जर विमानावर वीज कोसळली तर..!

डॉ. बाळ फोंडके
गुरुवार, 25 मार्च 2021

‘जर तर’च्या गोष्टी

ज्याचं अंगच मुळी विद्युतवाहक धातूचं बनलेलं आहे त्या विमानावर वीज कोसळली तर काय अवस्था होत असेल? पण वास्तवात केवळ एक घटना वगळता आजवर वीज कोसळल्यानं विमानाच्या उड्डाणात काही अडथळा आलेला नाही. त्या पायी काही गंभीर समस्या उद््भवणं तर दूरच राहिलं.

धुवांधार पाऊस कोसळत असतो. सरीवर सरी वेगानं येत धरतीवर तांडव नृत्य  करत असतात. साथीला ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट असतोच. समोरचं काही नीटसं दिसतच नाही. अशा परिस्थितीत रस्त्यावरून गाडी चालवणंही मुश्कील होऊन जातं. मग आकाशातून अगडबंब विमानांचं सारथ्य ते वैमानिक कसे करत असतील, याचं नेहमीच आश्चर्य वाटत राहतं. त्यातही एक सवाल तर भयभीत करणाराच असतो. जर या विमानावर वीज कोसळली तर! एखाद्या झाडावर ती कोसळली तर त्याचा क्षणार्धात कोळसा होत असल्याचं आपण पाहिलेलं असतं. मग ज्याचं अंगच मुळी विद्युतवाहक धातूचं बनलेलं आहे त्या विमानाची काय अवस्था होत असेल हा, विचारही थरकाप उडवून जातो. 

हा काही त्या झोडपणाऱ्या पावसासारखा वेडावाकडा विचार नाही. वर्षभरात किमान एकदा तरी प्रत्येक विमानाला विजेचा धक्का बसत असतो, असं अमेरिकेत केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. ज्या वेळी असा गडगडाटी पाऊस पडत असतो त्या वेळी ढगांवर विद्युतभार जमा होत असतो. त्या परिस्थितीत जेव्हा एखादं विमान त्यातून प्रवास करत असतं तेव्हा त्याची त्या जमा झालेल्या विद्युतभाराशी विक्रिया होऊन वीज उदयाला येत असते. म्हणजे एका अर्थी विमानाचं त्या वेळी उड्डाण करणं हेच मुळी विजेला आमंत्रण देत असतं. विमानाच्या अंगावर धारदार कडा असलेले जे भाग असतात तिथं प्रामुख्यानं विजेचा लोळ उत्पन्न होतो. पण तो विरुद्ध दिशेनं निघून जातो. आजवर फक्त एकदाच वीज कोसळल्यामुळं विमानाचा नाश झाला आहे. १९६७ साली त्या विमानावर वीज कोसळल्यामुळं इंधनाच्या टाकीत ठिणगी उडाली आणि त्यातून जो भडका उडाला, स्फोट झाला त्यापायी त्या विमानाची राख झाली. पण ती एक घटना सोडल्यास आजवर वीज कोसळल्यानं विमानाच्या उड्डाणात काही अडथळा आलेला नाही. त्या पायी काही गंभीर समस्या उद््भवणं तर दूरच राहिलं. 

असं कसं होतं, असा सवाल आपल्या मनात आल्यास नवल नाही. कारण विमानाचा सांगाडा अॅल्युमिनियमचा बनलेला असल्यामुळं तर विजेच्या कचाट्यातून विमानाची कशी सुटका होते हे कोडं कोणालाही पडेल. अॅल्युमिनियम हे चांगलं विद्युतवाहक आहे. म्हणून तर आपल्या घरातल्या विजेच्या प्रवाहासाठी त्याच धातूच्या तारांचा वापर केला जातो. तरीही तेच अॅल्युमिनियम आणि त्याची विद्युतवाहकता विमानाचं संरक्षण करतात. जेव्हा वीज त्या विमानावर पडते तेव्हा ती सहसा त्याच्या नाकाचं किंवा पंखाचं टोक अशा अणकुचीदार भागाकडे आकर्षित होते. त्या पायी तयार झालेला विद्युतप्रवाह मग विमानाच्या त्या बाहेरच्या आवरणातून, त्याची कातडीच म्हणा ना, प्रवास करत तशाच एखाद्या दुसऱ्या भागापर्यंत मजल मारतो. तिथून मग तो बाहेर निघून जातो. इतर भागाकडे त्याची नजरच वळत नाही. आतला भाग म्हणजे केबिन तर काहीच झालं नाही अशा थाटात राहते. प्रवाशांना काहीच जाणवत नाही. छपरावर लावलेला लाईटनिंग कंडक्टर वीज स्वतःकडे ओढून घेऊन बाकीच्या इमारतीला तिच्या धक्क्यापासून वाचवतो. नेमकी तीच कामगिरी विमानाची ही बाहेरची अॅल्युमिनियम किंवा त्याच्या सारखीच विद्युतवाहक असलेली कातडी बजावते. खिडकीतून बाहेर बघत असलेल्या प्रवाशाला कदाचित पंखाच्या टोकापाशी उठलेला विजेचा लोळ दिसेल. त्या वेळी झालेला गडगडाटही काही जणांना ऐकू येईल. पण त्या पलीकडे विमानावर वीज कोसळल्याची जाणीवच प्रवाशांना होणार नाही. कानांना हेडफोन लावून बसलेल्या वैमानिकांना काही वेळा हा मोठ्यानं झालेला आवाज ऐकू येतो. केबिनमधले दिवे मिणमिणल्यासारखे होतात. पण क्षणभरच. परत एकदा सगळं काही सामान्य स्थितीला पोचतं. 

