परग्रहवासीयांनी संपर्क साधला तर...!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

‘जर तर’च्या गोष्टी

चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी खगोलशास्त्रज्ञ जेरी एहमान अवकाशाचं निरीक्षण करत असताना त्यांना एक संदेश आला. खरोखरच तो संदेश होता याची शहानिशा केल्यावर त्यांची खात्री पटली. तोच संदेश आता ‘वॉव संदेश’ या नावानं ओळखला जातो.

आजपर्यंत मानवासारखे बुद्धिमान सजीव फक्त या धरतीतलावरच आढळलेले आहेत. आपल्या सौरमालिकेतल्या इतर कोणत्याही ग्रहावर सजीव सृष्टी असल्याचा कोणताच पुरावा मिळालेला नाही. एवढंच काय पण विश्वात इतरत्र कुठंही अशी बुद्धिमान सजीवांची प्रजाती असल्यास तिच्याशी संपर्क करण्याच्या उद्देशानं ‘सर्च फॉर एक्स्ट्रॉ टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स’ (सेटी) या नावाचा एक प्रकल्प गेली कित्येक वर्ष राबवला जात आहे. ‘कोण आहे रे तिकडे!’, अशी साद घालत तिला कोणी प्रतिसाद देतो की काय हे बारकाईनं ऐकण्याचा प्रयास केला जात आहे. पण अजून तरी कोणीही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळं या अफाट विश्वात कुठंही अशी प्रगत प्रजाती असण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. 

तरीही काही जणांनी अजूनही उमेद सोडलेली नाही. आज नाही पण भविष्यात, कदाचित उद्यापरवाही, अशा कोणाचा तरी ठावठिकाणा कळेल अशी आशा ही मंडळी बाळगून आहेत. विज्ञानकथांमध्ये तर परग्रहवासीयांना कळीचं स्थान दिलं गेलं आहे. म्हणूनच असं विचारावंसं वाटतं की जर परग्रहवासीयांनी आपल्या हाकेला ओ देत आपल्याशी संपर्क साधलाच तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? तुम्ही नेमकं काय कराल? 

आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट घेणार असलो तर सहसा आपण त्या व्यक्तीला तशी पूर्वसूचना देतो. परग्रहवासीयही हा शिष्टाचार पाळतील का? हा पहिलाच प्रश्न उभा राहील. तशी पूर्वसूचना द्यायची तर ‘सेटी’ या उपक्रमामध्ये आपण जी विश्वभरात सगळीकडे ऐकू जाईल अशी हाक मारतो आहोत, त्याला प्रतिसाद देऊन त्यांना ते करता येईल. आपण जो संदेश प्रसारित करत आहोत त्यात आपली पृथ्वी आणि तिच्यावर वस्ती करणारा मानवप्राणी यांच्या प्रमुख वैशिष्ट्यांची माहिती दिली जात आहे. त्यावरून आपली ओळख त्यांना सहज पटेल अशी व्यवस्था केली आहे. त्यांची ओळखही आपल्याला सहज होईल असा एखादा संदेश उद्यापरवा त्या उपक्रमाच्या केंद्राकडे आला, तर तो नेमका परग्रहवासीयांनीच पाठवला आहे की इथल्याच कोणातरी मस्करीवीरानं ती उठाठेव केली आहे, याचा उलगडा करणं आवश्यक होऊन बसेल.

चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी खगोलशास्त्रज्ञ जेरी एहमान नेहमीप्रमाणे अवकाशाचं निरीक्षण करत असताना त्यांना एक संदेश आला. ते चमकून उठले. खरोखरच तो संदेश होता की काय याची शहानिशा त्यांनी केली. त्यानुसार त्यांची खात्री पटली. तो कोणाकडून आला हे त्यांना कळेना. पण त्यांनी त्या इलेक्ट्रॉनिक संदेशाची मुद्रितप्रत बनवून त्या संदेशाभोवती लाल शाईतलं वर्तुळ काढलं आणि त्यावर ‘वॉव’ असं लिहिलं. तोच आता ‘वॉव संदेश’ या नावानं ओळखला जातो. 

त्या वॉव संदेशानं जगभरातल्या वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकलं आहे. कारण तो संदेश ‘सेटी’च्या कार्यालयात आला नव्हता. तरीही कदाचित आपल्या नकळत तो येऊन गेला असेल म्हणून त्यांनी त्यांच्या नोंदीची छाननी केली. एवढंच नाही तर परत तो येईल म्हणून कान टवकारून तो ऐकायचा प्रयत्न चालू ठेवला. पण त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळं अशा एखाद्या परग्रहावरील प्रगत प्रजातीनं आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्याची नेमकी आणि खरीखुरी ओळख कशी पटवायची, या प्रश्नानं वैज्ञानिकांना सतावलं आहे. कारण अपोलो दहा या अंतराळयानातून अवकाशात भ्रमंती करताना जेव्हा ते चंद्राच्या पलीकडच्या, आपल्याला न दिसणाऱ्या, बाजूकडून जात होते तेव्हा त्यांना वेगळंच संगीत ऐकू आलं होतं. त्याची उपपत्ती कशी लावायची, तो असाच परग्रहवासीयांकडून आलेला संदेश होता की आपल्याच संदेशवहनाच्या यंत्रणेतील बिघाडापायी उत्पन्न झालेली विद्युतलहर होती, याचा निवाडा करता आलेला नाही. त्यामुळं हरदासाची कथा मूळपदावर आली आहे. 

