मिठात आयोडीन नसेल तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

‘जर तर’च्या गोष्टी

आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या पोषणाची आवश्यकता असते. प्रथिनं, कर्बोदकं, अगदी ज्याला कोलेस्टेरॉल म्हणतात त्याचीही, अल्प प्रमाणात का होईना, गरज असते. जीवनसत्त्वांची तर असतेच. पण त्या शिवाय अनेक खनिजांचीही निरनिराळ्या अवयवांसाठी उपयुक्तता असते. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम तसंच हिमोग्लोबिनचं प्रमाण राखण्यासाठी लोह म्हणजेच आयर्नही हवं असतं. रोगप्रतिकारशक्तीसाठी शरीर झिन्कची मागणी करतं, तशीच इतरही अनेक खनिजं गरजेची असतात. ती अल्प प्रमाणात लागतात म्हणून त्यांना मायक्रोन्यूट्रायन्ट्स म्हणतात.

मायक्रोन्यूट्रायन्ट्स कळीची भूमिका बजावतात. त्यांच्या त्या अल्प प्रमाणात जर खंड पडला तर काही वेळा निरोगी राहणं कठीण होऊन बसतं. आयोडीन हे यापैकीच एक खनिज आहे. आयोडीनची गरज पूर्णपणे भागवण्यासाठी ते मिठात अंतर्भूत केलं जातं. तसं करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे खाद्यपदार्थ कोणताही असो त्याला मिठाशिवाय परिपूर्णता मिळत नाही. त्यामुळं शरीरात हमखास शिरण्यासाठी मिठात जर योग्य प्रमाणात आयोडीन मिसळलं तर मग त्याची गरज पूर्णपणे भागू शकते. मिठात ते नसलं तर मग दुसऱ्या कोणत्या तरी मार्गानं ते आवश्यक त्या  प्रमाणात पोटात जाईल याची तजवीज करावी लागेल. त्यामुळं ते मिठातच असलं पाहिजे असं नाही. पण मीठ हा आवश्यक तेवढं आयोडीन शरीराला मिळण्याचा हमखास मार्ग आहे. विनासायास त्याची उपलब्धता निश्चित करणं त्यापायी शक्य होतं. 

तरीही एक प्रश्न उरतोच. आयोडीनलाही काय असं सोनं लागून गेलंय की ते नाही मिळालं म्हणून हाय खावी लागावी? आपल्या गळ्याच्या खाली जो खळगा असतो, त्याच्या आत थायरॉईड ग्रंथी असते. ती काही प्रथिन संप्रेरकांची निर्मिती करून शरीराला पुरवते. ही संप्रेरकं, वैद्यकीय भाषेत त्यांनी ‘टी३’, ‘टी४’ अशी नावं आहेत. शरीराची निकोप वाढ करण्यात, इजाग्रस्त पेशींना तंदुरुस्त करण्यात आणि एकंदरीतच चयापचय तालबद्ध ठेवण्यात ही संप्रेरकं कळीची भूमिका बजावतात. या संप्रेरकांना कार्यान्वित करण्याचं काम ‘टीएसएच’ नावाचं दुसरं एक संप्रेरक करतं. जेव्हा रक्तातल्या टीएसएचची मात्रा वाढते तेव्हा थायरॉईड ग्रंथी संप्रेरकांच्या निर्मितीला सुरुवात करते. पण जर आयोडीनचा योग्य तो पुरवठा झाला नाही तर मग या संप्रेरकांच्या जडणघडणीवर संख्यात्मक आणि गुणात्मकही परिणाम होतात. त्याचा प्रभाव थायरॉईड ग्रंथीवरही पडून ती सुजू लागते. तीच मग गळ्याखालच्या घळीत उतरून तिथं मोठ्या मोसंबीच्या आकाराचं गळूसारखं उपांग फुटल्याचं दिसतं. त्याला ‘गॉयटर’ म्हणतात. ते आयोडीनच्या कमतरतेचं एक दृश्य लक्षण आहे. जगातली एक तृतीयांश लोकसंख्या आयोडीनच्या कमतरतेची शिकार झालेली आहे, असं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. 

आयोडीनच्या कमतरतेचा सर्वात जास्ती धोका गर्भवती स्त्रियांना असतो. खास करून दक्षिण आशिया म्हणजेच भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, न्यू झीलंड आणि युरोपियन देशांना आयोडीनच्या कमतरतेची समस्या भेडसावते. कारण तिथल्या मातीत आयोडीन पुरेशा प्रमाणात नसतं. त्यामुळं नैसर्गिकरीत्या त्यांच्या शरीराची आयोडीनची गरज भागत नाही. त्यातही जी मंडळी पूर्ण शाकाहारी, म्हणजे मांसमच्छी किंवा अंडं, दूध वगैरे पदार्थही वर्ज्य मानणारी असतात, त्यांना अधिक धोका असतो. कारण ज्याला सागरी अन्न म्हटलं जातं त्या कोळंबी, तिसऱ्या, कुरल्या, सीवीड वगैरे खाद्यपदार्थांत भरपूर आयोडीन असतं. ते खाण्यानं मग अतिरिक्त आयोडीन घेण्याची आवश्यकता भासत नाही. गर्भधारणेच्या काळात होणाऱ्या बाळाची आयोडीनची गरजही मातेलाच पूर्ण करायची असते. प्रसूतीनंतर नवजात शिशूला स्तनपानातून आयोडीन मिळतं. ते व्यवस्थित मिळालं नाही तर त्याच्या वाढीवर, खास करून बाळाच्या मेंदूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्याचा बुद्धिमत्ता विकास खुंटतो. 

