चेहऱ्यावरच्या सुरकुत्या...

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 4 जुलै 2022

आपल्या त्वचेची सर्वात वरची, जी आपल्याला दिसते आणि जिला ऊन, पाऊस, वारा, थंडी यांचा सामना करावा लागतो ती बाह्यत्वचा. त्याच्या खालची मध्यत्वचा. आणि या दोन्हींना आधार देणारी अंतर्त्वचा. सुरकुत्या जरी बाह्यत्वचेवर दिसत असल्या तरी खालच्या त्वचांमध्ये होणाऱ्या शरीरक्रियांमधील घडामोडींची दवंडीच तिच्याकडून पिटली जाते.

आपली कांती कशी नितळ हवी. दाढी केल्यावर किंवा क्रीम वगैरे लावल्यानंतर त्वचा गुळगुळीत हवी, अशीच कोणाचीही अपेक्षा असते. पण ती नेहमीच पूर्ण होते असं नाही. वय वाढत चालल्यामुळं किंवा इतर काही कारणांपायी त्वचेवर सुरकुत्या पडायला लागतात. खास करून डोळे, ओठ, मानेच्या खळग्यात त्या अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. कोपराखालच्या हातावरही त्यांचं जाळं जमू लागतं. माणूस अस्वस्थ होतो. 

वास्तविक ही एक नैसर्गिक अवस्थाच आहे. आपल्या त्वचेच्या तीन पातळ्या आहेत. सर्वात वरची, जी आपल्याला दिसते आणि जिला ऊन, पाऊस, वारा, थंडी यांचा सामना करावा लागतो ती बाह्यत्वचा किंवा एपिडर्मिस. त्याच्या खालची डर्मिस किंवा मध्यत्वचा. आणि या दोन्हींना आधार देणारी अंतर्त्वचा, तिला हायपोडर्मिस म्हणतात. आपली कातडी शुष्क होणार नाही, कोरडी पडणार नाही, नेहमी ओलसर राहावी म्हणून पाण्याचा अंश जतन करून ठेवणारी हायपोडर्मिस. सुरकुत्या जरी बाह्यत्वचेवर दिसत असल्या तरी खालच्या त्वचांमध्ये होणाऱ्या शरीरक्रियांमधील घडामोडींची दवंडीच तिच्याकडून पिटली जाते. 

निरोगी बाह्यत्वचा पाणी किंवा ऊनपाऊस यासारख्या वातावरणातील घटकांना अडवते, एक तटबंदीच निर्माण करते. त्वचेला लवचिकपणा तसंच घट्टपणा देण्याचं काम तिच्यात असणारे कोलॅजेन, इलॅस्टिन आणि ग्लायकोअमिनोग्लायकॅनसारखे घटक करतात. भरपूर प्रमाणात ते उपस्थित असतात. त्यांच्या प्रमाणात किंवा रचनाबंधामध्ये बदल झाल्यास त्याचं प्रतिबिंब बाह्यत्वचेच्या स्वरूपावर पडतं, सुरकुत्यांच्या रूपात ते दिसू लागतं. परंतु या बाह्यत्वचेचा एक तुकडा घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली तिचं निरीक्षण केलं, तर मात्र ते निरोगी त्वचेहून वेगळं असल्याचं पटकन दिसून येत नाही. म्हणूनच वैज्ञानिकांचा असा होरा आहे की सुरकुत्या पडण्यामागे एकच एक कारण नसावं. वृद्धत्वाच्या नैसर्गिक प्रक्रियेपायी अनेक घटकांमध्ये होणार्‍या बदलांचा तो एकत्रित परिणाम असावा.

वृद्धत्वाच्या प्रक्रियेचेही दोन प्रकार आहेत. अंतर्गत आणि बाह्य. अंतर्गत प्रक्रिया नैसर्गिक असते. वाढत्या वयानुसार कोलॅजेन, इलॅस्टिन यांच्या प्रमाणात तसंच त्यांच्या रचनाबंधांमध्ये बदल होत राहतात. त्यामध्ये आपण काहीही ढवळाढवळ करू शकत नाही. आपल्या जीननी आपल्या शरीराच्या वाढीचं जे वेळापत्रक आखलेलं असतं त्यानुसार या प्रक्रिया पार पडतात. बाह्य घटकांचा त्यावर ढिम्म परिणाम होत नाही. सकारात्मकही नाही आणि नकारात्मकही नाही. वयाच्या विशीनंतर कोलॅजेनचं अंगभूत उत्पादन एक टक्क्यानं घटतं. साहजिकच त्याचा त्वचेच्या लवचिकपणावर परिणाम होतो. पण ही घट तशी अल्प असल्यामुळं तो परिणाम दिसून येत नाही. पण त्वचेची जाडी कमी व्हायला तसंच ती अधिक नाजूक व्हायला सुरुवात झालेली असते. या प्रक्रियेची तीव्रता वाढत्या वयानुसार वाढतच जाते. त्याच्या संगतीनं घामाचं नियंत्रण करणाऱ्या घर्मग्रंथींच्या कामातही शिथिलपणा येतो. त्वचेला आवश्यक असणारं तेल निर्माण करणाऱ्या तैलग्रंथीही चुकारपणा करू लागतात. इलॅस्टिन आणि ग्लायकॅन्सचं उत्पादनही मंदावतं. त्वचेला सुरकुत्या पडणं मग टाळता येत नाही.

