झाड कोसळणार असेल तर...

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 11 एप्रिल 2022

‘जर तर’च्या गोष्टी

झाड कोसळून पडणार असेल तर तसा काही संदेश मिळवता आला तर झाडाला वाचवण्यासाठी काही तजवीज नाही का करता येणार? सिंगापूरमधल्या सेन्टोसा या लोकप्रिय पर्यटन स्थळाच्या व्यवस्थापकानेही असाच प्रश्न स्वतःला विचारला होता. तिथंही गेल्या काही वर्षांत महाकाय वृक्ष एकाएकी पडण्याच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या. त्यात काही पादचाऱ्यांचे बळीही गेले होते. ज्या ठिकाणाला जगभरचे लक्षावधी पर्यटक दरवर्षी आवर्जून भेट देतात तिथं अशा दुर्घटना होणं परवडणारं नव्हतं.

अकस्मात काऽऽ ड ऽऽऽ कडाड् असा आवाज झाला. पक्ष्यांचा थवा चीं चीं करत उडून गेला. काय झालंय हे पाहण्यासाठी बाल्कनीत गेलो तर आमच्या सोसायटीच्या बागेतला, आमच्या जवळच्या कोपऱ्यातला एक भला मोठा वृक्ष उन्मळून पडला होता. आडवार पसरला होता. त्याची काही मुळं अजूनही बुंध्याला चिकटून होती. बाकीची अर्धवट मातीतच राहिली होती. पन्नास वर्षं जुना वृक्ष. चांगलाच पसरलेला. पर्णभारानं लगडून गेलेला, असा ध्यानी मनी नसता असा कोसळून पडल्याचं दुःख होतंच. पण त्याच्या जाण्यानं ओकंबोकं झालेलं मैदान केविलवाणं दिसत होतं. 

तरी बरं बागेतलं काही गवत आणि कडेकडेची काही झुडुपं सोडली तर त्या पडलेल्या झाडाखाली इतर काही अडकून पडलं नव्हतं. नेहमीच असं होतं असं नाही. काही वेळा असं झाड तिथंच पार्क केलेल्या एखाद्या गाडीवर पडतं, तिचा चक्काचूर होतो. कधी शेजारच्या इमारतीतल्या बाल्कनीवर कोसळतं, तिचं बरंच नुकसान करतं. काही वेळा तर अशा डेरेदार वृक्षाच्या सावलीत निवांत बसलेल्या कोणावर कोसळतं किंवा तिथून जाणाऱ्या एखाद्या पादचाऱ्याच्या डोक्याचा वेध घेत उन्मळून पडतं; त्याचा जीव घेतं. पर्यावरणाचं नुकसान तर असतंच पण त्याच्या जोडीला मालमत्तेची किंवा जीविताची अशी हानी होते. 

तो वृक्ष असा कोसळून पडणार असल्याची काहीही चिन्हं दिसलेली नसतात. नेहमी पाहतो त्याच दिमाखात तो उभा असतो. वाऱ्याबरोबर त्याच्या पानांची सळसळ ऐकवत असतो. एखाद्या धट्ट्याकट्ट्या व्यक्तीला एकाएकी हृदयविकाराचा तीव्र झटका येत तो जागच्या जागीच धराशायी व्हावा तशातलीच गत. वरवर काहीही कारण नसताना असा वृक्ष मातीमोल होतो. अशा वेळी वाटत राहतं की त्याची अंतिम घटिका अशी जवळ आली आहे याची पूर्वसूचना मिळण्याची काही व्यवस्था झाली तर आपत्ती व्यवस्थापनाची काही उपाययोजना करता येईल. झाड कोसळून पडणार असेल तर तसा काही संदेश मिळवता आला तर झाडाला वाचवण्यासाठी काही तजवीज नाही का करता येणार?

सिंगापूरमधल्या सेन्टोसा या लोकप्रिय पर्यटन स्थळाच्या व्यवस्थापकानेही असाच प्रश्न स्वतःला विचारला होता. तिथंही गेल्या काही वर्षात महाकाय वृक्ष एकाएकी पडण्याच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या. त्यात काही पादचाऱ्यांचे बळीही गेले होते. ज्या ठिकाणाला जगभरचे लक्षावधी पर्यटक दरवर्षी आवर्जून भेट देतात तिथं अशा दुर्घटना होणं परवडणारं नव्हतं. ती जागा धोकादायक आहे असा संदेश गेला तर पर्यटकांची संख्या चांगलीच रोडावेल अशी भीती त्यांना वाटत होती. 

