जर प्रकाशकिरणांवर मी आरूढ झालो तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 15 मार्च 2021

‘जर तर’च्या गोष्टी

आइन्स्टाईननं नकळत आपल्याला दिलेला संदेश आपल्याला कळण्यासारखाच आहे. प्रश्न विचारत चला. जगावेगळे असले तरीही. त्यापायी कोणी तुम्हाला चक्रम म्हटलं, येडचाप म्हटलं तरी त्याकडे दुर्लक्ष करा. इतरांनी न घेवो, तुम्हीच ते गांभीर्यानं घेत चला; थॉट एक्सपरिमेन्ट करा.

उद्या चौदा मार्च. विसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेतील ख्यातनाम ‘टाइम’ मॅगेझिननं घेतलेल्या सर्वेक्षणात त्या शतकावर अनमोल ठसा उमटविणारा महामानव म्हणून जगभरातल्या नागरिकांनी ज्याची एकमतानं निवड केली त्या अल्बर्ट आइन्स्टाईनचा जन्मदिन. आइन्स्टाईनला कोणतीही रूढ चाकोरी मान्य नव्हतीच. त्यामुळं अगदी शालेय वयापासून त्याला चित्रविचित्र शंका सतावायच्याच. प्रश्न पडायचे. आणि त्यांची समाधानकारक उत्तरं देणं कोणालाही शक्य नसल्यामुळं त्याची गणती बंडखोर म्हणून केली जायची. नाहीतर चक्रम म्हणून त्याला खड्यासाऱखं वेगळं काढलं जायचं. साहजिकच ‘एकला चालो रे’चं धोरण स्वीकारत तो स्वतःच त्या प्रश्नांचा पाठपुरावा करत राहायचा. 

‘जर प्रकाशकिरणांवर मी आरूढ झालो तर!’, हा असाच एक प्रश्न. प्रकाशकिरणांचा वेग तुम्हाआम्हाला अबब करत तोंडात बोट घालायला लावणाराच. सेकंदाला तीन लाख किलोमीटर. भन्नाट वेग. तो वेगच या विश्वातील अंतिम वेगमर्यादा आहे हे त्यावेळी तरी माहिती नव्हते. आइन्स्टाईननं स्वतःच नंतर त्याची घोषणा केली. तर त्या वेगानं मी प्रवास केला तर काय होईल, असाच त्याच्या प्रश्नाचा रोख होता. 

भलेभले विद्वानही त्याचं उत्तर देऊ शकत नव्हते. म्हणून मग आइन्स्टाईननं स्वतःचीच वेगळी वाट चोखाळली. त्यानं मनातल्या मनात, कल्पनेत म्हणा हवं तर, प्रयोग करायला सुरुवात केली. वैज्ञानिक पद्धती प्रयोगनिष्ठच आहे. कोणत्याही समस्येची उकल करायची तर त्यासाठी सुनियोजित प्रयोग करायचे. प्रामाणिकपणे, कोणतीही लांडीलबाडी न करता मिळालेली निरीक्षणं नोंदवायची, त्यांचा एकत्रित तर्कसंगत विचार करत निष्कर्ष काढायचा. तेच त्या समस्येचं उत्तर. भलेही ते अपेक्षेप्रमाणे न आलेलं असो. ही सर्वमान्य झालेली रूढ वैज्ञानिक पद्धत.

तिची कास तर सोडायची नाही. पण आइन्स्टाईनच्या समस्याच अशा असत की प्रयोगशाळेत जाऊन त्यांच्या संबंधीचे प्रयोग करणं अशक्यच. तरीही आइन्स्टाईन डगमगणारा नव्हताच. त्यानं त्यासाठी अनोखी शक्कल लढवली. मनातल्या मनात गणित करत प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांना त्यानं साजेसं नावही दिलं. ‘थॉट एक्सपरिमेन्ट’. ते गाजले. सैद्धान्तिक भौतिकशास्त्र ही नवी ज्ञानशाखा उदयाला आली ती या थॉट एक्सपरिमेन्टचं बोट धरूनच. आपल्या या विक्षिप्त वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आइन्स्टाईननं केलेल्या थॉट एक्सपरिमेन्टची परिणती झाली त्या आता जगविख्यात झालेल्या सर्वात लहान समीकरणामध्ये. E = mC2. 

