वय निघून गेले.......?

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 7 डिसेंबर 2020

अर्थविशेष

सुरेश भटांची एक अप्रतिम गझल आहे. आता वेळ गेली असे सुचवणारी. तुम्हालाही असेच वाटते का? मार्चमधे शेअरबाजाराने तळ गाठलेला असतांना गुंतवणूक करायचे राहूनच गेले. आता वेळ निघून गेली.. जर बाजाराने पुन्हा खाली मुसंडी मारली तर किती छान होईल! पण मित्रहो पुन्हा मुसंडी मारल्यास आपण खरेदी करू शकू कां? आणि शेअरबाजार जर खालच्या पातळीवर दीर्घकाळ राहिला तर ? ते सहन करण्याचा संयम आपल्यात आहे का हा खरा सवाल आहे.

मी तुम्हाला एक दिलासा देऊ इच्छितो की वेळ अजूनही गेली नाही. किंबहुना ती कधीच जात नसते. बाजाराच्या प्रत्येक पातळीवर संधी आपली वाट पाहत असते. प्रत्येकच तेजीमध्ये नफावसुली येत असते आणि तेजीचे शिलेदार आणि कधीकधी घोडेही बदलत असतात. मात्र ही वेळ सावध राहण्याची, काही नफा खिशात टाकून, संधीची वाट पाहण्याची नक्कीच आहे. इतक्या तेजीतही फार नफा देत नसलेले किंवा वारेमाप वर गेलेले समभाग (किमान त्यातला छोटासा हिस्सा) विकायला काय हरकत आहे? 

नोव्हेंबर महिन्यातील परदेशी भांडवलाच्या ओघामुळे निफ्टीचा निर्देशांक १३२६ अंकांनी वाढला. ही वाढ १३ टक्क्यांच्या वर आहे. एका महिन्यात निर्देशांकांनी १३ टक्क्यांवर तेजी दाखवण्याची घटना यापूर्वी २००९ मधे घडली होती. मे २००९च्या तेजीला निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या एकहाती विजयाची पार्श्वभूमी होती व त्यावेळी निर्देशांक २७ टक्क्यांनी वाढले होते. साहजिकच या आठवड्यात निफ्टी व बँक निफ्टी थोडासा विसावा घेणे अपेक्षित आहे. दशकातील सर्वाधिक तेजीचा आदर करायलाच हवा. एक पाऊल  मागे घेऊन नफावसुलीतील भांडवल १२५०० ते १२८०० या पातळीवर योग्य त्या स्टॉप लॉसने गुंतवायला हवे. तेजी संपली नाही, पण काही काळ तेजीचा पाया घट्ट करण्यात (consolidation) जाऊ शकतो. तेवढा संयम ठेवला तर हुरहूर कमी होईल.

निफ्टी आणि बँक निफ्टी स्थिर किंवा छोट्या पट्ट्यात राहणार असेल तर स्मॉल व मिड कॅप शेअर वाढू शकतात. गेल्या तीन वर्षात प्रथमच NSE ५०० या निर्देशांकातील ९० टक्के शेअर्स ५० दिवसांच्या चलसरासरीवर आहेत. त्यात व्ही मार्ट, व्हेरोक, बलरामपुर चीनी, नाल्को आदि शेअर्सचा अल्प कालावधीसाठी विचार होऊ शकतो (शुक्रवारचा बंद अनुक्रमे २२४१, ३८९, १६४  व ३९). या खेरीज आपले लाडके आयटी व औषध उद्योग आहेतच! 

थोडासा आढावा घेऊया
डीव्हीज लॅब, सुवेन फार्मा, लॉरस, सिन्जीन, बायोकॉन, नवीन फ्लोरिन, पीआय इंडस्ट्री, एसआरएफ, टाटा एलेक्सी, एनआयआयटीटेक( कोफोर्ज), डिक्सॉन,  व्हीएसटी टीलर्स तसेच एस्कॉर्ट वगैरे शेअर्स १२ सप्टेंबरच्या लेखात सुचवले होते.  लेख जरी आधीच लिहिला जात असला तरी १२ सप्टेंबरचे व २८ नोव्हेंबरचे भाव फरक बघितले, तर या शेअर्स मधे १० ते ३५ टक्के वाढ झाल्याचे दिसते.  तात्पर्य हे की या कठीण काळात ज्या ज्या उद्योगांनी कामगिरीत वृद्धी दाखवली ( विक्री व नफा यात सतत वाढ) त्यांना बाजाराने उचलून धरले. असो.

दुसरे असे की मार्च महिन्यातल्या तडाखेबंद शेअर विक्रीनंतर परदेशी संस्थांनी एप्रिलमधे हात आखडता घेतला. पुढे मात्र खरेदी वाढली . धरणाच्या भिंतीतून पाणी झिरपावे तशी थोडी थोडी खरेदी चालू होती. मुख्य कारण म्हणजे हळूहळू उघडत असलेली आपली अर्थव्यवस्था आणि कोरोनाच्या साथीतही काही उद्योगांनी टाकलेली मरगळ. त्याच दरम्यान आलेल्या अहवालानुसार एडीबीने मात्र पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे वाटचाल करेल, असेही आपल्या एशियन डेव्हलपमेंट आउटलुक या अहवालात नमूद केले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी ८-९ टक्क्यांवर वाढेल. नागरिकांचा सहभाग आणि व्यावसायिक उलाढाल चांगली  होऊ लागल्यामुळे जीडीपी वाढण्यास मदत मिळणार आहे असे त्यांचे मत.  

