोपाठ मीटिंग्स सुरू राहिल्या. मधूनच सार्थक टेबलवर कॉफीचा मग ठेवून गेला. अगदी तिला आवडते तश्शी! 

****

“सार्थक, पुढच्यावेळी ग्रोसरी करताना मुलांना आणायचं नाही. मी एकटीनंच आले असते ना!”

“पण या राक्षसगणातल्या मुलांना मला घरी एकट्यानं सांभाळता येत नाही गं!” 

‘एक संध्याकाळ याला मुलांना बघता येत नाही. माझं ऐकत नाहीत नि काय नि काय कारणं. तरी म्हणत होते एक पुरे आहे आपल्याला. तर नाही. मुलं हवीत फक्त. पण त्यांची एक गोष्ट करायला सांगितली की तोंडाला फेस येतो याच्या.’ 

“मान्य. मग अख्ख्या लवाजम्यानं यायला हवं का? तू यायचंस. तुला एकट्यानं साधी ग्रोसरी जमू नये!!”

“मला न जमायला काय. पण तुझ्या शंभर सूचना असतात, आणि मी काहीही आणलं तरी हजार तक्रारी असतात. हेच का आणलं.. तेच का आणलं नाही. म्हणून म्हटलं तूसुद्धा चल बरोबर.” सार्थक अगदी दीनवाण्या चेहऱ्यानं म्हणाला, तशी मीरालाही सकाळपासून स्वतःची सुरू असलेली चिडचिड थांबवावी असं वाटलं. 

“हं .. उच्छाद मांडतात खरं. पण बाहेर येऊनसुद्धा तेच करतात ना. दिसेल ते मागत राहतात. ऐकलं नाही की रडारड..”

“चालायचंच गं. तेवढीच ड्राइव्ह होते सगळ्यांची. त्यांना मजा येते बाहेर फिरायला. कशी मस्त सुस्तावलीयेत बघ.”

मीरानं ड्राइव्ह करता करता मान उंचावून मागच्या आरशात हलकेच नजर टाकली. संध्याकाळभर धिंगाणा घालून झाल्यावर हट्टानं घेतलेले हॉटडॉग आणि आइस्क्रीम रिचवून मागच्या सीटवर केकाटणारी पिलावळ आता विसावली होती. रात्रीची वेळ असल्यानं रस्ता जरा मोकळा ढाकळा होता. उद्याच्या वादळाची नांदी म्हणून की काय पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या होत्या. अशा निवांत ड्राइव्हमध्ये कशाची कमतरता होती तर तिच्या आवडत्या कवितांची. त्यातही ग्रेसच्या कविता.. अहाहा.. इच्छा होते न होते न होते तोवर तिचं आवडतं गाणं लागलंही.. 

‘ते झरे चंद्र सजणांचे.. ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया’

“तू कधीपासून ग्रेस ऐकायला लागलास?” तिनं आश्चर्यानं सार्थककडे पाहिलं. 

“छे छे.. मी नाही ऐकत ग्रेस बिस. मला समजतच नाही तर. झोप येते दोन ओळी ऐकल्या की”

“मग का लावलंस? लाव तुझ्या आवडीचं काही..” 

“पुढचं गाणं ‘चलती है क्या नौ से बारा’च आहे मॅडम. आवड जुळत नसली म्हणून काय झालं? एक तुझ्या आवडीचं, एक माझ्या. क्या बोलती हो?”

मीराला खुद्कन हसू आलं. ‘सार्थक जराही बदलला नाहीये.. असाच अवखळ होता पंधरा वर्षांपूर्वीसुद्धा. आपणच बदललोय कदाचित. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली नको तितक्या दबलोय.’ ती पुन्हा विचारात गुंतायला लागली, तसं सार्थकनं मागच्या सीटवर ठेवलेल्या हॉटडॉगच्या बॅगमधून एक पुडकं बाहेर काढलं.. 

“तू चिकन टेंडर्ससुद्धा घेतलेस??” तिच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सार्थक फक्त हसला आणि त्याचं चिकनवर ताव मारणं सुरू झालं. ड्रायव्हिंग करत असताना तिची नजर एक क्षण त्याच्यावर स्थिरावली. फळं, पालेभाज्या, ओट्स अशा सज्जन पदार्थांच्या रांगेत जराही मानाचं स्थान नसलेला हा प्रकार खाताना त्याचा चेहरा प्रचंड खुलला होता. अखेरीस तिलाही रहावलं नाही. 

“मला पण दे की..”

“सॉरी सॉरी.. खूप भूक लागली होती अगं. विसरायला झालं.. ” सार्थकनं मस्टर्ड सॉसमध्ये चिकन टेंडर नेमकं तिला आवडतं तेवढंच बुडवून भरवलं. 

“अहाहा..” 

“ओय.. ड्रायव्हिंग करताना अहाहा म्हणत डोळे मिटू नको म्हणजे मिळवलं”

“माहीतेय रे.. पण आणखीन एक दे ना..”

“पूर्वी डाएटच्या नावाखाली अजिबात खायची नाहीस असं काही.. आता माझ्यापेक्षा जास्त तोडतेस..”

“स्स्स..काय मस्त स्पायसी आहे.. अं.. काय करतोयस तू!! नाकाला सॉस लागलं..”

“बघू दाखव..” सार्थकनं हलकेच तिच्या नाकाला लागलेलं सॉस टिपलं. समोरून येणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशात तिचे बदामी डोळे खुलून दिसत होते. तिला अजून एक चिकन टेंडर भरवत यावेळी त्यानं मुद्दाम तिच्या नाकाला सॉस लावलं. यावर ती नेहमीप्रमाणे खोटंखोटं वैतागली आणि त्याकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करत त्याने हलकेच तिच्या गालावर एक टपली मारली. 

मनातल्या मनात मात्र मीरा धुंद हसली. पावसानं धूसर झालेल्या काचेतून रस्त्यावरची नजर जराही न हटवता ॲस्ट्रो-टुडेनं भाकीत केलेला हा ‘टेंडर मोमेंट’ डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला स्पष्ट दिसला होता.

संबंधित बातम्या