जर चंद्रावर वस्ती करायची असेल तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 6 डिसेंबर 2021


‘जर तर’च्या गोष्टी

चंद्रावर वस्ती करायची तर माणसाच्या मूलभूत गरजांची तृप्ती होईल, याची शाश्वती करणं आवश्यक आहे. कारण ऑक्सिजन, पाणी, अन्न या मूलभूत गरजा आपल्या या ‘मामाच्या’ घरी पूर्ण होण्याची शक्यता धूसरच  आहे.  

दीडशे वर्षांपूर्वी ज्यूल्स व्हर्ननं ‘फ्रॉम अर्थ टू द मून’ ही कथा लिहिली. तेव्हापासून चंद्रावर जाण्याचं, तिथं वस्ती करण्याचं स्वप्न अखिल मानवजात पाहत आली आहे. त्यापैकी चंद्रापर्यंत मजल मारून आपण त्या कादंबरीची शताब्दी साजरी केली. मात्र चंद्रावर जाऊन राहण्याची कल्पना साकार करण्यात अजून तरी यश मिळालेलं नाही. नाही म्हणायला अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनं, नासानं, ‘आर्टेमिस’ प्रकल्प हातात घेत त्या अनोख्या साहसाची नांदी म्हटली आहे. परंतु तो प्रकल्प केव्हा प्रत्यक्षात येईल हे सांगणं त्यांनाही तसं जडच जात आहे. 

मानवानं भटक्या जीवनशैलीचा त्याग करून एके ठिकाणी वस्ती करून राहायला सुरुवात केली, त्यावेळी जी आव्हानं त्याच्या समोर होती तशीच ती आजही आहेत. जंगलात वाढणाऱ्या गवतापासून गहू, तांदूळ यासारख्या तृणधान्यांचा विकास झाला आणि अन्नसुरक्षेच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकता आलं. त्यामुळंच त्यानं नवीन जीवनशैली अंगीकारण्याचं धाडस केलं. तरीही पाणी आणि ऑक्सिजन या मूलभूत गरजा भागवण्याची तरतूद असल्याशिवाय तो हे साहस करायला प्रवृत्त झाला नसता. या जगाच्या पाठीवर ऑक्सिजन सर्वत्र सारखाच आणि मुबलक सापडत असल्यानं ती चिंता मिटली होती. पाणी असंच सतत आणि पर्याप्त प्रमाणात मिळत राहील, याची खातरजमा करण्यासाठी त्यानं मोठमोठ्या नद्यांच्या काठांवरच आपलं पाल टाकायला सुरुवात केली. 

चंद्रावर वस्ती करायची तर या मूलभूत गरजांची तृप्ती होईल, याची शाश्वती करणं आवश्यक आहे. गुहांमधला अधिवास सोडून मानवानं नद्यांच्या दोआबात वस्ती करायला घेण्याइतकं ते सोपं नाही. कारण ऑक्सिजन,  पाणी, अन्न या मूलभूत गरजा आपल्या या ‘मामाच्या’ घरी पूर्ण होण्याची शक्यता धूसरच  आहे. त्यात चांदोबाच्या गुरुत्वाकर्षणाची ओढही कमजोरच आहे. तिचाही विचार करायला हवा. सूर्यमहाराजही आपल्या उष्णतेची ऊब देताना चंद्राविषयी तसा सापत्नभावच बाळगून आहेत. त्यामुळं तिथलं तापमान वस्ती करून राहायला अनुकूल नाही. या सर्वांचीच तरतूद केल्याशिवाय तिथं वस्ती कशी करता येईल!

याचा अर्थ मानवानं चंद्रावर पाऊल ठेवलेलं नाही किंवा अल्प काळ का होईना तिथं वास्तव्य केलेलं नाही, असा नाही. नील आर्मस्ट्रॉंगच्या पावलावर पाऊल ठेवून आजवर इतरांनीही तिथवर मजल मारलेली आहे. पण त्यासाठी त्यांना हवा, पाणी, अन्न वगैरे सगळी रसद बरोबर घेऊन जावं लागलं होतं. स्पेस सूटसारखा खास पोशाख परिधान केल्याशिवाय तिथं क्षणभरही राहता येत नव्हतं. ऑक्सिजनची टाकी बरोबर घेऊनच ही यात्रा करावी लागत होती. झालंच तर आपलं खाणं-पिणंही पाठीवर टाकूनच  त्याला प्रस्थान करता आलं होतं. मर्यादित काळासाठी तसं करणं शक्य होतं. पण तिथं दीर्घ काळासाठी किंवा कायमची वस्ती करायची तर धरतीपासून हे सगळं अवडंबर तिथवर नेणं अशक्यच आहे. शिवाय ही शिदोरी सतत पुरवता यायला हवी. त्यासाठी लागणारा खर्च परवडण्यासारखा तर नाहीच, शिवाय तो पुरवठा अव्याहत चालू ठेवण्यासाठीची यंत्रणा उभी करणंही कठीण आहे. 

