जर लघुग्रह पृथ्वीवर कोसळला तर...!

डॉ. बाळ फोंडके
रविवार, 31 जानेवारी 2021

‘जर तर’च्या गोष्टी

चिंतू आमचा म्हणजे चिंतातूर जंतू. परवा असाच सकाळचं वर्तमानपत्र फडकावत आला. घाबराघुबरा झालेला. क्षणभर तोंडून शब्दच फुटत नव्हता. पाणी प्यायला दिलं. थोडासा सावरल्यावर विचारलं की काय झालंय तर तेच वर्तमानपत्र माझ्या डोळ्यासमोर नाचवत म्हणाला, ‘तू हे वाचलं नाहीस?’

मी वाकून पाहिलं तर बातमी होती की एक मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार आहे. हे प्रसारमाध्यमवालेसुद्धा काहीवेळा थोडंसं तिखट मीठ वापरूनच बातमी देतात. तो लघुग्रह म्हणजेच अॅस्टरॉईड खरोखरच धरतीवर येऊन पडणार नव्हता, तर पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या कक्षेवर आदळणार होता. पृथ्वीच्या जवळून जाणार होता. जवळून म्हणजे किती? तर एकवीस लाख किलोमीटर अंतरावरून. त्यापायी काही नुकसान होण्याची शक्यता नव्हती. 

पण समजा चिंतूला वाटणारी भीती खरी ठरली तर? म्हणजे खरोखरीच असा एखादा लघुग्रह धरतीवर कोसळला तर? तर नेमकं काय होईल हे त्या लघुग्रहाचा आकार किती आहे आणि तो किती उंचीवरून पडणार आहे यावर अवलंबून राहील. कारण असे लघुग्रह, अशनी नेहमीच धरतीवर कोसळत असतात. उल्कापात तर दर महिन्याला होत असतो. आणि तो गोल कितीही मोठा असला तरी पृथ्वीच्या वातावरणातून येत असताना होणाऱ्या घर्षणापायी जळत जातो, त्याचा आकार आक्रसत जातो. आजवरच्या अशा किमान तीन घटना आपल्याला माहिती आहेतच. पहिली ज्यातून चंद्राचा जन्म झाला ती. पृथ्वीचाही जन्म होण्याच्या त्या काळात अशाच एका लघुग्रहाशी झालेल्या टक्करीतून धरतीचा एक टवका उडाला आणि तोच चंद्र म्हणून आपल्या भोवती घिरट्या घालत राहिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार सरोवराचा उगमही अशाच घटनेतून झाला आहे. आणि तिसरी घटना सर्वात महत्त्वाची, साडेसहा कोटी वर्षांपूर्वी घडलेली. त्यावेळी चांगलाच मोठा लघुग्रह येऊन आदळला होता. त्यापायी जो धुरळा आणि वाफ आकाशात उडाली त्यामुळं सूर्यच झाकोळला गेला. त्याचे किरण जमिनीपर्यंत पोचूच शकले नाहीत. उष्णता न मिळाल्यानं तापमान चांगलंच घसरलं. वातावरणातून ऑक्सिजन मिळणंही अवघड झालं. त्यापायीच मग त्यावेळी संपूर्ण धरतीवर आपलं साम्राज्य वसवलेल्या डायनोसॉरचा वंशनाश झाला. इतर सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीला वाव मिळाला. त्याचीच परिणती म्हणजे आपलं, मानवजातीचं, आधिपत्य धरतीवर प्रस्थापित झालं.

तेव्हा लघुग्रह किती मोठा आहे, म्हणजेच त्याचा जो भाग खरोखरच जमिनीवर येऊन आदळणार आहे त्याचं आकारमान किती आहे यावर नेमका काय उत्पात घडणार आहे ते अवलंबून असेल. तरीही या भरकटलेल्या लघुग्रहांकडे प्रचंड ऊर्जा असते. कारण त्यांचा भन्नाट वेग. तो जवळजवळ ताशी पन्नास हजार किलोमीटर एवढा असू शकतो. 

आता विचार करा की एक बस आहे. ती नुसतीच तुम्हाला येऊन टेकली तर काय होईल? तुमचा पारा चढेल. कदाचित शरीराच्या ज्या भागाला ती टेकली आहे तो काही वेळ हुळहुळेल. त्यापेक्षा काही फारशी मोठी इजा होणार नाही. पण तीच बस जर ताशी पन्नास किलोमीटरच्या वेगानं धावत असेल तर तुम्ही उडवले जाल, उंचावरून जमिनीवर येऊन आदळाल, तुमची हाडं मोडतील, डोक्याला इजा झाली तर ती गंभीर असण्याची शक्यता आहे. 

