वृत्तपत्राची एका दोनशे वर्षे

विश्राम ढोले
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

कव्हर स्टोरी

विचारसणीला बांधलेली एकोणविसाव्या शतकातील क्लासिकल पत्रकारिता असो, आक्रमक आर्थिकतेला तोंड देणारी विसाव्या शतकातील व्यावसायिक पत्रकारिता असो किंवा ग्लोबल व्हिलेज झालेल्या एकविसाव्या शतकातील डिजिटल विदा पत्रकारिता असो, ‘गार्डियन’ने ‘फॅक्टस् आर सेक्रेड अँड कमेन्टस् आर फ्री’ या आपल्या ब्रीदाशी फारकत घेतली नाही.

स्थळ- इंग्लंडमधील मॅन्चेस्टर शहर. वर्ष १८१९. अगदी नेमकी तारीख सांगायची तर १६ ऑगस्ट. हातमाग आणि यंत्रमाग कामगारांनी गजबजलेल्या आणि गिरण्यांच्या धुरांनी काळवंडलेल्या मॅन्चेस्टर शहरात शांततामय निदर्शने चालू होती. शहराने अनुभवलेले तोवरचे ते सर्वात मोठे निदर्शन. सरकारने मका व इतर धान्याच्या आयातीवर लावलेल्या प्रचंड शुल्कामुळे अन्नधान्याचे भाव प्रचंड वाढले होते. त्याचा फायदा होत होता फक्त स्थानिक जमीनदारांना. वाढती महागाई कामगारांना सहन होईना आणि त्यांचे वेतन वाढविणे मालकांना परवडेना, अशी स्थिती. म्हणून एरवी असलेला कामगार- मालक हा अंतर्गत विरोध बाजूला ठेवून या आंदोलनात दोघेही सहभागी झालेले. पण १६ ऑगस्टच्या शांततामय आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात अठरा आंदोलक ठार, तर साडेसहाशे जण जखमी झाले. ब्रिटनच्या इतिहासातील ते एक सर्वाधिक रक्तरंजित राजकीय आंदोलन ठरले.  

आज ज्याला ‘दी गार्डियन’ म्हणून ओळखले जाते त्या अत्यंत प्रतिष्ठित वर्तमानपत्राचा जन्म याच आंदोलनातून झाला. या आंदोलनाचे साक्षीदार आणि सहानुभुतीदार असलेले कापूस व्यापारी जॉन टेलर यांनी ५ मे १८२१ रोजी ‘दी मॅन्चेस्टर गार्डियन’ या साप्ताहिकच्या रूपाने या वर्तमानपत्राची सुरुवात केली. हे साप्ताहिक सुरू करण्यामागे १८१९चे आंदोलन आणि त्यातील हिंसाचार ही कारणे होती, हे खरेच. पण ती तात्कालिक होती. त्यामागच्या वैचारिक प्रेरणा एका दीर्घ, गुंतागुंतीच्या आणि व्यापक सामाजिक बदलांमधून आलेल्या होत्या. 

