भय इथले संपत नाही

भूषण महाजन,शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 10 मे 2021

अर्थविशेष

आता नव्याने गुंतवणूक करायची तर अत्यंत सावध राहायला हवे. कमी भांडवल पणाला लावणे व काटेकोर स्टॉप लॉसचे पालन करणे अनिवार्य. फ्युचर बाजारापासून दूरच राहिलेले बरे.

आपण गेली सहा महिने गुंतवणूकदारांना कोविडची भीती बाजूला ठेवून प्रत्येक मंदीत खरेदी करायला सुचवीत आहोत. तसेच त्यासाठी ‘निफ्टी’ची १४,३००ची पातळीही पुन्हा पुन्हा अधोरेखित करीत आहोत. तरीही गुंतवणूकदारांच्या मनातील भय काही दूर होत नाही. ‘निफ्टी’ची १३,७५० ही पातळी येण्याची शक्यता २० ते ३० टक्के आहे. तिथे स्टॉप लॉस ठेवा आणि १४,३००च्या जवळ खरेदी करा असा सल्ला पूर्णपणे झुगारून छोटा गुंतवणूकदार बाजार पुन्हा जोरदार खाली यायचीच वाट पाहात आहे आणि त्यामुळेच कडेला बसून आहे.  

गेल्याच सोमवारी सकाळी एक गुंतवणूकदार माझ्याकडे आले होते. बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बाजार चांगलाच खाली उघडला होता. आल्या आल्या त्यांनी तोफ डागली, ‘‘बघा, मी म्हणतच होतो, बाजार खाली येणार! आला की नाही? रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होते आहे. ऑक्सिजन नाही, इस्पितळात जागा नाही, औषधे नाहीत, लॉकडाउन चालू आहे.. कुठल्या जोरावर तुम्ही तेजी करायला सांगता?’’

“सर, आता कुठे बाजार उघडला आहे. संपेपर्यंत बघूया काय होतेय ते! भारताइतकीच गंभीर परिस्थिती ब्राझील आणि युरोपमधील अनेक देशांत आहे. तिथेही लॉकडाउन आहे. पण तिथे बाजार वरच चालले आहेत,” मी तर्कशास्त्रीय उत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

“त्यांचे नका सांगू मला. तिथल्या व्यवस्था आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या आहेत. सारे कसे शिस्तीत होत असते. आपल्याकडचा सावळा गोंधळ, त्यात होणारे राजकारण! सगळ्याकडेच दुर्लक्ष कसे करता येईल?’’ त्यांनी पुढचे अस्त्र काढले.

“सर, आपल्याकडे सरकारवर टीका करायची पद्धतच आहे. बोलता बोलता १५ कोटी नागरिकांना लस देऊन झालीदेखील, पुढील दोन महिन्यात इथल्या लशींच्या जोडीला रशियाची स्पुटनिक लस येईल, तीस -चाळीस कोटी नागरिकांचे लसीकरण झालेही असेल. त्यात कारखाने बंद नाहीत. हा हा म्हणता मे महिना संपेल आणि अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल,” मी माझे म्हणणे रेटत होतो.  “मान्य आहे कोविडची ही दुसरी लाट अनपेक्षितपणे समोर आली. पण आता आपली व्यवस्था कामाला लागलीय. गेले दोन महिने शेअरबाजार १४ हजार ते १५ हजार या टप्प्यात घोटाळतोय; त्याला खाली यायचे असते तर आजच ‘निफ्टी’ १२,५००च्या पातळीवर असती,’’ मी माझा मुद्दा सोडत नव्हतो. 

“तुम्ही काही म्हणा, पण ‘सेन्सेक्स’ ४०,००० आणि ‘निफ्टी’ ११,९०० ला येणार बघा. नवे रुग्ण पाच लाखांवर गेले तर हे होणारच! आजच कळेल तुम्हाला एक हजार अंशांनी बाजार खाली आल्यावर!” त्यांनी  ब्रह्मास्त्र सोडले. 

तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो; बाजार किती खाली येईल हे मलाही माहीत नाही. कदाचित तुम्ही म्हणता तसे होईलही. पण मग स्टॉप लॉस कशासाठी आहे? नजर जर दूरवर ठेवली, या तीनचार महिन्यांपलीकडे बघितले तर लक्षात येईल की आताचे तिमाही निकाल पाहता पुढील वर्ष चांगले जाणार ही आशा यथायोग्य आहे. 

‘‘मग, बाजार काही केल्या खाली येणार नाही म्हणता?’’ त्यांनी निराशेने विचारले. ‘‘गोरे लोक तर सतत विक्रीच करताहेत. त्याचे काय?’’ परदेशी गुंतवणूकदार ऑक्टोबर २०२० पासून जोरदार खरेदी करताहेत, अगदी फेब्रुवारी अखेरपर्यंत खरेदी चालूच होती, तेव्हा तुम्ही कोठे होता? बँकिंग क्षेत्राबद्दल ज्ञात असलेल्या अनिश्चिततेमुळे त्या क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून ते नफा वसूल करताहेत. जरा कोरोनाचा कहर कमी होऊ द्या, रुपया बळकट होऊ द्या, मग बघा हेच परदेशी गुंतवणूकदार दुप्पट जोमाने खरेदी करतील. तोपर्यंत आपण थांबायचे की आजच खालच्या पातळीवर आपली झोळी भरून घ्यायची हा ज्याच्या त्याच्या जोखीमक्षमतेचा विषय आहे. भांडवल तुमचे आहे, तेव्हा निर्णयही तुमचाच. त्यातही परदेशी गुंतवणूकदार खरेदी-विक्री दोन्ही करतात, त्याची गोळाबेरीज माध्यमात येत असते, याचाही विचार करायला हवा.’’  बाजार जरी खाली आला, तरी घाबरायचे नाही. कारण आपण काही बाजारात गुंतवणूक करीत नाही. चांगले व्यवस्थापन असलेल्या मोजक्या समभागात भांडवल गुंतवतो आहोत. किंवा अशा शेअरची निवड करण्याचा अनुभव असलेल्या म्युचुअल फंडात पैसे गुंतवतो आहोत. मग भीती कसली ? काळ आणि वेळ दोन्ही आपल्या बाजूला आहेत. 

