ऑक्सिमीटर ‘वर्णभेदी’ असेल तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

‘जर तर’च्या गोष्टी

अमेरिकेच्या ‘एफडीए’नं, पत्रक काढून गंभीर इशाराच दिला आहे. पल्स ऑक्सिमीटरचं निदान चुकण्याची अनेक कारणं असू शकतात याची जाणीव डॉक्टरांनी ठेवायला हवी, असं सांगून इस्पितळात दाखल झालेल्या किंवा कराव्या लागणाऱ्या रुग्णासाठी जागरूकता बाळगावी, असाच सल्ला ‘एफडीए’नं दिला आहे.

कोरोनाच्या महासाथीनं अनेक बाबींची पहिल्यांदाच ओळख करून दिली आहे. ऑनलाइन शिक्षण, झूमसारख्या मंचावरून सभेचं आयोजन किंवा कौटुंबिक बैठक, क्वारंटाईन, आरटीपीसीआर टेस्ट आणि आणखी कितीतरी.  पल्स ऑक्सिमीटर नावाचं एक यंत्र असतं याची सुतराम कल्पना नव्हती. पण आज तेही सर्वत्र समोर येत आहे. बॅंकेमध्ये, कोणत्याही सरकारी, खासगी कचेरीत, डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये, मॉलमध्ये प्रवेश करायचा तर या ऑक्सिमीटरला नमस्कार केल्याशिवाय पाऊल टाकता येत नाही. 

तसं पाहिलं तर इवलासा जीव वाटतो त्याचा. दोरीवर वाळत घातलेले कपडे वाऱ्यानं उडून जाऊ नयेत म्हणून त्याला जो चिमटा लावतो, त्याचाच हा मोठा भाऊ. जरा जाडजूड आणि वजनदार. वरच्या बाजूला मोबाईलच्या स्क्रीनसारखा एक पडदा. तो चिमटा आपल्या तर्जनीवर अडकवायचा आणि त्यावरचं एक बटन दाबायचं. आता त्या पडद्यावर प्रकाशमान होणाऱ्या आकड्यांचा नाच पाहायचा. तो संपल्यावर जर आकडा ९५ किंवा त्याच्याहून अधिक असेल तर रोखून धरलेला श्वास सोडायचा. 

काय करतो हा इलेक्ट्रॉनिक चिमटा? तो रक्तपेशींमध्ये असलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण मोजतो. रक्तपेशी फुप्फुसाकडून मिळालेलं ऑक्सिजनचं गाठोडं शरीराच्या सर्व भागातल्या पेशींना बहाल करतात. त्या रक्तपेशी ऑक्सिजननं समृद्ध झालेल्या आहेत की नाही याचं निदान ऑक्सिमीटर करतो. जर पुरेपूर ऑक्सिजन असेल तर ते प्रमाण शंभर टक्के मानलं जातं. त्याच्या तुलनेत प्रत्यक्षात किती ऑक्सिजन आहे, हेच ते इवलंसं यंत्र दाखवतं. जर ते प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर मग तुम्ही स्वस्थ आहात असं निदान केलं जातं. जर कोरोनासारख्या श्वसनयंत्रणेला ग्रासणाऱ्या कोणत्याही व्याधीची लागण झाली असेल, तर ते प्रमाण घटलेलं दिसून येतं. रोगनिदानासाठी उपयुक्त असं ते साधन आहे.

म्हणून तर ते सर्वजनसमभाव राखतं हे गृहीत धरलं जातं. पण अलीकडेच अमेरिका आणि इंग्लंडमध्ये केलेल्या संशोधनावरून ऑक्सिमीटर ‘वर्णभेद’ करतो, असं दिसून आलं आहे. गोरी कातडी आणि गव्हाळ किंवा काळी कातडी यांच्यामध्ये ते दुजाभाव दाखवतं. त्यापायीच मग जर तुमची त्वचा गोरी नसेल तर ऑक्सिमीटरचं निदान कितपत अचूक आहे याविषयी शंका घेण्यास जागा राहते, असंच या संशोधनाचं मर्म आहे.

अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठातील मायकेल शोडिन्ग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या मान्यवर नियतकालिकात एक शोधनिबंध प्रकाशित केला आहे. त्यांनी त्या संशोधनासाठी ७,३४२ गौरवर्णीय आणि १,०५० कृष्णवर्णीय रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण दोन वेगवेगळ्या चाचण्या करून मोजलं. एक चाचणी पल्स ऑक्सिमीटर वापरून केली तर दुसरी, रक्तातील वायूचं प्रमाण मोजणारी पारंपरिक चाचणी वापरून केली. पहिली चाचणी केल्यानंतर दहा मिनिटांनीच दुसरी चाचणी केली गेली. त्यामुळं तेवढ्या वेळात रक्तात काही फरक पडण्याची शक्यता नगण्य झाली होती. 

त्यांना असं आढळून आलं, की गौरवर्णीय रुग्णांपैकी केवळ साडेतीन टक्के रुग्णांच्या बाबतीत दोन चाचण्यांमध्ये तफावत दिसली. ज्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण ८८ टक्क्यांहूनही कमी होतं, ऑक्सिमीटर त्यांचं प्रमाण ९५ टक्के निकषापेक्षा जास्ती असल्याचं दाखवत होतं. पण कृष्णवर्णीयांच्या बाबतीत ही तफावत तब्बल साडेअकरा टक्क्याहून जास्ती होती. थोडक्यात ज्या रुग्णांना उपचारांची आवश्यकता होती, अशांना ते निरोगी असल्याचं प्रमाणपत्र देऊन घरी पाठवण्यात येत होतं. कोरोना रुग्णांच्या बाबतीत अशी ढिलाई जीवघेणी ठरू शकली असती. 