याची उकल करण्यासाठी एक तोडगा सुचवला गेला आहे. जर आपल्याच यंत्रणेच्या विक्षिप्त वागणुकीतून असा रेडिओ संदेश उमटला असेल तर त्याच्या उगमाचं अंतर फार असणार नाही. पण परग्रहावरून असा संदेश आला असेल तर त्याचं उगमस्थान मात्र काही कोटी, अब्ज किलोमीटर अंतरावर असेल. त्याहूनही पलीकडे असण्याचीही शक्यता आहे. तेव्हा हा संदेश किती अंतरावरून आला याची छाननी केल्यास आपण तो निर्विवादपणे परग्रहावरूनच आला असं ठरवू शकू. आजही पोलिस एखादा संशयित कुठं आहे हे शोधून काढण्यासाठी त्याच्या मोबाईल फोनचं ठिकाण ज्या ट्रॅन्ग्युलेशन पद्धतीनं निश्चित करतात ती यासाठीही उपयोगी पडेल. दोन निरनिराळ्या ठिकाणच्या दुर्बिणीकडून जेव्हा अवकाशातल्या एखाद्या गोलाचं निरीक्षण केलं जातं तेव्हा ते ज्या कोनातून पाहत असतात ते ध्यानी घेऊन तो अवकाशस्थ गोल किती अंतरावर आहे हे ओळखता येतं. दूरदूरवरच्या ताऱ्यांचं अंतर मोजण्यासाठी या पद्धतीचा अवलंब, इतर अनेक पद्धतींबरोबर  केला जातो. आणि समजा या साऱ्या धडपडीतून तो खरोखरच परग्रहावरून आला आहे याची खात्री पटली तर पुढं काय करायचं, हा सवाल फडा काढून उभा आहेच. परग्रहवासीयांनी असा संपर्क साधला तर आपण त्याला कशी दाद द्यायची? आपणही त्यांच्या या ‘हॅलो’ला प्रतिसाद म्हणून ‘हाय’ म्हणायचं की काहीच करायचं नाही! कारण आपण ‘हाय’ म्हणतो आहोत हे त्यांना समजायला तर हवं. दोन भिन्न भाषिक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या संभाषणाला सुरुवातच कधीकधी करता येत नाही. त्यावर साईन लॅन्ग्वेजचा अवलंब करून आपलं म्हणणं त्या व्यक्तीपर्यंत पोचवण्याचा प्रयास आपण करू शकतो. शिवाय साईन लॅन्ग्वेजमध्येही निरनिराळ्या मुद्रांचा अर्थ दोन्ही बाजूंना समजतो. तो सारखाच असतो. पण इथं तर एकमेकांची तोंडही दिसत नसताना अशी एखादी सार्वत्रिक भाषा कुठून सापडायची? म्हणजे पहिले पाढे पंचावन्न!

हा तिढा सोडवण्यासाठी विश्वभरातल्या सर्वांनीच ज्या एखाद्या नैसर्गिक आविष्काराचा अनुभव घेतला आहे त्याची ओळख पटवण्यापासून सुरुवात करता येईल. तारा किंवा आकाशगंगा यासारख्या अवकाशातील निसर्गाच्या आविष्कारापासून सुरुवात करता येईल. पण ही संकल्पना राबवायची तर आपण ज्यांना तारा म्हणतो किंवा आकाशगंगा म्हणतो त्यांना ते काय म्हणतात, हे सांगता आलं पाहिजे. किंवा त्यांचं प्रतिनिधित्व करणारा आणि संभ्रमात न टाकणारा इलेक्ट्रॉनिक संदेश तयार करायला हवा. 

तेव्हा परग्रहवासीय आपल्याशी संपर्क साधताहेत यापायी उल्हसित व्हायला हरकत नाही. पण त्यांनी तशी सूचना दिली तर आपण काय करायचं, कशा प्रकारे सहज आकलन होऊ शकेल असा प्रतिसाद द्यायचा, हे ठरवणं सोपं नाही. इतरही अडचणी आहेत. तरीही आपण लवकरच त्यावर मात करू अशी आशा वैज्ञानिक बाळगून आहेत.

संबंधित बातम्या