ते टाळण्यासाठी त्यांनी विमानाचं नियंत्रण करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेची आराधना केली. विमान उंचीवरून उडत असताना ते सरळसोट जातं आहे यावर चालकाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. ते कोणत्याही एका बाजूला प्रमाणाबाहेर झुकत नाही याची खातरजमा क्षणोक्षणी करून घ्यावी लागते. काही प्रमाणात विमानाचं झुकणं अनिवार्य असतं, किंबहुना आवश्यकही असतं. पण ते हाताबाहेर जात नाही याची तजवीज करावी लागते. त्यासाठी विमानाचा झुकाव किती आहे याची बित्तंबातमी तर मिळवावी लागतेच, पण तो आटोक्यात राहील यासाठीही उपाययोजना करावी लागते. अत्याधुनिक विमानात हे आपोआप होत राहतं. घरातल्या एअरकंडिशनर कसा खोलीचं तापमान निर्धारित पातळीवर राहील याची स्वयंचलित सोय करतो, तशातलाच हा प्रकार. पण त्यासाठी प्रथम तो झुकाव मोजण्याची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी खास इलेक्ट्रॉनिक संवेदक, सेन्सर, आता विकसित केले गेले आहेत. किती झुकाव चालू शकेल याचा अंदाज घेऊन तो चालकानं नियंत्रित केला की तो राखला जाईल याची तजवीजही इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमार्फतच केली जाते. 

त्याच संवेदकांचा वापर आपल्या समस्येचं निराकरण करण्यासाठी नाही का वापरता येणार, असा विचार सेन्टोसातल्या तज्ज्ञांनी केला. झाड जरी आपल्याला स्थिर भासलं तरी त्याची सतत हालचाल चालूच असते. जेव्हा वारा वेगानं वाहत असतो तेव्हा ती सहजगत्या आपल्या नजरेत भरते. गेल्या पावसाळ्यात परिसरातल्या नारळाच्या झाडाची अशी लक्षणीय, म्हटलं तर भीतीदायक, आंदोलनं टिपणारा एक व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सादर केला होता. पण जोमदार वारा नसला तरी अशी आंदोलनं होतच राहतात. त्यामध्ये झाड एका बाजूला आणि तिथून मूळपदावर येत दुसऱ्या बाजूला झुकत राहतं. हे संवेदक त्यावर लक्ष ठेवून त्याची माहिती देत राहतात.

पण हा झाला बुंध्याचा किंवा खोडाचा झुकाव. झाडाची मुळं, जी जमिनीत खोलवर असल्यामुळं दृष्टीला पडत नाहीत तीही स्थिर नसतात. त्यांचीही सतत हालचाल होत असते. कारण या मुळांना जमिनीला घट्ट धरून राहण्याची गरज असते. मातीत सतत बदल होत असतात. तिच्यामध्ये शिरणाऱ्या पाण्यापायी तिची स्थिती कायम राहत नाही. कधी पाणी जास्त झालं तर तिचा चिखल होतो. अर्थप्रवाही होतो. उलट ते कमी झालं तर ती कोरडी पडते. तिचे कण एकमेकांना धरून राहणं कठीण होतं. या बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुळंही हालचाल करत राहतात. त्यांच्या या हालचालीचा परिणाम ते झाडंच एका किंवा दुसऱ्या बाजूला थोड्या प्रमाणात झुकण्यात होतो. 

मुळांच्याही या हालचालीची क्षणाक्षणाची माहिती हे इलेक्ट्रॉनिक संवेदक मिळवतात. त्या हालचालीचा आलेखही काढता येतो. वृक्षसंवर्धनाची कामगिरी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना तो देत राहतो. झाडाच्या गुरुत्त्वमध्याच्या संदर्भात तो झुकाव किती आहे याचा अंदाज घेत मग त्या झुकावापायी झाडाला हानी तर पोचत नाही ना याचा निर्णय घेत कर्मचारी आवश्यक ती उपाययोजना करू शकतात. झाडाला आधार देता येतो. मुळांभवतीची माती पर्याप्त स्थितीत राहील याची तजवीज करता येते. त्यांच्याजवळ जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला आवर घालता येतो. 

सेन्टोसामधील तब्बल दोनशे झाडांना अशा संवेदकांचा आधार देण्यात आला आहे. ते त्यांची निगा राखतील, किमानपक्षी ते वृक्ष जमीनदोस्त होण्याच्या स्थितीला आलेच असतील तर त्यांची आगाऊ सूचना देऊन त्यापायी मालमत्तेची आणि जीविताची हानी होणार नाही, याची दक्षता घेता येईल. कोणत्याही एका समस्येवर मात करण्यासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा त्या क्षेत्राशी काडीचाही संबंध नसलेल्या दुसऱ्याच क्षेत्रात वापर करण्याची कल्पकता दाखवता येते, त्या तंत्रज्ञानाचं उपयोजन क्षेत्र विस्तारता येतं, याचंच हे संवेदक बोलकं उदाहरण आहेत.

संबंधित बातम्या