समुद्रमंथन

श्रीनिवास शारंगपाणी
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

“आपण एक फार मोठा शोध लावला आहे. हा आपल्यापासून काही फुटांवर आहे ना तो एक डायनोसॉर आहे,” सुब्रह्मण्यम शांतपणे म्हणाले. “काऽऽय?” कॅप्टन आणि मायदेव चकित होऊन ओरडलेच.... 

डॉ. मायदेव जहाजाच्या एका हलक्याशा धक्क्यानं जागे झाले. डोळे चोळत ते बिछान्यावर उठून बसले. त्यांचं लक्ष समोरच्या कालनिर्देशकाकडे गेलं. मंगळवार, ता. ११ नोव्हेंबर २०३६ - सकाळची वेळ ७:२४:३७. ते मनोमन हसले. या तारखेला आणि वेळेला काही अर्थ तरी होता का? त्यांच्या हसण्याला मात्र अर्थ होता. ते ‘आरएसव्ही समुद्रमंथन’ या संशोधन जहाजामधून प्रवास करत होते आणि दक्षिण ध्रुवाच्या दिशेनं निघाले होते. इथं दक्षिण गोलार्धात नोव्हेंबर म्हणजे उन्हाळा आणि त्यामुळं दिवस व रात्र कित्येक महिन्यांची असल्यानं वास्तविक पाहता भारतीय प्रमाणवेळेचा संदर्भ असलेल्या कालनिर्देशकाला स्थानिकदृष्ट्या काहीच अर्थ नव्हता. काल रात्री (!) ते झोपले तेव्हाही लख्ख प्रकाश होताच आणि आत्ताही होताच. फरक एवढाच होता की त्यांनी काल झोपताना पोर्टहोलवर काळा पडदा लावून घेतला होता आणि सर्व दिवे मालवून टाकले होते, म्हणजेच कृत्रिमरीत्या रात्र निर्माण केली होती. फिल्मी स्टुडिओत करतात तशी.

धक्का कशानं बसला ते पाहण्यासाठी अंगावर जाडजूड कोट घालून ते डेकवर आले. डॉ. सुब्रह्मण्यम डेकवरच उभे होते. तेही नखशिखांत लोकरीच्या प्रावरणांनी वेष्टित होते. चेहऱ्याला वारं चांगलंच झोंबत होतं. डॉ. मायदेवांनी प्रश्नार्थक मुद्रा केल्यावर त्यांनी आपल्या हातातील काळ्या कॉफीच्या कपानंच समुद्रात एका दिशेनं निर्देश केला. एक छोटासा हिमखंड तरंगताना त्यांना दिसला. अर्थात हा छोटासा दिसणारा हिमखंड खाली बराच मोठा असतो हे त्यांना माहीत होतं, तरीही कुणालाच काळजी नव्हती. कारण एक तर तो किती मोठा आहे आणि कुठल्या दिशेनं चालला आहे हे उपकरणांच्या साह्यानं कॅप्टननं माहीत करून घेतलं होतं. याशिवाय हे अत्याधुनिक जहाज, आरएसव्ही (रिसर्च शिपिंग व्हेसल) समुद्रमंथन, अशा हिमखंडांचा सामना करण्यास समर्थ होतं.

“दोब्रोय ऊत्रा,” डॉ. सुब्रह्मण्यमनी रशियन भाषेत ‘सुप्रभात’ असं म्हणून अभिवादन केलं. डॉ. सुब्रह्मण्यम यांनी मॉस्कोमधील विद्यापीठातून उत्क्रांतीय जीवशास्त्रामधील डॉक्टरेट मिळवली होती. त्यामुळे त्यांना अवगत असलेल्या रशियनमधून ते कधी कधी अभिवादन करीत. प्रत्युत्तरादाखल मायदेवांनी “वणक्कम” असं त्यांना तमिळमध्ये अभिवादन केलं.

