डोळा आळशी झाला तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021


‘जर तर’च्या गोष्टी

एक डोळा जर आतल्या बाजूला म्हणजे नाकाकडे किंवा बाहेरच्या बाजूला म्हणजे कानाकडे झुकू लागला तर त्यांच्याकडून उमटणाऱ्या प्रतिमांमध्ये विसंवाद उत्पन्न होतो. तेही आळशी डोळ्याच्या व्याधीचं कारण असू शकतं.

‘डोळा आळशी झाला तर..?’ हा काय प्रश्न झाला, असंच तुम्हाला वाटेल ना! म्हणजे माणूस आळस करतो. तो आळशी होतो. पण फक्त डोळाच कसा काय आळशी होईल! खरंतर तुम्हाआम्हाला समजेल अशा भाषेतलं हे एका व्याधीचं वर्णन आहे. डॉक्टर त्याला ‘अॅम्ब्लायोपिया’ असं भरभक्कम नाव देतात. ते आपल्याला समजणार नाही म्हणून मग त्याचं ‘आळशी डोळा’ असं बारसं केलं गेलं आहे. 

‘दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी’, असे जरी नाकाच्या तटबंदीनं दोन डोळे विभक्त केले असले, तरी त्यापायी दृष्टीला तसं एक वरदानच लाभलेलं आहे. कारण कोणत्याही वस्तूकडे पाहताना हे दोन भाऊ वेगवेगळ्या कोनातून आपल्या लक्ष्याकडे नजर वळवतात. त्यामुळंच तर आपल्याला लांबी आणि उंची या व्यतिरिक्त समोरच्या दृश्याची खोलीही अजमावता येते. त्यासाठी मग या दोन डोळ्यांमध्ये सहकार्य असावं लागतं. त्यांच्याकडून उमटलेल्या प्रतिमा जरी थोड्याफार वेगळ्या असल्या तरी दोन्ही स्पष्ट असतात. धूसर असत नाहीत. पण काही वेळा काय होतं, एक डोळा जरा आळस करतो. त्याच्याकडून तेवढी स्पष्ट प्रतिमा उमटत नाही. तिचे कंगोरे सुस्पष्ट नसतात. त्या दोन प्रतिमांमध्ये मग विसंवाद होतो. जो डोळा स्पष्ट प्रतिमा देत आहे, त्याच्या कामाकडेच मेंदू लक्ष देतो. दुर्लक्ष करत राहिल्यामुळं दुसरा डोळा अधिकच आळशी बनतो. असंच होत राहिलं की आपली दृष्टीच अधू बनते, काहीवेळा तर कायमचीच. 

याची सुरुवात बालवयातच होत असल्याचं डॉक्टरांना आढळलेलं आहे. साधारण सहा ते नऊ या वयात ही बाधा होते. त्याचं निदान करणं आता डॉक्टरांना सहज साध्य झालं आहे. त्यामुळं वेळीच उपचार केले तर त्याचा कायमचा बंदोबस्त करता येतो. तरीही एक डोळा आळस करतो आहे हे ओळखायचं कसं? तर मूल एखादी वस्तू किती जवळ आहे किंवा किती दूर आहे हे सांगू शकत नसेल, तर तशी शंका यायला हवी. वस्तूचं आपल्यापासूनचं अंतर आपण एरवी सहज आणि बहुतांश अचूकपणे सांगू शकतो. पण दोन डोळ्यांमधलं सहकार्य हरपलं असेल तर ते शक्य होत नाही. तसंच मूल तो आळशी डोळा मिटून, एका डोळ्यानंच समोरचं दृश्य पाहत असेल किंवा त्याच्याकडे पाहताना आपलं डोकंच एका बाजूला झुकवत असेल तर मग डॉक्टरांकडे जाऊन निदान करून घेणंच श्रेयस्कर. चकणेपण हेही एक या व्याधीचं लक्षण आहे.

असं होण्याची कारणं मात्र वेगवेगळी आहेत. आपल्या डोळ्यांमध्ये समोरच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असते. त्यांचा फोकस निश्चित असतो. मग ती वस्तू जवळ असो की दूर. हातात धरलेल्या पुस्तकातला मजकूर जितक्या स्पष्टपणे वाचता येतो, तितकंच आकाशात उडणाऱ्या पतंगाच्या शेपटाचं वर्णनही अचूक करता येतं. पण काही वेळा एक डोळा इतक्या स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्याला एक तर जवळची वस्तू नीट दिसत नाही किंवा दूरची तरी. वेळीच त्याची ओळख पटली तर चष्म्याच्या मदतीनं ही विसंगती दूर करता येते. पण तसे उपाय केले नाहीत तर मग मेंदूकडे पोचणारी एक प्रतिमा स्पष्ट तर दुसरी धूसर असते. मेंदू धूसर प्रतिमेकडे दुर्लक्ष करत राहतो. व्याधी अधिकच गंभीर होऊ लागते. डोळ्यांमधील भिंग लवचिक असतं. जवळच्या असो की दूरच्या, दृश्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी डोळ्यांना जोडलेले स्नायू त्या भिंगांना मदत करतात. काही वेळा एका डोळ्याचे स्नायू कमकुवत झालेले असतात, किंवा त्यांना इजा झालेली असते. अशा वेळी अशी विसंगती उद्‌भवण्याची शक्यता असते. 

