बेचके पछतावो...?

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

अर्थवेध

कोरोनाचा कहर व्हायच्या आधीच, म्हणजे भारतात जेमतेम हजाराखाली रुग्ण सापडले असताना, शेअर बाजार न भुतो न भविष्यती असे कोसळले. एप्रिल महिन्यात जर कुणी वर्षअखेर निर्देशांक कुठे असतील याचा अंदाज करायला सांगितला असता तर तो अंदाज निफ्टी १०,००० व सेन्सेक्स ३५,००० यापुढे कदाचित गेला नसता. लॉकडाउन संपला तेव्हा कुठे जगभरचे शून्यतम व्याजदर आणि विकसित देशांनी ओतलेला पैसा आणि त्यामुळे येणारी तेजी याचा अंदाज आला.

या सदरात सतत खरेदीची शिफारस केली आहे आणि तीही काही विशिष्ट क्षेत्रातच. औषधउद्योग, रसायने, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकपयोगी वस्तूचे निर्माते, वाहनउद्योग आणि विमा कंपन्या! या बाहेर जायची प्रथम वेळ आली ती ऑक्टोबरमधे, खासगी बँकांनी ४५ हजार कोटी रुपये हक्कविक्रीने जमा केल्यावर, अन त्यानंतर उदय कोटक यांचे विवेचन व समालोचन बँकिंग क्षेत्रावरील विश्वास वाढवून गेले. आता तर येणाऱ्या वाढीव भांडवलाच्या ओघामुळे व त्याच बरोबर अर्थव्यवस्थाही रुळावर येत असण्यावर तज्ज्ञांचे एकमत झाल्यामुळे तेजी बेलगाम वाढत आहे. तेजीचा उच्चांक काय असेल हे कुणालाच ठाऊक नाही. कदाचित १४,००० किंवा १४,५०० किंवा त्याहीपुढे! त्यात अर्थमंत्र्यांनी, ‘गेल्या शंभर वर्षात या देशात सादर झाले नाही’ असे बजेट मांडणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘नो डील’ ब्रेक्झीटही जवळपास विनासायास होईल असे दिसते, त्याचीच तेजी युरोपीय बाजारात आली!  तेव्हा, अधून मधून २१ डिसेंबर सारखे होणारे अपवाद वगळता, जानेवारी महिन्यात तेजीला आवर बसण्याची शक्यता कमीच. त्यातही नवीनवी माहिती समोर येत आहे. जगभरचे बाजार एका मिंक व्हायरसला घाबरले. पण म्युटेशन होणे हा विषाणूचा स्थायीभाव आहे असे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगतात. कोरोनामध्ये आजपर्यंत दिसलेल्या काही बदलांवर अधिक चर्चा झाली. पण आज हातात असलेली लस सर्वच म्युटंट व्हायरसवर चालू शकेल असे स्पष्ट झाल्यावर भीती ओसरली. झालेच तर ताज्या बातमीप्रमाणे भारतात नवीन वर्षात नक्कीच लसीकरण सुरू होणार. ह्या साऱ्या बातम्या तेजीला खतपाणी देणाऱ्याच आहेत.

