पुन्हा एक संधी...

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 1 मार्च 2021

अर्थविशेष

पंधरा तारखेला निफ्टीने तेजी करीत, १६ तारखेला १५४३० अंशाचा नवा उच्चांक नोंदवत आपल्या टार्गेटला जवळजवळ स्पर्श केला खरा, पण लगेच थकून माघार घेतली. गेले काही दिवस आपण १५५००ची वाट पाहात होतो. ती पातळी येणार येणार, असे वाटत असतांनाच दबा धरून बसलेल्या गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली, तेजीचे मंदीत रूपांतर कधी झाले ते कळलेच नाही. किती जवळ आणि किती दूर! पण हीच बाजाराची अपरिहार्यता आहे.

पाहता पाहता आठवड्यात साडेसातशे अंशांनी घसरून निफ्टीने सोमवारी, २२ तारखेला, १४,६७५चा बंद दिला. नेमकी येथेच या निर्देशांकाची ३० दिवसांची चलसरासरी आहे. त्यामुळे विक्री दबाव थांबण्याची आशा आहे. आशा अंधूक यासाठी आहे की यावेळी परदेशी संस्थाही विक्री करीत आहेत, दुसरे म्हणजे गुरुवारी, २५ तारखेला, वायद्याचा  अखेरचा दिवस आहे. त्याकारणाने विक्री चालू राहू शकते. तिसरे म्हणजे कोरोना पुन्हा डोके वर काढतोय. चौथे म्हणजे इंडिया विक्सनेही ३० टक्के उसळी मारून २६ अंशाला स्पर्श केलाय. तेव्हा थोडा अधिक संयम ठेवला तर १३,७५० ते १४,६७५ या दरम्यान खरेदीच्या अनेक संधी मिळतील. अर्थात ‘मंदीला तळ नाही आणि तेजीला आभाळ नाही,’असे आम्ही नेहमी म्हणतो. तेजी संपलेली नाही, फक्त मागे वारंवार म्हटल्याप्रमाणे खरेदी अत्यंत चोखंदळपणे करायला हवी. कदाचित हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत तेजीची तुतारी हलकेच वाजायला लागली असेल.

मागील व या महिन्यात प्रत्येक ५०० अंशाला १० टक्के या प्रमाणे आपण जर नफा वसुली करून ती रक्कम ठेव बाजारात वळवली असेल तर या खरेदीला भांडवलही तयार असेल. असो.

एलॉन मस्क मोठा विलक्षण उद्योगपती आहे. नावीन्यपूर्ण कल्पना अमलात आणून त्या व्यापारक्षम करण्यात त्याचा हात कदाचित फार कमी लोक धरू शकतील. ‘टेस्ला’ सारख्याच ‘स्पेस एक्स’ या कंपनीचाही तो प्रवर्तक आहे. ‘स्पेस एक्स’तर्फे हजारो उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले जातात. एकूण ४२ हजार उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे. पृथ्वीचा प्रत्येक कानाकोपरा दृष्टिक्षेपात यावा असे ध्येय आहे. भविष्यात या स्पेस इंटरनेटच्या माध्यमातून जग तुमच्या हातात आल्याचे समाधान मिळू शकते. आज ‘टाटा कम्युनिकेशन’चे (पूर्वाश्रमीची ‘व्हीएसएनएल’) केबलचे एकमेवाद्वितीय जाळे समुद्राखालून जगभर पसरले आहे. त्यातूनच संदेशाची देवाणघेवाण होते. ‘स्पेस एक्स’ने भारत सरकारबरोबर बोलणीही सुरू केली आहेत. सॅटेलाइट ब्रॉडबँड इंटरनेट सेवा भारतात सुरू झाल्यास आज जोडणी नसलेल्या अत्यंत दुर्गम भागातही इंटरनेट वापर सुरू होऊ शकेल. पुढे काय होणार, ह्या सेवेसाठी काय किंमत मोजावी लागणार हे भविष्यात कळेलच. ‘टाटा कम्युनिकेशन’चे पुढील धोरण काय असेल ह्याचेही औसुक्य आहेच. येणारे डिसरप्टिव्ह तंत्रज्ञान आपल्या जीवनात काय बदल करू शकेल याची ही चुणूक आहे. शेअर बाजारातही याचे पडसाद उमटतील. आपल्या किंमत/उपार्जनाच्या गुणोत्तराला धुडकावून अशा शेअरची बाजारातली मागणी वाढत जाऊ शकते.  आज अमेरिकेत ‘गुगल’, ‘टेस्ला’, ‘अॅपल’, ‘अॅमेझॉन’, ‘नेटफ्लिक्स’ व भारतात ‘इंडिया मार्ट’, ‘इन्फो एज’ या शेअरचे भाव अव्वाच्या सव्वा का आहेत यावरही यातून थोडा प्रकाश पडू शकतो.

