भुवयाच नसत्या तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 10 मे 2021

‘जर तर’च्या गोष्टी

शब्दाविण संवादू साधण्याचं भुवया एक प्रमुख साधन आहे. जर भुवया नसत्याच तर हे कसं शक्य झालं असतं!

आपल्या शरीरात निरनिराळे अवयव आहेत. या प्रत्येक अवयवाचं काही निश्चित प्रयोजन आहे अशी व्यवस्थाही निसर्गानं  केली आहे. आपल्या जगण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये योगदान देण्यासाठी त्यांच्यावर काही महत्त्वाचं काम सोपवलेलं आहे. याला अपवाद असलाच तर तो अॅपेन्डिक्सचा. त्या अवयवाचं नेमकं काय काम आहे, याचं गूढ अजून तरी उकललेलं नाही. त्यामुळं ते एक अनावश्यक शुक्लकाष्ठ आहे, असाच समज आहे. काही उपयोग होण्याऐवजी काही वेळा त्याचा त्रासच व्हायला लागतो. आणि मग शस्त्रक्रिया करून तो कापून काढण्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि तसं केल्यावर तो अवयव नसल्यानं कोणतीही अडचण संभवत नाही. 

अॅपेन्डिक्सच्याच पंगतीला काही जण भुवयांना बसवू इच्छितात. कशासाठी आहेत या भुवया? जर भुवयाच नसत्या तर काय आभाळ कोसळणार आहे? असाच सवाल ही मंडळी करत आहेत. त्याचं उत्तर मिळवायचं तर मुळात या भुवया आहेतच कशासाठी हे शोधायला हवं. त्यासाठीच वैज्ञानिकांनी आदिमानवाच्या काळातल्या जीवाश्मांचा अभ्यास केला. लक्षावधी वर्षांपूर्वी धरतीवर भटकणाऱ्या, आपल्या त्या पूर्वजांच्या शरीराच्या ठेवणीत आणि आज वावरणाऱ्या‍ तुमच्या आमच्यासारख्या आधुनिक माणसाच्या शरीरयष्टीत अनेक साम्यस्थळं त्यांना दिसून आली. अर्थात काही फरकही होतेच. खास करून डोक्याच्या आणि चेहरेपट्टीच्या रचनेत. त्यातही नाकाची ठेवण, डोळ्याची खोबण, ओठांची महिरप जवळजवळ तशीच्या तशीच असल्याचं त्यांना दिसलं. नाही म्हणायला एक अपवाद होता. तसा तो असायलाच हवा. त्याच्याशिवाय नियम कसा सिद्ध व्हावा!

हा अपवाद मात्र ठळक आहे. त्या आदिमानवाच्या डोळ्यांच्या खोबणीला वरच्या बाजूनं हाडांचा जाडजूड बांध होता. नजर पडताच लक्ष वेधून घेईल असा. उत्क्रांतीच्या ओघात आपल्या चेहऱ्या‍मधून तो गायब झाला आहे. त्या जागी तुलनेनं नाजुकशा भुवयांची स्थापना झाली आहे. साहजिकच त्या हाडांच्या भक्कम वाटणाऱ्या कमानींचं काय प्रयोजन होतं, हा प्रश्न या वैज्ञानिकांच्या मनात फडा काढून उभा राहिला होता. 

अनेक कल्पना पुढं आल्या. सुरुवातीला वाटलं की आपल्या कवटीच्या आकृतिबंधाला आधार देण्याचं काम त्या करतात. पण त्याची पुष्टी करणारा पुरावा मिळाला नाही. काही जण म्हणाले की जबड्याची हालचाल, खास करून खाताना होणारी, नीटसपणे होण्यात त्यांची मदत होते. पण तो सिद्धांतही पचनी पडला नाही. म्हणजे मग अॅपेन्डिक्ससारखं तेही एक निरुपयोगी उपांग होतं की काय? पण मग त्याचं रुपांतर या नाजूक भुवयांमध्ये कशासाठी झालं? 

काहींच्या मते चेहऱ्या‍च्या सौंदर्याला उठाव देण्यासाठी त्यांची योजना केली गेली आहे. म्हणूनच ही मंडळी भुवयांकडे जास्त लक्ष देऊन त्यांचा आकार, जाडी, रंग अधिक खुलून दिसावेत, यासाठी धडपड करत असतात. कोणी त्या कापून कोरीव करतात. कोणी त्यांचा आकार डोळ्यांचा घाट नजरेत भरावा यासाठी प्रयत्न करतात. तसं पाहिलं तर भुवया प्रत्येकाच्या चेहरेपट्टीला अधिक आकर्षक बनवतातच असं नाही. शिवाय ही काही भुवयांची निसर्गदत्त कामगिरी असण्याची शक्यताही तशी कमीच. 

