लस घेतली असेल तर...!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 24 जानेवारी 2022

‘जर तर’च्या गोष्टी

शरीराचं सैन्यदल लिम्फपेशींचं बनलेलं असतं. ते आप-पर भाव या तत्त्वावर काम करतं. आपला कोण आणि परका कोण, याची ओळख पटवण्याचं शिक्षण त्यांना मिळालेलं असतं. बाहेरून शरीरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पदार्थाचं ‘आधारकार्ड’ ते तपासून पाहतं. पदार्थांच्या, मग तो सजीव असो की निर्जीव, आवरणावर काही विशिष्ट प्रथिनं असतात. तेच त्यांची निर्विवाद ओळख पटवणारं आधारकार्ड. त्यांचं वाचन करून येणारा आगंतुक मित्र आहे की शत्रू याची छाननी शरीराचे सैनिक करतात. 

या  चिंतूचं काय करावं हे समजेनासं झालंय. जरा कुठं खुट्ट झालं की स्वतः तर घाबरतोच पण इतरांनाही घाबरवून सोडतो. आताच पाहा ना! त्याच्या दोन मित्रांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्या आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांनी लगेच डॉक्टरांचा सल्लाही घेतला. डॉक्टरांनी दोघांनाही घरातच अलगीकरणात राहायला सांगितलं. काही औषधं दिली. त्यांची तशी काही तक्रार नसावी. पण चिंतू मात्र हडबडून गेला.  

‘असा कसा काय कोरोना होऊ शकतो त्यांना?’

‘का नाही होऊ शकत?’

‘अरे पण त्यांनी लशीचे दोन डोस घेतले होते. त्यांचं लसीकरण पूर्ण झालं होतं. तसं सर्टिफिकेटही आहे त्यांच्याकडे.’

‘तरीही त्यांनी जर नियम पाळले नसतील, मास्क वापरला नसेल, गर्दीत मिसळले असतील, तर त्यांना बाधा होऊ शकते.’

‘लस घेतली असेल तरी?’

‘हो, लस घेतली असेल तरी. लस घेतली म्हणजे बेफिकीर वागण्याचा परवाना मिळाला असं नसतं. लस घेतल्यामुळं संसर्ग टाळता येतो, असं नाही. पण रोगाची तीव्रता कमी करता येते. रोगाशी झगडण्याची शरीराची क्षमता वाढवता येते. त्यामुळं ऑक्सिजनची गरज भासणं, किंवा आयसीयूमध्ये राहावं लागणं टाळता येतं. घरच्या घरी विलगीकरणाचे नियम कठोरपणे पाळले की काम होऊ शकतं.’

‘असं कसं? उपयोग काय मग लशीचा?’

‘हे बघ, आपल्या देशावर हल्ला करू शकणाऱ्या शत्रूला प्रतिबंध करण्यासाठी आपण सैन्यदल ठेवतो. सध्या कुठं लढाई होत नसली तरी त्यांना सतर्क ठेवतो. त्यांना सतत प्रशिक्षण देतो. लुटुपुटीच्या लढायाही करायला लावतो. ‘वॉर गेम्स’ म्हणतात त्याला. आपल्याच सैन्याच्या एका तुकडीला शत्रूची भूमिका पार पाडायला लावून त्याचा मुकाबला करायला दुसऱ्या तुकडीला सांगतो. त्यामुळं शत्रूची रणनीती काय असेल याचा अंदाज घेऊन आपली रणनीती आखण्याचं शिक्षण आपल्या सैनिकांना आपण देतो. ते सतत सज्ज राहतील याची तजवीज करतो. 

पण अशा तऱ्हेनं सैन्यदल डोळ्यात तेल घालून पहारा करत राहिलं म्हणून शत्रू गप्प बसेल, हल्ला करण्याचा प्रयत्नच करणार नाही असं थोडंच होतं! जर आपण सैन्यदलं सुसज्ज ठेवली नाहीत तर काय होईल!

‘शत्रू जोरदार हल्ला चढवून आपल्याला नामोहरम करून टाकेल.’

‘एक्झॅक्टली! लस म्हणजे रोगजंतूविरोधी लुटुपुटीची लढाईच असते. त्याच्याविरुद्ध शरीराला वॉर गेम खेळायला लावण्यासारखं असतं. तो एक लुटुपुटीचा जंतूसंसर्ग असतो. मात्र त्यासाठी वापरला जाणारा रोगजंतू शरीराच्या सैन्यदलाला त्या रोगजंतूची ओळख पटवून देईल पण रोग बाधा आणणार नाही अशा प्रकारचा असतो.  