‘गार्डियन’च्या स्थापनेच्या पन्नासेक वर्ष आधी म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून इंग्लंडमध्ये अर्थव्यवस्थेचे औद्योगिकीकरण वेगाने होत होते. व्यापारी भांडवलशाहीकडून औद्योगिक भांडवलशाहीकडे इंग्लंडची वाटचाल सुरू होती. पारंपरिक जमीनदार वर्ग, कारखानदार-गिरणीमालक यांचा नवभांडवलदार वर्ग, शारीरिक श्रमावर उपजिविका करणारा कामगार वर्ग आणि यांच्यादरम्यान असणारा मध्यमवर्ग अशी नवी सामाजिक व्यवस्था शहरांमध्ये उदयाला येत होती. त्यांच्यातील समन्वय-संघर्षाचे नवे ताणेबाणे हळूहळू घट्ट होत होते. एकोणविसाव्या शतकातील मॅन्चेस्टर तर या युरोपिय औद्योगिक क्रांतीची जणू राजधानीच. शेकडो कापड गिरण्या आणि हजारो कामगारांनी गजबजलेल्या मॅन्चेस्टरमध्ये तर हे ताणेबाणे अधिक प्रकर्षाने अनुभवायला येत होते. त्यांचे प्रतिबिंब तत्कालिन राजकारण, वर्तमानपत्रे आणि सार्वजनिक चर्चाविश्वासत दिसू लागले होते. खरेतर ‘गार्डियन’ सुरू होण्याच्या आधीही मॅन्चेस्टर आणि इंग्लंडमधील अनेक नव-औद्योगिक शहरांमध्ये वर्तमानपत्रे होतीच. पण ती पारंपरिक जमीनदार-सामंती वर्ग, गिरणीमालक-उद्योगपती असा नवभांडवली वर्ग किंवा नवा शहरी कामगारवर्ग यापैकी कोणाचे तरी हितसंबंध जोपासण्यासाठी चालविली जायची. अशा परिस्थितीत टेलर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या ज्या वेगळ्या वैचारिक धारणा होत्या त्याचे प्रतिनिधित्व करणारे वर्तमानपत्र कुठेच नव्हते. या गरजेतूनच ‘दी मॅन्चेस्टर गार्डियन’चा जन्म झाला. 

काय होत्या या वेगळ्या वैचारिक धारणा? ‘गार्डियन’च्या इतिहासात त्याचे इतके काय महत्व? 

अठरावे आणि एकोणविसावे शतक म्हणजे इंग्लंडमधील लोकशाही, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि वसाहतविस्तार यांनी भारलेला काळ. अठराव्या शतकावर रॅशनालिझमला मानणाऱ्या जॉर्जियन पर्वाचा पगडा, तर एकोणविसाव्या शतकावर रोमॅन्टिसिझमने प्रभावित व्हिक्टोरियन पर्वाचा. आजच्या लिबरल आणि कॉन्झर्वेटिव्ह पक्षांचे पूर्वसुरी व्हिग्स आणि टोरी हे पक्षही याच काळातले. ईस्ट इंडिया कंपनीसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून इंग्लडचा वाढलेला आंतरराष्ट्रीय व्यापार, जगभरातील वसाहतविस्तार आणि त्यातून आलेली सुबत्ता याच काळातली. व्यापारी समृद्धीतून आलेली व्यापारी भांडवलशाही ते औद्योगिकीकरणातून निर्माण होत गेलेली औद्योगिक भांडवलशाही हे स्थित्यंतरही या काळाने अनुभवलेले. वेगाने होत गेलेले शहरीकरण, मोठ्या प्रमाणावरील वासाहतिक स्थलांतर हेही याच काळातले. ब्रिटनमधील जनमानसावर प्रभाव ठेवून असलेल्या पारंपरिक चर्च ऑफ इंग्लंडला आतून आणि बाहेरून आव्हान मिळत गेले तेही याच काळात. इतके सारे व्यापक बदल अनुभवलेल्या या काळात अनेक राजकीय-आर्थिक-सामाजिक विचारधारा निर्माण झाल्या नसत्या तरच नवल. 

