रासायनिक शस्त्रं वापरली तर

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 2 मे 2022

‘जर तर’च्या गोष्टी

रासायनिक शस्त्रांची ओळख पटली असली तरी त्यांच्या परिणामांवर कोणताही इलाज अजून तरी सापडलेला नाही. जर त्यांचा वापर केला गेलाच तर त्यानंतर त्याला विरोध करणं कठीणच नव्हे तर अशक्यच आहे. त्यांना रोखण्याचे, त्यांचा वापर होऊ न देण्याचे जे काही मार्ग आहेत त्यांच्यावरच विसंबून राहावं लागत आहे. म्हणूनच अलिखित आंतरराष्ट्रीय करारानुसार त्यांच्या वापरावर अघोषित बंदी आहे,

युक्रेनविरुद्धचं युद्ध लांबत चालल्यावर रशियाकडून रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यात येईल, अशी भीती अमेरिका तसंच युरोपीय राष्ट्रांनी व्यक्त केली होती. त्याला उत्तर म्हणून अमेरिकेनं युक्रेनमधील प्रयोगशाळांमध्ये जैविक अस्त्रं विकसित करण्याचा कार्यक्रम आखला असल्याचा आरोप रशियानं केला. पारंपरिक शस्त्रांचा वापर तेवढा परिणामकारक ठरत नसल्याचा अनुभव आल्यानंतर आता युद्धखोर राष्ट्रं या वेगळ्या प्रकारच्या शस्त्रात्रांकडे वळण्याच्या शक्यतेवर सगळेच गांभीर्यानं विचार करू लागले आहेत. जर खरोखरच रासायनिक शस्त्रांचा वापर केला गेला तर त्याचा प्रतिकार नेमका कसा करायचा, ती शस्त्रं बोथट करण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल, याचा विचार करणं आता  अनिवार्य होऊ पाहत आहे. अर्थात त्यासाठी रासायनिक शस्त्रांचं स्वरूप काय असतं आणि ती आपली कामगिरी कशी बजावतात हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.

माणसांना किंवा गुरांना इजा पोहचवण्याची, प्रसंगी त्यांचा जीव घेण्याची क्षमता असणारं कोणतंही विषारी रसायन या शस्त्रांचा गाभा असतो. वनस्पतींचा नाश करणाऱ्या रसायनांचाही यातच समावेश केला जातो.  शरीरातील घटकांशी, पेशींशी होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेद्वारे ही रसायनं विध्वंस घडवून आणतात. तोफगोळे, बंदुकांच्या फैरी, क्षेपणास्त्रे, भूमिगत सुरुंग किंवा साधा फवारा मारणारं कोणतंही उपकरण यांच्या मदतीनं या रसायनांचा मारा करता येतो. अर्थात नेमकं कोणतं रसायन वापरलं आहे यावर ते शरीरावर  कोणती प्रक्रिया करणार आहे आणि कोणत्या मार्गानं हानी पोचवणार आहे हे ठरतं.

या रसायनांचे मुख्यतः चार प्रकार केले गेले आहेत. एका प्रकाराला ‘नर्व्ह एजंट’ असं म्हणतात. मज्जातंतूंवर व एकंदरीतच चेता संस्थेवर त्यांचा घातक परिणाम होतो. चेतासंस्था सर्वच शारीरिक, ऐच्छिक तसंच अनैच्छिक, हालचालींचं नियंत्रण करत असल्यामुळं अशा प्रकारचा हल्ला म्हणजे ‘मूले कुठारः’ अशाच प्रकारचा असतो. मुळावरच घाव घातला की मग वृक्ष कोसळून पडायला कितीसा वेळ लागेल, हीच विचारसरणी या प्रकारच्या अस्त्रांचा विकास करण्यास प्रवृत्त करते. 

मध्यवर्ती मज्जासंस्था तसंच शरीरभर पसरलेलं मज्जातंतूंचं जाळं यावर या रसायनांचा प्रभाव पडला की स्नायू मोठ्या प्रमाणावर चाळवले जातात. त्यांची हालचाल अनियंत्रित होऊ लागते. शरीरातील महत्त्वाच्या ग्रंथींच्या कामकाजातही अडथळे निर्माण होतात. परिणामी त्यांच्यामधून पाझरणाऱ्या संप्रेरकांचं प्रमाण  अनियंत्रित होतं. ते आवश्यकतेपेक्षा जास्ती तरी होतं किंवा एकदम आटतं. साहजिकच त्यांची टोचणी मिळाल्यानं होणार्‍या शरीरक्रिया विकृत स्वरूप धारण करतात. त्याचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. तो जर आटोक्यात आणता आला नाही तर मृत्यूही होऊ शकतो. ‘सारिन’, ‘सोमान’ आणि ‘व्हीएक्स’ ही या प्रकारची सध्या उपलब्ध असलेली अस्त्रं आहेत. ती द्रवरूप, फवारा, पावडर किंवा धूर यापैकी कोणत्याही स्वरूपात वापरली जाऊ शकतात.

