ट्रान्झिस्टरचा शोध लागला नसता तर...

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

‘जर तर’च्या गोष्टी

या अनोख्या बटणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. एका सेकंदात अशा अनेक बटणांची उघडझाप करता येते. त्यामुळंच तर  संगणकाला अभिप्रेत असलेली फक्त दोनच शब्दांची भाषा ट्रान्झिस्टर वापरू शकतो. दोनच शब्द. होय किंवा नाही. आणि तीही आकड्यांच्या रूपात. एक आणि शून्य. थोडक्यात ऑन किंवा ऑफ.

‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’, असं एक वचन आहे. आकारानं  इवलासा, सजीव किंवा निर्जीव; पण जगरहाटीवर प्रचंड प्रभाव पाडतो असाच त्याचा मथितार्थ आहे. त्याची प्रचिती आपण आज घेत आहोत, पण त्या वचनात थोडासा फरक करून. ‘लहान मूर्ती पण थोर अपकीर्ती’, हे वर्णन कोरोना विषाणूला चपखल लागू पडतं. डोळ्यांनाच काय पण शक्तिवान सूक्ष्मदर्शकांची मदत घेऊनही न दिसणाऱ्या त्या सजीवानं आज साऱ्या जगाला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडलं आहे. मात्र त्याचा मुकाबला करताना आपल्याला अशाच दुसऱ्या लहान मूर्तीची मोलाची मदत होत आहे. 

आपल्या स्वातंत्र्याला जितकी वर्षं झाली त्याच वयाचं हे इवलंसं पोर आहे. पण त्यानंही आपल्या जीवनशैलीत, खास करून या महासाथीच्या संकटकाळात कळीची भूमिका वठवली आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ज्याचा आज संचार आहे असा तो ट्रान्झिस्टर. खरोखरच आकारानं अतिशय लहान. टाचणीच्या अग्रावर असंख्य मावतील इतकंच त्याचं आकारमान. पण त्यानं या संकटकाळी आपलं जगणं सुसह्य करून टाकलं आहे. म्हणूनच मनात विचार येतो की या ट्रान्झिस्टरचा शोध लागलाच नसता तर! आणि तो विचारही झटकून टाकण्याचीच आपली प्रवृत्ती होते. 

असं आहे तरी काय या ट्रान्झिस्टरमध्ये? आज तुमचं जग या ट्रान्झिस्टरच्या जोरावरच तर व्यवस्थित चालू आहे. तुम्ही घरीच बसून काम करताय, वर्क फ्रॉम होम, किंवा तुमची शाळा घरातच भरतेय. ते शक्य झालंय कारण तुमच्याजवळ लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे. तुम्ही घरीच बसून जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या तुमच्या भावाशी, मुलांशी बोलू शकता आहात, त्यांना पाहू शकत आहात. कारण तुमच्या हातात स्मार्ट फोन आहे. कोरोनापायी सरकारनं जे निर्बंध घातले होते त्यामुळं तुम्ही घरातून बाहेर पडू शकत नव्हता. मग तुम्ही किराणा माल, भाजीपाला, औषधं आणि अशाच जीवनावश्यक वस्तू कशा मिळवत होतात /आहात? तुमच्या स्मार्ट फोनवरचं कुठलं तरी अॅप वापरूनच ना! आणि त्या मालाची किंमतही तुम्ही त्याच फोनचा वापर करून अदा करत आहात ना! ही झाली नुसती वानगी. अशी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं आज तुमचं जगणं सुसह्य करत आहेत. त्या यच्चयावत उपकरणांचा जीव त्या ट्रान्झिस्टरमध्येच लपलेला आहे. जर ट्रान्झिस्टरचा शोध लागला नसता तर.. तर कदाचित यापैकी काही उपकरणं विकसितच झाली नसती. आणि जी झाली असती ती आकारानं इतकी अगडबंब असती की त्यांची मदत होण्याऐवजी अडचणच होण्याची शक्यता जास्त आहे.

