मैत्र

संतोष भिंगार्डे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या दोघांमध्ये स्पर्धाभाव असला तर ते समजून घेण्याजोगं असतं. कारण अशा परिस्थितीत, दोघांच्याही महत्त्वाकांक्षा आणि ध्येय एकमेकांच्या आड येण्याची शक्यताच अधिक. पण तरीही मैत्री जमून जाते. स्पर्धाभाव मागे पडत जातो, आणि एकमेकांना परस्परपूरक असा मित्रभाव निर्माण होतो. दोघेही अभिन्न मित्र म्हणून त्या त्या क्षेत्रात स्वीकारलेही जातात. एकमेकांना साथ देत, कधी भांडत-तंडत दोघाही स्पर्धक-मित्रांच्या कारकिर्दी फुलत जातात. संकटाच्या काळात एकमेकांना सांभाळून घेणं, सुखाचे क्षण वाटून घेणं, बघण्यासारखं असतं. अशा मित्रभावात नांदत असतं ते परस्परांबद्दलचं निरपेक्ष सौहार्द, सदिच्छा आणि आदरभाव. या नामवंतांच्या मैत्रीचा फक्त त्यांनाच नव्हे, तर समाजालाही अप्रत्यक्ष लाभ होतच असतो. हे सगळं कसं घडतं? 
गेल्या वर्षातल्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये अशा नामवंत मित्र-मैत्रिणींच्या जोड्यांनी नेमकं काय केलं? घरातल्या ठाणबंद अवस्थेत आपली मैत्री कशी जपली? त्यांच्या मैत्रीचं नेमकं गमक काय? वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही जोड्यांना आम्ही गाठून बोलतं करण्याचा प्रयत्न केला. काही मित्र-मैत्रिणींनी ‘कॅय?’ असाच प्रतिप्रश्न केला. मैत्री कशी झाली, आणि टिकवली, हे कसं सांगणार बुवा? असं कोडं त्यांना पडलं. ते कोड्यात पडणंसुद्धा कमालीचं बहारदार, आणि मैत्रीभावाचा पुरावा देणारं होतं. काही दोस्तमंडळींनी मात्र आपली मैत्री उलगडण्याचा प्रयत्न केला. 
वाचा त्यांच्याच शब्दांत...

संगीतानं एकत्र आणलं...
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन मित्रमंडळी भेटत असतात. त्यातील काही जणांशी आपली घट्ट मैत्री होते. ते आपल्या सुख-दुःखात सहभागी होतात. आपण आपल्या मनातले विचार त्यांच्याकडं स्पष्टपणे मांडू शकतो किंवा काही विचारांबाबत मतभिन्नता असली, की वादही घालू शकतो. माझी शाळेतील आणि कॉलेजमधील मित्रमंडळी वेगवेगळी आहेत. परंतु, माझा सर्वात जवळचा मित्र आणि ज्याच्यावर मी जिवापाड प्रेम करतो असा मित्र म्हणजे रोचक कोहली. 

मी आठवीत असल्यापासून रोचकला ओळखतो. १९९० च्या उत्तरार्धात आम्ही एकाच शाळेत होतो, ती शाळा म्हणजे चंदीगडमधील सेंट जॉन हायस्कूल. त्यातच मला संगीताची आवड आणि त्यालाही. त्यामुळं आमच्यामध्ये चांगलीच मैत्री झाली, कारण आम्ही दोघंही संगीतप्रेमी. या संगीतानंच आम्हाला एकत्र आणलं व आमच्या मैत्रीचे धागे घट्ट बांधून ठेवले. आठवीत शिकत असताना इतर विद्यार्थ्यांच्या मानानं आमच्या दोघांकडंही विविध प्रकारची गाणी लिहिणं, त्यांना चाल लावणं हे विशेष गुण होते. त्यामुळं वर्गातील इतर मुलंही आमच्या मैत्रीकडं कुतूहलानं पाहत असायची. 

रोचक आणि मी, आम्ही बरीच नाटकं एकत्र केली आहेत. संगीत तसंच नाटक असा आमचा उत्तम प्रवास सुरू होता. शिवाय मजा-मस्ती ही ओघानं होतच होती. कॉलेजच्या पहिल्याच वर्षी आम्ही स्पार्टाकस या ग्रीक नाटकात एकत्र होतो. दुसऱ्‍या वर्षी कुमारस्वामी आणि तिसऱ्‍या वर्षी अंधयुग अशी नाटकं आम्ही एकत्र केली. अंधयुगमध्ये माझ्या पात्राचं नाव अश्वत्थामा होतं. रोचकनं प्रामुख्यानं या सर्व नाटकांना संगीत दिलं आणि त्यानं या नाटकांतील काही पात्रंदेखील साकारली. सुरुवातीपासूनच तो सर्वगुणसंपन्न आहे. त्याचा सकारात्मक दृष्टिकोन मला खूप आवडायचा.