“आलो का आपण मैत्रीपाशी?” मायदेवांनी विचारलं. या संशोधन सफरीच्या काही उद्देशांपैकी हाही एक उद्देश होता. भारतानं २६ जानेवारी १९८४ला प्रथम दक्षिण गंगोत्री या नावानं अंटार्क्टिकावर आपलं स्थानक निर्माण केलं. पण ते बर्फामध्ये गाडलं गेल्यावर १९८९मध्ये मैत्री स्थापन झालं. नंतर जवळपास हिमाद्री, भारती आणि इंडार्क या संशोधनशाळा तसंच विमानाची धावपट्टी अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. २०२५ या वर्षापर्यंत सगळं ठीक चाललं होतं. अनेक समूह तिथं जाऊन संशोधन करून परतले. पण याच दशकामध्ये झालेल्या अतोनात तापमानवृद्धीमुळे मैत्री आता पाण्याखाली गेलं होतं. अर्थात अंटार्क्टिकाचा बराचसा भाग वितळून नाहीसा झाला होता. त्यामुळे या भागाचं सर्वेक्षण करण्याकरिताच समुद्रमंथन ही संशोधननौका इथपर्यंत आली होती. मायदेव पर्यावरणतज्ज्ञ होते, तर सुब्रह्मण्यम उत्क्रांती शास्त्रज्ञ होते. याशिवाय इतर अभियंते आणि खलाशी जहाजावर होते. 

“होय, मगाशी मी कॅप्टन अरिजित सिंग यांच्या केबिनमध्ये जाऊन पाहून आलो. साधारण अक्षांश ७२० दक्षिण, रेखांश १२० पूर्व इथं आपण आहोत,” सुब्रह्मण्यम उत्तरले. 

“म्हणजे मैत्रीच्या अगदी जवळच म्हणायचं की!”

“दा.” पुन्हा एकदा रशियनमध्ये होकार दर्शवीत सुब्रह्मण्यम म्हणाले.

“पण इथं तर दूरपर्यंत समुद्रच दिसतोय!”

“दा. याचाच अर्थ, आपलं मैत्री समुद्रात विलीन झालं. आपण गेली कित्येक दशकं किंवा एक शतकसुद्धा म्हणा हवं तर, मोठ्या प्रमाणावर कर्बोत्सर्जन केलंय. त्यामुळे उद्‍भवलेलं हे जागतिक उष्मीकरण. त्याचे परिणाम आपण भोगतोय, अंटार्क्टिका वितळून चाललाय आणि आपल्या मैत्री स्थानकाबरोबरच इतर सुविधाही समुद्रास्तृप्यन्तु झाल्यायत,” सभोवार नजर फिरवीत सुब्रह्मण्यम उद्‍गारले.

“मग आता इथलं छायाचित्रण करून आपल्याला परतावं लागेल,” मायदेवांच्या मनातली निराशा लपत नव्हती.

“ते तर कॅप्टन अरिजितनं ऑलरेडी केलंय. पण नव्या स्थानकासाठी जागेची पाहणी करायचीय आपल्याला. विसरलात का?”

“छे, छे. पण इथं दूरवर कुठंही भक्कम साधी सोडा, पण बर्फानं वेष्टित अशी जमीनही कुठं दिसत नाहीय.”

“न्येत, न्येत. आत्ता दिसत नसली तरी गरज पडल्यास दक्षिण ध्रुवापर्यंत जाऊन कुठं पृष्ठभाग आहे की नाही त्याची खात्री करून घ्यायला लागेल.  

त्याशिवाय आपल्याला परतता येणार नाही. तशीच ऑर्डर आहे आपल्याला. होमसिक झालात काय? घरची खूप आठवण येतेय का?”

“नाही हो. इथं फक्त समुद्र, समुद्र आणि समुद्र. दुसरं काही नाहीये. अगदी बोअर झालंय हो,” मायदेव म्हणाले.