खरं तर ट्रान्झिस्टर म्हणजे एक स्वीच आहे, बटन आहे. ते वापरून तुम्ही विजेचा प्रवाह नियंत्रित करता. पण त्यासाठी अवजड यांत्रिक कळ न वापरता ते विजेच्या दाबाचाच वापर करतं. पॉझिटिव्ह दाब दिला की ते बटन ऑन होतं आणि ते ज्या सर्किटमध्ये गुंफलेलं आहे त्याच्यातून वीज खेळायला लागते. उलट निगेटिव्ह दाब दिला की ते ऑफ होतं आणि अर्थातच विजेचा प्रवाह खंडित होतो. शिवाय त्याच्या लहान आकारामुळं अशी अनेक स्वीचेस आपण अतिशय लहान चकतीवर जोडू शकतो. अशा चकतीलाच चिप म्हणतात. ती चिपच इतकी लहान असते की मनगटावरच्या घड्याळातही राहू शकते आणि ते घड्याळ चालवते. असं घड्याळ नुसतीच वेळ दाखवत नाही तर ते तुमचं तापमान, रक्तदाब, रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण, तुमच्या हृदयाचा ठोके मोजू शकतं. तुम्ही दिवसभरात किती पावलं चाललात, किती अंतर धावलात, किंवा इतर व्यायाम किती केलात, तुम्ही किती तास झोपलात, त्यापैकी किती तासाची झोप गाढ होती, किती कूस बदलत काढली होती, या सर्वांची नोंद ते घड्याळ ठेवू शकतं. इतकंच काय पण त्या घड्याळातूनच तुम्ही फोन करू शकता, ई-मेल पाहू शकता, त्या मेलचं उत्तर बोलूनच देऊ शकता. ट्रान्झिस्टरपायीच हे शक्य झालं आहे. सुरुवातीला हे ट्रान्झिस्टर एकेकटेच कामाला जुंपले जात होते. साधा रेडिओ बांधायचा तर एका ट्रान्झिस्टरनं भागत नव्हतं. त्यामुळं त्या प्रारंभाच्या काळातले ट्रान्झिस्टर रेडिओ त्यापूर्वीच्या रेडिओपेक्षा बरेच लहान असले तरी तसे आकारानं मोठेच होते. पण त्यांना लागणारी वीज छोट्या बॅटरीसुद्धा पुरवू शकत असल्यामुळं तो एका ठिकाणाहून दुसरीकडे तुम्ही सहज नेऊ शकत होता. आपली गाडी दारोदारी नेऊन भाजी विकणारा गाडीवाला गळ्यात ट्रान्झिस्टर रेडिओ घेऊन फिरू शकत होता. टेस्ट मॅचची कॉमेन्टरी ऐकण्यासाठी घरीच बसून राहण्याची गरज नव्हती.

अधिक संशोधनानंतर असे असंख्य ट्रान्झिस्टर एकमेकांना जोडून त्यांची महाकाय आणि गुंतागुंतीची सर्किट अंतर्भूत असलेली चिप बनवता येऊ लागली. घरगुती वापराच्या अनेक उपकरणांमध्ये अशी एक चिप बसवून गृहिणीचं काम अधिक सोपं होऊ लागलं. इतकंच काय पण एकेकाळी एक मोठी खोली व्यापणारा संगणक सहजगत्या तुमच्या टेबलावर आणि नंतर तर मांडीवर येऊन बसला. जटिल, गुंतागुंतीची गणितं सोडवू लागला. 

या अनोख्या बटणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. एका सेकंदात अशा अनेक बटणांची उघडझाप करता येते. त्यामुळंच तर संगणकाला अभिप्रेत असलेली फक्त दोनच शब्दांची भाषा ट्रान्झिस्टर वापरू शकतो. दोनच शब्द. होय किंवा नाही. 

आणि तीही आकड्यांच्या रूपात. एक 

आणि शून्य. थोडक्यात ऑन किंवा ऑफ. पण अशी अनेक बटणं एकत्र गुंफून 

टाकता येऊ लागल्यामुळं मग संगणक तुमचीआमची भाषा बोलू लागला. त्याचा वापर करून लिहिता येऊ लागलं. त्या लेखाचं संपादन करायचं तर खाडाखोड न करता स्वच्छ प्रत तयार करता येऊ लागली. संगणक तुमच्या आमच्याशी संवादही करू लागला. त्यासाठी नवीन चिप तयार झाली. पण त्या चिपचा आत्माही ट्रान्झिस्टरमध्येच दडलेला आहे.

आज माहितीचा महापूर उसळलाय. इंटरनेटवर तऱ्हेतऱ्हेची माहिती आज सहज उपलब्ध झालेली आहे. आपल्याला छळणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवर मिळवणं शक्य झालं आहे. आपण अंतराळयुगात प्रवेश केलाय. आपलंच यान थेट मंगळापर्यंत जाऊन आलंय. तिथं गेल्यावरही धरतीशी संपर्क ठेवून आहे. घोंघावणाऱ्या वादळाच्या प्रवासाची बित्तंबातमी आपल्याला उपग्रह देत आहेत. त्यामुळंच तर मालमत्तेचं नुकसान आपण किमान पातळीवर राखतो आणि जीवितहानी तर पूर्णपणे टाळतो. 

जर ट्रान्झिस्टरचा शोध लागला नसता तर आपलं जगणं आजच्याइतकं सुसह्य झालं असतं का? तुम्हीच करा विचार.

संबंधित बातम्या