ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर...

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 9 मे 2022

‘जर तर’च्या गोष्टी

भूकंपांमुळे पृथ्वीच्या कवचाला भेगा पडतात, त्यांच्यामध्ये फटी तयार होतात. या कवचाखाली अडकलेला मॅग्मा घनरूप कवचापेक्षा हलका असल्यामुळं वरच्या दिशेनं जाऊ पाहतो. कवचाला पडलेल्या भेगा, फटी ही संधी त्याला मिळवून देतात. त्याच्या दबावाखाली तो शिलारस जोरानं, वेगानं, धसमुसळेपणा करत उफाळतो. तोच ज्वालामुखीचा उद्रेक.

जगभरात अनेक ज्वालामुखी आहेत. त्यातले बहुतांश निद्रित अवस्थेत आहेत. त्यामुळं त्यांच्या अस्तित्वाची चाहूलही लागत नाही. पण मधूनच एखाद्याला जाग येते आणि त्याचा उद्रेक होत तो तिथं असल्याची खूण मिळते. अलीकडेच इंडोनेशियात अशाच एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला. गेल्या वर्षी इटलीमध्येही असाच एक ज्वालामुखी खडबडून जागा झाल्यासारखा उफाळला होता. ‘जर ज्वालामुखीचा असा उद्रेक झाला तर...,’ हा सवाल साहजिकच अनेकांच्या मनात झिम्माफुगडी घालू लागला होता.

त्याचं उत्तर मिळवायचं तर मुळात ज्वालामुखींचा जन्मच कसा झाला, याचा विचार करायला हवा. जेव्हा  धरतीचा जन्म झाला आणि ती धगधगत्या गोळ्यासारखी होती, त्यावेळी सतत कोणता ना कोणता ज्वालामुखी खदखदत असे. जसा हा गोळा थंड होऊन धरतीला आकार येऊ लागला तसे ते ज्वालामुखीही थंडावले. आपल्या पृथ्वीच्या अंतरंगाचं स्वरूप आणि तिथं होत असणाऱ्या प्रक्रिया ज्वालामुखीला जन्म देत असतात. ज्याला आपण जमीन म्हणतो ते धरतीमातेचं कवच आहे. पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून समुद्रसपाटीपर्यंतचं  अंतर लक्षात घेतलं तर हे कवच पातळच म्हणायला हवं. तेही परत सलग एकसंध नाही. अनेक छोट्यामोठ्या तुकड्यांमध्ये ते विखुरलेलं आहे. या तुकड्यांना ‘टेक्टॉनिक प्लेट्स’ म्हणतात. त्याही एका जागी स्थिर नाहीत. त्यांची सतत हालचाल सुरू असते. त्याचं कारण त्या कवचाखालच्या भागात अजूनही पृथ्वी प्रचंड तापलेली आहे. तिथलं तापमान एवढं चढेल आहे की तिथले कातळही त्या पर्यावरणात वितळतात. त्यांचा ‘मॅग्मा’ म्हणजेच शिलारस होतो. तो द्रवरूप असल्यामुळं त्याच्यात लाटा उठतात, प्रवाह वाहतात. तेच त्याच्यावर तरंगणाऱ्या टेक्टॉनिक प्लेट्सना सतत चल ठेवतात.

हे असे विहरणारे तुकडे कधी एकमेकांच्या दिशेनं प्रवास करतात. परिणामी त्यांची टक्करही होते. तर इतर काही तुकडे एकमेकांपासून दूर जाऊ पाहतात. काही तर एकमेकांना घसटत एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं जाऊ पाहतात. या साऱ्या हालचालींपायी भूकंप होतात. त्यामुळे त्या कवचाला भेगा पडतात, त्यांच्यामध्ये फटी तयार होतात. कवचाखाली अडकलेला मॅग्मा घनरूप कवचापेक्षा हलका असल्यामुळं वरच्या दिशेनं जाऊ पाहतो. कवचाला पडलेल्या भेगा, फटी ही संधी त्याला मिळवून देतात. त्याच्या  दबावाखाली तो शिलारस जोरानं, वेगानं, धसमुसळेपणा करत उफाळतो. तोच ज्वालामुखीचा उद्रेक. 