विमानाच्या सुरक्षित प्रवासासाठी त्याचा जमिनीवरच्या नियंत्रकाशी सतत इलेक्ट्रॉनिक संपर्क असण्याची गरज असते. या संदेशवहनात काही क्षण अडथळा निर्माण होतो. तसंच विमानातील सर्व यंत्रणा आपलं नेमून दिलेलं काम इमानेइतबारे पार पाडत आहेत, याचीही माहिती सतत वैमानिकाला मिळणं गरजेचं असतं. बाहेरच्या वातावरणाविषयीची, तापमान, हवेचा दाब, वाऱ्यांची दिशा आणि वेग वगैरेची माहितीही अशाच प्रकारे मिळवण्याची सोय केलेली असते. ही माहिती पुरवण्यासाठी अनेक छोटे मोठे कॉम्प्युटर अथक काम करत असतात. त्यांच्या कामात कोणताही व्यत्यय येणार नाही यासाठी त्यांचं विजेच्या लोळापासून संरक्षण करण्याची चोख व्यवस्था अत्याधुनिक प्रवासी विमानांमध्ये केलेली असते.

विमानाचा सर्वात नाजूक भाग म्हणजे त्याची इंधनाची टाकी. ग्रीक पुराणात

अकिलसची कथा आहे. जन्मतःच त्याची आई त्याला एका जीवनदायी नदीत बुचकळून काढते. त्यामुळं त्याच्या सर्व अंगावर कवचकुंडलं चढतात. पण बुचकळण्यासाठी आईनं त्याची खोट धरलेली असते. तीच नेमकी त्या नदीच्या पाण्यात बुडायची राहून जाते. तेच त्याचं मर्मस्थान बनतं. तशीच ही इंधनाची टाकी. तिच्यात एक चुटपुटती ठिणगी जरी पडली तरी सारं काही भस्मसात व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळं तिला विजेच्या धक्क्यापासून सुरक्षित राखण्यासाठी तिच्यावरची अॅल्युमिनियमची कातडी दुप्पट तिप्पट जाड केलेली असते. ती भेदून वीज आत प्रवेश करू शकत नाही. शिवाय टाकीची दारं, वरची बुचं वगैरे खास वीजरोधक पदार्थाची बनवण्याची दक्षता घेतली जाते. 

कॅप्टन जॉन कॉक्स हे अमेरिकेतील एक वैमानिक. आजवर अनेकदा ते सारथ्य करत असलेल्या विमानांवर वीज कोसळलेली आहे. त्यांनी आपले अनुभव सांगितलेले आहेत. ‘जिथं विजेचा प्रवेश झाला आणि जिथून ती निघून गेली त्या तिथं पुसटशी जळाल्याची खूण राहण्यापलीकडे इतर काही नुकसान झाल्याचं मला कधीच दिसलेलं नाही. मी तर विजेच्या त्या हल्ल्यातून बचावलो आहेच पण माझ्या प्रवाशांच्या केसालाही धक्का लागलेला नाही. आकाशात मी काय किंवा प्रवासी काय अधिक सुरक्षित असतो. जेव्हा विमान जमिनीवर उतरलेलं असतं त्या वेळी तर वीज कोसळली तर विमानाच्या बाहेर आजूबाजूला जी मंडळी विमानाची देखभाल करत असतात किंवा सामानाची चढउतार करत असतात त्यांना निश्चितच धोका असतो. पण आजकाल विमानात चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी एरो ब्रिजचा वापर होत असल्यामुळं प्रवासी कोणत्याही क्षणी उघड्यावर नसतात. त्यापायी त्यांचं व्यवस्थित संरक्षण होतं. तेव्हा मुसळधार आणि वादळी पावसातही बिनधास्त विमान प्रवास करा. कोसळणारी वीज तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही याची खात्री बाळगा.’ दस्तुरखुद्द कॅप्टन साहेबांनीच अशी ग्वाही दिल्यावर आपण कशाला घाबरायचं!

संबंधित बातम्या