संधी की सापळा!

भूषण महाजन, शेअरबाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 19 एप्रिल 2021

अर्थविशेष

गेला संपूर्ण आठवडा शेअरबाजारात ऊन-पावसाचा खेळ चालू होता. शुक्रवारी अमेरिकेतले बाजार वर्षभराच्या उच्चांकावर बंद झाले तेव्हा गेल्या सोमवारी (ता.१२) निफ्टी आणि सेन्सेक्स वरच उघडतील असा तज्ज्ञांचा अंदाज सपशेल चुकला. 

आपण म्हणतोय त्याप्रमाणे बाजार कोविडला नव्हे तर लॉकडाउनला घाबरून असतो याचा प्रत्यय आला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात बाजाराने विकएण्ड लॉकडाउन पचवला, पण पंधरा दिवस सारे बंदची चर्चा सुरू झाल्यावर सारे बांध फुटले. त्यात पुणे शहर, भारताच्या वाहन उद्योगाचा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा कणा आहे हे लक्षात घेतले, तर सेन्सेक्स जवळजवळ २००० अंशाने का पडला असावा याचा अंदाज येतो. धातू, वाहन, बँकिंग, मीडिया, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम सर्वच क्षेत्रीय निर्देशांक पडले. अगदी औषध उद्योगाचे शेअरही सहानुभूती दाखवीत किंचित पडल्यासारखे झाले. जिथे मोठा नफा दिसत होता तिथे गुंतवणूकदारांनी तो वसूल केला, जिथे नफा वाढणार नाही ह्याची खात्री पटत चालली उदाहरणार्थ हॉटेल, राष्ट्रीयकृत बँका ते तर मातीला मिळाले. मिड कॅप, स्मॉल कॅपचे वारे उलट्या दिशेने वाहिले. महापुरात लव्हाळे वाचतात, असे म्हणतात पण मिड आणि स्माल कॅप ह्यांचीही साय उतरली. एकच चुकीचा निर्देशांक वाढला. तो म्हणजे ‘इंडिया विक्स’. आपल्याला ‘इंडिया विक्स’ची ताकद माहिती आहे. हा निर्देशांक ३०च्या वर गेला की मोठ्या मंदीची चाहूल मिळते. समाधानाची बाब इतकीच की ‘इंडिया विक्स’ जेमतेम २३ला टेकला आहे आणि धोक्याच्या पातळीच्या बऱ्याच खाली आहे. 

आता महानायक अमिताभ बच्चन यांच्या भाषेत ‘एक करोड रुपये का सवाल’ विचारता येईल.... ‘ही संधी आहे की सापळा?’ या यक्षप्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू.

मंदीवाल्यांचा जोर का वाढला? याची पाच कारणे....

भारतातील नवीन कोविड रुग्णांची संख्या वाढतेय. अमेरिकेने लसीकरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढवलाय. 

ब्रिटनमध्ये अर्ध्या  लोकसंख्येला लस देऊन झालीय, त्यामानाने आपण मागे पडलोय. पूर्वी कोविड चाचणीचे निकाल त्वरित कळत असत, आज चार-पाच दिवस लागतात, त्यावरून संशयित रुग्णसंख्या कशी वाढतेय याचा अंदाज येतो. 

डॉलर पुढे गर्भगळीत झालेला रुपया हे तिसरे कारण. आंतर बँक चलन व्यवहारात डॉलरने ७५ रुपयांचा स्तर ओलांडला. ही गेल्या वीस महिन्यातील सर्वोत्तम आपटी आहे. भारताचे कमजोर चलन परदेशी गुंतवणूकदारांना निरुत्साही करते कारण त्यांचे दुहेरी नुकसान होते. लसीकरणात येणारे कथित अडथळे सेंटीमेंट आणखी खराब करून डॉलर  अधिक मजबूत करू शकतात.

महागाई निर्देशांक ५.०३ वरून ५.५२ टक्क्यांवर पोहोचलाय. तसेच औद्योगिक उत्पादनही उणे ३.६ टक्के झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजाप्रमाणे या तिमाहीत महागाई दर ५.२ टक्के राहावा अशी अपेक्षा आहे.

लॉकडाउनसदृश स्थिती बँका व फायनान्स कंपन्यांना अडचणीची ठरू शकते. त्यात सर्वच बँकांना कर्जातील कमी झालेला उठाव त्रस्त करीत आहे. निफ्टीच्या वाटचालीमध्ये ३८ टक्के वाटा बँकनिफ्टीचा आहे. बँकांचे शेअर्स नरम राहिले तर निफ्टीवर कशी जाणार?

याउलट मंदिवाल्यांवर मात का व कशी करता येईल याची सात कारणे :

आपली लोकसंख्या ही प्रमुख अडचण असली तरी सरकार नवीन उपाय योजते आहे. रशियाच्या स्पुटनिक या लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी डॉ. रेड्डीज लॅब शड्डू ठोकून तय्यार आहे. 