तेवढ्यात डेकच्या दुसऱ्या बाजूनं एक खलाशी ओरडला, “तो पाहा, तो पाहा एक खडक दिसतोय!”

“अरे वा. ईश्वरानं माझं म्हणणं ऐकलं वाटतं. समुद्रापेक्षा काहीतरी वेगळं सापडलं म्हणायचं,” असं म्हणून मायदेव सुब्रह्मण्यम यांच्याबरोबर त्या खलाशाकडे गेले. त्यानं लांबवर बोट दाखवलं. दूरवर अंधुकसं काळं राखाडी काहीतरी दिसत होतं.

“खडक असेल किंवा मोडक्या जहाजाचे अवशेषही असू शकतील,” मायदेव म्हणाले.

“नॅव्हिगेशन ब्रिजवर जाऊन दुर्बिणीतून पाहू या,” सुब्रह्मण्यम म्हणाले आणि त्या दिशेनं चालू लागले.

आरएसव्ही समुद्रमंथन जहाज अद्ययावत

असल्यानं नॅव्हिगेशन ब्रिजवर दुर्बीण होती आणि शेजारच्या केबिनमध्ये शास्त्रीय उपकरणांची एक सुसज्ज प्रयोगशाळाच होती. तोपर्यंत कॅप्टन अरिजित सिंगही तिथं येऊन पोचले. त्यांनीच दुर्बिणीला योग्य दिशा देऊन आणि फोकस करून पाहायला सुरुवात केली.

“एखादा खडक किंवा तरंगणारा काळा तुकडा असावा,” सिंग म्हणाले. 

मायदेवांनी दुर्बिणीतून पाहिलं आणि ते म्हणाले, “हां, तसंच काहीतरी वाटतंय.” नंतर सुब्रह्मण्यम यांनी दुर्बिणीला बराच वेळ डोळा लावला. मधूनच ते “हं”, “ओह”, “ओय” असं पुटपुटत होते. त्यांनी मग आपला चष्मा पुसला आणि म्हणाले, “अहो हे काहीतरी वेगळंच वाटतंय मला.”

“म्हणजे?” मायदेवांनी चमकून विचारलं.

“मी बराच वेळ निरखून पाहिलं तर ते जे काही आहे ना ते हालचाल करत असावं असं वाटलं मला.”

“ती वस्तू लाटांमुळे हालचाल करत असावी,” कॅप्टन सिंग. 

“नाही. ती वस्तू लाटांच्या हालचालीपेक्षा वेगळ्या दिशेनं हालचाल करताना दिसली. म्हणजेच ती स्वतःहून हालचाल करत असावी,” आपली मूठ तिथल्याच टेबलावर आपटून सुब्रह्मण्यम म्हणाले.

“मग एखादा मोठा मासा वगैरे...” मायदेवांनी सुरुवात केली. त्यांचं वाक्य मधेच तोडत सुब्रह्मण्यम म्हणाले, “छे, छे. अशक्य. अहो मासा पाण्यात इतक्या संथपणे कधीच हालचाल करत नाही. अगदी देवमाशासारखे मोठे मासेसुद्धा इतका वेळ संथपणे हालचाल करत नाहीत. सगळे जलचर पाहा, सुळकन इकडून तिकडे जातात. ही वस्तू अशी डुलत डुलत हलतेय.”

“मग एखादा मोठ्या आकाराचा जखमी किंवा आजारी जलचर...” कॅप्टन सिंगनी सुचवलं.

“न्येत, न्येत. कॅप्टन, यू शूड नो बेटर. असे आजारी किंवा जखमी जलचर फार काळ जिवंत राहू शकत नाहीत समुद्रात. इतर समुद्री प्राणी त्यांचे लचके तोडून त्यांचा लवकरच फन्ना उडवून टाकतात,” सुब्रह्मण्यम दुर्बिणीतून पाहत म्हणाले. त्यांचं पाहून झाल्यावर कॅप्टन सिंग यांनीपण दुर्बिणीतून नजर टाकली.