‘गार्डियन’चा जन्म जिथे झाला त्या मॅन्चेस्टरमध्येच अशी एक वैचारिक बैठक आणि आंदोलन निर्माण होत गेले. ‘मॅन्चेस्टर लिबरॅलिझम’ हे त्या वैचारिक-सामाजिक आंदोलनाचे नाव. त्याला आश्रय होता तो नव्या शहरी व्यापारी आणि मध्यमवर्गाचा. आणि त्यांचे वैचारिक अधिष्ठान होते अॅडम स्मिथ, डेव्हिड ह्युम, ज्याँ बाप्टिस्ट साय यांनी मांडलेल्या आर्थिक आणि तात्त्विक विचारांमध्ये. मुक्त व्यापार, कमीत कमी सरकारी हस्तक्षेप, स्पर्धात्मकता, युद्ध आणि लष्करीकरणाला विरोध, मानवी प्रतिष्ठा आणि वैचारिक खुलेपणाला प्राधान्य, धर्म आणि शासनव्यवस्था यांची संपूर्ण फारकत, माध्यमांचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता, मध्यमवर्गीय संवेदना आणि नैतिकता ही या मॅन्चेस्टर लिबरॅलिझमची वैशिष्ट्ये. याच धारणांचा नंतर थोडा भौगोलिक आणि वैचारिक विस्तार होत गेला आणि तिला ‘लिबरल नॉन कन्फॉर्मिस्ट’ असे नाव मिळाले. संस्थापक जॉन टेलर आणि त्यांच्यानंतर जवळजवळ अर्धशतकभर संपादक राहिलेल्या सी.पी. स्कॉट यांनी मॅन्चेस्टर ‘गार्डियन’ची वैचारिक पाळेमुळे याच लिबरल-नॉन कन्फॉर्मिस्ट वैचारिकतेत घट्ट रुजवली. संस्थापक संपादक टेलर यांच्या नंतर ‘गार्डियन’ची मालकी त्यांचा मुलाकडे गेली. नंतर १९०७ साली ती स्कॉट यांच्याकडे गेली. त्यानंतर म्हणजे १९३६ ते २००८ या काळात ‘गार्डियन’ची मालकी स्कॉट यांनी स्थापलेल्या स्कॉट ट्रस्ट या विश्वस्त संस्थेकडे होती. आणि त्यानंतर ती स्कॉट ट्रस्ट लिमिटेड या कंपनीकडे गेली. पण या संपूर्ण काळात ‘गार्डियन’ची ही वैचारिक बांधिलकी कधी फार बदलली नाही. किंबहुना स्कॉट ट्रस्टने तर या वैचारिक बांधिलकची तरतूद ट्रस्टच्या घटनेतच करून टाकली होती. त्यानुसार ‘खुल्या विचार परंपरेशी बांधिलकी राखणाऱ्या, कोणत्याही पक्षाशी लागेबांधे नसलेल्या दर्जेदार वृत्तपत्राच्या आर्थिक आणि संपादकीय स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आर्थिक तरतुद करणे ’ हे या ट्रस्टचे प्रमुख उद्दिष्ट होते. 

‘गार्डियन’चे महत्त्व त्यांनी अधिकृतपणे आणि सातत्याने जपलेल्या या वैचारिक बांधिलकीमध्ये आहे. आता वैचारिक बांधिलकी मानणाऱ्या वर्तमानपत्रांची कधी वानवा होती असे नाही. पण अशी बांधिलकी मानणारी वर्तमानपत्रे ‘गार्डियन’इतकी दीर्घकाळ टिकली नाही. अगदी भारतीय वर्तमानपत्रांची उदाहरणे घेतली तरी ही बाब स्पष्ट होते. ‘गार्डियन’चा जन्म झाला त्या १८२१च्या आसपास भारतातही वृतपत्रसृष्टी विस्तारत होती. भारतीय भाषांमधील पहिले वर्तमानपत्र म्हणजे बंगालीतील ‘समाचार दर्पण’ प्रकाशित झाले ते १८१८ साली. पहिले हिंदी वर्तमानपत्र ‘उदंत मार्तंड’ ‘गार्डियन’ नंतर पाच वर्षांनी म्हणजे १८२६ साली आले. मराठीतील पहिले वर्तमानपत्र ‘दर्पण’ ‘गार्डियन’नंतर तब्बल ११ वर्षांनी म्हणजे १८३२ साली प्रकाशित झाले. पण ही आणि या काळात आलेली, काहीएक वैचारिक भूमिका घेणारी वर्तमानपत्रे ‘गार्डियन’इतकी दीर्घायुषी आणि वर्धिष्णू राहिली नाहीत. अपवाद फक्त ‘बॉम्बे समाचार’ (आताचे ‘मुंबई समाचार’) या गुजराती वर्तमानपत्राचा. ‘गार्डियन’नंतर एकच वर्षानी म्हणजे १८२२ साली ते प्रकाशित झाले. अजूनही प्रकाशित होत असलेले आशियातील सर्वात जुने वर्तमानपत्र असा ‘बॉम्बे समाचार’चा लौकिक असला, तरी ‘गार्डियन’प्रमाणे त्याची स्वतंत्र ओळख अशी नाही.