भाऊसाहेब पाटणकरांच्या चालीवर सांगायचे तर ..
वाटते नागीण ज्याला खेळण्या साक्षात हवी 
त्यानेच घ्यावे शेअर्स येथे, 
छाती हवी, मस्ती हवी 

प्रसंगी थोडा तोटा सहन करण्याची ज्यांची तयारी आहे, त्यांनाच शेअरबाजार भरभरून देतो. मला त्यांचा मुद्दा पटवून देण्याच्या उद्देशाने ते दिवसभर थांबले होते. आधीच्या शुक्रवारी ४८,७६६ ला बंद झालेला सेन्सेक्स सोमवारी ४१० अंश खाली उघडला खरा पण दिवसभरात चक्क वर जाऊन फक्त ६० अंश खाली बंद झाला. असो, बाजार संपल्यावर ते काही मला भेटले नाहीत. 

ही सर्व घटना विस्ताराने सांगायचे कारण एकच! ही छोट्या गुंतवणूकदाराची प्रातिनिधिक मानसिकता आहे. शंभर रुपये ‘वेदांत’मध्ये, किंवा ६०० रुपये ‘टाटा स्टील’मध्ये गुंतवायची भीती वाटत होती, पण आता  २५० रुपयांत किंवा एक हजार रुपयांत हेच शेअर घ्यावेसे वाटतात. यालाच ‘कन्फर्मेशन बायस’ असेही म्हणतात. आता नव्याने या क्षेत्रात गुंतवणूक करायची तर अत्यंत सावध राहायला हवे. कमी भांडवल पणाला लावणे व काटेकोर स्टॉप लॉसचे पालन करणे अनिवार्य. फ्युचर बाजारापासून दूरच राहिलेले बरे. असो. 

गेल्या सप्ताहात, २६ एप्रिल पासून सुरू झालेली तेजी कलेकलेने वाढत ‘निफ्टी’च्या १४,८९० या पातळीवर धडकली आणि तिथेच मोठ्या विक्रीला सामोरे जावे लागले. एप्रिलच्या २९ तारखेला बाजाराने १५ हजार अंशाला स्पर्श केला खरा, पण मंदीवाले भारी पडले. या सदरात १४,३०० ते १४,८५० ही रेंज पुन्हा पुन्हा दर्शविली आहे. बंगालच्या निकालाची अपरिहार्यता जरी बाजाराला ठाऊक असली तरी केंद्रातील सत्ताधारी पक्ष तेथे बाजी मारेल अशी वेडी आशा बाजाराला होती. तसे न झाल्यामुळे ‘निफ्टी’ खालच्या पातळीवर उघडली. पण आपल्या सर्वांपेक्षा चलाख असलेला बाजार आणखी खाली आला नाही, तारतम्य वापरून वरच आला.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निकाल जरी जोरदार येत असले तरी भावही भरपूर वाढले आहेत. आता चांगल्या कामगिरीचा बोनस कर्मचाऱ्यांना द्यायची वेळ आली आहे. पगारवाढ, नवी भरती व त्याच जोमाने करावे लागणारे नवे करार अशी अनेक आव्हाने आहेत. ‘एचसीएल टेक’च्या निकालात ७०० कोटींची तरतूद हेच दर्शवते. या क्षेत्रात नफा वसुलीला वाव आहे व तो वसूल करावा. 

सरकारचा एक नवा उपक्रम स्तुत्य आहे. किनाऱ्याजवळ उथळ पाण्यात मच्छीमारी फायदेशीर होत नाही. त्यासाठी भर समुद्रात नौका न्याव्या लागतात. तसेच ‘बॉम्बे हाय’ नंतर नवे सागरी संशोधन झालेले नाही. भारतीय नौदलाच्या मदतीने ‘ब्लू ओशन इनिशिएटिव्ह’ सरकारने योजला आहे. त्यात हे सर्व नौदलाच्या संरक्षणात होणार आहे. ह्या धोरणाचा आराखडा जनतेच्या सहभागासाठी व प्रतिक्रियेसाठी जाहीर केला आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा किमान ७ ते १० टक्के वाटा  यातून उचलला जावा अशी अपेक्षा आहे. 

बाजारात दृढीकरण (Consolidation) चालू आहे. बाजार फारसा खाली न येता कन्सॉलिडेशन होत आहे, हे फार चांगले लक्षण आहे. मे महिना सहसा मोठी तेजी दाखवीत नाही. मॉन्सूनची भाकिते येत असतात, अन्नधान्याचा साठा व पाणीपुरवठा किती समतोल आहे हे बघितले जाते. काही दुर्गम भाग सोडता यावर्षी पाण्याचा साठा मुबलक आहे. मॉन्सून सरासरी इतका होईल असा अंदाज आहे, त्यातून तेजीची छोटी झुळूक अनुभवायला मिळावी असे वाटते.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या