वामनानं तीन पावलांमध्ये विश्व पादाक्रांत केल्याची कहाणी आपण ऐकतो. तीन पावलांच्या या समीकरणानं विश्वाची पाळंमुळंच हादरून टाकली. ऊर्जा आणि वस्तुमान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हेच त्या समीकरणाचं मर्म आहे. म्हणूनच तर ऊर्जेचं वस्तुमानात आणि वस्तुमानाचं ऊर्जेत अवस्थांतर होऊ शकतं, हा त्याचा मथितार्थ आहे. त्याची प्रचिती मिळवून दिली ती अणुऊर्जेनं. इवल्याशा अणूच्या वस्तुमानाचं प्रचंड ऊर्जेत रूपांतर होऊ शकतं हे प्रत्यक्ष प्रयोगानंच सिद्ध करून दाखवलं गेलं. त्याच अणुऊर्जेमुळं आज जगभरातल्या अनेक घरांमध्ये वीज खेळते आहे. फ्रान्समध्ये तर एकूण वीजनिर्मितीच्या तब्बल ऐंशी टक्के हिस्सा अणुऊर्जेचा आहे. इतर देशांमध्येही अणुवीजनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. अगदी आपल्या मायदेशीही. आणि नुसतीच वीज नाही, तर आपल्या जीवनाची इतर कितीतरी अंग अणुऊर्जेपायी अधिक समृद्ध झाली आहेत. रोगनिदान, रोगोपचार, शेती, वैद्यकीय उपकरणांचं जंतुनाशकत्व, पाण्याच्या पाईपची किंवा इंटरनेटच्या केबलची गळती नेमकी कुठे आहे हे शोधून काढण्यासाठी, अनेक क्षेत्रांमध्ये अणुऊर्जा सक्रिय सहभाग देत आहे. 

अणुऊर्जा शब्द जरी कानावर पडला तरी प्रत्येकाला हिरोशिमाचीच आठवण होते. खरं आहे. त्या प्रचंड ऊर्जेमुळं विध्वंस होऊ शकतो. पण तो दोष काय त्या ऊर्जेचा किंवा तिला साकार करणाऱ्या आइन्स्टाईनच्या त्या इटुकल्या समीकरणाचा थोडाच आहे! अणूच्या वस्तुमानातून उदय पावलेल्या ऊर्जेचा वापर विधायक कामासाठी करायचा की विध्वंसक, हे वापरकर्ता ठरवतो, ती ऊर्जा नाही. हातातली सुरी भाजी चिरण्यासाठी चालवायची की गळा कापण्यासाठी, हे सुरी ठरवत नाही. ती धरणारा हातच तो निर्णय घेतो. जगातला पहिला शोध म्हणून ज्याची ख्याती झाली आहे त्या अग्नीला अन्न शिजवण्याची आज्ञा द्यायची की सुनेला जाळण्याची, याचा निर्णय अग्नीचा नसतो. वस्तुमानाचं अवस्थांतर जसं ऊर्जेत होतं तसंच ऊर्जेचं अवस्थांतर वस्तुमानात व्हायलाही प्रत्यवाय नसावा. त्यातूनच मग या विश्वनिर्मितीविषयीचं एक गूढ उकलायला मदत झाली. विश्वाचा जन्म एका महाविस्फोटातून झाला हे आता जवळजवळ सर्वांनीच मान्य केलं आहे. तरीही एक सवाल हॅम्लेटच्या बापाच्या भुतासारखा छळत होताच. कारण त्या महाविस्फोटातून रोंरावत बाहेर पडली ती निखळ ऊर्जाच. निर्गुण, निराकार ऊर्जा. पण आज आपल्याला दिसतं ते ठोस वस्तुमान असलेलं, ठसठशीत आकार, घाट असलेलं विश्व. मग त्या निर्गुण, निराकार ऊर्जेतून हे सगुण विश्व कसं साकार झालं? आइन्स्टाईनचं ते समीकरण त्या सवालाचा परखड जबाब देतं. 

विश्वाविषयीच्या, वास्तवाविषयीच्या आपल्या संकल्पनाच पार बदलून टाकणारं ते समीकरण मुळात पुढं आलं ते आइन्स्टाईननं स्वतःलाच विचारलेल्या त्या वरवर भंगड वाटणाऱ्या प्रश्नातून. म्हणे प्रकाशकिरणांवर आरूढ होत दौडत जायचंय! खूळ भलतंच! पण तसं नाही. तो प्रश्न गांभीर्यानं घेतला, त्याचा जिद्दीनं आणि तर्कसंगत पाठपुरावा केला म्हणून तर आपल्या, अखिल मानवजातीच्या ज्ञानात अमूल्य भर पडली. चार्ली चॅप्लिन आणि आइन्स्टाईन एकदा एका समारंभात रंगमंचावर आल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. तो ऐकून चॅप्लिन म्हणाला, ‘ते माझा गौरव करताहेत कारण मी काय म्हणतो ते त्यांना समजतं आणि तुझा ते उदोउदो करताहेत कारण तू काय म्हणतोस ते त्यांना कळतच नाही.’ नसेल कळत. पण ज्यांना ते कळतं त्यांनी ते आपल्याला समजावून सांगण्याचे अथक प्रयत्न केले आहेत. तरीही मुद्दा वेगळाच आहे. कारण आइन्स्टाईननं नकळत आपल्याला दिलेला संदेश मात्र आपल्याला कळण्यासारखाच आहे. प्रश्न विचारत चला. असे जगावेगळे असले तरीही. त्यापायी कोणी तुम्हाला चक्रम म्हटलं, येडचाप म्हटलं तरी त्याकडे दुर्लक्ष करा. इतरांनी न घेवो, तुम्हीच ते गांभीर्यानं घेत चला, थॉट एक्सपरिमेन्ट करा. कोणी सांगावं तुमच्यातही एखादा आइन्स्टाईन 
दडलेला असेल. 

संबंधित बातम्या