पाहताना दोन्ही डोळे बरोबर मध्यावर येतात. पण एक डोळा जर आतल्या बाजूला म्हणजे नाकाकडे किंवा बाहेरच्या बाजूला म्हणजे कानाकडे झुकू लागला तर त्यांच्याकडून उमटणाऱ्या प्रतिमांमध्ये विसंवाद उत्पन्न होतो. तेही या आळशी डोळ्याच्या व्याधीचं कारण असू शकतं. एखाद्या वेळी एकाच डोळ्यात मोतीबिंदू झाला असेल तर साहजिकच एक प्रतिमा धूसर आणि दुसरी स्पष्ट असते. त्यापायीही मोतीबिंदूनं ग्रासलेला डोळा आळस करायला लागतो. प्रौढ वयातल्या आळशी डोळ्यापाठी बहुतांशी हेच कारण असतं. पण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून त्या डोळ्याचा आळस घालवता येतो.

मोतीबिंदू झालेला असल्यास त्या डोळ्यातील भिंगातून प्रकाशकिरण व्यवस्थितरीत्या पाठीमागच्या पडद्यावर पडत नाहीत. साहजिकच मग प्रतिमा धूसर होते. काही वेळा डोळ्यातल्या भिंगाचं नियंत्रण करणारे स्नायू ठाकठीक असतात पण पापणीचे नसतात. अशा वेळी ती पापणी सदा झुकलेलीच राहते. प्रकाशकिरणांच्या मार्गात अडसर उभा राहतो. त्या डोळ्यातून मेंदूला पोचलेली प्रतिमा अस्पष्ट असते, धुरकट असते. मेंदूनं त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं मग तो डोळा आळशी बनतो. 

पण हे तरी का होतं? स्नायूंच्या कामात अशी ढिलाई का उत्पन्न होते? मूल जर अपुऱ्या वाढीचं जन्माला आलं असेल किंवा त्यानंतरची त्याची वाढ सुदृढपणे झाली नसेल, तर मग स्नायूंच्या कामात असा असमतोल तयार होतो. लहान वयातच सहसा आळशी डोळ्याचा त्रास होण्याचं हे मुख्य कारण आहे. वाढत्या वयात होणारा त्रास बालवयात त्याच्याकडे काणाडोळा केल्यामुळं, वेळीच उपचार न केल्यामुळं उद्‌भवतो. त्यानंतर त्यावर कायमचा उपाय करण कठीण होऊन बसतं. 

लहान मुलांना आपल्याला काय होतंय हे नीट सांगता येत नाही. त्यामुळं निदान करण्याचं डॉक्टरांचं कामही अवघड होऊन बसतं. तरीही काही क्लृप्त्या त्यांनी लढवल्या आहेत. गतिशील वस्तूकडे मुलाला पाहायला सांगून त्याची काय प्रतिक्रिया होते हे अजमावलं जातं, किंवा एक डोळा बंद करून समोरच्या वस्तूसंबंधीची त्याला मिळणारी माहिती पडताळली जाते. 

एकदा का निदान झालं की मग त्यावरच्या उपायांचा विचार करावा लागतो. या व्याधीमध्ये दोन डोळ्यांवाटे उमटणाऱ्या प्रतिमांमधील समतोल ढळलेला असतो. तो परत साधण्याचं उपाययोजनांचं उद्दिष्ट असतं. त्यासाठी मग जो डोळा चांगला आहे त्याच्यावर पडदा ठेवला जातो. त्यापायी मग मेंदूला फक्त कमकुवत डोळ्यातल्या संदेशावरच अवलंबून राहावं लागतं. मेंदू मग त्या डोळ्याला आधार देत त्यातला कमकुवतपणा घालवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला मुलाची नजर बावचळल्यासारखी होते. पण हळूहळू त्याच्या कमकुवत डोळ्यात सुधारणा झाली की मग तो पडदा सतत वापरावा लागत नाही. 

दुसरा उपाय जरा विचित्र वाटेल. त्यासाठी मग दमदार डोळ्यातली प्रतिमाही धूसर होईल अशी तजवीज केली जाते. त्यापायी ढळलेला समतोल परत सांधला जातो. त्याचवेळी योग्य अशा चष्मा देऊन दोन्ही डोळ्यातल्या धूसर प्रतिमा सुस्पष्ट केल्या जातात. 

तेव्हा जर डोळा आळशी झाला तर हाय खाण्याची गरज नाही. वेळीच उपचार करून दृष्टी कायमची अधू होण्याचा धोका पूर्णपणे टाळता येतो.

संबंधित बातम्या