इंग्लंडमधील वर्तमानपत्रांचीही स्थिती काही वेगळी नाही. ‘टाईम्स’, ‘बेलफास्ट न्यूज लेटर’ या आजतागायत सुरू असलेल्या वर्तमानपत्रांचा जन्म ‘गार्डियन’च्या बराच आधीचा. आता ‘गार्डियन मिडिया ग्रुप’चा भाग असलेल्या ‘ऑब्जर्व्हरची’ही स्थापना १७९१ची. लंडनहून प्रकाशित होणारे ‘दी डेली टेलिग्राफ’ ‘गार्डियन’पेक्षा ३४ वर्षे लहान. ही मोठी वर्तमानपत्रे अजून सुरू आहेत. प्रतिष्ठित आहेत. आर्थिकदृष्ट्याही सुदृढ आहेत. पण पत्रकारितेवरील एकूण प्रभावाबाबत ‘गार्डियन’ त्यांच्यापेक्षा सरस आहे. ‘गार्डियन’ची लिबरल नॉन कन्फॉर्मिस्ट ही भूमिका आज कळत न कळत पत्रकारितेचे आदर्शवत प्रमाण झाली आहे. वर्तमानपत्रांचे वर्तन त्याप्रमाणे आहे असे इथे अजिबात सुचवायचे नाही. पण वर्तमानपत्रांच्या सामाजिक मूल्यमापनासाठी जी भूमिका आज प्रमाण म्हणून मानली जाते तिचे वर्णन ‘लिबरल नॉन कन्फॉर्मिस्ट’ या शब्दांनीच करता येते. मराठीतील ज्येष्ठ संपादक अरूण टिकेकर तर अगदी स्वच्छपणे हीच आपलीही भूमिका आहे असे सांगायचे आणि त्याचे साक्षेपाने वर्णन करायचे. इतकेच कशाला, आज भारतासह जगभरातील पत्रकारितेच्या शिक्षणामध्ये क्लासिकल पत्रकारितेचे प्रमाण म्हणून ‘फॅक्टस् आर सेक्रेड, कमेन्टस् आर फ्री’, हे जे सूत्र शिकविले जाते ते चक्क ‘गार्डियन’च्या संपादकीय धोरणातून घेतलेले आहे. व्यावसायिक स्थैर्य आणि वैचारिक बांधिलकी कायम ठेवूनही ‘गार्डियन’प्रमाणे पत्रकारितेसाठी प्रमाण होण्याइतपत स्थान, दीर्घायुष्य आणि व्यावसायिक यश फार कमी वर्तमानपत्रांच्या वाट्याला आले आहे. ‘गार्डियन’चे  आणि त्याच्या जन्मामागील वैचारिक प्रेरणांचे ऐतिहासिक महत्त्व हे असे सांगता येते.