यापैकी ऑक्सिजनची तरतूद कदाचित होऊ शकेल. कारण चंद्राच्या जमिनीतल्या मातीत भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आहे. मातीपासून तो अलग करण्यासाठी उष्णता आणि वीज वापरण्याची गरज आहे. तेव्हा ती तजवीज करता येईल. तरीही प्रश्न पडतोच. उष्णता एक वेळ सूर्यप्रकाशातून मिळू शकेल. ती पर्याप्त आहे की काय हे बघावं लागेल. पण समजा त्याची खातरजमा झाली तरी तिथं वीज कुठून आणणार? त्यासाठी तिथं वीजनिर्मिती केंद्राची बांधणी करावी लागणार असेल, तर ते कितपत व्यवहार्य आहे हेही तपासावं लागेल. चंद्रावर जलविद्युत, औष्णिक विद्युत, पवनविद्युत वगैरे सारेच पर्याय निकालात निघतात. केवळ सौरऊर्जेचाच पर्याय सद्यपरिस्थितीत व्यवहार्य ठरेल. पण त्यासाठीही सौर पॅनेल धरतीवरूनच तिथं न्यावी लागतील. शिवाय सूर्यप्रकाशही सतत उपलब्ध नसतो. त्याच्या मात्रेतही सातत्य नाही. त्यामुळं आण्विक वीजनिर्मितीचा विचार करावा असं काही वैज्ञानिकांनी सुचवलं आहे. त्यासाठी आवश्यक असणारं इंधन म्हणजेच युरेनियम चंद्रावर अस्तित्वात असल्याचे काही पुरावे मिळालेले आहेत.

तितकंच महत्त्वाचं आहे पाणी. पाण्याला जीवन म्हणतात. पाण्याशिवाय माणूस जिवंत राहू शकणार नाही. चंद्रावर पाणी असल्याचा शोध आपल्या चांद्रयानानं लावला होता. पण ते एखाद्या पापुद्र्यासारखं असल्याचंही म्हटलं होतं. शिवाय ते चंद्राच्या ध्रुवप्रदेशात गोठलेल्या अवस्थेत आहे. त्याचा वापर करायचा असेल तर त्याचं प्रथम द्रवरूपात अवस्थांतर करावं लागेल. नुसतं तसं करूनही भागणार नाही तर ते वाहतं असायला हवं. 

पृथ्वीवर मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्याचा आपण वापर करू शकतो कारण निसर्गानं इथं कायमचं जलचक्र प्रस्थापित केलं आहे. आपण पिण्यासाठी आणि इतर काही कामांसाठीही शुद्ध पाण्याचा वापर करतो. आपल्या वापरापायी त्या पाण्याचं अशुद्ध अशा सांडपाण्यात रूपांतर होतं. ते बहुतांशी समुद्रात किंवा अशाच इतर जलाशयांमध्ये सोडलं जातं. त्याची वाफ होऊन ढग बनतात आणि ते पावसाच्या रूपानं आपल्याला परत शुद्ध पाणी बहाल करतात. असं जलचक्र जर चंद्रावर प्रस्थापित झालं तरच त्या पाण्याचा व्यापक स्तरावरील वापर शक्य आहे. 

सिंगापूर, इस्राईल सारख्या काही देशांनी सांडपाण्याचं शुद्धीकरण करून त्याचं पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यासाठीची शुद्धीकरण केंद्रही उभारली आहेत. तेव्हा जर नैसर्गिक जलचक्र नसेल तर चंद्रावर अशा शुद्धीकरण केंद्रांची साखळीच बांधावी लागेल. तरच तिथं वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांची पाण्याची गरज भागू शकेल. 

आज अंतराळात कामासाठी जाणारे अंतराळवीर आपल्या बरोबर आपली रसदही घेऊन जातात. मर्यादित काळासाठीच त्यांचा अंतराळस्थानकांवर मुक्काम असल्यामुळं तेवढं अन्न नेण्याची तरतूद करता येते. पण चंद्रावर दीर्घकाळासाठी किंवा कायमची वस्ती करायची असेल तर अन्न तिथल्या तिथंच उपलब्ध होईल अशी व्यवस्था करायला हवी. त्यासाठी चंद्रावरच शेती करावी लागेल. तिथल्या कमी गुरुत्वाकर्षणाच्या आणि हवामानाच्या टोकाच्या पर्यावरणात शेती करणं आव्हानात्मकच आहे. तिथली माती धरतीवर आणून त्यात प्रयोगशाळेतल्या नियंत्रित वातावरणात शेती करण्याचे काही प्रयोग केले गेले आहेत. चंद्रावर शेती करण्यासाठीचे काही धडे त्यातून मिळाले आहेत. त्यांचा वापर करून अंतराळात शेती करण्याच्या काही प्रयोगांचा अंतर्भाव यापुढील चंद्रमोहिमांमध्ये करण्याचा विचार चालू आहे. 

या अनेक अडचणींचा डोंगर पार केल्यावरच आपण चंद्रावर वस्ती करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणू शकू. त्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत याची खूणगाठ मात्र मनाशी बांधायलाच हवी.

संबंधित बातम्या