पण या अंतर्गत प्रक्रियांबरोबर जर वातावरणाचा अनिष्ट परिणामही होत राहिला तर सुरकुत्या पडण्याचा वेग वाढत जातो. खास करून सूर्यप्रकाशात दीर्घ काळ काम करावं लागत असेल, तर ही प्रक्रिया वेग घेते. सूर्यप्रकाशातील जंबुपार म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणांचा यात मोठा सहभाग असतो. जर या किरणांपासून बचाव करणाऱ्या सनस्क्रीन मलमांचा नियमित वापर केला तर काही प्रमाणात या प्रभावाचा जोर कमी करता येतो. 

जंबुपार किरणांचा सतत मारा होत राहिल्यास बाह्यत्वचा अधिक जाड होते, तिच्यावर फ्रेकल्ससारखे काळे डाग पडायला लागतात, त्वचा अधिक नाजूक असेल तर काही प्रकारच्या कर्करोगाची लागण होण्याची शक्यताही वाढीस लागते. त्याच्याच जोडीला कोलॅजेन आणि इलॅस्टिन यांच्या उत्पादनात घट होण्याच्या प्रक्रियेलाही बळ मिळतं. त्वचेच्या आतल्या अंगामधील चरबी कमी होत जाते. साहजिकच त्वचा आपला गुळगुळीतपणा हरवून बसते. अधिकाधिक खडबडीत होत जाते. त्वचा पातळ होत सहजासहजी तुटू लागते. जरासं घर्षण झालं तरी तुटू लागते. कागदाची कडाही धारदार चाकूसारखी जखम करू शकते. साबणानं जोरजोरानं घासली जाण्यानंही तिला इजा पोचू शकते. सुरकुत्या आपलं बस्तान बसवायला लागतात तसंच आपला अंमल अधिकाधिक क्षेत्रावर बसवायला लागतात. 

अंगभूत प्रक्रियेला आवर घालणं किंवा तिचा वेग मंदावणं शक्य नाही. पण बाह्य कारणांपायी जी त्वचेची हानी होते तिला अटकाव करणं मात्र आपल्या हातात असतं. सूर्यप्रकाशातल्या ‘यूव्ही ए’ आणि ‘यूव्ही बी’ या किरणांचा मारा थोपवण्याचे जोमदार प्रयत्न करण्याची गरज खास करून वयाच्या विशीनंतर भासू लागते. त्यासाठी २४X७ प्रतिबंधक मलमांचा वापर मदतगार होऊ शकतो, ही मलमं या किरणांना आरपार जाऊ न देता बाह्यत्वचेचा त्यांच्या अनिष्ट परिणामांपासून बचाव करतात. या किरणांना रान मोकळं सोडल्यास सुरुवातीला त्वचा लालसर दिसू लागते. हळूहळू त्वचेचे बारीक तुकडे होत खाऱ्या बिस्किटांच्या पापुद्र्यासारखी होते.

अंतर्त्वचेतली चरबी कमी झाल्यामुळं त्वचा शिथिल पडते. तिचा लवचिकपणा हरवतो. आतला आधार गमावल्यामुळं ती लोंबू लागते. विसविशीत होऊ लागते. तिच्यावर रेषा उमटतात आणि घड्याही पडतात. या साऱ्यांचा परिपाक सुरकुत्यांचं जाळं तयार होण्यात होतो. आपला चेहरा, कोपरापासून खालचा हाताचा भाग नेहमीच उघडा असतो. सूर्यप्रकाश त्याच्यावर सतत मारा करतो. त्यामुळं सुरकुत्यांचं प्रमाणही याच अंगांवर अधिक विदारकपणे दिसून येतं. चेहऱ्यावर सतत एकच अभिव्यक्ती करत राहिल्यास त्याचाही परिणाम होतो. स्मितहास्य चेहऱ्याला उजाळा देतं. आपल्याला अधिक आकर्षक बनवतं, असा सर्वसाधारण समज आहे. तो खराही आहे. पण स्मितहास्य करताना ओठांभोवतीच्या स्नायूंना जास्ती काम करावं लागतं. ते ताणलेल्या अवस्थेत  राहतात. सततच्या या ताणांपायी ते स्नायूही ढिले पडतात. साहजिकच तिथली त्वचा आक्रसल्यासारखी होते. तिला घडी पडते. ती दूर करून परत तिला ताठरपणा देण्याच्या कामात स्नायूंकडून कुचराई होते. साहजिकच ती त्वचा तशीच घडी पडल्यासारखी राहते. सुरकुती तयार होते.

धूम्रपानदेखील सुरकुत्यांना जन्म देण्यास कारणीभूत असल्याचं अलीकडील संशोधनातून दिसून आलं आहे. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ही एक वाढत्या वयाबरोबर होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळं ती संपूर्ण टाळणं जरी शक्य नसलं तरी तिची तीव्रता कमी करणं मात्र आपल्या हातात आहे.

संबंधित बातम्या