सेवानिवृत्ती नियोजन

सुधाकर कुलकर्णी
सोमवार, 20 मे 2019

अर्थविशेष
 

योग्य आर्थिक नियोजन असेल, तर आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा समस्यांवर मात करता येते. मात्र यासाठी आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्‍यक असते. फार कमी जण आर्थिक नियोजन करत असल्याचे दिसून येते. आर्थिक नियोजनात घरखरेदी, वाहनखरेदी, मुलांचे शिक्षण, त्यांचे विवाह, आपत्कालीन खर्च, करनियोजन, रिटायरमेंट प्लॅनिंग व इस्टेट प्लॅनिंग या बाबींचा समावेश असतो. आपण नोकरीत असाल, तर साधारणपणे वयाच्या ६० वर्षांनंतर आपल्याला निवृत्त व्हावे लागते. जर व्यवसायात असाल, तरीसुद्धा एक दिवस निवृत्त व्हावेच लागते आणि आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकर होण्यासाठी वेळीच निवृत्तीविषयक नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते. म्हणून ‘निवृत्तीसाठी नियोजन का व कसे करावे’ याची माहिती आपण घेऊ. 

निवृत्तीसाठी नियोजनाची गरज खरे तर प्रत्येकाला आहे. तथापि नोकरदार, छोटेमोठे व्यावसायिक यांच्यासाठी हे नियोजन अधिक गरजेचे आहे. प्रथितयश कलाकार व खेळाडू यांनासुद्धा निवृत्ती-नियोजनाची गरज असते. कारण त्यांच्या कारकीर्दीचा कालावधी जेमतेम १० ते १५ वर्षे इतकाच असतो. त्यामुळे त्यांचा निवृत्तीचा कालावधी नोकरदार किंवा व्यावसायिक व्यक्तींच्या तुलनेने मोठा असतो. याउलट राजकारणी व मोठे उद्योगपती यांना आर्थिक संपन्नता असल्याने अशांनी याबाबत फारशा गांभीर्याने विचार केला नाही तरी चालू शकते; वास्तविक करायला हवे, कारण वेळ सांगून येत नाही. 

निवृत्ती-नियोजन प्रामुख्याने निवृत्तीआधीचा काळ (अर्थार्जन चालू असतानाच सेवानिवृत्त होईपर्यंतच्या कालावधीत करावयाचे आर्थिक नियोजन) व निवृत्तीनंतरचा काळ (प्रत्यक्ष सेवानिवृत्त झाल्यावर मिळालेल्या व शिल्लक असलेल्या रकमेचे पुढील कालावधीसाठी करावयाचे आर्थिक नियोजन) या पद्धतीने करावे लागते. 

नोकरी अथवा छोटा-मोठा व्यवसाय करीत असताना आपण निवृत्ती-नियोजन जितक्‍या लवकर सुरू करू तितके चांगले. कारण यासाठी आपल्याला जास्त कालावधी मिळतो व त्यामुळे थोडीशी जोखीम घेऊन गुंतवणूक केल्यास कमी गुंतवणूक करून आपला अपेक्षित निवृती निधी (रिटायरमेंट फंड) जमा करता येतो. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला किती रिटायरमेंट फंड लागेल याचा अंदाज करणे गरजेचे असते. 

असा अंदाज पुढीलप्रमाणे काढता येतो  
    सध्याचे वय, मासिक उत्पन्न, अत्यावश्‍यक मासिक खर्च. 
    निवृत्ती येण्याचा कालावधी, त्यानंतरचे अपेक्षित आयुष्य, त्यावेळचे सुरुवातीचे अपेक्षित खर्च, आजारपण किंवा अन्य आकस्मिक खर्चासाठी तरतूद व त्यामध्ये महागाईनुसार होणारी वाढ या सर्व बाबी विचारता घेऊन निवृत्त होताना आपल्याकडे किती रक्कम असणे आवश्‍यक आहे याचा अंदाज काढता येतो. 
उदा. संजय पवार नामक व्यक्तीचे वय ३२ असून तो खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. सध्याचे त्याचे मासिक उत्पन्न ७५ हजार रुपयांच्या जवळपास आहे. त्याला घरखर्चासाठी दरमहा ३० हजार रुपये लागतात. घरभाडे व पीएफ, विम्याचा हप्ता यापोटी सुमारे २० हजार रुपये एवढा दरमहा खर्च असून अंदाजे २० हजार रुपये इतकी दरमहा गुंतवणूक करणे त्याला सध्या शक्‍य आहे. आता आपण संजयने निवृत्ती-नियोजन कसे करावे हे पाहू. 