“समथिंग ऑड” असं पुटपुटत कॅप्टन सिंगनी आपला मोर्चा जहाजाच्या सुकाणूचक्राकडे वळवला. 

****

काही मिनिटांनीच आरएसव्ही समुद्रमंथन ‘त्या’ वस्तूपासून साधारणपणे शंभर मीटर अंतरावर पोचलं. 

“आहाऽ. पाहा मी म्हणत होतो तेच खरं ठरलं. हा प्राणीच आहे पाहा. पण अगदी वेगळाच दिसतोय,” सुब्रह्मण्यम उत्साहानं ओरडलेच. समुद्री लाटांच्या पृष्ठभागातून मधूनच त्या प्राण्याचं डोकं अवतीर्ण होत होतं. त्याच्या डोक्यावर एक तपकिरी रंगाचा तुरा दिसत होता. मधूनच त्याची त्याच रंगाची पाठ दृग्गोचर होत होती.

“अरेच्या, खरंच की,” मायदेव उद्‍गारले. तेवढ्यात कॅप्टन सिंग ओरडले, “ते पाहा! त्याच्या तोंडाजवळचं पाणी लालभडक झालंय. हा जखमी झालाय की काय?”

बारकाईनं निरीक्षण करून सुब्रह्मण्यम त्यांना म्हणाले, “छे, तो जखमी झालेला नाहीय. तो इतरांना जखमी करतोय!”

“हां, त्याच्या तोंडात एक मोठा मासा दिसतोय खरा. त्यामुळेच पाणी लालेलाल झालंय आणि हा खूप मोठा प्राणी दिसतोय,” मायदेवही पुढं सरसावून डोळे बारीक करून पाहू लागले.

आता बोट त्या प्राण्याच्या बरीच जवळ म्हणजे २० मीटर अंतरावर आली होती.

“आ बोझ्ये. ओ माय गॉड. हा हा.. क्रायोलोफोसॉरस वाटतोय,” आपलं डोकं दोन्ही हातात धरून आकाशाकडे पाहत सुब्रह्मण्यम किंचाळले.

“कोण?” “काय?” आश्चर्यचकित होऊन कॅप्टन सिंग आणि मायदेव या दोघांनीही विचारलं. पण त्याकडे लक्ष न देता सुब्रह्मण्यम कॅप्टनकडे वळले आणि म्हणाले, “या प्राण्याला बांधून नेता येईल का? कॅन धिस क्रीचर बी सिक्युअर्ड?”

“अंऽऽ, येस. पण....” कॅप्टनचं बोलणं पूर्ण झालंच नाही.

“वेळ घालवू नका. पटापट तो बोटीजवळच राहील अशी व्यवस्था करा. आपल्याला त्याला बोटीवर घ्यायचं नाहीये हे लक्षात घ्या. त्याला कुठलीही इजा होता कामा नये,” सुब्रह्मण्यम भराभर सूचना करतच होते. कॅप्टननी स्टाफच्या लोकांना तशा सूचना दिल्या. काही मिनिटांतच कुशल खलाशांनी अजस्र दोरखंडांनी त्या प्राण्याच्या मानेला आणि मागील लांब पायांना बांधून जहाजाच्या दिशेनं ओढायला सुरुवात केली.

“खूप जड आहे हा. याला जहाजाच्या मागच्या बाजूनं ओढत नेऊ या का?” कॅप्टननं विचारलं.

“अंहं. त्यानं उसळी मारली तर तो प्रॉपेलरच्या पात्यात अडकेल. जहाजाच्या बाजूलाच राहू द्या, काहीसा मोकळा असू दे आणि करकचू नका त्याला. वेळ आलीच तर ओढून वर घेता येईल अशा पद्धतीनं बांधा. अर्थात तेव्हा त्याला बंदिस्तच ठेवावं लागेल,” सुब्रह्मण्यम यांच्या सूचनांमध्ये कमालीची स्पष्टता होती.

