जर गंधसंवेदना नाहीशी झाली तर...!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 28 जून 2021

‘जर तर’च्या गोष्टी

काय गंमत आहे बघा. एक इवलासा रोगजंतू, पण त्याचा हल्ला झाल्यानंतरच आपल्याला गंधसंवेदनेचं महत्त्व लक्षात यायला लागलं. ती नाहीशी झाली तर जगणं किती मुश्कील होतं याचा अनुभव आल्यानंतरच आपल्याला या संवेदनेची खरी ओळख पटायला लागली. एरवी आपण या संवेदनेची तशी उपेक्षाच करत आलो आहोत.

कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर सर्वच जण चार भिंतीत अडकून पडले आहेत. त्यामुळंच असेल कदाचित पण समाजमाध्यमांचा वापर भलताच वाढला आहे. त्यातही विरंगुळा म्हणून काही विनोदही एकमेकांना पाठवण्यात येतात. त्यातलाच एक अलीकडे पुष्कळच लोकप्रिय झाला होता. सध्या आंब्याचा मोसम असल्यामुळं एकजण आंबे घ्यायला जातो. एका विक्रेत्याकडचं केशरी फळ पाहून तो त्या आंब्याचा सुगंध जोखण्याचा प्रयत्न करतो. आंब्याचा परिचित सुगंध न आल्यामुळं तो विक्रेत्याला सांगतो, ‘या आंब्याला तर काही वासच नाही.’

विक्रेता त्याला म्हणतो, ‘तुला काहीच वास येत नाही? मग जा, आरटीपीसीआर टेस्ट करून घे.’

यातला विनोदाचा भाग सोडला तरी सध्या आपल्या गंधसंवेदनेबद्दल सगळेच चांगलेच सजग झाले आहेत, यात शंका नाही. तिचा लोप होणं हे कोरोनाची बाधा झाल्याचं लक्षण असू शकतं, हे समजल्यामुळं तर तशी शंका आली तरी कोणीही घायकुतीलाच येतं. 

आपल्या परिसराविषयी आपल्याला माहिती देणाऱ्या पाच संवेदनांपैकी गंधसंवेदना बरीच प्रबळ आहे. इतर संवेदनांसाठी आपल्याला खास प्रयत्न करावे लागतात. चव चाखण्यासाठी त्या पदार्थाचा जिभेशी संपर्क आणावा लागतो. स्पर्शसंवेदनेची स्थितीही तशीच आहे. ध्वनीसंवेदना आणि दृश्यसंवेदना कान आणि डोळे उघडे असले तरच जाणवतात. ते अवयव बंद करून घेता येतात. पण नाक बंद करून आपण जगू शकत नाही. कारण श्वासोच्छ्वास करण्यासाठी तरी नाक उघडंच ठेवावं लागतं. ते चोंदलं तरी जीव मेटाकुटीला येतो. त्यामुळं गंधसंवेदना तशी अनैच्छिक आहे. 

प्राण्यांची गंधसंवेदना माणसापेक्षाही अधिक तीव्र असते. स्वसंरक्षणासाठी तिचा प्राण्यांना फार मोठा उपयोग होतो. वाघ कुठं तरी परिसरात आल्याचा सुगावा त्याच्या वासावरून हरणांना लागतो आणि वेळीच तिथून पळ काढता येतो. कुत्र्यांच्या ठायी असलेल्या याच संवेदनाचा फायदा पोलिस दल गुन्हेगाराचा छडा लावण्यासाठी करताना तर आपण नेहमीच पाहतो. वरवर सामान्य वाटणारी ही गंधसंवेदना तशी जटिल आहे. ती कशी काम करते, याचा उलगडा अजूनही होतो आहे. पण त्या प्रक्रियेचं इंगित शोधून काढल्याबद्दल २००४ सालच्या नोबेल पुरस्काराचा मान रिचर्ड अॅक्सेल आणि लिन्डा बक यांना प्राप्त झाला. कोणत्याही पदार्थाचे रेणू त्याच्यापासून वेगळे होत आसमंतात पसरत असतात. या रेणूंची जेव्हा त्यांना दाद देणाऱ्या आपल्या नाकातल्या ग्राहक रेणूंशी गाठ पडते, तेव्हा ते एकमेकांना गळामिठीच घालतात. त्यापायी मग त्या ग्राहकांशी जोडलेले मज्जारज्जू चाळवले जातात, उत्तेजित होतात आणि त्यांच्यावरून एक विद्युतरासायनिक संदेश मेंदूकडे प्रवास करायला लागतो. गंधसंवेदनेशी निगडित मेंदूतल्या केंद्राकडे तो पोचला की तिथं त्या संदेशाचं वाचन होतं, त्याचा अन्वयार्थ लावला जातो आणि तोच आपल्याला जाणवतो. त्या गंधाची ओळख करून देतो. तशा सोप्या वाटणाऱ्या या अभिक्रियेतूनच आपल्याला असंख्य गंधांची ओळख पटते. सुगंध कोणता आणि दुर्गंध कोणता हे तर अगदीच प्राथमिक स्वरूपाचं काम झालं. पण त्या दोन गटांपैकी प्रत्येक गंधाची वेगवेगळी ओळख करून देण्याचं कामही आपली ही संवेदना करत असते. स्वयंपाकघरात शिजत असलेल्या पदार्थाचा सुगंध दरवळत आपल्या नाकपुड्यांना चाळवून गेला की आपली भूकही उचल खाते. तोंडाला पाणी सुटतं. कारण अन्नग्रहणातही गंध संवेदना महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण कोणत्याही खाद्यपदार्थाचा स्वाद घेतो तो केवळ त्याच्या चवीतून नाही, तर त्याच्या गंधातूनही. आपली भूक प्रज्वलित करण्याचं काम गंध संवेदना करत असते. सर्दी झालेली असली की भूकही काही वेळा मरते त्याचं कारणही गंधसंवेदना मवाळ होण्यातच सापडतं. म्हणूनच गंधसंवेदनाच जर नाहीशी झाली तर आपली भूकही मंदावेल आणि साहजिकच मग आपलं पोषण व्यवस्थित होण्यात अडचण येईल. 