संजय वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होणार असे गृहीत धरल्यास त्याला निवृत्त होण्यास सुमारे २८ वर्षांचा कालावधी आहे. निवृत्तीनंतर पती-पत्नी अंदाजे २० वर्षे हयात असतील आणि आजच्या मासिक खर्चाच्या ९० टक्के इतका खर्च असेल, असे गृहीत धरल्यास निवृत्तीनंतर सुमारे २० ते २२ वर्षे आवश्‍यक खर्च भागविता येईल, एवढी रक्कम वयाच्या ६० अखेरीस त्याच्याकडे असणे आवश्‍यक आहे. सरासरी ६ टक्के दराने महागाई वाढणार असे गृहीत धरल्यास आजचे ३० हजार रुपये आणखी २८ वर्षांनी (संजयच्या वयाच्या ६० अखेरीस) सुमारे दीड लाख रुपये इतके असतील. याच्या ९० टक्के म्हणजे सुमारे १ लाख ३५ हजार रुपये एवढी रक्कम त्याच्या ६१ व्या वयाच्या सुरुवातीस आवश्‍यक असेल. या रकमेत पुढे ६ टक्के महागाईनुसार वाढ होत राहील. याचा विचार करता वयाच्या ६० व्या वर्षाअखेरीस त्याच्याकडे सुमारे २.७५ कोटी रुपये इतकी शिल्लक असणे आवश्‍यक आहे. त्याचा दरमहा ५०० रुपये इतका पीएफ व तेवढेच कंपनीचे योगदान अशी दरमहा १००० रुपये इतकी रक्कम ‘पीएफ’मध्ये जमा होते, असे गृहीत धरल्यास; तसेच, त्याचे दरवर्षी दहा टक्के दराने उत्पन्न वाढत राहील असे गृहीत धरल्यास वयाच्या ६० अखेरीस अंदाजे एक कोटी रुपये इतकी रक्कम त्याला मिळू शकते. याशिवाय अन्य रकमा सुमारे २५ लाख रुपये (ग्रॅच्युइटी व लिव्ह एनकॅशमेंट) मिळतील, असे गृहीत धरल्यास सुमारे १.२५ कोटी रुपये इतकी रक्कम मिळेल. मात्र वरील उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्यक्ष गरज २.७५ कोटी रुपयांची असल्याने त्या १.५ कोटी रुपये एवढी वेगळी तरतूद करणे गरजेचे आहे. उपलब्ध असलेला २८ वर्षांचा कालावधी पाहता पुढील २८ वर्षे त्याने दरमहा ५,५०० रुपये नियमितपणे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवायला हवेत. तसे केल्यास वयाच्या ६० अखेरीस दोन कोटी रुपये जमा होऊ शकतील. (सरासरी १२ टक्के वार्षिक रिटर्न गृहीत धरून). मात्र जर त्याला मार्केटची जोखीम घ्यायची नसेल, तर पीपीएफ अथवा एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० हजार रुपये गुंतवावे लागतील. 

याउलट अजय पाटील हा एक व्यावसायिक असून त्याचे दरमहा सरासरी उत्पन्न ७५ हजार रुपये इतके आहे. मात्र व्यावसायिक असल्याने यात चढउतार होत असतात. तसेच त्याला पीएफ, ग्रॅच्युइटी व लिव्ह एनकॅशमेंट याप्रकारचे पेमेंट वयाच्या ६० अखेरीस मिळणार नाही. त्याचाही खर्च व आयुर्मान, संजयइतकाच धरला तर त्यालासुद्धा वयाच्या ६० अखेरीस २.७५ कोटी रुपये इतकी रक्कम पुढील २८ वर्षांत जमा करणे गरजेचे आहे. त्याने जर पुढील २८ वर्षे दरमहा १० हजार रुपये रक्कम नियमित इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर वयाच्या ६० अखेरीस ४ कोटी रुपये जमा होऊ शकतील. (सरासरी १२ टक्के वार्षिक रिटर्न गृहीत धरून). मात्र जर त्याला मार्केटची जोखीम घ्यायची नसेल, तर पीपीएफ अथवा एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १८ हजार रुपये गुंतवावे लागतील. 

समजा अजय हा ‘सारेगमप’सारख्या गाण्याच्या स्पर्धेतून गायक म्हणून नावारूपाला आला असेल व त्याचे वय आज २५ वर्षे आहे. सध्या त्याला पार्श्‍वगायन, गाण्याचे कार्यक्रम व काही जाहिराती यातून सध्या दरमहा सरासरी ३ लाख रुपये मिळतात. मात्र या क्षेत्रातील स्पर्धा विचारात घेता तो आणखी १५ वर्षे सरासरी दोन लाख रुपये दरमहा मिळवू शकेल, असे गृहीत धरले. तसेच त्याला दरमहा ७५ हजार रुपये इतका खर्च आहे, तर त्याला त्याची १५ वर्षांनी कारकीर्द संपत असताना दरमहा दीड कोटी रुपये एवढी रक्कम वयाच्या चाळिसाव्या वर्षी लागेल. यात दरवर्षी सरासरी ६ टक्के महागाईनुसार वाढ होणार आहे. पती-पत्नीचे ८० वर्षांचे आयुर्मान विचारात घेता पुढील ४० वर्षे पुरेल इतकी तरतूद वयाच्या ४० अखेर करणे गरजेचे आहे. यासाठी वयाच्या ४० अखेर त्याच्याकडे ५ कोटी रुपये असणे गरजेचे आहे. पुढील १५ वर्षे नियमितपणे दरमहा १० लाख रुपये एवढी रक्कम इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास सुमारे ५ कोटी रुपये एवढी रक्कम जमा होऊ शकेल. 

वरील तिघांनाही त्यांचे सध्याचे उत्पन्न विचारात घेता अपेक्षित गुंतवणूक करणे सहज शक्‍य आहे. याशिवाय त्यांनी घर/वाहनखरेदी, मुलांचे शिक्षण, आपत्कालीन तरतूद यासाठीचे नियोजन करणे तितकेच गरजेचे आहे. 
(वरील आकडेवारी इक्विटी दीर्घकालीन रिटर्न सरासरी १२ टक्के, महागाई वाढ ६ टक्के (इन्फ्लेशन) व पीएफ, पीपीएफ, एपीएस सरासरी रिटर्न ९ टक्के गृहीत धरून केलेली आहे.)   

संबंधित बातम्या