अर्थात नुसत्या वैचारिक प्रेरणा असून चालत नाही. माध्यमांच्या स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक जगात तर नाहीच नाही. त्यासोबतच नियोजनबद्ध व्यावहारिक पावले टाकावी लागतात. कठीण प्रसंगी कणखर भूमिका घ्यावी लागते. काळानुसार, तंत्रज्ञानानुसार बदलावे लागते. कष्टाने आणि चुकांमधून शिकत ‘गार्डियन’ने ते केले. ‘गार्डियन’वरही बिकट प्रसंग आले. मांद्यही आले. १९३०च्या दशकातील मालकीसंबंधीचे अस्थैर्य ट्रस्टच्या स्थापनेतून दूर झाले खरे, पण ‘गार्डियन’ला एकूण व्यावसायिक सुस्ती येत गेली. तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अजागळपणा वाढत गेला. १८५५ साली ‘दी मॅन्चेस्टर गार्डियन’ दैनिक झाले होते. खप बरा होता. पण पेपरला असलेली मॅन्चेस्टरची कळा काही गेली नव्हती. मर्यादित पाने, सुमार छपाई, अनाकर्षक रचना, घोड्यांच्या शर्यतीसारख्या लोकरुचीच्या विषयांना न मिळणारे स्थान, व्हिक्टोरियन छापाच्या नैतिकतेचा एक सुप्त शिष्टपणा आणि व्यवस्थापकीय व संपादकीय भाबडेपणा यामुळे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ‘मॅन्चेस्टर गार्डियन’ला एक व्यावसायिक मंदपणा येत गेला. तो इतका की १९६०मध्ये ‘गार्डियन’ने आपल्याच प्रतिस्पर्धी ‘टेलिग्राफ’ची जाहिरात पहिल्या पानावर आणि तेही कमी दरात छापली. टेलिग्राफच्या जाहिरातीतले शब्द होते- ‘दी पेपर यू कॅन ट्रस्ट विच प्रोव्हाईडस् ऑल यू कॅन वॉन्ट इन न्यूजपेपर.’ भोंगळ व्यावसायिकतेचे असे उहारण विरळाच. अर्थात वाढती आर्थिक चणचण हेही त्यामागचे एक कारण होते.          

शेवटी १९६४ साली ‘मॅन्चेस्टर गार्डियन’ने मॅन्चेस्टरचे सुरक्षित आणि परिचित वातावरण सोडून लंडनमध्ये येण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दैनिकाच्या नावातील मॅन्चेस्टर गळून पडले. राहिले ते आजचे नाव- ‘दी गार्डियन’. पण लंडनच्या फ्लिट स्ट्रीटवर येऊन ‘टेलिग्राफ’, ‘टाईम्स’ आणि इतर वर्तमानपत्रांशी स्पर्धा करणे सोपे नव्हते. लवकरच आर्थिक तंगी इतकी वाढली की स्कॉट ट्रस्टच्या मालकांनी ‘गार्डियन’ आणि ‘टाईम्स’चे विलिनकरण करण्यासाठी बोलणी सुरू केली. त्यावेळी ‘टेलिग्राफ’च्या वाढत्या प्रभावापुढे ‘टाईम्स’चीही आर्थिक स्थिती तोळामासाच झाली होती. अर्थात विलीनीकरणाची बोलणी यशस्वी झाली नाही. तत्कालिन संपादक अलिस्टर हिदरिंग्टन यांचा या विलिनीकरणाला तीव्र विरोध होता. पण या साऱ्यापासून धडा घेऊन त्यांनी ‘गार्डियन’ला नवे रूप दिले. सुस्ती झटकली. पूर्वीच्याच वैचारिक बांधिलकीला व्यावसायिक कौशल्याची आणि धडाडीची जोड देऊन ‘गार्डियन’ला लंडनमध्ये प्रस्थापित केले. विशेषतः १९७० आणि १९८०च्या दशकात ब्रिटनमध्ये झालेल्या मोठ्या राजकीय ध्रुवीकरणाच्या काळात ‘गार्डियन’चे राजकीय महत्त्व आणि व्यावसायिक यश वाढत गेले. ब्रिटनमधील राजकीय पटलावरील डाव्यांचा ‘गार्डियन’ हा एक बुलंद आवाज झाले. असे म्हणतात की सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी (एसडीपी) या ब्रिटनमधील मध्यममार्गी पक्षाचा जन्मच ‘गार्डियन’च्या मतपृष्ठांवर (ओपिनियन पेजेस) झाला. ‘गार्डियन’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या वाचकांच्या पत्रव्यवहारातून लेबर पक्षाच्या भविष्यकालीन धोरणांची दिशा दिसत असे. खाणकामगारांनी ऐंशीच्या दशकात केलेल्या संपाच्या वार्तांकनातून ‘गार्डियन’ची डावीकडे झुकणारी, लेबर पक्षाला अनुकूल आणि कामगारांची बाजू उचलून धरणारी भूमिका स्पष्ट झाली. राजकीय मध्याच्या डावीकडे झुकलेले, मध्यमवर्गीय संवेदनांचे, पोलिटिकली करेक्ट राहू इच्छिणारे पण प्रामाणिक वर्तमानपत्र ही ‘गार्डियन’ची ओळख या काळात अधिक गडद होत गेली. 

