जर पावसातून चाललात तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

‘जर तर’च्या गोष्टी

मोकळी जागा कुठं आहे, वारा कोणत्या दिशेनं वाहतो आहे, तो पाठीवर आहे की समोरून येतोय, पावसाच्या धारा सरळ पडताहेत की वाऱ्याच्या सपाट्यानं त्या थोड्या तिरप्या झाल्या आहेत, मोकळ्या जागेतून किती अंतर पार करायचं आहे आणि मुख्य म्हणजे पावसाच्या पडण्याचा वेग किती आहे, या सर्वांवर पावसात आपण किती भिजणार ते अवलंबून असतं. 

ग्यानबाचं वागणं अनेकांना विक्षिप्त वाटतं, पण त्याच्या त्या चक्रमपणातही एक तर्कसंगती असते. एक वेगळंच लॉजिक असतं. परवाचीच गोष्ट. तो आला तो नखशिखांत चिंब भिजलेला. त्याच्या भुवयांवरूनही पाणी ओघळत होतं. 

‘अरे एवढा कसा भिजलास? आणि छत्री नाही का घ्यायची?’

‘मुद्दामच नाही घेतली. मला तो प्रयोग करून बघायचाच होता.’

‘कसला प्रयोग? कोणी सांगितला करायला?’

‘तुम्हीच नेहमी सांगता ना की कोणी काहीही सांगितलं तरी त्याचा पडताळा घेतल्याशिवाय ते खरं मानू नये म्हणून.’

‘हो, अजूनही मी तेच म्हणेन. पण त्याचा पावसात भिजण्याशी काय संबंध?’

‘तुम्हीच नव्हतं का सांगितलंत की तिकडे इंग्लंडमध्ये की अमेरिकेत कोणी तरी सांगितलंय की पावसातून धावत जाण्याऐवजी चालत गेल्यानं माणूस कमी भिजतो. धावत जाण्याचा फारसा फायदा होत नाही.’

‘हं, हं, ते होय? ते तसं खरंच आहे. पण तू ती माहिती संपूर्णपणे नीट ऐकलेली दिसत नाहीस. कारण त्यांनी तो प्रयोग कोणत्या परिस्थितीत केला होता याचा विचार तू केलेला दिसत नाहीस. अरे कोणताही प्रयोग आपण करून पाहायचा तर ती परिस्थितीही विचारात घ्यावी लागते. आणि ती तशीच्या तशी हुबेहूब उभी करावी लागते. तसं केलं नाही तर मग त्या दोन प्रयोगांच्या निष्कर्षांची तुलना करता येत नाही. इंग्रजीत म्हण आहे ना, ‘यू कॅनॉट मिक्स अॅपल्स विथ ऑरेंजेस’. सफरचंदाची तुलना संत्र्याशी करून कसं चालेल. त्याला काही अर्थच राहणार नाही. तीच या प्रयोगांचीही गत असते. म्हणून तर कोणताही प्रयोग करताना कोणती पद्धत वापरली, कोणत्या सामग्रीचा उपयोग केला वगैरे सविस्तर सांगितलं जातं. 

तर आता तू आता ज्याबद्दल बोललास त्या प्रयोगाची कथा. एक तर आता जसा धो धो कोसळतोय तशा पावसात तो प्रयोग केलेला नव्हता. हलक्या सरी येत असताना तो केलेला होता. म्हणजे समज पाऊस पडायला सुरुवात होतेय आणि तुझ्याकडे छत्री नाही, तर मग जवळचा आडोसा गाठण्यासाठी धावत जाण्यानं काही फारसा फायदा होणार नाही असंच त्या वैज्ञानिकांना म्हणायचं होतं. 

माणूस भिजतो कारण त्याच्या अंगावर किंवा डोक्यावर पावसाचे थेंब पडतात. जिथं तुम्ही आहात आणि जिथं पोचायचं आहे त्यामधल्या मोकळ्या जागेतून जाताना ते थेंब त्याच्या अंगावर पडतात. पण ती मोकळी जागा कुठं आहे, वारा कोणत्या दिशेनं वाहतो आहे, तो पाठीवर आहे की समोरून येतोय, पावसाच्या धारा सरळ पडताहेत की वाऱ्याच्या सपाट्यानं त्या थोड्या तिरप्या झाल्या आहेत, मोकळ्या जागेतून किती अंतर पार करायचं आहे आणि मुख्य म्हणजे पावसाच्या पडण्याचा वेग किती आहे, या सर्वांवर तुझं भिजणं अवलंबून असतं. सर्वच घटक तुझ्या बाजूचे असतील तर मग त्या मंडळींचं ते म्हणणं तंतोतंत खरं ठरेल. पण इतर बाबतीत जरा वेगळा विचार करायला हवा. 