शरीराचं सैन्यदल लिम्फपेशींचं बनलेलं असतं. ते आप-पर भाव या तत्त्वावर काम करतं. आपला कोण आणि परका कोण, याची ओळख पटवण्याचं शिक्षण त्यांना मिळालेलं असतं. बाहेरून शरीरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पदार्थाचं ‘आधारकार्ड’ ते तपासून पाहतं. पदार्थांच्या, मग तो सजीव असो की निर्जीव, आवरणावर काही विशिष्ट प्रथिनं असतात. तेच त्यांची निर्विवाद ओळख पटवणारं आधारकार्ड. त्यांचं वाचन करून येणारा आगंतुक मित्र आहे की शत्रू याची छाननी शरीराचे सैनिक करतात. 

तो शत्रू आहे याची खात्री पटली की आपल्याच इतर सहकाऱ्यांना त्याची खबरबात देत त्यांना त्या शत्रूला नामोहरम करणाऱ्या अॅन्टिबॉडी नावाच्या शस्त्रांचं उत्पादन करायला प्रवृत्त करतात. आपण लशीचा पहिला डोस घेतो तेव्हा रोगबाधा न आणता या शस्त्रांची निर्मिती केली जाते. पण ती मंदगतीनं होते आणि एकूण उत्पादनही जास्ती होत नाही. पण दुसरा डोस घेतल्यानंतर निर्मितीला वेगही येतो आणि झपाट्यानं उत्पादन उच्च पातळी गाठतं. आता प्रत्यक्ष शत्रूचा हमला झाला तरी त्याच्याशी मुकाबला करायला शरीराचं सैन्यदल जय्यत तयारीत असतं. ते त्याला नेस्तनाबूत करायला पुरेसं असतं. अर्थात काळ उलटला की अॅन्टिबॉडीची संख्या घटते. ती पूर्वपदावर आणण्यासाठी वर्धक मात्रा म्हणजे बूस्टर डोस घ्यावा लागतो.

शत्रू म्हणजेच हे रोगजंतूही बिलंदर असतात. त्यांचा नायनाट करताना त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असली तरी जे बचावतात ते परत आपली नव्यानं जुळवाजुळव करतात. त्यात ते आपलं आधारकार्ड बदलण्याची योजना आखतात. देशाच्या शत्रूंच्या बाबतीतही अशीच परिस्थिती असल्याचं आपण पाहतोच. आधारकार्ड बदलल्यामुळं आता पूर्वीची अॅन्टिबॉडी तितक्या कार्यक्षमतेनं आपलं काम करू शकत नाही. रोगजंतूचा संसर्ग आणि प्रसार झपाट्यानं वाढण्याची शक्यता उद्‌भवते. कोरोनाच्या बाबतीतही आपण पाहत आलोय की अल्फा, बीटा, डेल्टा आणि आता ओमायक्रॉन हे त्याचे निरनिराळे अवतार प्रकट झाले आहेत. प्रत्येकाच्या आधारकार्डात काही लक्षणीय बदल झालेले आहेत. 

तरीही या विषाणूंचं एक वैशिष्ट्यच आपलं संरक्षण करतं. विषाणू हे बांडगुळासारखे असतात. ते आपली वाढ स्वतंत्रपणे करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना नेहमीच कोणत्या तरी यजमानाची आवश्यकता भासते. त्याच्या पोटात शिरून तो अरबाच्या तंबूत शिरलेल्या उंटासारखी त्या यजमानाची सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात घेतो. तिचाच वापर करून तो आपली वाढ करतो. आपल्या असंख्य पिलावळीला जन्म देतो आणि त्या यजमानाला मारून इतरांवर हल्ला करायला सज्ज होतो. तरीही सर्वच यजमानांना मारून टाकलं तर आपलीही वाढ खुंटेल, गच्छंती होईल, याची जाणीव असल्यामुळं तो आपला प्रसार तर होईल पण यजमानही शिल्लक राहतील असं धोरण अवलंबतो. त्यामुळं मग त्याची संसर्गजन्यता वाढते पण संहारकशक्ती क्षीण होते. कोरोनाच्या बाबतीतही आपण याचाच अनुभव घेत आहोत. 

याचा अर्थ असा नाही की आता लस घेतली असेल तर सगळी सावधगिरी धुडकावून लावून मनमानी करता येईल. लस घेतली असली तरी संसर्ग टाळता येत नाही. तो टाळण्यासाठीच मग निर्बंधांचं, नियमांचं काटेकोर पालन करणं जरुरीचं आहे. मास्क घाला, गर्दीत जाणं टाळा, सॅनिटायझर वापरा, हात धुवा. आणि मुख्य म्हणजे लसीचे सर्व डोस कुचराई न करता घ्या. मग कोरोनाचा आणखी एखादा नवीन अवतार आला म्हणून घाबरायचं कारण उरणार नाही.

संबंधित बातम्या