****

कॅप्टन सिंगच्या केबिनमध्ये तिघं कॉफी पीत बसले होते.

“तुम्ही इतक्या तातडीनं सूचना दिल्यात की विचारायला वेळच मिळाला नाही. अगदी महत्त्वाचं काहीतरी असणार म्हणून आम्ही तुमच्या सूचनांचं पालन केलं. पण आता सांगा ही काय भानगड आहे?” कॅप्टननं सुब्रह्मण्यमना विचारलं.

“ते सांगतो, पण अजून एक तातडीची सूचना मला करायची आहे. ती म्हणजे इथून सर्वात जवळ जमीन असलेलं ठिकाण कुठं आहे? तिकडे आपल्याला बोट लगेच वळवावी लागेल.”

कॅप्टननं आपल्या खिशातील इलेक्ट्रॉनिक 

साहाय्यक काढून पाहिला आणि म्हटलं, “इथून ब्यूवे द्वीप हे सर्वात जवळचं आहे आणि ते सुमारे २३०० किलोमीटर अंतरावर आहे. मी जहाज तिकडे वळवू शकतो पण तिथं नांगर टाकायला किंवा बेटावर उतरायला नॉर्वे देशाची परवानगी घ्यावी लागेल, कारण ते त्यांच्या मालकीचं आहे. शिवाय आपल्यालाही आपल्या मुख्यालयाकडून खास परवानगी घ्यायला लागेल.”

“ओके. तुम्ही तशा परवानग्या मिळवायला सुरुवात करा. किती वेळ लागेल आपल्याला तिथं पोचायला?” सुब्रह्मण्यमनी विचारलं.

“साधारणपणे ४६ तास लागतील ब्यूवे द्वीपाला पोचायला, जर हवामान असंच ठीक राहिलं तर,” कॅप्टन.

“ओत्लिच्न. ऑल राइट. लेट्स होप फॉर द बेस्ट. प्लीज डू इट.”

कॅप्टननं लगेचच वॉकी-टॉकीवरून सूचना दिल्या. काही काळानं एका सौम्य धक्क्यानं बोट वळल्याची सूचना सर्वांना मिळाली.

“पण हा सगळा काय प्रकार आहे ते समजावून सांगाल का जरा,” मायदेवांनी विनंती केली.

“आपण एक फार मोठा शोध लावला आहे. हा आपल्यापासून काही फुटांवर आहे ना तो एक डायनोसॉर आहे,” सुब्रह्मण्यम शांतपणे म्हणाले.

“काऽऽय?” कॅप्टन आणि मायदेव चकित होऊन ओरडलेच. मायदेवांचा तोंडापाशी नेलेला कप हिंदकळला आणि त्यातली कॉफी भरतकाम केलेल्या शुभ्र टेबलक्लॉथवर सांडली. त्यांचा चेहरा गोरामोरा झाला, पण कॅप्टननं स्मित करून हातानंच ‘असू दे’ असं सूचित केलं. सुब्रह्मण्यम कॉफीचा दीर्घ घोट घेण्यात मग्न होते.

“दा. येस. हा क्रायोलोफोसॉरस जातीचा डायनोसॉर आहे. हा मांसभक्षी आहे.”

“डायनोसॉर? अहो ते तर साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच नष्ट झाले ना?” मायदेव अजूनही धक्क्यातून सावरले नव्हते.

“आणि मला वाटतं ते त्याआधी जवळजवळ सोळा कोटी वर्षं पृथ्वीवर अस्तित्वात होते,” कॅप्टन अरिजित सिंग म्हणाले आणि अखेरचा घोट घेऊन त्यांनी कॉफी संपवली.

‘‘कारू हिमयुगाच्या आसपास शीतनिद्रावस्थेत, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत हायबर्नेशन म्हणतो, त्यात गेला असला पाहिजे. तो सध्या घडत असलेल्या तापमानवृद्धीमुळे पुन्हा जागृतावस्थेत आला असणार.” सुब्रह्मण्यमनी स्पष्टीकरण दिलं.

