जर ऋतूच नसले तर...!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

‘जर तर’च्या गोष्टी

ऋतुचक्रच नसतं तर माणसाचं जगणं केविलवाणं झालं असतं. जर ऋतूच नाहीसे झाले तर मग माणसाची वाटचाल उलट्या दिशेनं होत राहील. परत वेचीवेधी संस्कृतीत, म्हणजेच हंटर गॅदरर अवस्थेत, माणूस जाऊन धडकेल.

साडेचार अब्ज वर्षांपूर्वी साधारण मंगळाच्या आकाराचा एक लघुग्रह पृथ्वीवर वेगानं येऊन आदळला. त्यानं धरतीचा एक टवका उडवला. धरतीच्या गुरुत्वाकर्षणानं त्याला धरून ठेवलं. तोच आता अंतराळात आपला चंद्र बनून प्रदक्षिणा घालत राहिला आहे. पण चंद्राला जन्म देण्याबरोबर या टकरीनं आणखीही एक कायमचा बदल घडवून आणला. तिनं उभ्या पृथ्वीला कलती केली. कायमची. तेव्हापासून आपल्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या पातळीशी साडेतेवीस अंशाचा कोन करून पृथ्वी आपलं परिभ्रमण करत आहे. 

या कलण्यामुळं झालं काय, तर सूर्यकिरण वसुंधरेच्या निरनिराळ्या प्रदेशांवर निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या कोनातून पडू लागले. कोणत्याही एका प्रदेशाला मिळणाऱ्या उष्णतेची मात्रा वर्षभर एकसारखीच न राहता तिच्यात नियमित चढउतार होत राहिले. याचीच परिणती ऋतूंच्या निर्मितीत झाली. जर पृथ्वी ताठ उभीच राहिली असती तर तिच्या पृष्ठभागावर निरनिराळ्या प्रदेशांमध्ये वर्षभर एकसारखंच तापमान राहिलं असतं. ऋतुमानात कोणताही बदल झाला नसता. विषुववृत्त आणि आसपासचा प्रदेश उष्ण कटिबंधात समाविष्ट झाला असता. पण जसजसं विषुववृत्तापासून, दक्षिणेला काय किंवा उत्तरेला काय, दूर जावं तसतशी त्या कटिबंधाला मिळणारी सूर्याची उष्णता कमी कमी होत गेली असती. ते प्रदेश अधिकाधिक थंड राहिले असते. दोन्ही ध्रुवांवर तर थंडीनं कमाल पातळी गाठली असती. साहजिकच जगण्याला पूरक परिस्थिती विषुववृत्त आणि ध्रुवप्रदेशांपासून सारख्याच अंतरावर असलेल्या अधल्यामधल्या कटिबंधातच स्थापित झाली असती. सजीवांची आणि मानवप्राण्याचीही वस्ती त्याच मर्यादित प्रदेशात झाली असती. 

पण तसं झालेलं नाही. त्यासाठी त्या टक्कर देणाऱ्या लघुग्रहाचे आणि त्यानं निर्माण केलेल्या ऋतुचक्राचे आभार मानायला हवेत. जर ऋतूंची निर्मितीच झाली नसती तर जीवन आता दिसतं तसं कधीच फोफावलं नसतं. कॅनडातल्या मॅकगिल विद्यापीठातल्या प्राध्यापक डॉन अॅटवुड यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. ते म्हणतात, ‘ऋतुचक्रच नसतं तर माणसाचं जगणं केविलवाणं झालं असतं’. 

आजही विषुववृत्ताच्या जवळपासच्या प्रदेशात गेलात तर तिथं ऋतुचक्र अनुभवाला येत नाही. सिंगापूरला वर्षभर बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र. वर्षभर एकच तापमान. हवा सदोदित दमट. पावसाची साथ तर सततची. तिच्यापासून सुटका नाही. तिथं काय किंवा आफ्रिकेतल्या काँगोमध्ये काय. तिथल्या पर्जन्यवनात असंच पर्यावरण आहे. अशा सततच्या पाऊसधारांमुळं जमिनीची सतत धूप होत राहते. वरचा सुपीक भाग हळूहळू निघून जातो. तिथल्या पोषक पदार्थांचा निचरा होत जातो. कोणतंही पीक घेणं कठीणच होऊन बसतं. जगभरात सगळीकडेच अशीच परिस्थिती राहिली तर मग मनुष्यवस्तीसाठी योग्य जागा मिळवणंही दुरापास्त होऊन गेलं असतं. विरळ वस्ती विखुरलेली राहिली असती. जीवनकलह अधिकच गंभीर झाला असता. सध्या जो आपण संस्कृतीविकास पाहतो आहोत तोच झाला नसता. आधुनिकच काय पण प्राथमिक अवस्थेतलं तंत्रज्ञानही विकसित झालं नसतं.

वर्षभर उष्ण दमट हवामानापोटी संसर्गजन्य रोगजंतूंचं फावलं असतं. रोगराईनं धुमाकूळ घातला असता. आजही अशा हवामानाच्या प्रदेशात हीच स्थिती आढळते. पण तिचा सामना करण्यासाठी माणसानं औषधपाण्याची आणि लसीकरणाची सोय करून ठेवली. त्यासाठीचं तंत्रज्ञानच विकसित झालं नसतं तर त्या रोगराईचा मुकाबला कसा केला असता?