प्रत्येक वेळी मानवी संबंध खूप महत्त्वाचे असतात. परंतु या लॉकडाउनच्या कालावधीत या मानवी संबंधांमध्ये काहीसं अंतर पडलेलं दिसलं. मात्र आम्ही वरचेवर एकमेकांच्या संपर्कात राहिलो. तसं पाहायला गेलं, तर रोचक आणि मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आमच्या शाळा-कॉलेजातील मित्रमंडळींशी संवाद साधतो. परंतु आता कोरोनामुळं आम्ही अनेक मित्रांशी फोनवरून संपर्क साधला. आमच्या एकत्रित गप्पा खूप झाल्या. आम्ही आमचे काही अनुभव त्यांच्याशी शेअर केले आणि त्यांनीही आम्हाला गमतीजमती सांगितल्या. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही एकाच शाळेतले आहोत. एखाद्या कठीण परिस्थितीत अशा गप्पा खूप पाठबळ देतात. काही गोष्टी नव्यानं समजतात आणि याच गोष्टी आपल्याला कठीण परिस्थितीचा सामना करायला अधिक बळ देतात.

- आयुष्मान खुराना

***********************************************

आमची मैत्री एकदम घट्ट
आयुष्मान आणि मी बऱ्‍याच वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहोत. मला वाटतं की आमची मैत्री ही पाण्यासारखी आहे आणि तेच कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. पाण्याप्रमाणंच आमची मैत्री ही शुद्ध आहे. हां.. कदाचित, पाणी हा आमचा आवडता शब्द आहे असं म्हणायलाही हरकत नाही. कारण ‘पानी दा रंग’ हे आमचं पहिलं गाणं.

जेव्हा आयुष्मान आणि मी पहिल्यांदा चंदीगडमधून बाहेर पडलो होतो, तेव्हा एका शहरात जन्मलेल्या व वाढलेल्या मुलांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन जग बघणं ही खूप अवघड गोष्ट होती. कारण आमच्यासाठी एक नवीन विंडो होती. तेव्हा आम्ही दोघांनी मिळून ते वेगळं जग शोधण्याचा प्रयत्न केला. आमची स्वप्नं काय आहेत, संगीत कसं तयार केलं जातं, आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन याचा शोध घेतला. आम्ही लोकल ट्रेनमधून प्रवास केला. आमच्याकडं कधी कधी पैसेही नसायचे. पैसे नसतानाही उसनवार करून आम्ही गोव्यात गेलो. पोटा-पाण्यासाठी तिथं मिळतील ती कामं केली. 

आज मागं वळून पाहताना आमच्या अंगावर खूप काटा येतो आणि कधी कधी डोळ्यांतून अश्रूही येतात आणि मला वाटतं की याच गोष्टींनी आम्हाला इतकं जवळ आणलं आहे. एकमेकांच्या आनंदाच्या आणि कठीण काळात आम्ही एकमेकांबरोबर होतो. आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून ज्या मुलींना डेट करत होतो, त्या मुलींशी आम्ही लग्न केलं. म्हणून आता आम्ही चारजण एका 

कुटुंबासारखे आहोत. आमच्या कॉलेजमधील थिएटरचा काळ हा  आमच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय काळ होता. तेव्हा आम्ही नाटक सादर करण्यासाठी चंदीगड ते मुंबई असा प्रवास केला आणि मग आम्ही काही चांगला वेळ एकत्र घालवला. आम्ही दर दोन-तीन दिवसांनी एकमेकांशी बोलत असतो. आम्ही आमच्या स्वतःच्या क्षेत्रात अनेक नवनवीन गोष्टी करत असतो. मी करत असलेल्या कामाबद्दल अभिप्राय घेण्यासाठी मी अनेकदा त्याला फोन करतो आणि मला त्याचा चित्रपट किंवा त्याचा अभिनय आवडला की नाही हे जाणून घेण्यासाठी तो मला फोन करतो. कामाशिवायही आम्ही इतर अनेक गोष्टींवर बोलतो. 

आम्ही आमच्या जुन्या मित्रांशी संपर्क साधतो. इतर ग्रुपबरोबरदेखील संपर्कात असतो आणि तेव्हा बऱ्‍याचदा जुन्या आठवणींना उजाळा देतो.लॉकडाउनमध्येही गेल्या पाचेक महिन्यांत आयुष्मान आणि मी नेहमीच एकमेकांच्या संपर्कात होतो. खरंतर आम्ही दोघंही आता चंदीगडमध्ये आहोत. नुकतंच मी नवीन सिंगलचं शूट सुरू केलं, तेव्हा शूटच्या पहिल्याच दिवशी आयुष्माननं सेटवर येऊन मला आश्चर्यचकित केलं. तो सायकल चालवत होता आणि मला शूटसाठी शुभेच्छा द्यायला आला होता. प्रत्येक जण त्याच्या येण्यानं खरोखर उत्साही आणि आश्चर्यचकित झाला. अशी ही आमची शाळा-कॉलेजपासून असलेली मैत्री आजही तितकीच घट्ट आहे आणि यापुढंही अशीच असेल याची आम्हाला खात्री आहे.

- रोचक कोहली
शब्दांकन : संतोष भिंगार्डे

संबंधित बातम्या