अख्ख्या विश्वातून भारत आणि चीनमध्ये तेथील नागरिकांकडून घरच्या लोकांसाठी परकीय चलनात रक्कम पाठवली जात असते. परदेशात राहणारे भारतीय आणि चिनी लोक आपल्या घरच्या लोकांसाठी परकीय चलनाच्या रूपात रक्कम पाठवत असतात. या बाबतीत नुकताच मेक्सिको हा देश फिलिपिन्सला मागे टाकून तिसऱ्या नंबरला आला आहे. हा परकीय चलनाचा भरणा फिनटेक कंपन्यांमार्फत त्वरित करण्याची एक चढाओढ तेथे असते. जसजसा खासगी कंपन्यांचा यातील सहभाग वाढत जाईल तसतसे परकीय चलनांचे व्यवहार अधिक सुलभ, पारदर्शक व कमी दलालीत होतील. ‘बजाज फायनान्स’ आता फिनटेक कंपनी म्हणून पुढे येत आहे. ‘झिरोधा’कडे ब्रोकिंग धंद्याचा १६ टक्के हिस्सा आहे. तो व्यवसाय, तसेच म्युचुअल फंड वितरण, क्रेडिट कार्ड, शस्त्रक्रिया आदी वैद्यकीय खर्चांसाठी सुलभ आरोग्य कर्जे असे अनेक व्यवसाय ‘बजाज फायनान्स’ला आकर्षित करीत आहेत. पुढील दोन वर्षात त्यांचे १० हजार कोटी रुपये नफ्याचे उद्दिष्ट महत्त्वाकांक्षी असले तरी साध्य होऊ शकते. हा समभाग विकला असल्यास ५,००० ते ५,३५०च्या दरम्यान पुन्हा खरेदी  करायला हवा. पुढे ४,५०० पर्यंत खाली आल्यास गुंतवणूक वाढवावी.

भारतीय रोखेबाजार अमेरिकेच्या वळणावर जात आहे. रिझर्व्ह बँक अधूनमधून बाँड खरेदी करून या बाजाराला आधार देत असते. परंतु सततच्या विक्रीमुळे बाँडच्या किमती खाली येत आहेत. किंमत खाली म्हणजे व्याजदर वर जातात. एका आठवड्यात सरकारी कर्जरोख्याचा उतारा ६ टक्क्यांवरून ६.२ टक्के झाला. असेच चालू राहिले तर व्याजदर तर कमी होणार नाहीतच, पण सरकारी बँकांच्या कोषागारातील व्यवहाराचा नफा कमी होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेलाही सतत बाँड खरेदी करण्याला मर्यादा आहेत. व्याजदर कमी करण्याच्या उत्साहामुळे बरेचदा रिझर्व्ह बँकेकडून लिलाव रद्द होतात व बाँड विकत घेण्याची जबाबदारी अंडररायटर्सच्या गळ्यात येते. ह्या बाजाराच्या हालचालींचा दुसरा परिणाम म्हणजे ‘व्याजदर वाढतील की काय?’ या भीतीने शेअरबाजार खाली येऊ शकतो.

