जर वारे वाहिले नाही तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 17 मे 2021

‘जर तर’च्या गोष्टी

गुदमरल्यासारखं होत होतं. उष्म्यानं जिवाची काहिली होत होती. घामाच्या धारा लागल्या होत्या. झाडांची पानं स्तब्ध झाली होती. त्यांच्यामध्ये किंचितही हालचाल होत नव्हती. वारा साफ पडला होता. ही स्थिती जास्त काळ टिकणार नाही अशी आशा मनाच्या एका कोपऱ्यात पल्लवीत होऊन राहिली होती...

समजा वारा वाहण्याचा कायमचाच बंद झाला तर! जर वारे वाहिलेच नाही तर! कोकणातल्या माझ्या मित्रांना त्यामुळं हायसं वाटेल कदाचित. गेल्या वर्षी आलेल्या वादळानं केलेली जखम अजूनही थोडीफार भळभळत असल्याने, वारे वाहिले नाहीत तर आमच्यावर कृपाच होईल, अशी त्यांची भावना झाली तर नवल नाही. पण वादळवारे काही नित्याचे नसतात. अलीकडच्या काळात थोड्याफार नित्यनियमानं त्यांचं आगमन होत राहिलं आहे, तरीही ते मर्यादित काळच राज्य करतात. तेवढ्या काळात ते अनन्वित विध्वंस करतात हे खरं. ते बंद झाले तर हायसं वाटेलही. पण अंगावर रोमांच उमटवणाऱ्या मंद झुळुकीपासून ते मोसमी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांनी कायमची सुटी घेतली तर काय होईल?

मर्ढेकरांची एक कविता आहे. ‘बन बांबूचे पिवळ्या गाते...’ ते बांबूचं बन कसं गातं? तर त्यातून वारा वाहतो. तो त्या बांबूंच्या बासऱ्या बनवतो. त्यांच्यामधून मग सूर निघतात. त्यांचंच गाणं बनतं. वारेच वाहिले नाहीत तर ते गाणं बंद पडेल. पडलं तर पडलं, त्यात काय मोठंय, असंच कोणीही म्हणेल. खरं आहे. तो तसा वारे न वाहण्याचा क्षुल्लक परिणामच ठरेल. पण त्याच कवितेत पुढं म्हटलं आहे ‘जगण्याची पण पुन्हा प्रतिज्ञा’. वारे वाहिले नाहीत तर तीच करावी लागेल. पण तिची पूर्ती होणं मात्र अशक्य होऊन बसेल.

आपल्या देशाचं जीवन कोणत्या एका घटकावर अवलंबून आहे? या प्रश्नाचं एकच उत्तर आहे. मॉन्सूनचा पाऊस. पाण्याला जीवन म्हणतात. कारण पाण्याशिवाय सजीव जगूच शकत नाहीत. हे पाणी आपल्याला मिळतं ते या मॉन्सूनच्या पावसामुळं. त्याच्या जेमतेम चार महिन्याच्या राजवटीत वर्षभराच्या आपल्या पाण्याची बेगमी होते. पिण्याच्या पाण्याची चिंता तर मिटतेच. पण शेतीची गरजही भागवली जाते. हा मॉन्सूनचा पाऊस घेऊन येतं कोण? तर नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे. त्यांचा उगम पार पूर्वेला इस्टर बेटांजवळ होतो. तिथून ते वाहत सुटतात. वाटेत हवेतलं, सागरांच्या माथ्यावरचं यच्चयावत बाष्प घेऊन येतात. ते वारे हिमालयाला जाऊन थडकले की तिथंच अडवले जातात. आपल्या जवळचा पाण्याचा सारा खजिना इथंच रिता करतात. वारेच वाहिले नाहीत तर हे मोसमी वारेही आपल्या आकाशात येणार नाहीत. आणि ते आले नाहीत तर मग पाण्याचा कुंभ आपल्या जमिनीवर रिता कोण करणार! आपली जगण्याची प्रतिज्ञा सफल कशी होणार!