म्हणजे समज की पाऊस एकाच वेगानं पडतो आहे. त्याच्या वेगात बदल होत नाहीये. तर मग त्यांच्या मधल्या मोकळ्या जागेत असणारे एकूण पावसाचे थेंब जितके असतील, तेवढ्याच थेंबांना टक्कर देत तुला तो पल्ला गाठायचा असतो. तेव्हा मग तू चाललास काय आणि धावलास काय, काहीच फरक पडणार नाही. तेवढ्या थेंबांना तुझं शरीर भिडणारच आहे. पण जेव्हा तू धावतोस तेव्हा या थेंबांपैकी तुझ्या डोक्यावर पडणाऱ्या थेंबांची संख्या निश्चितच कमी असते. आणि तू वेगानं गेल्यामुळं तुझ्या पुढं असणाऱ्या थेंबांना दामटत तू पुढंपुढं जात राहशील. त्यामुळं ते थेंबही धसमुसळेपणानं तुझ्या हातापायांवर, छातीवर आदळतील. त्यामुळं उलट तुझे कपडे चांगलेच भिजतील. डोकं त्या मानानं जरा कोरडं राहील. पण तू चालत आलास तर तुझ्या डोक्यावर पडणाऱ्या थेंबांची संख्या जास्ती असेल. परंतु आता मधल्या थेंबांना तुझं अंग हलकेच भिडेल. तुझं शरीर त्यांना दामटणार नाही, कुरवाळेल. त्यामुळं मग ते थेंबही तुझ्याशी दांडगाई करणार नाहीत. त्यापायी तुझ्या हातापायांना, छातीला, पाठीला ते थेंब हलकाच स्पर्श करतील. परिणामी तू फारसा भिजणार नाहीस. त्या वैज्ञानिकांचं म्हणणं या अर्थी खरं आहे. अर्थात त्यासाठी पाऊस हलका असायला हवा. एकाच धीम्या गतीनं पडायला हवा. त्याला वाऱ्याची फारशी साथ नसावी. म्हणजे मग तो सरळ वरून पडत राहील. तिरपा येणार नाही. पण समजा पावसाचा जोर जास्ती असेल आणि त्याला वाऱ्याचीही साथसंगत लाभलेली असेल तर मग तो बेभान होऊन तिरपा तिरपा येईल. जर तो तुझ्या पाठीवर असेल तर मग तू धावलास तर कमी भिजशील. कारण ज्या वेगानं वारा वाहतो आहे त्याच वेगानं तू धावलास तर मग त्या थेंबांना तुझ्या अंगाशी भिडायला तेवढाच कमी वेळ मिळेल. त्यांच्या सतत पुढंच राहून तू त्यांच्या तावडीतून सुटू शकशील. मात्र जर तो समोरून येत असेल तर तुझी खैर नाही. कारण एक तर तो एकदम तुझ्या अंगावरच कोसळेल. शिवाय तो तुला पाठी पाठी ढकलत राहील. त्यापायी तू मोकळ्या जागेत जास्ती वेळ अडकून पडल्यासारखा होशील. तेवढ्याच जास्ती थेंबांना तुझ्या अंगाशी दंगामस्ती करण्याची संधी मिळेल. तुझं अंग आणि तुझं डोकं दोन्हीही चांगलीच चिंब भिजतील. तू धावण्याऐवजी चाललास म्हणून काही लक्षणीय फरक पडणार नाही. आता पडतोय त्या पावसातून तू चालत आलास तरी एवढा भिजलास कारण तुझ्या घरापासून इथपर्यंतचं अंतर तसं जास्तीच आहे. तरीही तू धावला असतास तर तुझं डोकं थोडंसंच कोरडं राहिलं असतं. तुला किंवा मला जाणवेल इतका फरक पडला नसता. ते काही असो. पटकन घरात जाऊन टॉवेल घेऊन आधी डोकं खसाखसा पुसून काढ. कपडेही बदल.

बाकी काही म्हण ग्यानबा तुझी प्रयोग करण्याची जिद्द आवडली बुवा आपल्याला. फक्त प्रयोग करण्यापूर्वी त्याच्यासंबंधीची सर्व माहिती मिळवून तिचं व्यवस्थित मनन करायला हवं, हेही तुला या निमित्तानं समजलं असेलच. या प्रयोगातूनही तुला बरंच काही शिकायला मिळालं असेल, 
होय ना!’

संबंधित बातम्या