पण १९७० आणि १९८०चे दशक ‘गार्डियन’साठी एका वेगळ्या अर्थाने आव्हानात्मक होते. कारण याच काळात ऑस्ट्रेलियन माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक यांनी ब्रिटनमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली होती. ‘न्यूज ऑफ दी वर्ल्ड’ हे लोकप्रिय पण सवंग ब्रिटिश वर्तमानपत्र विकत घेऊन मरडॉक यांनी १९६८ साली ब्रिटिश माध्यम बाजारपेठेत प्रवेश केला. लगोलग पुढच्या वर्षी ‘दी सन’ हे दैनिक विकत घेतले. नियमित आकाराच्या ‘दी सन’ला टॅबलॉईड आकारात बदलले आणि नुसते आकाराने नाही तर प्रकृतीनेही ‘टॅबलॉईड’ केले. चढकभडक बातम्या, गॉसिप, चावटपणा ते छचोरपणा, सामान्यांपासून ते वलयांकित व्यक्तींपर्यंत कोणाच्याही खासगी आयुष्यातील गोष्टींचा बोभाटा, ही ब्रिटनमधील टॅबलॉईड वर्तमानपत्रांची खास शैली, आणि साहेबाच्या देशातील वाचकांचाही त्याला पूर्वापार व भरपूर आश्रय. मरडॉक यांनी या टॅबलाॅईड शैलीला अजून प्रोत्साहन दिले. ऐंशीच्या दशकात मरडॉक यांनी अग्रणी वर्तमानपत्र आणि ‘गार्डियन’चा प्रतिस्पर्धी ‘टाईम्स’ आणि ‘संडे टाईम्स’ विकत घेतले. नवी इलेक्ट्रॉनिक छपाई यंत्रणा, आक्रमक विक्रीपद्धती, कर्मचारीकपात आणि सवंग लोकप्रियतेकडे झुकणारे वार्तांकन अशा विविध गोष्टींद्वारे आर्थिक चणचणीतील टाईम्सला पुन्हा नफ्यात आणले. इतकेच नव्हे तर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या मार्गारेट थॅचर, जॉन मेजर यांच्यापासून ते लेबर पक्षाच्या टोनी ब्लेअर यांच्यापर्यंत बड्या नेत्यांशी संधीसाधू हातमिळवणी करून मरडॉक यांनी व्यावसायिक फायदाही करून घेतला. एका अर्थाने मरडॉक यांच्या रूपाने ‘गार्डियन’समोर फक्त व्यावसायिकच नव्हे तर पत्रकारितेच्या वेगळ्याच शैलीचे एक तगडे आव्हान उभे राहिले होते.  

‘गार्डियन’ने आपली क्लासिकल पत्रकारितेची शैलीच अधिक प्रखर करून हे आव्हान पेलले. शोधपत्रकारिता हे ‘गार्डियन’च्या पत्रकारिता शैलीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. मरडॉक यांच्या या आव्हानाला तोंड देताना ‘गार्डियन’ने या वैशिष्ट्याचा पुरेपुर वापर केला. विशेषतः नव्वदीच्या दशकात नियमितपणे केलेल्या शोधपत्रकारितेमुळे ‘गार्डियन’ त्यावेळच्या अतिशय स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहिले. त्यातील टोरी खासदारांच्या गैरवर्तणुकीचे प्रकरण तर खूप गाजले. शोधपत्रकारितेच्या एका मालिकेद्वारे त्यांनी  जोनाथन अँटकिन्स आणि नील हॅमिल्टन या दोन बड्या नेत्यांसह सत्तारुढ पक्षातील खासदारांच्या गैरवर्तणुकीची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. अँटकिन्स यांनी ‘गार्डियन’विरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. पण पुढे १९९९ साली न्यायालयाने तो फेटाळला. अँटकिन्स यांना तुरुंगात जावे लागले. ‘गार्डियन’च्या बातम्या खऱ्या असल्याचे सिद्ध झाले. ‘गार्डियन’चे सर्वत्र कौतुक झाले. १९९७ आणि ९८ अशा दोन सलग वर्षी ‘गार्डियन’ला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट वर्तमानपत्राचा पुरस्कार मिळाला. 