 हलत्या हवेला वारा म्हणतात हे आपण शिशुवर्गातच शिकतो. आपल्या अवती भवती सर्वत्र हवा आहे म्हणून तर सौरमालेतल्या इतर सर्व ग्रहांना वगळून केवळ या एकमेव पृथ्वी नावाच्या ग्रहावर सजीव अवतरले आहेत. त्यांची उत्क्रांती होत आपण म्हणजे मानवप्राणी इथं राज्य गाजवतो आहे. पण ही हवा काही आपणहून हलत नाही. ती हलायची आणि वारे वाहायचे तर काही निकष पूर्ण व्हावे लागतात. सूर्यकिरण धरतीला तापवतात. पण ही प्रक्रिया सगळीकडे एकसारखीच, समान होत नाही. कारण सगळीकडेच जमीन नाही. बराचसा भाग पाण्यानं व्यापलेला आहे. जमीनही सगळीकडे एकसंध सपाट नाही. उंच सखल  आहे. काही ठिकाणी पठार आहे तर काही ठिकाणी पर्वतराजी. त्यामुळं सूर्यकिरण जरी सगळीकडे एकसारखेच येत राहिले तरी ते शोषण्याची प्रक्रिया वेगवेगळी होते. त्यामुळं काही ठिकाणची हवा जास्ती गरम होते तर इतर ठिकाणची तुलनेनं थंडच राहते. गरम हवा प्रसरण पावते, विरळ होते, हलकी होते आणि जमिनीपासून वरवर जाऊ पाहते. थंड हवेची घनता तुलनेनं जास्ती असते. ती खाली बैठक मारू पाहते. त्यामुळं हवेची घुसळण होते. निरनिराळे प्रवाह वाहू लागतात. हेच वाऱ्यांचं रूप घेऊन आपल्याला अनुभवायला मिळतात.

वारे हे असे वाहत राहिल्यामुळंच मग आपलं हवामान तयार होतं. ते तसे वाहिले नसते तर विषुववृत्ताजवळचं हवामान जास्तीच उष्ण झालं असतं. कारण तो भाग तुलनेनं सूर्याच्या जास्ती जवळ जात असल्यामुळं अधिक तापतो. उलट दोन्ही ध्रुवांजवळ कमी उष्णता पोचते आणि ते प्रदेश तुलनेनं थंड राहतात. पण वारे वाहत असल्यामुळं या दोन प्रदेशांवरच्या हवेची आपापसांत घुसळण होऊन विषुववृत्तावरची हवा उष्णतेचा कहर करत नाही. तसंच ध्रुवप्रदेश पार गोठून जात नाही. अधल्यामधल्या भूभागांवरचं हवामानही समतोल राहतं. जगणं सुसह्य करतं. वारे वाहिले नाहीत तर हवामानाचा असा समतोल प्रस्थापित होणार नाही. जगणं दुष्कर करून टाकेल.

उत्तर गोलार्धात ईशान्येकडून विषुववृत्ताच्या दिशेनं काही वारे वाहतात. तसेच दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वाहतात. यांना व्यापारी वारे म्हणतात. कारण ज्या वेळी शिडाच्या जहाजांमधूनच बहुतांश व्यापार होत होता तेव्हा त्या शिडांमध्ये भरून त्या जहाजांना पश्चिमेच्या दिशेनं वेगानं जाण्यास त्या वाऱ्यां‍ची मदत होत होती. आज त्या वाऱ्यांचं तेवढं महत्त्व राहिलेलं, नसलं तरी मध्ययुगात जर ते वाहिले नसते तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि दळणवळण जवळजवळ ठप्पच झालं असतं. ना कोलंबसाला अमेरिका सापडली असती, ना वास्को द गामा कालीकतला उतरला असता. जगाचा इतिहासच बदलून गेला असता.

वाऱ्यांच्या अंगी तशी खूपच ऊर्जा असते. मंद झुळूक आपल्याला थंडावा देते त्यावेळी त्या ऊर्जेची फारशी जाणीव आपल्याला होत नसली तरी जेव्हा हेच वारे रुद्रावतार धारण करत चक्रावर्त बनतात त्यावेळी या ऊर्जेची नको तितकी ओळख पटते. पण वाऱ्यांच्या या गुणधर्माचा वापर करून आपली कामं करून घेण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. पवनचक्क्यांचा वापर विहिरीतून पाणी उपसण्यासाठी, धान्य दळण्यासाठी पूर्वीही केला जात असे. हॉलंडमध्ये तर त्यांचा सर्रास वापर होत होता. आजही होत आहे. तिथं ठायी ठायी पवनचक्क्या आढळतात. कोळशाचा किंवा खनिज तेलाचा वापर करून वीज निर्मिती करताना प्रदूषणाचा विळखा पडत असल्यामुळं आज अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यात सौरऊर्जेबरोबरच पवनऊर्जेलाही प्राधान्य मिळत आहे. या वर्षी पवनऊर्जेच्या माध्यमातून देशात छत्तीस गिगावॉट विजेचं उत्पादन झालं. वारेच वाहिले नाहीत तर 

या उपयुक्त ऊर्जास्त्रोताला आपण गमावून बसू. छे, छे, वादळवारे नकोत पण वारे मात्र वाहिलेच पाहिजेत.

संबंधित बातम्या