तेव्हा भल्यामोठ्या अपेक्षा घेऊन येणारा अर्थसंकल्प आणि नंतर सालाबादपणे होणारा अपेक्षाभंग; हाच तेजीला लगाम घालेल असे वाटते. जर उच्चांक किती व तो केव्हा होईल हे माहीत नसेल तर निफ्टीच्या दर ५०० अंशाच्या वाढीला ५ टक्के ते १० ‘टक्के अर्घ्य देणे उत्तम. ही टक्केवारी कमीजास्त करणे प्रत्येक निवेशकाची वैयक्तिक पसंती व जबाबदारी. संपत्ती निर्माण करण्याइतकेच तिचे संरक्षण व संवर्धन करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी आपली संपत्ती भिन्न मालमत्ता प्रकारात विभागलेली हवी. शेअर बाजारातून ठेवबाजारात वा रोखीत किंवा सुवर्णबाजारातही थोडा चंचुप्रवेश करायला काय हरकत आहे? आपण विक्री केल्याने बाजार काही वर जायचा थांबणार नाही, काही काळ पश्चाताप होणारच. तो होऊ द्यावा. कारण थोर लोकांनी सांगून ठेवले आहे, की गोड लागला तरी उस मुळापर्यंत खाऊ नये. शेअर विकत घेऊन तो वर जाण्याची वाट बघत देव पाण्यात ठेवण्यापेक्षा, थोडी विक्री करून भाव खाली यायची वाट पाहणे सोयीस्कर. भाव खाली जरी आले नाहीत तरी भांडवल तर नक्कीच खिशात येईल. म्हणूनच म्हणतो, ‘समय आ रहा है के, लेके नही बेचके पछतावो!’

खरेदीची शिफारसही चोखंदळपणे, त्यातल्या त्यात खालच्या भावात करावी असे वारंवार सुचवले आहे. तसेच खरेदीबरोबर विक्रीही केली पाहिजे. अर्थात वाढत्या बाजारात चांगल्या गुणवत्तेची खरेदी अधिक करावी व ‘ड’ दर्जाचे शेअर्स विक्रीसाठी हाती घ्यावे. 

खवळलेल्या समुद्रात मासेमारी करू नये असा संकेत आहे. मात्र पट्टीचे मच्छीमार वादळी सागरातच जाळे फेकतात कारण मोठी मासळी त्याच वेळी सहज सापडते. तसेच शेअरबाजाराचे आहे. चांगल्या चाललेल्या तेजीत एखादी मंदीची वावटळ येते. धीर न सोडता या मंदीचा उपयोग करून घेतला पाहिजे. या सदरात गेले अनेक सप्ताह माहिती तंत्रज्ञान व औषध उद्योगाबद्दल लिहिले आहे. बाजाराने २१ डिसेंबरला मोठे करेक्शन दिले. तो दिवस चोखंदळ खरेदीचा होता. आपल्या आवडीच्या शेअर्सचा या तीन दिवसातला प्रवास बघू. इन्फोसिस ११५२-११६० पर्यंत खाली आला होता, त्याने १२३६ चा बंद दिला. कोफोर्ज (२३१०-२६५२), एचसीएल टेक (८५०-९१९), सुव्हेन ( ३९०-४६०), अलेम्बिक (९८१-१०७२), डीव्हीज लॅबस (३५५०-३७५०) यांच्या बाबतीतही हीच कथा. इतके चांगले शेअर्स पायाशी लोळण घेत असताना, इथे तिथे बघायचे कशाला? चांगली गुणवत्ता असलेले शेअर्स महाग वाटले तरी तेजीत अल्पमुदतीसाठी आणि कुठल्याही बाजारात दीर्घ मुदतीतही संपत्ती निर्माण करतात. पूर्ण विश्वास ठेऊन खालच्या भावात पुन्हा खरेदी हवीच!