थोडक्यात काय तर जिच्याशी टक्कर होणार आहे त्या चीजेच्या आकारमानापेक्षाही तिच्या ठायी असलेल्या वेगाची नुकसान करण्याची क्षमता किती तरी पटीनं जास्ती असते. तर हा आयफेल टॉवरच्या उंचीचा जो लघुग्रह २०२८ मध्ये आपल्या दिशेनं झेपावणार आहे त्याच्याकडे ताशी पन्नास हजार किलोमीटर इतका वेग असेल तर त्याच्या अंगी असणारी ऊर्जा एक दशलक्ष मेगाटन बॉम्बएवढी असेल. पृथ्वीवरच्या यच्चयावत सजीवसृष्टीचा विनाश करण्याची क्षमता त्याच्या ठायी असेल. 

आता एक दशलक्ष मेगाटन म्हणजे नेमकं किती हे आपल्याला सहजासहजी समजणार नाही. तेव्हा जरा खालच्या पातळीवरून सुरुवात करू. समजा तो लघुग्रह एखाद्या टुमदार घराएवढाच आहे. पण तोही ताशी पन्नास हजार किलोमीटरच्या वेगानं प्रवास करत आहे. तर मग त्याची विध्वंसक्षमता वीस किलोटन शक्तीच्या बॉम्बएवढीच असेल. म्हणजे हिरोशिमावर टाकल्या गेलेल्या बॉम्बएवढी. पण त्यानंही काय हाहाकार माजवला होता हे आपल्याला इतिहास सांगतोच आहे. तेव्हा एक दशलक्ष मेगाटन म्हणजे अशा एक कोटी बॉम्बचा वर्षाव एकसाथ होण्यासारखंच होईल. त्यामुळं काय अनर्थ होईल याची कल्पना करा. कदाचित तुमची कल्पनाशक्तीही बधिर झाल्यासारखी होईल. तेव्हा चिंतूची चिंता तशी वाजवीच आहे असं तुम्ही म्हणाल. तरीही त्याची भीती प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता किती याचाही विचार करायला हवा. कारण या आपल्या दिशेनं झेपावणाऱ्या लघुग्रहाच्या प्रवासासंबंधी आजवर जी माहिती मिळाली आहे त्यावरून गणित करता तो फार फार तर काही लाख किलोमीटर अंतरावरूनच निघून जाईल. तो आपलं काही लक्षणीय नुकसान करण्याची शक्यता नगण्यच आहे. तरीही हे असे मोकाट सुटलेले लघुग्रह म्हणजे उधळलेल्या सांडासारखे असतात. केव्हा ते बिथरतील आणि आपला मोहरा वळवतील याचा नेम सांगता येत नाही. तेव्हा त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागेल. चक्रीवादळाचा मागोवा आपण कसा घेत राहतो तसंच. त्याहीपेक्षा अधिक सजगतेनं. ते करण्याची आपली क्षमता आहे. त्यामुळं त्यानं कदाचित आपला मार्ग बदलला आणि तो पृथ्वीच्या अधिक जवळ येण्याची शक्यता दिसली तर आपल्याला सावधगिरीचा इशारा देता येईल. 

अशी काही अस्मानी सुलतानी येण्याची शक्यता दिसलीच तर त्या लघुग्रहावर एखाद्या अग्निबाणाचा किंवा क्षेपणास्त्राचा मारा करून त्याला दुसरीकडेच जायला प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करता येतील. त्या दृष्टीनं जगभरचे अंतरिक्ष वैज्ञानिक आतापासूनच काही प्रकल्प राबवत आहेत. तो लघुग्रह आपल्या टप्प्यात येईपर्यंत त्या प्रकल्पांची सिद्धता होऊन या प्रसंगाचा समर्थपणे सामना करण्याची उमेद आपण बाळगू शकतो. चिंतूची चिंता तशी योग्य असली तरी त्यामुळं भयभीत होऊन हातपाय गाळून बसण्याचं कारण नाही. तो लघुग्रह असेल शक्तिमान, पण ‘हम भी कुछ कम नही’, हेही लक्षात ठेवा.

संबंधित बातम्या