प्रामुख्यानं श्वसनक्रियेला घातक ठरणाऱ्या रसायनांना ‘चोकिन्ग एजंट’ म्हटलं जातं. ते सर्वार्थानं समर्पक आहे. कारण ती रसायनं शब्दशः गळा घोटणारी ठरतात. नाक, घसा आणि फुप्फुसं याच्या स्नायूंवर यांचा परिणाम होतो. आणि ते आपली निसर्गदत्त कामगिरी नीटपणे पार पाडू शकत नाहीत. हवेत ती पसरवलेली असतील तर फुप्फुसांमध्ये ती ओढली जातात, तसंच त्वचेमधूनही ती शरीरात शिरकाव करू शकतात. श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यामुळं शरीरात पर्याप्त प्रमाणात प्राणवायू शोषला जात  नाही, तसंच कार्बन डाय ऑक्साईडचा निचराही व्यवस्थित होत नाही. प्राणवायूचं प्रमाण घटलं तर निरनिराळ्या अवयवांना त्याचा पुरेसा पुरवठा होत नाही, त्यांना गरजेची असणारी ऊर्जा मिळत नाही. सर्वच अवयव असे निकामी होऊ लागले तर मृत्युपंथाला लागायला सुरुवात होते. क्लोरिनसारखा एरवी उपयुक्त ठरणारा वायूही ‘डॉ. जेकिल ॲण्ड  मिस्टर हाईड’ सारखं आपलं दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व दाखवत  प्राणघातक ठरू शकतो. वायुरूपातच त्याचा प्रसार करणंही सोपं जातं.

तिसऱ्या प्रकारची रसायनं प्रथम त्वचेवर फोड आणतात. सुरुवातीला नुसतीच खाज येते पण हळूहळू ती वाढत जाऊन लालसर पुरळ उठते. डोळे, बाह्यत्वचा तसंच श्वसनसंस्था ही या रसायनांची लक्ष्यं आहेत. श्वासोच्छ्वासाद्वारे या रसायनांनी शरीराच्या अंतर्भागात प्रवेश मिळवला तर मग अनेक अवयवांना या  फोडांची लागण होते. सल्फर मस्टर्ड आणि नायट्रोजन मस्टर्ड ही अशा शस्त्रांची काही उदाहरणं आहेत. त्यांचा हल्ला करण्यासाठी द्रवरूप, धूर, पावडर आणि फवारा यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करता येतो.

थेट रक्ताभिसरणावर हमला करणाऱ्या रसायनांचा आणखी एक गट आहे. हवेतून घेतलेल्या प्राणवायूचं पेशींना आवश्यक असणाऱ्या ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी ज्या रासायनिक प्रक्रिया होतात त्यांच्यामध्येच अडथळा आणण्याची व त्यापायी त्यांचं विकृतीकरण करण्याची कामगिरी ही रसायनं पार पाडतात. चहूकडे पाणी असूनही प्यायला थेंब नाही, अशी जी अवस्था होत असते त्याच प्रकारे प्राणवायू भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही त्याचा वापर करता येत नाही. मुख्यत्वे श्वासोच्छ्वासातूनच ही रसायनं शरीरात प्रवेश मिळवतात आणि रक्तप्रवाहाद्वारेच शरीराच्या कानाकोपर्‍यात पोचतात. हैड्रोजन सायनाईड आणि सायनोजेन क्लोराईड ही या प्रकारची महाविघातक अस्त्रं आहेत.

ही झाली पारंपरिक रासायनिक शस्त्रं. पण ज्या प्रकारे अल कायदानं अमेरिकेवर हल्ला करताना प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांनाच शस्त्र बनवलं होतं, त्याच प्रकारे एका अनोख्या रासायनिक शस्त्राचा वापर  रशियनांनी लिटव्हिनेन्को या गुप्तहेराविरुद्ध केला होता. लिटव्हिनेन्को हा रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संस्थेचाच घटक होता. पण तो पाश्चात्त्य राष्ट्रांना सामील झाला होता आणि इंग्लंडमध्ये त्यानं स्थलांतर केलं होत. तिथं तो असतानाच रशियाचे दोन गुप्तहेर तिथं पोचले आणि लिटव्हिनेन्कोला चहापानाला बोलावून त्यांनी त्याच्या चहाच्या प्याल्यात पोलोनियम हा किरणोत्सर्गी पदार्थ मिसळला. तो लिटव्हिनेन्कोच्या शरीरात मिसळल्यावर त्याच्या प्रभावाखाली तो अक्षरशः तिळ तिळ मरत गेला.

रासायनिक शस्त्रांची ओळख पटली असली तरी त्यांच्या परिणामांवर कोणताही इलाज अजून तरी सापडलेला नाही. जर त्यांचा वापर केला गेलाच तर त्यानंतर त्याला विरोध करणं कठीणच नव्हे तर अशक्यच आहे. त्यांना रोखण्याचे, त्यांचा वापर होऊ न देण्याचे जे काही मार्ग आहेत त्यांच्यावरच विसंबून राहावं लागत आहे. म्हणूनच अलिखित आंतरराष्ट्रीय करारानुसार त्यांच्या वापरावर अघोषित बंदी आहे, अर्थात त्याचं पालन करण्यासाठी राष्ट्रशासकाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असेल तर...

संबंधित बातम्या