‘फायझर’ची लस उणे ७० अंशाखाली स्थिर राहते, ती देणे जरी सयुक्तिक नसले तरी ‘जॉन्सन ॲण्ड जॉन्सन’ कंपनीची लस आपण मागवू शकतो. अमेरिकेत संशोधन आणि भारतात उत्पादन हा फॉर्म्युला औषध उद्योगाने आत्मसात केला आहे आणि जगमान्य आहे. तेव्हा पुढील चार/पाच महिन्यांत ३० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. एक कोटी ज्येष्ठ नागरिकांना दोन्ही डोस देऊन झाले आहेत. यातली राजकीय चढाओढ बाजूला ठेवल्यास व सरकारवर विश्वास ठेऊन, स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतल्यास आपण कोविडवर मात नक्कीच करू शकू हा विश्वास बाजाराला आधार देऊन जाईल. 

अमेरिका, युरोप (तेथे लॉकडाउन असूनही), ब्रिटन, चीन, किंबहुना जगभरचेच बाजार तेजीत आहेत. आज ना उद्या आपला बाजारही ती कास धरेलच. 

खाली आलेला रुपया परदेशी गुंतवणुकीसाठी अडसर असला तरी माहिती तंत्रज्ञान, औषध उद्योग व इतर निर्यातभिमुख उद्योगांचा तारणहार ठरू शकतो. खाली येऊन नंतर मजबूत होणारे चलन येणाऱ्या भांडवलासाठी जास्त आकर्षक असते. आलेखात तसा कल मात्र दिसायला हवा. 

रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या पतधोरणात षटकार मारला आहे. व्याजाचे दर खालीच राहतील याची काळजी घेत सरकारलाही कर्जउभारणी स्वस्तात करता येईल, अशी व्यवस्था केली आहे. सरकारनेही पायाभूत सुविधांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टना (इन्व्हीट) प्रोत्साहन देत मोठी गुंतवणूक या क्षेत्रात येईल अशी व्यवस्था केली आहे. त्यातून पोलाद व सिमेंटची मागणी वाढेल. रिझर्व्ह बँकेने बाजारातून किती रोखे घेणार हे जाहीर केले आहे. हा अत्यंत प्रोत्साहक असा जी-सॅप कार्यक्रम (परदेशातील QEच्या धर्तीवर) दीर्घ मुदतीचे व्याजदर कमी करण्यास मदत करेल. अर्थव्यवस्थेसाठी पोषक असे हे पाऊल शेअरबाजारालाही उभारी देऊन जाईल. लॉकडाउन अल्पावधीसाठी असेल, यावर बाजाराचे एकमत आहे. कदाचित पंधरा दिवस कळ काढल्यास पुढे व्यवहार खुले करावेच लागतील. तेव्हा मंदीवाल्यांची सरशी कमी होत जाईल. 

काही अतिरंजित अपेक्षा व त्यामुळे होणारा अपेक्षाभंग सोडला तर तिमाही निकाल उत्साहवर्धक असणार आहेत. ‘टीसीएस’ने त्याची चुणूक दाखवलीच आहे. जर राष्ट्रीय उत्पन्न ११-१२ टक्क्यांनी वाढणार असेल तर चांगले व्यवस्थापन व निर्देशित क्षेत्रातील उद्योग अधिक नफावृद्धी दाखवतील यात शंका नाही. 

अप्रत्यक्ष कर, आयकर, आयातकर आदी करांचे संकलन अंदाजापेक्षा अधिक आहे. औद्योगिक उत्पादन उणे ३.६ टक्के असले तरी गेल्या मार्चमध्ये ते उणे १७ टक्के होते हेही लक्षात घेतले पाहिजे. चालू असलेली घसरण महिना अखेर पर्यंत टिकली तर ती मोठी संधी आहे असे समजायला हरकत नाही. अत्यंत चोखंदळपणे निवडक शेअर संग्रहित करता येतील. समजा दोन तीन महिने ही संधी राहिली तर टप्प्याटप्प्याने खरेदी करता येईल. मित्रहो, लक्षात असू द्या, काळ आणि वेळ दोन्हीही गुंतवणूकदाराच्याच बाजूला असते. कमी अधिक थांबावे लागेल एव्हढेच. 

या संधीचा फायदा घेतांना आता निवड सोपी आहे. रसायन क्षेत्रातील ‘पीआय इंडस्ट्री’, ‘आरती’ व ‘नवीन फ्लोरिन’, तसेच इतर क्षेत्रांतील ‘बजाज फायनान्स’,‘ एयू फायनान्स बँक’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘सीडीएसएल’,  ‘इन्फोसिस’, ‘कोफोर्ज’, ‘पर्सिस्टंट’, ‘एचसीएल टेक’, ‘टाटा ॲलेक्सी, ‘लिवर’, ‘डाबर’, ‘टाटा कन्झ्युमर’, ‘मेरिको’, ‘इमामी’, ‘डीव्हीज्’, ‘सनफार्मा’, ‘सुव्हेन फार्मा’,  ‘एपीएल अपोलो’, ‘टाटा स्टील’, ‘जेएसडबल्यू स्टील’, ‘हिंदाल्को’, ‘डिक्सन’ वगैरे नेहमीचेच कलाकार. खरे तर ही नावे मी गेली सहा आठ महिने पुन्हा पुन्हा घेत आहे. भाव छानपैकी वाढलेही आहेत, तरीही पुढे जागा आहे असे माझे मत आहे. आपापल्या जोखीमक्षमतेप्रमाणे विचार करावा.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या