ओझोनचं कवच नष्ट झालं तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

‘जर तर’च्या गोष्टी

क्लोरोफ्लोरोकार्बनवर बंदी आणण्यासारख्या काही उपाययोजनांमुळं ओझोनच्या कवचाला पडलेलं छिद्र बुजवण्यात आपल्याला चांगलं यश मिळालं आहे. तरीही धोका संपूर्णपणे टळलेला नाही. या कवचावर सतत नजर ठेवून ते अखंड आणि अबाधित राहत आहे याची खातरजमा करून घेतली जात आहे. म्हणूनच हे कवच जर नष्ट झालं, ओझोनचा हा थर नाहीसाच झाला, तर काय होईल? याचा विचार करणं भाग आहे.

सध्या जिकडेतिकडे क्लायमेट चेन्ज, हवामान बदलाचा नारा ऐकू येतो. ‘धरतीला आलाय ताप’ असंच म्हटलं जातं. कारण पृथ्वीचं सरासरी तापमान वाढतंय. तसं पाहिलं तर ही वाढ असेल अर्ध्या किंवा एका अंशाची. पण तीही सहन करणं कठीण होत चाललंय. नाहीतरी आपल्यालाही ताप येतो तेव्हा तापमान एखाद्या अंशानंच वाढलेलं असतं. 

तसाच काही वर्षांपूर्वी नारा होता ‘आभाळ फाटलंय’ असा; ‘आभाळाला भोक पडलंय’ असा. हे कसं शक्य आहे असं आपल्याला वाटेलच. धुवाधार पाऊस कोसळत असला की आपण म्हणतो, आभाळ फाटल्यासारखा बदाबदा पडतोय पाऊस. पण ते अलंकारिक अर्थानं. थोडाफार अतिशयोक्तीचा आसरा घेत. पण त्या काळात खरोखरीच आभाळ फाटल्यासारखीच परिस्थिती होती.

आपण आभाळ एकसंध असल्याचं म्हणतो. पण वैज्ञानिकांच्या मते आपलं वातावरण निरनिराळ्या थरांचं बनलेलं आहे. सर्वात खालचा थर आहे ट्रॉपोस्फिअरचा. समुद्रसपाटीपासून दहा किलोमीटर उंचीपर्यंत हा थर पसरलेला आहे. जगातील सर्वात उंच पर्वतशिखर एव्हरेस्टची उंची साडेआठ किलोमीटरपेक्षा थोडी जास्त (८८४८.८६ मीटर) आहे. म्हणजेच ते ट्रॉपोस्फिअरच्या सीमारेषेजवळ पोचलेलं आहे. 

आपल्या हवामानाशी निगडित ज्या ज्या काही घटना होतात, प्रक्रिया होतात, त्या सगळ्या या थरातच होतात. जमिनीजवळची गरम झालेली हवा हलकी असल्यामुळं वर जाते, तिथल्या थंड वातावरणाशी संपर्क आल्यावर त्या वाफेचं द्रवरूप पाण्यात रूपांतर होतं आणि ती परत जमिनीवर उतरते. थोडक्यात ट्रॉपोस्फिअरमध्ये सतत अशी खळबळ चालू असते. त्याच्या वरचा थर हा स्ट्रॅटोस्फिअर म्हणून गणला जातो. हा दहा किलोमीटर पासून पन्नास किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेला आहे. हवाई वाहतूक करणारी काही विमानं तितक्या उंचीवर पोचतात. काही काळ या थरातूनच प्रवास करतात. अशा प्रवासात काही वेळा वैमानिक आपल्याला बाहेरचं तापमान किती आहे हे सांगतो. ते चांगलंच थंड असल्याचंही आपल्याला समजून येतं. पण त्याहून अधिक उंचीवर गेल्यास मात्र तापमान चढलेलं असल्याचंच दिसून आलं आहे.  

आपण वाचलेलं असतं की वातावरणात जसजसं अधिक उंचावर जावं तसतसं तापमान घसरतं, अधिकाधिक थंड होतं. ट्रॉपोस्फिअरच्या बाबतीत ते खरं असल्याचंही सिद्ध झालं आहे. पण निसर्ग विचित्र आहे म्हणतात याचा प्रत्यय स्ट्रॅटोस्फिअरमध्ये येतो. कारण त्याचा काही भाग अधिक उंचीवर असूनही तिथे मात्र तापमान चढंच राहतं. याचं प्रमुख कारण म्हणजे तिथं असलेला ओझोन वायूचा थर. पृथ्वीला लाभलेलं ते एक कवचच आहे.

पंधरा ते तीस किलोमीटर उंचीच्या पट्ट्यात हे कवच असतं. आपल्या ओळखीच्या ऑक्सिजनच्या रेणूमध्ये त्याचे दोन अणू असतात. पण ओझोन वायूच्या रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असतात. या वायूची क्लोरिन वायूशी गाठ पडली तर तो नष्ट होतो. पण सूर्यप्रकाशाची ऑक्सिजनशी प्रक्रिया होऊन त्यातून ओझोनची नव्यानं निर्मिती होते. 