आपण सारेच ‘कुरूक्षेत्रावरचे अर्जुन’ असल्यामुळे, शेवटी खरेदी करावी की विक्री या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. उदा. तीन महिन्यापूर्वी डिक्सन हा शेअर सुचवला होता. पी/ ई/ जी (Price/ Earnings per share/ Growth in Profits) चा मागोवा घेत ही सूचना करण्यात आली होती. म्हणजे केवळ किंमत व प्रती शेअर मिळकत एव्हढेच न बघता, नफा कसा चक्रवाढ पद्धतीने कसा वाढतो आहे हे दर्शवले होते. ८५००ला  सुचवलेला हा समभाग अल्पावधीतच ५० टक्क्यांनी वर गेला आहे. पण तरीही हा न विकता किमान तीन वर्षे जवळ राखला पाहिजे. अधेमधे बाजाराच्या लहरीने खाली आल्यास अधिक भांडवल गुंतवले पाहिजे. तसेच सुवेनफार्मा हा शेअर. या आठवड्यातच २० टक्के वाढला. हासुद्धा लांब पल्ल्याचा सोबती आहे. दुसरा पर्याय म्हणजे गुंतवणूक व ट्रेडिंग दोन्ही खात्यात हे असे पूर्ण दृढविश्वास असलेले  शेअर घेतले पाहिजे. भावात वध-घट झाल्यास ट्रेडिंग करावे आणि काही प्रमाणात गुंतवणूक राखून ठेवावी. हे शिवधनुष्य राकेश झुनझुनवाला यांनी लीलया पेलले आहे. प्रत्येकालाच जमेल असे नाही. सामान्य गुंतवणूकदाराने सहसा दीर्घ मुदतीसाठीच गुंतवणूक करावी व स्वत:च्या जोखीम क्षमतेप्रमाणे नफा ताब्यात घ्यावा. 

याठिकाणी मोतीलाल ओसवाल संस्थेतर्फे दरवर्षी प्रसूत होणाऱ्या ‘वेल्थ क्रिएशन स्टडी’ अहवालाचा निर्देश केला पाहिजे. चालू वर्ष त्या अहवालाचे रौप्यमहोत्सवी वर्ष! सोशल मीडियामुळे हा अहवाल घरोघर पोहोचला आहे. तो वेळात वेळ काढून वाचावा, मनन करावा व त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा. निवेश करून फक्त थांबल्याने संपत्तीचे समृद्धीत कसे रुपांतर होते हे त्यातून मनात ठसते. (गुंतवणूक कसदार व दर्जेदार होण्यासाठी चांगले व्यवस्थापन, छोट्या गुंतवणूकदारांबद्दल आस्था असलेले, व्यवसायाशी प्रामाणिक प्रवर्तक असायलाच हवे.) गेल्या पंचवीस वर्षात सर्वात जलद संपत्ती निर्माण करणारी कंपनी आहे इन्फोसिस!

कितीही मोठ्या म्युचुअल फंड मॅनेजरला  विचारले की बाजार कधी खाली येईल?  किती दिवस तेजी टिकेल? पुढील दोन तीन महिन्यात नक्की काय होईल? मी आज काय करू? खरेदी करू की विकू? तर तो फक्त लांब पल्ल्याची  गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. त्याचेही मर्म हेच आहे. यावर पंडित बालमुकुंद अर्श मलसियानी यांचा एक शेर आठवतो :

‘पुछ अगले दस साल मे क्या होगा 

मुझसे इस बरस की बात न कर 

यह बता हाल क्या है लाखोंका 

मुझसे दो चार दस की बात न कर’ 
दुसरा सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, आज हातातले सर्व फंड विकतो, बाजार खाली आल्यावर घेईन की विकत! चालेल का? त्याही प्रश्नाला उत्तर एकच. बाजार

कधी खाली येणार आहे ते मलाही सांगा! नाहीतर एप्रिलपासून अनेक लोक शेअर विकून, कडेला बसून हाच प्रश्न विचारात आहेत, ते कदाचित ‘फोमो’ (Fear of Missing Out) इफेक्टमुळे.  राहवत नाही म्हणून १४,५०० या निफ्टी पातळीवर बाजारात येतील. तर हातातले सर्व फंड न विकता टप्प्याटप्प्याने त्यातला काही भाग बॉंड फंडात गुंतवला तर जोखीमही कमी होईल आणि नफा वसुलीचा आनंदही मिळेल.

मित्रहो, अमेरिकी बाजार रंगात आले आहेत, भारतीय बाजारात नवनवा पैसा ओतला जातोय, तेव्हा चोखंदळपणे खरेदी आणि धूर्तपणे विक्री हेच यशाचे गमक आहे हे ध्यानी घ्यावे. 

(महत्त्वाचे. या लेखातील सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर

बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच

गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व

त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या