अमेरिकन अध्यक्षांच्या निवडीनंतर, जणू काही या धरणाची दारेच उघडली गेली. (चौकट पहा) मार्च २०२० मधे झालेल्या ६५००० कोटी रुपयांच्या शेअरविक्री समोर परदेशी संस्थांनी नोव्हेंबरमध्ये ६६००० कोटींची खरेदी केली. परिणाम एकच! न भूतो  न भविष्यति अशी तेजी. कमी झालेले व्याजदर, अमेरिकन, जर्मनी, जपान व इतर देशातून सर्वच बाजारात ओतलेला पैसा, आणि आपल्याकडील शिथिल झालेला लॉकडाउन या तीन कारणांनी तेजी होत गेली. या प्रवासात शेअरबाजार ५ ते १० टक्के खाली कधीही येऊ शकतो, पण ते सोडल्यास प्रत्येक खालच्या स्तरावर खरेदी करणे हे सूत्र सोयीचे ठरेल असे वाटते.

जर यदाकदाचित भारतभर  पुन्हा लॉकडाउन करण्यात आला, किंवा लस निर्माण करण्यास वा जनसामान्यांस देण्यास अतिविलंब झाला, तर आणि तरच हे परदेशी भांडवल परत जाऊ शकते. तसे झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या असे म्हणावे लागेल.

रिझर्व्ह बँक आपले पतधोरण ४ तारखेला (डिसेंबर) जाहीर करेल. तोपर्यंत हा लेख प्रसिद्धीच्या मार्गावर असेल. गव्हर्नर शक्तीकांता दास ह्यांनी नुकतेच FEDAIला संबोधित करताना अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. इतक्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता धूसर आहे. पुढील तिमाहीचा आढावा अधिक महत्त्वाचा आहे.  परंतु, एखादे लाडावलेले मुल जसे नुसते डोळे उगारताच रडायला लागते, तसा बाजार हे निमित्त वापरून नरम राहू शकतो.

रिझर्व्ह बँकेने १९९३ मधे व त्यानंतर २०१४ साली नवे बँक परवाने दिले होते. गेल्या काही वर्षात सार्वजनिक बँका अनार्जित कर्जांच्या ओझ्याखाली दाबून गेल्या आहेत. सरकारने  जरी गरजेनुसार भांडवल पुरवठा करण्याचे ठरवले, तरी ते कमीच पडते. त्यातूनच सक्षम उद्योगसमूहांना बँक सुरू करण्यास परवानगी द्यावी असे घाटत होते. या संबंधी नेमलेल्या समितीने आपला शिफारस अहवाल सादर केला आहे. त्यानुसार ५००० कोटींवर मालमत्ता असलेले समूह बँक परवान्यासाठी अर्ज करू शकतील. (१९९३ साली दिलेल्या १० पैकी ४ परवाने अपात्र ठरले, ह्याचीही येथे दाखल घेतली पाहिजे). याखेरीज ५०००० कोटींवर मालमत्ता असलेल्या नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यादेखील अर्ज करू शकतील. भारती, पेटीएम व फिनो पेमेंट बँकांचे व्यवहार/कामकाज  पाच ऐवजी तीन वर्ष समाधानकारक चालल्यास त्यांचेही छोट्या फायनान्स बँकांमध्ये रूपांतर होऊ शकेल. यातून बँकिंग उद्योगाची भांडवल टंचाई दूर होईल अशी आशा आहे. मागील १९९३ मधील प्रयासात नवा परवाना मिळून चालू झालेली ग्लोबल ट्रस्ट बँक, केतन पारिख प्रकरणात अडकली व डबघाईला आली, तसेच टाइम्स बँक एचडीएफसी बँकेत विलीन करावी लागली. यावेळी हा उपक्रम यशस्वी झाल्यास ते अर्थव्यवस्थेला एक मोठे वरदानच ठरेल. रिलायन्सने २०१४ सालीच बँक परवाना मिळवलेला आहे हेही येथे नमूद केले पाहिजे. 

दरम्यान विख्यात अर्थतज्ज्ञ आशिमा गोयल यांनी पुढील दोन तिमाहीत अर्थचक्र जागेवर येईल असे भाकीत केले आहे. तसेच आर्थिक व इतर सुधारणांचा रेटा पुढे चालूच राहील असे अर्थमंत्र्यांनी घोषित केले आहे. शेतकरी सुधारणा कायद्यांना पंजाब व हरियाना येथे होत असलेला विरोध व चालू असलेले आंदोलन योग्य हाताळणी केल्यास थांबवता येईल. एकाच कायद्याविरुद्ध दोन परस्पर विरोधी हितसंबंध असणारे गट (अडते व शेतकरी ) आंदोलन छेडतात हे विशेष.

थोडक्यात म्हणजे निफ्टीला १३२००-१३३००ची पातळी ओलांडायला त्रास होऊ शकतो. मार्केटमध्ये थोडातरी नफा खिशात टाकायला हवा आणि खालच्या पातळीवर (१२५०० ते १२८००) खरेदीला उभे राहायला हवे. काही अघटित घडले तरच हे धोरण बदलेल.

संबंधित बातम्या