मरडॉक शैलीच्या पत्रकारितेला ‘गार्डियन’ने शोधपत्रकारितेच्या रूपाने एक जबरदस्त ठोसा दिला २००९ साली. मरडॉक यांच्या मालकीच्या ‘न्यूज ऑफ दी वर्ल्ड’ या टॅब्लॉईडच्या पत्रकारितेचे बळी ठरलेल्या काही जणांनी त्याविरुद्ध तक्रारी केल्या. चौकशीत ‘न्यूज ऑफ दी वर्ल्ड’च्या काही पत्रकारांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेऊन, संबंधितांचे फोन हॅक करून त्यांचे खासगी आयुष्य चव्हाट्यावर मांडले आणि बदनामी केली, असे दिसून आले. पण असे फार क्वचित झाले आणि ही सारी प्रकरणे सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी आणि ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्ती यांच्याबाबतीतच झाले असे सांगत ‘न्यूज ऑफ दी वर्ल्ड’ने या प्रकरणी झाकपाक करण्याचा प्रयत्न केला. पण ‘गार्डियन’सोबत काम करणाऱ्या निक डेव्हिस या अव्वल दर्जाच्या शोधपत्रकाराने अनेक महिने काम करून ‘न्यूज ऑफ दी वर्ल्ड’च्या या साऱ्या प्रकरणाची प्रचंड व्याप्ती शोधून काढली. एका धूर्त व आक्रमक मालकाच्या प्रचंड खपाच्या, आर्थिक ताकदीच्या वर्तमानपत्राविरुद्ध दुसऱ्या वर्तमानपत्राने अशी बातम्यांची मालिका चालविणे हे सोपे काम नव्हते. पण ‘गार्डियन’चे कणखर आणि कर्तृत्ववान संपादक अॅलन रसब्रिजर यांनी ते आव्हान पेलले. जुलै २००९मध्ये ‘गार्डियन’ने ‘न्यूज ऑफ दी वर्ल्ड’ची सारी कुलंगडी पुराव्यांसह जगापुढे मांडली. ‘न्यूज ऑफ दी वर्ल्ड’मध्ये फोन हॅकिंग हा फक्त अपवाद नसून तोच नियम होता आणि त्याला मालक व्यवस्थापकांची मूक संमती होती हे ‘गार्डियन’च्या बातम्यांमधून स्पष्ट झाले इतकेच नव्हे तर मालक-व्यवस्थापकांनी त्यासाठी ब्रिटिश पोलिसांना, राजकीय नेत्यांना लाच दिली, ब्रिटिश संसदेची दिशाभूल केली हेही ‘गार्डियन’ने पुढे आणले. त्यावरून खूप गदारोळ झाला. पुढे दोन वर्षे बातम्या आणि चौकशी हे सत्र सुरू राहिले. उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमण्यात आला. माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक, संपादक अँडी कौल्सन, व्यवस्थापिका रिबेका ब्रुक अशा सगळ्यांच्या कसून चौकशा झाल्या. कौल्सन, ब्रुक यांना राजीनामे द्यावे लागले. मरडॉक पिता पुत्र थोडक्यात बचावले, पण अपमानित झाले. प्रचंड लोकक्षोभापायी जाहिरातदारांनी हात आखडता घेतल्याने मरडॉक यांना दिडशेपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेले ‘न्यूज ऑफ दी वर्ल्ड’ अखेर बंद करावे लागले. त्यांचे इतर माध्यमांशी संबंधित काही व्यावसायिक प्रकल्पही गुंडाळावे लागले. नव्या जगातील नव्या शैलीच्या माध्यमसम्राटाला ‘गार्डियन’च्या क्लासिकल शैलीच्या जर्नालिझमने एक जबरदस्त उत्तर दिले. 