ऋतुचक्रामुळं आज आपण हिवाळ्याचा अनुभव घेतो. त्याचे तीन फायदे अॅटवुड यांनी सांगितले आहेत. पहिला, गव्हाच्या लागवडीचा. गव्हाचं पीक घेण्यासाठी हिवाळ्यातल्या हवामानाची गरज असते. आपल्या देशातही पंजाब, हरियाणा एवढंच काय पण मध्यप्रदेशासारख्या तुलनेनं थंड हवामानाच्या प्रदेशात गव्हाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. गहू हा धरतीवरच्या बहुसंख्य लोकांचं पोषण करण्याचं काम करतो. हिवाळ्यानं त्याला मदतच केली आहे. 

रोगजंतूंना अटकाव करण्यात आणि कृमीकीटकांना पिटाळून लावण्यातही हिवाळ्याची मदत होते. अर्थातच त्या प्रदेशातले नागरिक अधिक निरोगी राहतात. पर्याप्त पोषण आणि रोगजंतूंना प्रतिबंध यामुळं त्यांचं जीवन अधिक आनंददायी होतं. जीवनकलह अधिक सुसह्य झाल्यामुळं त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटतात, त्यांच्या सर्जनशीलतेला बहर येतो. 

त्यातूनच मग तंत्रज्ञानाच्या निर्मितीला चालना मिळते. हिवाळा तसा आल्हाददायक असला तरी काही वेळा त्या काळातलं तापमानही असह्य होतं. त्यावर तोडगा काढण्यासाठी मग उष्णता निर्माण करण्याची तजवीज करावी लागते. आदिमानवाच्या काळात शेकोटी पेटवून ती केली जात होती. पण जसजशी लोकसंख्या वाढू लागली तसतसा हा लाकूडफाट्याचा पुरवठा अपुरा पडू लागला. त्यातूनच मग प्रथम कोळशाचा आणि नंतर खनिज तेलाचा शोध लागला. उष्णता तसंच ऊर्जानिर्मितीसाठी त्यांचा सढळ वापर होऊ लागला. वाफेवर चालणाऱ्या इंजिनाच्या शोधालाही ही परिस्थिती मदतगारच ठरली. त्यानंतर मात्र यंत्रसंस्कृती फोफावली. तंत्रज्ञान निर्मितीची घोडदौड सुरू झाली. ती आजतागायत कायम आहे. आजचं आपलं जीवन जर अधिक सुखमय झालं असेल तर त्याला या ऋतुचक्राची साथ आहे हे कसं विसरता येईल? जर ऋतूच नाहीसे झाले तर मग माणसाची वाटचाल उलट्या दिशेनं होत राहील. परत वेचीवेधी संस्कृतीत, म्हणजेच हंटर गॅदरर अवस्थेत, माणूस जाऊन धडकेल, असाच इशारा अॅटवुड यांनी दिला आहे. 

पण ऋतू नाहीसे होण्याचं संकट केव्हा उद्‌भवेल? जर सध्याच्या कललेल्या स्थितीतून पृथ्वी परत उभी राहिली तरच. पृथ्वी सतत स्वतःभोवती गिरकी मारत असल्यामुळं ते होण्याची शक्यता आहे, असं काहीजणांना वाटतं. पण तसं होणार नाही याची दक्षता चंद्रमहाशय घेत आहेत. चंद्राचं गुरुत्वाकर्षण धरतीला आहे त्या कललेल्या स्थितीतच कायम ठेवण्याची कामगिरी पार पाडत आहे.

तरीही ऋतुचक्राला काही प्रमाणात खीळ घालण्यास आणखी एक कारण असू शकतं. सध्या ज्या हवामान बदलाचा अनुभव आपण घेत आहोत त्यामुळं ऋतुचक्राचं स्वरूपच बदलून जाण्याची शक्यता काही वैज्ञानिकांनी वर्तवलेली आहे. 

यंदा आपल्या देशानं गेल्या कित्येक वर्षातल्या सगळ्यात थंड उन्हाळा अनुभवला, असं हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. त्याचा पाऊसपाण्यावर काय परिणाम होईल, हे कळून येईलच. पण त्याच वेळी दुसऱ्या टोकाला कॅनडा आणि अमेरिका इथल्या थंड प्रदेशात उष्णतेची भीषण लाट पसरत असल्याचं दिसतं आहे. साधारणपणे राजस्थानातल्या वालुकामय प्रदेशात किंवा मध्यपूर्वेतल्या वाळवंटी भागात अनुभवायला येणाऱ्या पन्नास अंशाच्या तापमानानं कॅनडामध्ये शेकडो बळी घेतले आहेत. कधी नव्हे ते कॅलिफोर्नियामध्ये वणव्यांनी यंदा कहर केला होता. उलट नेमेचि जिथं वणवे लागतात त्या ऑस्ट्रेलियात पावसानं कहर माजवला आहे. हवामानाच्या या उलथापालथीपायी ऋतुचक्रही कोलमडून पडलं तर? तसं होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करायला हव्यात, असाच सल्ला तज्ज्ञ देत आहेत. 

संबंधित बातम्या