जर हाताचा अंगठाच नसता तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 6 सप्टेंबर 2021


‘जर तर’च्या गोष्टी

वानरकुळातल्या इतर प्राण्यांपेक्षाही मानवप्राण्याचा अंगठा अधिक कार्यक्षम आहे. या समोरासमोरून इतर बोटांना स्पर्श करण्याच्या गुणधर्मामुळं तो हाताची भक्कम पकड घेऊ शकतो. माणसानं आपल्या प्रबळ बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याच गुणधर्माचा उपयोग करून निरनिराळी औजारं, शस्त्रं तयार करून त्यांचा वापर सुरू केला. त्यापायी मग त्याचा विकासही भरभर होत गेला. 

एकलव्य आठवतो? तोच, ज्याला द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकवण्याचं नाकारलं होतं. पण त्यापायी नाऊमेद न होता पठ्ठ्यानं ‘गुरुर्देवो महेश्वरः’ म्हणत द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून त्याच्या साक्षीनं धनुर्विद्येचा अभ्यास सुरूच ठेवला होता आणि त्यात प्रावीण्यही मिळवलं होतं. ते पाहून, आपला पट्टशिष्य असलेल्या अर्जुनाला हा कदाचित वरचढ ठरेल या धास्तीनं द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या या अनोख्या शिष्याकडे कशाची मागणी करावी? त्याच्या अंगठ्याची. एकलव्यही धन्य. त्यानं तत्काळ कशाचाही विचार न करता ती अभूतपूर्व गुरुदक्षिणा देऊन टाकली. अंगठ्या शिवाय चार बोटांच्या हातांनी त्यानं नंतर तिरंदाजी कशी केली असेल, या प्रश्नाचं उत्तर काही महर्षी व्यासांनी दिलेलं नाही. खरं तर त्यांनी त्याहीपेक्षा मूलभूत असलेल्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर दिलेलं नाही. द्रोणाचार्यांनी नेमका अंगठाच का मागावा? अंगठ्याचं एवढं काय महत्त्व आहे? ते धनुर्विद्येपुरतंच मर्यादित आहे की इतर मानवी व्यवहारांसाठीही आहे? जर अंगठाच नसला तर काय होईल?

महाभारतकारांनी भलेही त्याचं उत्तर दिलं नसेल. पण आधुनिक महर्षी सर आयझॅक न्यूटन यांनी मात्र ते दिलं आहे. त्यांनी अंगठ्याचं माहात्म्य अधोरेखित करत म्हटलं आहे, ‘इतर कोणताही पुरावा नसेना का, मला विचाराल तर माणसाच्या हाताचा अंगठा हीच साक्ष आहे या विश्वातल्या ईश्वराच्या अस्तित्वाची.’

वैज्ञानिकांनी मानवप्राण्याच्या हाताच्या अंगठ्याचं प्रमुख वैशिष्ट्य केव्हाच ओळखलं आहे. खरं तर हाताला, पायांना पाच पाच बोटं असतात. हाताचाच विचार केला तर इतर चार बोटं सारखीच असतात, फक्त लांबीतला फरक सोडला तर. सडसडीत, तीन तीन हाडांची पेरं असलेल्या या इतर बोटांमध्ये अंगठा उठून दिसतो. त्याची जाडीही सगळ्यात जास्ती आहे. हाडांची दोनच पेरं आहेत. त्याचं टोकही चांगलं घसघशीत आहे. पण त्याहूनही महत्त्वाची आहे ती त्याची हालचालीची पद्धत. हाताला असलेला त्याचा जोड इतर बोटांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळं त्याची हालचाल अधिक मोकळी आहे. मुख्य म्हणजे अंगठ्यानं इतर चारही बोटांना समोरासमोरून स्पर्श करता येतो. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘ऑपोझेबल थम्ब’ म्हणतात. असा ऑपोझेबल थम्ब हे उत्क्रांतीच्या ओघात शिखरस्थानावर असलेल्या सर्वच वानर जातीच्या प्राण्यांना मिळालेलं वरदान आहे. तरीही चिम्पान्झी, गोरिला वगैरे वानरकुळातल्या इतर प्राण्यांपेक्षाही मानवप्राण्याचा अंगठा अधिक कार्यक्षम आहे. या समोरासमोरून इतर बोटांना स्पर्श करण्याच्या गुणधर्मामुळं तो हाताची भक्कम पकड घेऊ शकतो. वानर आपल्या मुठीत फांद्या घट्ट पकडून लोंबकळू शकतात, एका फांदीवरून दुसऱ्‍या फांदीवर उड्या मारू शकतात. पण माणसानं आपल्या प्रबळ बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याच गुणधर्माचा उपयोग करून निरनिराळी औजारं, शस्त्रं तयार करून त्यांचा वापर सुरू केला. त्यापायी मग त्याचा विकासही भरभर होत गेला. नेहमीच्या व्यवहारातली अनेक कामं करणं सुलभ झालं. असा वैशिष्ट्यपूर्ण अंगठा नसता तर ते शक्य झालं नसतं. 