‘गार्डियन’ने इंटरनेट लोकप्रिय होण्याच्या सुरुवातीच्या काळातच म्हणजे नव्वदीच्या दशकातच या तंत्रज्ञानाशी दोस्ती केली. पहिले इंटरनेटवर साधे संकेतस्थळ, मग काही बातमीपत्रे, नंतर सतत अद्ययावत होणारे डिजिटल पोर्टल ते डिजिटलला सर्वोच्च प्राधान्य देणारा माध्यमसमूह असा मोठा प्रवास ‘गार्डियन’ने अवघ्या दीडएक दशकात पूर्ण केला. पण तिथेही क्लासिकल जर्नालिझमची शैली सोडली नाही. म्हणूनच २०१० साली ज्युलियन असांजने इराक, अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या अत्याचाराच्या आणि लपवलेल्या कारवायांच्या साऱ्या डिजिटल नोंदी ‘विकिलिक्स’च्या माध्यमातून जगापुढे आणताना ‘गार्डियन’च्याच प्रसिद्धीची मदत घेतली. ‘विकिलिक्स’सोबत केलेल्या या भागीदारीबद्दल ‘गार्डियन’ला २०११चा उत्कृष्ट पत्रकारितेचा आणखी एक पुरस्कार मिळाला होता. हीच गोष्ट पुढे दोन वर्षांनी म्हणजे २०१३मध्ये एडवर्ड स्नोडेन या व्हिसलब्लोअरच्या बाबतीत झाली. अमेरिकी सुरक्षा संस्थेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या स्नोडेनने अमेरिकी सरकार करत असलेल्या सर्वंकष पाळतीचे गुप्त फोडायचे ठरविले तेव्हा ज्या दोन माध्यमसंस्थांवर त्याने भरवसा टाकला त्यात एक होती ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि दुसरे ‘दी गार्डियन’. ‘पनामा पेपर्स’ नावाने प्रसिद्ध झालेल्या एका प्रचंड मोठ्या विदासाठ्याच्या (डेटाबेस) प्रसिद्धीमध्येही ‘गार्डियन’चा सक्रिय सहभाग. २०१६ सालचे हे प्रकरण म्हणजे डेटा जर्नालिझमचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्याने केलेल्या पत्रकारितेचे एक वेगळेच उदाहरण. जगभरातील अनेक बड्या नेत्यांची, उद्योगपतींची आणि सेलिब्रिटींची करचुकवेगिरी आणि आर्थिक अफरातफरी उघड करणाऱ्या या ‘पनामा पेपर्स’मध्ये ‘गार्डियन’चा सहभाग आणि समन्वय अतिशय महत्त्वाचा राहिला. 

विचारसरणीला बांधलेली एकोणविसाव्या शतकातील क्लासिकल पत्रकारिता असो, आक्रमक आर्थिकतेला तोंड देणारी विसाव्या शतकातील व्यावसायिक पत्रकारिता असो किंवा ग्लोबल व्हिलेज झालेल्या एकविसाव्या शतकातील डिजिटल विदा पत्रकारिता असो, ‘गार्डियन’ने ‘फॅक्टस् आर सेक्रेड अॅण्ड कमेन्टस् आर फ्री’ या आपल्या ब्रीदाशी फारकत घेतली नाही. लिबरल नॉन कन्फॉर्मिस्ट ही भूमिका सोडली नाही. आज पत्रकारितेचा व्यवसाय, माध्यम, शैली आणि उद्दिष्ट असे सारेच वेगाने बदलत असताना ‘गार्डियन’च्या या द्वीशतकी दमदार वाटचालीचे अप्रूप वाटते. जगभरात पत्रकारितेची एकूणच विश्वासार्हता झपाट्याने खालावत असताना एका जबाबदार क्लासिकल पत्रकारितेचे ‘गार्डियन’ने निभावलेले सुजाण पालकत्व आश्वासक वाटते. 

(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत)

 

संबंधित बातम्या