जर इंटरनेट नसेल तर--! 

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 18 जानेवारी 2021

जर-तरच्या गोष्टी 

आता जवळजवळ वर्ष झालं. कोरोनानं आपल्याला जखडून ठेवलं आहे. लक्ष्मणानं सीतेसाठी एक रेषा आखून ती न ओलांडण्याचा आदेशच दिला होता. पण कस्तुरीमृगाच्या मोहजालात अडकून तिनं ती ओलांडली आणि पुढं सगळं रामायण घडलं. आजही आपल्या घराचा उंबरठा ही अशीच आधुनिक लक्ष्मणरेषा झाली आहे. ती विनाकारण ओलांडू नका अशी सरकारची कळकळीची विनंती धुडकावून लावून आपण ती ओलांडण्याचा प्रमाद केलाच तर कोरोनासूर आपल्याला ‘हे राम’ म्हणायला लावेल.

तरीही वर्षभरापूर्वी आपण आपल्या अनेक व्यवहारांसाठी, रोजच्या गरजा भागवण्यासाठी उंबरठे ओलांडतच होतो. त्याशिवाय जगणंच अशक्य झालं असतं. आज त्या लक्ष्मणरेषेचा अडथळा आल्यानंतर जगायचं कसं, असा सवाल साहजिकच खडा झाला. पण अल्लादिनला सापडला होता तसाच एक जादुई दिवा आपल्या मदतीला धावून आला. त्या दिव्यातून निघालेल्या जिनचं आजचं नाव आहे इंटरनेट. 

या इंटरनेटनं काय केलं नाही? त्यानं आपली चूल पेटती ठेवली. आपली थाळी रिकामी राहणार नाही, याची व्यवस्था केली. किराणा म्हणू नका, भाजीपाला म्हणू नका, मधल्या वेळचं खाणं म्हणू नका, सारं काही त्या लक्ष्मणरेषेच्या आतच पोचेल अशी तजवीज केली. त्याची किंमत चुकविण्यासाठी पैसे हवेत? त्याचीही सोय केली.

कामासाठी लळतलोंबत वेळेवर ऑफिसात पोचण्याची कसरत करणं बाद केलं. उशिरा पोचलो म्हणून साहेबाची बोलणी खायला नकोत की संध्याकाळी घरी परतायला उशीर झाला म्हणून बायकामुलं रुसायला नकोत. घरच्या घरी आरामात बसून सगळं काम पार पाडणं शक्य केलं. बाळगोपाळांसाठी तर शाळाच घरात आणून ठेवली. 

पण समजा ही इंटरनेट नावाची जादूची कांडी कायमची नाहीशीच झाली तर! नाही, नाही, असे घाबरेघुबरे होऊ नका. तसं काही होणार नाहीय. पण कल्पना करा इंटरनेटच नसतं तर काय केलं असतं? तसंच पाहिलं तर इंटरनेट नेहमीच होतं असं नाही. अवघ्या वीस पंचवीस वर्षांपूर्वी ते जवळजवळ नव्हतंच. १९९५मध्ये जगातल्या केवळ एक टक्का लोकांकडे इंटरनेट होतं. आज पंचवीस वर्षांनंतर जगभरातली साडेतीन अब्ज मंडळी इंटरनेटचा वापर करत आहेत. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के. तेव्हा ते बंद पडलं किंवा नाहीसंच झालं तर काय गोंधळ उडेल याचा विचार करा. 

ख्यातनाम अशा स्टॅनफर्ड विद्यापीठातल्या प्राध्यापक जेफ हॅनकॉकना त्याचा अनुभवच आला. त्यांनी एकदा आपल्या विद्यार्थ्यांना एक असाईनमेन्ट दिली. तब्बल अठ्ठेचाळीस तास इंटरनेटपासून  

दूर राहायचं, त्याचा कशासाठीही वापर करायचा नाही आणि त्यापायी त्यांना आलेले अनुभव शब्दबद्ध करायचे. पण बघतात तर काय सारा वर्गच त्यांच्याविरुद्ध बंड पुकारून उभा राहिला. एक वेळ निर्जळी उपोषण करू पण हे जमणार नाही, असं त्यांनी निक्षून सांगितलं. आणि प्राध्यापकांनी हट्टच धरला तर त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करू, अशी धमकीही द्यायला विद्यार्थी विसरले नाहीत.

त्या विद्यार्थ्यांना जे भयाण दिव्य दिसलं तेच आपल्यालाही आज दिसेल. अरे साधं मुंबईहून पुण्याला किंवा नाशिकला जायचं तर रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी स्टेशनवर जाऊन लांबलचक रांगेत तासन् तास उभं राहावं लागेल. सिनेमाचं तिकीटही थिएटरच्या खिडकीवरच काढावं लागेल. आणि रांगेमध्ये तासभर काढल्यानंतर खिडकीजवळ पोचताच ‘हाऊस फुल’चा बोर्ड पाहावा लागेल. समजा तुमच्या मित्रानं तुम्हाला जेवायला बोलावलंय तर त्याच्या घरी कसं जायचं याचा सगळा पत्ता व्यवस्थित माहिती असायला हवा. कोणतंही जीपीएस तुमच्या मदतीला येणार नाही. 