या उद्रेकाचेही दोन प्रकार आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर काय होईल, हे त्या ज्वालामुखीचं स्वरूप आणि तो ज्या टेक्टॉनिक प्लेटवर बसलेला असतो त्यावर अवलंबून असतं. जिथं दोन प्लेट्स एकमेकींच्या दिशेनं, त्यांची  टक्कर होईल अशा प्रकारे प्रवास करत असतात तिथं संयुक्त ज्वालामुखी अस्तित्वात येतात. त्यांच्यातून बाहेर पडणारा आणि काही प्रमाणात घट्ट होणारा शिलारस म्हणजेच लाव्हा अतिशय दाट असतो. शिवाय तो चिकटही असतो. त्याच्यामध्ये अडकून पडलेले वायूंचे बुडबुडे स्वतःची सहजासहजी सुटका करून घेऊ शकत नाहीत. ते त्यासाठी जोर लावून धडपड करत राहतात. त्यामुळेच त्या ज्वालामुखींचा उद्रेक स्फोटक अवतार धारण करतो. गरम राख आणि कातळाचे तुकडे हवेत फेकले जातात. उंच उंच उडतात. वारे त्यांना दूरदूरवर वाहूनही नेतात. अशा प्रकारचा उद्रेक खूपच धोकादायक असतो. तो विध्वंसक होतो. जिथं प्लेट्स एकमेकांपासून दूरदूर जाण्याचा प्रयत्न करतात अशा सीमारेषेवर दुसऱ्या प्रकारचे ज्वालामुखी जन्म घेतात. त्यांचा लाव्हा तुलनेनं पातळ असल्यामुळं जास्ती प्रवाही असतो. तो वेगानं पसरत जातो. हवाई बेटावर अशा प्रकारचे अनेक ज्वालामुखी आहेत. किंबहुना त्या बेटांचा जन्मच एका ज्वालामुखीच्या उद्रेकापायी झाला होता. आपलं दख्खनचं पठारही घनरूप धारण केलेल्या, घट्ट झालेल्या लाव्हारसाचंच बनलेलं आहे.

जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातून उसळणारा लाव्हा जर अतिशय उष्ण असेल तर फार मोठं नुकसान होतं. गावंच्या गावं बेचिराख होतात. शेतजमीनही नापिक होते. त्याच्या साथीनं बाहेर पडलेली राख हवेत उडते. ती नीट श्वासोच्छ्वास करू देत नाही. माणूस घुसमटतो. विमानांच्या उड्डाणालाही ती घातक ठरते. २०१० साली आईसलँडमध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकापायी एक लाख विमानोड्डाणं रद्द करावी लागली होती. एक कोटी प्रवासी खोळंबून राहिले होते. जवळजवळ शंभर अब्ज रुपयांचं नुकसान सोसावं लागलं होतं.

अर्थात ज्वालामुखीचा उद्रेक नेहमीच विघातक असतो असं नाही. काही वेळा तो विधायकही ठरू शकतो. जसं तो शेतजमीन नापिक बनवतो तसाच एक प्रकारचा उद्रेक अतिशय सुपीक शेतजमीन तयारही करतो. तिथं चांगली कमाई करणारी शेती करता येते. निसर्गसौंदर्यानं नटलेला प्रदेशही अस्तित्वात येतो. पर्यटनाला मदतीचा हात देतो. हवाई बेटं हे याचं बोलकं उदाहरण आहे. उद्रेकापायी निर्माण झालेल्या उष्णतेचा वापर करून वाफ तयार करता येते. तिला टर्बाइन चालवायला लावून वीजउत्पादन करता येतं.

सर्वच ज्वालामुखी जमिनीवर आहेत असं नाही. समुद्राच्या पोटातही ज्वालामुखी आहेत. अशाच एका ज्वालामुखीच्या उद्रेकातून सागराच्या अंतरंगातून काही जमीन पृष्ठभागावर आली. तीच आजची हवाई बेटं. तिथं असलेला ‘मोना लुआ’ हा ज्वालामुखी पर्यटकांचं आकर्षण आहे, त्याच्या डोक्यावरून विमानानं जात त्याच्या आत डोकावून पाहता येतं. ‘किलाऊआ’ हा दुसरा एक ज्वालामुखी अजूनही धुमसत आहे. त्यापायी त्या बेटांच्या आग्नेय किनार्‍याची जडणघडण सतत बदलत आहे. ‘लोही’ हा अजूनही सागरात खोलवर असलेला ज्वालामुखी अजून काही हजार वर्षं तरी आपलं डोकं पाण्याच्या  वर आपलं डोकं काढणार नाही की त्याचा उद्रेकही होणार नाही, असाच वैज्ञानिकांचा होरा आहे. तो तसाच निद्रिस्त राहणार आहे. 

इंडोनेशियामधील ‘टाम्बोरा’ ज्वालामुखीचा १८१५ साली झालेला उद्रेक हा अलीकडच्या काळातला सर्वात जास्त स्फोटक आणि विध्वंसक गणला जातो. त्यातून अतिशय उष्ण लाव्हा तर प्रचंड वेगानं उफाळून आलाच पण राख आणि तप्त वायू आकाशात उंचावर, अगदी स्ट्रॅटोस्फिअरच्या पातळीपर्यंत उडवले गेले. साठ हजार लोकांनी या उद्रेकात प्राण गमावले. आकाशात बराच काळ राख साचून राहिल्यामुळं सूर्याची  उष्णता धरतीपर्यंत पोचू शकली नाही. परिणामी युरोप आणि उत्तर अमेरिकेतलं सरासरी तापमान तीन अंश सेल्सियसनं घटलं. तिथे ते वर्ष उन्हाळाविरहित म्हणूनच ओळखलं जातं.

हवामानात तसंच पृथ्वीच्या रचनाबंधात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचं भाकीत करणं मात्र अजूनही वैज्ञानिकांना शक्य झालेलं नाही. ते करता आलं तर मालमत्तेची नसली तरी जीवितहानी टाळता येऊ शकेल.

संबंधित बातम्या