आपल्या घरातल्या रेफ्रिजरेटरमधली हवा थंड करण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन वायूचा वापर होत असे. तो वातावरणात वरवर जात स्ट्रॅटोस्फिअरमध्ये साचत असे. त्यातून मोकळ्या झालेल्या क्लोरिनचा संपर्क ओझोनशी आला की ओझोनची गच्छंती ठरलेलीच. हे ध्यानात आल्यावर पर्यावरण संरक्षणासाठी जपानमधील क्योटो आणि कॅनडातील मॉन्ट्रियल इथं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरमधल्या क्लोरोफ्लोरोकार्बनच्या वापरावर निर्बंध आले आहेत. तरीही इतर काही प्रक्रियांमध्ये त्यांचा वापर अजूनही होत आहे. त्याचा कितपत प्रभाव ओझोनच्या कवचावर पडतो यासंबंधीचं संशोधन होत आहे. हे ओझोनचं कवच पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीला निसर्गानं दिलेलं वरदानच आहे. कारण सूर्यप्रकाशात जे जंबुपार, म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट, यासारखे काही घातक किरण असतात. ते ओझोनकडून शोषले जातात. त्यात ओझोनची आहुती पडत असली तरी ते किरण सजीवांपर्यंत पोचू न देण्याची कामगिरी ओझोनचं कवच पार पाडतं. किंबहुना ते कवच वातावरणात तयार झाल्यानंतरच पृथ्वीवर सजीव सृष्टीचा उदय झाला. 

परंतु नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडण्याच्या माणसाच्या प्रवृत्तीपायी खास करून अंटार्क्टिकाच्या वर असलेल्या या कवचाला गळती लागली होती. टक्कल पडू लागलेल्या व्यक्तीचे केस जसे विरळ होत काही ठिकाणी पार उडून जातात तसंच हे कवच विरळ होत होत काही ठिकाणी तर साफ मोकळं झालं होतं. त्याच संदर्भात ‘आभाळाला भोक पडलं’ असं म्हटलं जात असे. ती चिंताजनक परिस्थितीच होती. कारण आता सूर्यकिरणांमधल्या घातक घटकांना थोपवणारं कोणीच नव्हतं. ते सरळ सरळ पृथ्वीवर अवतरले तर सजीव सृष्टीचं अस्तित्वच धोक्यात आलं असतं. क्लोरोफ्लोरोकार्बनवर बंदी आणण्यासारख्या काही उपाययोजनांमुळं ते भोक बुजवण्यात आपल्याला चांगलं यश मिळालं आहे.

तरीही धोका संपूर्णपणे टळलेला नाही. या कवचावर सतत नजर ठेवून ते अखंड आणि अबाधित राहत आहे याची खातरजमा करून घेतली जात आहे. म्हणूनच हे कवच जर नष्ट झालं, ओझोनचा हा थर नाहीसाच झाला, तर काय होईल? याचा विचार करणं भाग आहे.

काही नैसर्गिक प्रक्रियासुद्धा ओझोनच्या ऱ्हासाला कारणीभूत होऊ शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा वातावरणात बरीच धूळ, पाण्याचे थेंब फेकले जातात. ते किती उंचीवर जातात याला महत्त्व आहे. तरीही फवारा मारल्यासारखे काही छोटे कण तसंच पाण्याचे थेंब सूर्यकिरणांचं शोषण तरी करतात किंवा त्यांना वेगळ्याच दिशेनं जायला प्रवृत्त करतात. हे कण आणि थेंब क्लोरिनच्या ओझोनशी होणाऱ्या प्रक्रियेला अधिक तीव्र करतात. त्यापायीही ओझोनच्या कवचाला छेद जाऊ शकतो. 

अर्थात क्लोरिन काही फक्त क्लोरोफ्लोरोकार्बनमध्येच असतो असं नाही. पाण्याचं शुद्धीकरण करतानाही क्लोरिन वापरला जातो. तरणतलावांतल्या पाण्यातही क्लोरिन सोडला जातो. काही कारखान्यांमध्ये तसंच समुद्रातल्या क्षारांमध्येही क्लोरिन असतो. पण तो स्ट्रॅटोस्फिअरपर्यंत पोचत नाही. त्यामुळं त्याचा ओझोनशी संपर्क होण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. ओझोनच्या गळतीला तो कारणीभूत होऊ शकत नाही. म्हणूनच वातावरणाच्या वरच्या थरापर्यंत पोचू शकणाऱ्या क्लोरिनचं उत्सर्जन कमी केलं तर ओझोनच्या कवचाला धक्का पोचणार नाही. ते कवच भेदलं गेलं किंवा नष्ट झालं तर जीवसृष्टी अस्तंगत होण्याची पाळी येऊ शकते. ते टाळता येणं आपल्याच हातात आहे.

संबंधित बातम्या