काही जणांचं वजन वाढतच जातं. संतुलित आहार घेऊन किंवा व्यायाम करूनही ती मंडळी लठ्ठंभारतीच राहतात. बेढब होतात. त्याचं कारण आयोडीनची कमतरता असू शकतं. काही स्त्रियांना या कमतरतेपायी गर्भधारणा होत नाही. पौगंडावस्थेत ही कमतरता योग्य त्या वाढीला अटकाव करू शकते. तर काही मुलांची आकलनशक्तीही घटलेली असते. त्यापायी ती गतीमंद असल्याची भावना होते.

आपण जे अन्न घेतो त्याचं पचन होऊन त्यातल्या कॅलरीचं रूपांतर शरीरक्रियांना लागणाऱ्या ऊर्जेमध्ये होतं. त्याचं नियंत्रण थायरॉईड ग्रंथी करते. जेव्हा आयोडीनची कमतरता असते त्यावेळी या ऊर्जारूपांतराच्या प्रक्रियेत बाधा येते. अन्नातील कॅलरी रूपांतरित होत नाहीत. त्या चरबीच्या रूपात साठून राहतात. चरबी वाढत गेली की मेद वाढतो. लठ्ठपणा येतो. मिठातून जर आयोडीनचा पुरवठा झाला तर हा बिघडलेला समतोल परत रुळावर आणला जातो आणि मेदवृद्धीला आळा बसतो. 

शरीरक्रियांना आवश्यक तितकी ऊर्जा मिळाली नाही की साहजिकच ते लवकर थकतं. आयोडीनची कमतरता असली की सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत राहतो. याचं एक कारण म्हणजे हृदयाच्या ‘तबलजीचा’ हात थरथरणार नाही यावरही थायरॉईड लक्ष ठेवून असते. जरुरीपेक्षा कमी आयोडीन मिळाल्यास हृदय विलंबित लयीत जातं. उलट जर आयोडीनची मात्रा वाढली तर हृदय एकदम द्रुत लयीत काम करू लागतं. आयोडीनचा पुरवठा योग्य प्रमाणात मिळण्यानं हृदयही त्याच्यावर सोपविलेली कामगिरी इमानेइतबारे करत राहतं. 

थायरॉईड ग्रंथी केसांच्या मुळांनाही बळकटी देण्याचं काम करते. अर्थात त्यासाठी तिला पुरेशा प्रमाणात आयोडीन मिळायला हवं. ते मिळालं नाही तर केसांची मुळं कमकुवत होतात. केस गळून पडतात. त्वचेला तजेलदार ठेवण्याची जबाबदारीही थायरॉईडची असते. साहजिकच आयोडीनच्या कमतरतेपायी त्वचा कोरडी होऊ लागते. तिला पापुद्रे पडू लागतात. ते सुटून कातडीला भेगाही पडू शकतात. याचं एक कारण म्हणजे घाम कमी येतो.. पण कमी घामापायी त्वचेला आवश्यक तितका ओलावा मिळत नाही.

अन्नातल्या पोषणद्रव्यांचं रूपांतर ऊर्जेत करत असताना थायरॉईड शरीराचं तापमान संतुलित राखण्याचंही काम करते. कारण पुरेशा प्रमाणात उष्णता निर्माण करण्याचं कामही बरोबरीनं होत असतं. पण आयोडीनच्या कमतरतेपायी पुरेशी उष्णता निर्माण होत नाही. त्यामुळं थंडीचा मुकाबला करणं शरीराला अवघड जातं. त्या बाबतीत शरीर काहीसं हळवंच होतं. 

मुलगी जेव्हा वयात येते त्यावेळी तर आयोडीनची मात्रा व्यवस्थित मिळणं अत्यावश्यक असतं. ती जर मिळाली नाही तर तिची मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा पाळीच्यावेळी जास्तीच रक्तस्राव होतो. परिणामी ती अशक्त बनते. 

आयोडीन हे अशा तर्‍हेनं अनेक शरीरक्रियांवर मोठा परिणाम करत असतं. वास्तविक ते अल्प प्रमाणातच हवं असतं. पण तेही मिळालं नाही तर काही वेळा कायमच्या दुष्परिणामांना तोंड द्यावं लागतं. मिठातच ते मिसळलं की आपसूकच शरीराला ते मिळू शकतं. 

संबंधित बातम्या