“अरे बाप रे! कोट्यवधी वर्षांपूर्वीचा प्राणी पुन्हा जिवंत होऊन आपल्यासमोर आला आहे? हे अगदी स्वप्नात किंवा एखाद्या हॉलिवूडच्या विज्ञानपटात शोभेल असंच काहीतरी आपण अनुभवतोय,” मायदेव उत्साहित होऊन म्हणाले.

“ओ माय गॉड. हे खरंच असेल तर मीही कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात आलोय की काय असं मला वाटतंय,” कॅप्टन अरिजित सिंगनं दुजोरा दिला.

“हे सगळं, ही बोट आणि हा समुद्र आहे ना, तितकंच खरं आहे,” सुब्रह्मण्यमनी कपातली कॉफी संपवून आपल्या कपात आणखी कॉफी ओतून घेतली.

“आणि ती ब्यूवे द्वीपाकडे जाण्याची सूचना?” कॅप्टननं विचारलं.

“हां. त्याचं असं आहे, हे क्रायोलोफोसॉरस 

चांगले पोहू शकतात पण त्यांनाही विश्रांतीची गरज आहेच. शिवाय तो किंवा ती नुकतीच शीतनिद्रेतून जागृत झाली असेल तर या प्राण्याला लांबवर पोहणं सहन होणार नाही. आपण या प्राण्याला बोटीजवळ ठेवलंय पण गच्च बांधून ठेवलेलं नाही. त्यामुळे जवळपासचे मासे आणि इतर जलचर खाऊन तो जगू शकेल. त्याची अगदीच तडफड होताना दिसली तर मात्र त्याला बोटीवर घ्यावं लागेल,” सुब्रह्मण्यमनी समजावून सांगितलं.

ब्यूवे द्वीपावर पोचून दोन दिवस झाले होते. क्रायोलोफोसॉरसला बेटापाशी आल्यावर सोडून देण्यात आलं. अक्षरशः बागडतच तो द्वीपावर दाखल झाला. नॉर्वे सरकारच्या परवानगीनं आरएसव्ही समुद्रमंथन किनाऱ्याजवळच नांगरून थांबलं होतं. जहाजावरच्या त्रिकुटानं क्रायोलोफोसॉरसचं ‘विशाल’ असं नामकरण केलं. बेटावरचे अल्बाट्रॉस, एलिफंट सील, पेंग्विन अशांना भक्ष्य करून विशाल आनंदानं जगत होता. दहा दिवसांनी भारतानं तज्ज्ञांसह एक दुसरं जहाज पाठवून एका कंटेनरमधून विशालला भारतात आणण्याची व्यवस्था केली. भारताकडे येत असतानाच विशाल हा प्राणी ‘तो’ नसून ‘ती’ असल्याचं लक्षात आलं त्यामुळे नाव बदलून ‘विशाला’ ठेवण्यात आलं. विशालानं प्रवासातच एक डझन अंडी दिल्यामुळे क्रायोलोफोसॉरस प्रजाती जिवंत ठेवण्याला दिशा मिळाली.

****

भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीमुळे अनेक देशांनी अंटार्क्टिकामधून असेच गाडले गेलेले सजीव मिळवण्यासाठी मोहिमा आखल्या. भारतानं हैदराबादजवळ ‘सुब्रह्मण्यम डायनोसॉर पार्क’ स्थापन करून जिवंत क्रायोलोफोसॉरस प्रजातीची लोकांना ओळख करून देण्याची सोय केली.

या ‘समुद्रमंथना’मुळे जरी ऐरावत प्राप्त झाला नसला तरी तेवढाच मोठा म्हणजे अर्धा टन वजनाचा आणि आठ-नऊ मीटर लांबीचा अजस्र असा नामशेष झालेला प्राणी प्राप्त केला होता एवढं मात्र खरं.

संबंधित बातम्या