इंग्लंडमध्येही मग असंच संशोधन हाती घेतलं गेलं. त्यात रुग्णांचे तीन गट करण्यात आले. गौरवर्णीय, सावळ्या वर्णाचे आणि कृष्णवर्णीय रुग्ण. इथंही ऑक्सिमीटर गौरवर्णीयांना झुकतं माप देत असल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या बाबतीतलं निदान अचूक होतं. पण इतर दोन गटांमधल्या व्यक्तींच्या बाबतीत अचूकतेचं प्रमाण लक्षणीयरीत्या घटलेलं दिसून आलं. अमेरिकेतल्या अन्न आणि औषध प्रशासन संस्था ‘एफडीए’नं, तर आता पत्रकच काढून याबाबतीत गंभीर इशारा दिला आहे. ‘पल्स ऑक्सिमीटरचं निदान चुकण्याची अनेक कारणं असू शकतात याची जाणीव डॉक्टरांनी ठेवायला हवी. त्वचेचा रंग, त्वचेची जाडी, त्वचेचं तापमान, तंबाखूच्या वापरापायी काळवंडलेली त्वचा किंवा नखांना लावलेलं नेलपॉलिश या गोष्टी निदानातली अचूकता घालवू शकतात. त्यामुळं केवळ त्यावर अवलंबून राहू नये’, असंच हे पत्रक सांगतं. एखाद्या इमारतीत प्रवेश देताना कराव्या लागणाऱ्या झटपट चाचणीसाठी ते उपयुक्त असलं, तरी इस्पितळात दाखल झालेल्या किंवा कराव्या लागणाऱ्या रुग्णासाठी जागरूकता बाळगावी, असाच सल्ला ‘एफडीए’नं दिला आहे. ‘वंशभेद’, ‘रेशियल बायस’ असा स्पष्ट शब्दप्रयोग जरी या पत्रकात केला गेला नसला, तरी त्वचेचा रंग निदानाच्या अचूकतेवर परिणाम करतो हे त्यात म्हटलं गेलं आहे. 

हा ‘वर्णभेद’ या चिमुकल्या यंत्राकडून का केला जातो, हे समजून घेण्यासाठी त्याचं काम कसं चालतं याची माहिती घेणं अगत्याचं आहे. या यंत्रात एक इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर आणि दोन एलईडी प्रकारचे दिवे असतात. एक दिवा लाल रंगाचा प्रकाश देतो तर दुसरा अवरक्त म्हणजे इन्फ्रा रेड रंगाचा प्रकाश देतो. हे दोन्ही किरण त्वचेवर आदळून बोटाच्या आरपार जातात आणि चिमट्याच्या पलीकडच्या भागात असलेल्या त्या रंगांचं मोजमाप करणाऱ्या संवेदकाला भिडतात. तो बोटातल्या रक्ताकडून त्या रंगांचं किती शोषण झालं आहे हे मोजतो. 

रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं. शुद्ध रक्तात ते ऑक्सिजननं समृद्ध असतं. त्याचा रंग लालभडक असतो. ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं आहे अशा अशुद्ध रक्ताचा रंग फिकुटलेला असतो. शुद्ध रक्त अवरक्त किरण जास्ती प्रमाणात शोषतात आणि लाल किरणांना आरपार जाऊ देतात. अशुद्ध रक्ताची वागणूक यापेक्षा वेगळी असते. त्याचं विश्लेषण करून रक्तातल्या ऑक्सिजनच्या प्रमाणाचं निदान त्या चिमट्यासारख्या यंत्राकडून केलं जातं.

या प्रक्रियेतल्या पहिल्या पायरीवर किरण त्वचेतून पुढं जातात. पण या यंत्राच्या अचूकतेसाठी घेतल्या गेलेल्या चाचण्या केवळ गौरवर्णीय व्यक्तींवरच घेतल्या गेल्या असल्यामुळं त्वचेचा रंग वेगळा असल्यास त्वचा किती प्रमाणात रंग शोषते याचं सर्वेक्षण केलंच गेलेलं नाही. यापायीच मग त्या यंत्राच्या निदानातल्या अचूकतेत फरक पडतो. यंत्राकडून जाणूनबुजून वंशभेद केला जात नाही. परंतु त्याचं कॅलिब्रेशन करण्यासाठी केलेल्या चाचण्या अपुऱ्या असल्यामुळं हा दोष उद्‌भवला आहे. उत्पादकांकडून अनवधानानं घडलेल्या या गफलतीचं खापर मात्र त्या बिचाऱ्या यंत्रावर फोडलं जात आहे. 

याचा अर्थ ते यंत्र कुचकामी आहे असा मात्र नाही. ते निश्चितच उपयोगी आहे. मात्र त्याच्या निष्कर्षाबाबतीत डॉक्टरांनी तारतम्य बाळगण्याची आवश्यकता या संशोधनानं अधोरेखित केली आहे.

संबंधित बातम्या