देव्हाऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध असो की रातराणी किंवा सोनटक्का यासारख्या फुलांचा सुगंध असो, मन प्रसन्न करून जातो. आपल्या चित्तवृत्ती उत्फुल्ल अवस्थेत ठेवण्याचं काम गंधसंवेदना करत असते. त्यामुळंच मग अॅरोमाथेरपी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीचा विकास झाला आहे. स्वसंरक्षणासाठी केवळ प्राण्यांनाच गंधसंवेदनेची मदत होते असं नाही. आपल्यालाही होते. गॅसचा स्टोव्ह चुकून उघडा राहिला किंवा सिलिंडरमधून गॅस मोकळा सुटला तर त्याचा गंध आपल्याला लगेच त्याची जाणीव करून देतो आणि मग बचाव करायला उद्युक्त करतो. विजेच्या तारेवरचं रबराचं आवरण जळायला लागलं तर तोही गंध आपल्याला ओळखता येतो. नासलेल्या अन्नालाही वेगळा वास येतो आणि तो ओळखून आपण त्याची विल्हेवाट लावू शकतो. 

उघड्या खिडकीतून आलेल्या एखाद्या सुगंधानं काही विशिष्ट प्रसंगाच्या आठवणीही फडा काढून उभ्या राहतात. तो प्रसंग मनःचक्षुंसमोर उभा करतात. डॉ. रॅचेल हर्झ यांनी प्रत्यक्ष प्रयोग करूनच ते सिद्ध केलं आहे. त्यासाठी त्यांनी काही महिलांना सहभागी करून घेतलं. त्यांना त्यांच्या पूर्वायुष्यातील एखाद्या प्रसंगाशी निगडित असलेला आणि त्यामुळं ओळखीचा असलेला सुगंध हुंगायला दिला. त्यापायी त्यांच्या मेंदूतील अनेक पेशी उत्तेजित झाल्याचं त्यांना दिसून आलं. उलट त्यांनी पूर्वी कधीही न अनुभवलेल्या सुगंधापोटी चेतापेशी स्वस्थच राहिल्याचं आढळलं. स्मरणरंजनात, नॉस्टॅल्जियामध्ये तर इतर कोणत्याही संवेदनापेक्षा गंधसंवेदना अधिक जोमदार कामगिरी करत असल्याचंही वैज्ञानिकांनी नोंदवलं आहे. याचं कारणही त्यांनी शोधून काढलं आहे. ओलफॅक्टरी बल्ब हा गंधसंवेदनेची धुरा सांभाळणारा अवयव आपल्या नाकाच्या शेंड्यापासून थेट मेंदूच्या मुळापर्यंत पसरलेला आहे. विशेषेकरून आपल्या भावविश्वाचं नियंत्रण करणाऱ्या अमिग्डालाशी त्याची जवळीक आहे. त्यामुळंच गंधसंवेदना आपल्या भावविश्वाला अतिशय जवळची आहे. 

ज्यांची गंधसंवेदना तीक्ष्ण आहे अशांची सुगंध, मद्य, चहा, कॉफी वगैरेंच्या मूल्यमापनासाठी नेमणूक केली जाते. खास करून महागड्या आणि उच्च प्रतीच्या उत्पादनाचा दर्जा कायम राखण्यासाठी ते करणं आवश्यक असतं. जर त्यांची गंधसंवेदना नाहीशीच झाली तर ती कामगिरी ते कसे काय पार पाडू शकतील! आपल्यालाही उत्तम प्रतीचा चहा किंवा मद्य कसं काय मिळेल! 

तरीही कोरोनाची लागण झाल्यामुळं गंधसंवेदना कायमची नाहीशी होण्याची शक्यता नाही, असंच आतापर्यंतचा अनुभव सांगतो आहे. रोगमुक्त झाल्यावर गंधसंवेदना परत पूर्वीसारखी ठणठणीत होईल, असा विश्वास डॉक्टर देत आहेत.

संबंधित बातम्या