या अंगठ्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या तळाशी, जिथं तो तळहाताला जोडला जातो, तिथल्या हाडांच्या सांध्यावर कुल्चेचा एक थर आहे. त्यामुळं त्या सांध्याची हालचाल सुलभ होते. हाडावर हाड घासलं जात नाही. त्यापायी ती हालचाल वेदनारहित होते. शिवाय या अंगठ्यापायीच हाताची मूठ वळवणं सोपं झालं आहे. म्हणूनच उटाह विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ डेव्हिड कॅरिअर यांनी असं प्रतिपादन केलं आहे, की इतर प्राणी हातांनी ओरबाडू शकतात, पण ठोसा मारणं त्यांना जमत नाही. महंमद अली म्हणा किंवा आपली मेरी कोम म्हणा, त्यांना मुष्टीयुद्धासाठी या अंगठ्याची फार मोठी मदत होते. मुठीला वेगळीच ताकद तर मिळतेच, पण तुलनेनं नाजूक असलेल्या इतर बोटांना संरक्षणही मिळतं. त्यांना इजा होण्याची भीती न बाळगता स्वैरपणे ती मूठ उगारता येते. नेमका लक्ष्याचा वेध घेता येतो. दगडाचा मारा करणं हे माणसानं उचललेलं पहिलं शस्त्र होतं. ते शक्य झालं कारण अंगठा आणि तर्जनी किंवा मध्यमा यांच्या चिमटीत तो दगड पकडून उचलणं शक्य झालं. ऑपोझेबल थम्ब असल्यामुळंच अशी चिमूट तयार करणं शक्य झालं. त्या चिमटीत मग दगड पकडा, एखादं फळ पकडा किंवा आजच्या जमान्यातल्या स्वयंपाकात आवश्यक असलेलं चिमूटभर मीठ घ्या. सर्वासाठी तो अंगठाच मदतीला येतो. नुसता तो दगड उचलूनही भागत नाही तर तो नेम धरून फेकावा लागतो. त्यासाठीही तो प्रथम व्यवस्थित पकडता यायला हवा. अंगठ्याशिवाय अशी पकड घेणं अशक्यच आहे. 

अंगठ्याची करामत अजमावण्यासाठी इंग्लंडमधल्या नॅशनल सायन्स टीचर्स असोसिएशन या विज्ञान शिक्षकांच्या संघटनेनं वीस मिनिटांचा एक प्रयोगच सुचवला आहे. त्यानुसार प्रथम अंगठा हाताच्या कडेला चिकटपट्टीनं किंवा दोरीनं घट्ट बांधून टाकायला सांगितलं आहे. इतर चारी बोटं मात्र मोकळी सोडलेली राहतील आणि त्यांच्या हालचालीत कोणताही अडथळा येणार नाही, याची खातरजमा करून घ्यायची आहे. तेवढी तयारी झाली की आता या ‘अंगठ्याशिवाय’च्या हातानं पुढच्या क्रिया करायच्या आहेत. 

पेन्सिलीनं किंवा बॉलपेननं तुमची सही करा, जमत नसेल तर फक्त नाव लिहिण्याचा प्रयत्न करा. पायात पायमोजे घालून बूट चढवा. ते करता आलं तर त्या बुटाची नाडी बांधा. नाडीचाच विषय निघालाय तर पायजम्यात नाडी घाला. ती कोणी घालून दिलेली असेल तर तो पायजमा चढवून तीच नाडी घट्ट बांधा. शर्टचं, पॅंटचंही चालेल, बटन लावा. त्याच पॅंटला असलेली झिप उघडा किंवा बंद करा. झिप कशाला, दरवाजा बंद करण्यासाठी किल्लीनं कुलूप लावा किंवा लावलेलं कुलूप उघडा. जमिनीवर पडलेलं रुपयाचं नाणं उचला. हे काही जमलं नाही तर ब्रशनं दात घासण्याचा प्रयत्न करा. करून बघा आणि मग सांगा अंगठा नसता तर यापैकी दररोजच्या व्यवहारातली किती कामं तुम्ही व्यवस्थित आणि विनासायास करू शकला असता.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत तिरंदाजी, नेमबाजी, भालाफेक यासारखे अनेक खेळ होते, जिथं हाताची मूठ व्यवस्थित वळवता येण्याची आवश्यकता आहे. अगदी जिम्नॅस्टिकसारखा कसरतीचा खेळ घेतला तरी तिथंही कठड्याला किंवा खांबांना व्यवस्थित पकडता यायला हवं. अंगठ्याशिवाय ते शक्य होईल? आज संगणकाचा कळफलक वापरायचा झाला तरी अंगठ्याची मदत नसेल तर दोन शब्दांमध्ये अंतर ठेवण्यासाठी इतर बोटांचा वापर वेळखाऊ होईल. लिहीत असाल तर लक्ष विचलितही होऊ शकतं. तेव्हा अंगठ्याला गृहीत धरू नका. त्याचा आदर करायला शिका. जर अंगठा नसेल तर काय होईल याचा विचार सतत करा. 

संबंधित बातम्या