सरकार  सार्वजनिक उद्योगांच्या स्थावर संपदेच्या चलनीकरणाच्या मागे आहे. त्यासाठी कॅनेडियन मॉडेल आत्मसात करण्याचा विचार चालू आहे. कॅनडात सार्वजनिक उद्योगांना आपल्या मालकीची स्थावर मालमत्ता विकसित करण्याची जबाबदारी दिली जाते. सरकारला कुठलीही तोशीस लागू न देता स्वयंसिद्ध पद्धतीने विकसन करून सरकारलाच लाभांशापोटी नफा वितरित केला जातो. या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेकडे, देवस्थानांकडे पडून असलेल्या सोन्याच्या साठ्याचे चलनीकरण करण्याचे सरकारने मनावर घेतले आहे. यापूर्वी आलेल्या सुवर्णरोखे योजनांना नागरिकांनी केराची टोपलीच दाखवली होती. त्यातून बोध घेऊन नवीन योजनेत बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. आजच्या तंत्रामुळे सोन्याचा कस काढणे खूप सोपे झाले आहे व त्यासाठी वेळही अत्यल्प लागतो. हा व्यवहार करणे प्रत्येक बँकेच्या एक तृतीयांश शाखांना बंधनकारक केला आहे. सोने मोजून, कस काढून, शुद्धतेप्रमाणे मूल्यांकन केले जाईल व गिऱ्हाईकाची संमती असेल तर ते डीमॅट खात्यात जमा केले जाईल, वर व्याजही मिळेल. डीमॅट ख्यात्याचे व्यवहार अत्यंत सुलभ तर असतीलच पण ज्यांना सोने विकायचे नाही त्यांना मुदतीअंती शुद्ध सोने परत मिळेल. सरकारी रेट्यामुळे यावेळी या योजनेकडे सर्व सामान्य नागरिक व विशेषतः देवालये सहानुभूतीने बघतील अशी आशा आहे. देवस्थानांसाठी तर ही योजना अगदी ‘नो ब्रेनर’ आहे. जवळच्या साठ्यापैकी ५ ते १० टक्के सोन्याचे असे चलनीकरण करणे सोयीचे आहे. ही योजना यशस्वी झाल्यास सोने आयातीसाठी खर्च  होणारे बरेच परकीय चलन वाचेल. 

धातू उद्योगातील तेजी अखंडित राहू शकते. कच्च्या तेलाच्या मागे सर्वच अलोह धातू महागले. तांबे तर नऊ वर्षातील सर्वोच्च भावाला पोहोचले आहे. तीच गत कथिल, जस्त, निकेल व इतर धातूंची. कथिलही दहा वर्षातील अत्युच्च भावाला मिळत आहे. ‘नाल्को’, ‘हिंदाल्को’, ‘वेदांत’ आदी शेअर त्यामुळे प्रकाशझोतात आहेत. शंभर टक्के लाभांश नक्की मिळणारा ‘वेदांत’ याच सदरात १०० रुपयांना खरेदीसाठी सुचवला होता. तो आता दुप्पट झाला आहे. तसेच पोलादाची व लोह खनिजाची मागणी वाढते आहे. चीनची भूक शांत होईपर्यंत ही तेजी टिकावी.

वरील तेजीचा विपरीत परिणाम वाहन उद्योग व त्यांचे पुरवठादार यावर होऊ शकतो. त्यात सेमी कंडक्टर डिव्हायसेसचा पुरवठा खंडित झाला आहे. किमती न वाढवता विक्री वाढवण्याची कसरत या उद्योगाला करावी लागणार आहे. ग्रामीण भारतातील मागणी वाढती राहिली तर हे जमू शकते. तरीही खालच्या भावात ‘बजाज’ (३७५०-३८५०) व ‘हिरो’ (३२०० ते ३३००) घेता येतील. याच सदरात ३९ रुपयांना सुचवलेला ‘सी जी पॉवर’ ५५ रुपयांना टेकला आहे. त्यात पुढे वाढ होण्यास अजूनही जागा आहे.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

 

संबंधित बातम्या