नुसती कल्पना करताच घाम फुटला ना! तेही करावं लागलं तर करूच असं म्हणाल तर सध्याच्या लक्ष्मणरेषेच्या काळात तेही शक्य नाही. पण आज ना उद्या हा करोना जाईलच. आता तर लसही लवकरच मिळण्याची आशा आहे. तेव्हा लक्ष्मणरेषा पुसट होईल. तरीही इंटरनेटची सवय झालीय ती सुटेल का?

अर्थात काही मंडळी म्हणतात बरंच होईल हे नतद्रष्ट इंटरनेट गायब झालं तर. मुलांना, तरुणांना त्याचं व्यसनच लागल्यासारखं झालंय. कोरोनाची लक्ष्मणरेषा नसतानाही ती घरकोंबडीच झाली होती. सतत हातातल्या चिमुकल्या पडद्यावर कोणता तरी भयानक व्हिडिओ गेम खेळत होती. फेसबुक, इन्स्टाग्रामला चिकटून होती. ते नाही तर सतत ट्विवट्विवाट. खूळ नुसतं! इंटरनेट नसल्यावर कसे बाहेर पडून मोकळ्या हवेत मैदानी खेळ खेळतील. मग सर्वबाद ३६ची अवकळा येणार नाही. मित्रमैत्रिणींना, नातेवाइकांना उराउरी भेटतील. गप्पागोष्टी करतील. विचारांची देवाणघेवाण होईल. नाहीतरी माणूस हा कळप करून राहणारा आहे. चारचौघात मिसळल्याशिवाय त्याची मानसिक वाढ पक्की होत नाही. आभासी जगातली भेट म्हणजे अश्वत्थाम्याला पाजलेलं दूध. नुसतंच पाणी मिसळलेलं पीठ. 

यावर कोणी म्हणेल, कशाला हवं भेटायला! तिथं काही प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण होत नाही. नुसत्याच बाजारगप्पा होतात. नुसत्याच सांगोवांगीच्या गोष्टी होतात. खरंय. पण गॉसिप काही वाईट नाही, असंच रॉबिन डनबार सांगतील. समाजजीवनाला स्थैर्य लाभायचं असेल तर या गॉसिपचीच गरज असते. एवढंच सांगून ते थांबलेले नाहीत. तर आपली भाषा विकसित झाली तिलाही हे गॉसिपच कारणीभूत झालं हे त्यांनी सिद्धच  करून दाखवलंय. 

हे इंटरनेट चोवीस तास आणि तिन्ही त्रिकाळ चालू असल्यामुळं झोपेचंही खोबरं होतंय. कारण तुमची मुलगी असते अमेरिकेत. ती तिच्या दिवसाकाठी तुम्हाला त्या झूम की फूमवरून बोलावते. पण इथं तुमची झोपेची वेळ झालेली असते. कसेबसे डोळे उघडे ठेवण्यासाठी तुम्ही धडपड करता. आणि तिच्याबरोबरच्या त्या गप्पागोष्टी झाल्यावर परत काही डोळ्याला डोळा लागत नाही. कशाला हवंय ते इंटरनेट! नसलेलंच बरं!

ज्यांना आयुष्याच्या संध्याकाळात नवीन बदल आत्मसात करणं जमत नाही अशीच मंडळी असा विचार करताहेत असं नाही. आजच वर्क फ्रॉम होम करणारेही तसंच म्हणताहेत. कारण ते ऑफिसच्या वातावरणाला मुकताहेत. तिथं सहकार्‍यांबरोबर विचारांची देवाणघेवाण केल्यानं, हास्यविनोद केल्यानं कार्यक्षमता वाढते असाच त्यांचा अनुभव आहे. मुलंही शाळेत सवंगड्यांबरोबर खेळणं, त्यांच्याकडून काही नवीन शिकणं, वेगळ्या अनुभवांची माहिती घेणं करू शकत नाहीएत. 

तेव्हा इंटरनेट नसल्याचे सर्वच तोटे आहेत असं नाही. काही फायदेही जरूर आहेत. तरीही इंटरनेटचा एकंदरीत देशाच्या विकासाला जो हातभार लागतोय, अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जो उपयोग होतोय, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तरीही आपण इंटरनेटचं गुलाम बनून चालणार नाही, उलट त्यालाच गुलामाच्या पातळीवर ठेवायला हवं. शेवटी काय, इंटरनेट एक सुविधा आहे. ते चांगलंही नाही आणि वाईटही नाही. त्याचा वापर आपण कसा करतो यावर त्याचं बरेवाईटपण ठरणार आहे. खरं ना!

संबंधित बातम्या