पण आपल्या मनातील विचार आणि भावना मूकपणे व्यक्त करण्यात मात्र भुवया निश्चित उपयोगी ठरतात यात शंका नाही. भुवयांच्या हालचालीतून मनातील राग, कुतूहल यासारख्या भावना प्रकट होत असतात. अलीकडे टीव्हीवर एक जाहिरात दाखवण्यात येते. एक प्रौढ स्त्री आपल्या मुलाबाळांना रेस्टॉरंटमध्ये बोलावून घेते. सर्वजण जमतात. पण ती आणखी कोणाची तरी वाट पाहत असते. ती व्यक्ती दारात दिसताच ती उठून उभी राहते. ती व्यक्ती कोण आहे हे कुटुंबातील सदस्यांना माहिती नसतं. अर्थात मग ती इथं का आली आहे हा प्रश्न सर्वांच्याच मनात उभा राहतो. सगळेजण एकमेकांकडे पाहत राहतात. त्यांच्या भुवया उंचावलेल्या असतात. त्या पाहताच त्यांच्या मनात काय खळबळ माजली आहे, हे समजायला वेळ लागत नाही. भुवया नुसत्याच उंचावल्या जात नाहीत. त्या आक्रसूनही घेतल्या जातात. आश्चर्य वाटत असेल तर एकच भुवई उंचावली जाते. कित्येक वेळा आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे सांगण्यासाठीही भुवया विशिष्ट प्रकारे उंचावण्यात येतात. ‘उच्चभ्रू’ या शब्दप्रयोगाचा उगम तिथंच आहे. शब्दाविण संवादू साधण्याचं भुवया एक प्रमुख साधन आहे हे ध्यानात यायला मग वेळ लागत नाही. जर भुवयाच नसत्या तर हे कसं शक्य झालं असतं!

माणसाच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीमध्ये भुवया कळीची भूमिका बजावतात यात 

शंका नाही. तरीही उत्क्रांतीच्या ओघात शरीराच्या बहुतेक बाह्यांगावरचे केस नष्ट झाल्यानंतर हे इवलंसं शेपूट तरी का राखलं गेलं, याचा वेध मानववंशशास्त्रज्ञ घेत आले आहेत. 

आपल्याला घाम येतो तेव्हा किंवा पावसामध्ये आपण सापडलेले असतो तेव्हा जी ओल कपाळावरून ओघळत डोळ्यांकडे झेपावत असते तिला अटकाव करून तिच्या प्रवाहाची दिशा बदलण्याचं काम भुवया करतात. त्यामुळं डोळ्यांवर येऊन ती ओल दृष्टीला अटकाव करू शकत नाही. डोळे कोरडेच राहतात. भुवयांच्या कमानीसारख्या घाटामुळं त्या पाण्याचा ओघ डोळ्यांच्या कडांकडे वळवला जातो. तिथून तो गालांवरून पुढं जातो. आदिमानवाच्या काळात शिकारीपाठी धावताना त्याला घाम येत असणार. किंवा उघड्यावर पावसात तो भिजत असणार. अशा वेळी त्याच्या डोळ्यांचं त्या पाण्यापासून संरक्षण करण्याची कामगिरी भुवया पार पाडत होत्या. त्यामुळं त्याच्या दृष्यमानात खोट आली तर ती शिकार हातून निसटण्याची किंवा उलटी अंगावर धावून येण्याची भीती होती. नजर साफ राहिल्यास तो धोका टाळणं शक्य होतं. भुवया त्यात मदतच करत होत्या. शिवाय घाम जर डोळ्यात गेला तर त्यातील  क्षारापायी डोळे चुरचुरायला लागतात. तेही टाळलं जातं. 

स्वसंरक्षण ही प्रत्येक सजीवाची आदिम प्रवृत्ती आहे. मानवप्राणीही त्याला अपवाद नाही. त्यासाठी आपली सर्व ज्ञानेंद्रियं सदैव तय्यार असणं आवश्यक असतं. दृष्टी तर सर्वात महत्त्वाचं काम करते. ती काही कारणांनी कमजोर झाली तर वन्य प्राण्यांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा? पावसाच्या माऱ्यापासून सुटका करून घेण्यासाठी निवारा कसा शोधायचा? पर्यावरणाशी जुळवून घेत तगून राहण्यासाठी सजीवाला ज्या उपांगांची किंवा शरीरक्रियांची मदत होते ती बहाल करून त्यांची उपयुक्तता वाढवण्याचंच ध्येय निसर्ग बाळगतो. भुवयाच नसत्या तर त्याची पूर्तता कशी झाली असती!

संबंधित बातम्या