अज्ञात सैतान की ज्ञात भूत?

भूषण महाजन, शेअर बाजाराचे विश्‍लेषक
सोमवार, 17 मे 2021

अर्थविशेष

मागील आठवड्यात छोट्या गुंतवणूकदाराच्या मनातल्या भीतीचा ऊहापोह केला होता. निफ्टीने अल्पकाळासाठी १४,१२१ हा तळ नोंदवला आहे, ही आपली धारणा. आता १४,३०० या निफ्टीच्या पातळीपाशी (१३,७५० चा स्टॉप लॉस ठेवून) खरेदी केल्यास निफ्टी १४,९००पर्यंत  वर जाऊ शकते हा आपला अंदाज होता. आता काय झाले ते पाहू. 

तीन मेच्या सोमवारी प. बंगालमधील निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर बाजार खालीच उघडला. मग १४४१६चा तळ दाखवून त्या दरम्यानच थोडासा रेंगाळून, ४-५-६ आणि ७ मे हे चारही दिवस इंच इंच लढवत, खाली न येता वरच जात राहिला. मागील आठवड्याचा बंदही अपेक्षेप्रमाणे १४८२३ असा झाला. गेल्या सोमवारीही (ता. १० मे) बाजार वरच उघडला आणि १४९४२ अंशावर निफ्टी बंद झाली.  गेले दोन महिने निफ्टी १५०००च्या पातळीला अडखळते आहे. निफ्टी ही पातळी ओलांडेल का एवढाच औसुक्याचा मुद्दा होता. थोडक्यात काय हा टप्पा निफ्टीने पार करणे गरजेचे आहे. कुठल्या का बाजूला पार करेना! त्यामुळे नवीन खरेदी करताना सावधान ! 

मुख्य मुद्दा असा की बाजारात तेजीची झुळूक का होईना येऊ शकते, यावरच बऱ्याच तज्ज्ञांचा विश्वास नाही. कोविडची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेने महाभयानक आहे, बाजार वर जाईलच कसा? असा त्यांचा प्रश्न. लॉजिक जरी बरोबर असले तरी शेअरबाजारात अपेक्षित पडझड होतानाही दिसत नाही. हे कसे काय? त्याचे कारण असे असावे: मागील मार्चमध्ये कोविडचा प्रथम उद्रेक झाला त्यावेळी ही साथ एखाद्या अदृश्य सैतानासारखी होती. जनमानसात प्रचंड भीती होती. ती पसरते कशी, तिच्याशी  लढा कसा द्यायचा हे कुणालाच लक्षात येत नव्हते. जगभरची सरकारे हवालदिल झाली होती. त्याचाच  परिणाम शेअरबाजारावर झाला व तो जवळपास पन्नास टक्के घसरला . 

आजची कोविडची दुसरी लाट ही ज्ञात भूतासारखी आहे. तिचा सामना कसा करायचा यावर एकमत आहे. लसही आता उपलब्ध  आहे, ती दिलीही जात आहे. अज्ञानामुळे म्हणा, आणखी काही कारणाने म्हणा सोशल डिस्टसिंग पाळले जात नाही व मास्कही सर्वदूर वापरले जात नाहीत, त्यामुळे साथीला पटकन आळा बसत नाही हे खरे. पण ही दुसरी लाट आटोक्यात येईल याची खात्री आरोग्यरक्षकांना आहे. तसेच देशातील कारखाने, मालपुरवठा व दळणवळणही सुरू आहे. याकारणानेच भीती आणि माध्यमातील बातम्या फक्त गतिरोधकाचे काम करू शकतात, बाजाराला मंदीच्या खाईत लोटू शकत नाहीत असे वाटते . 

निफ्टी अशीच दुडक्या चालीने १६००० होईल असे आमचेही म्हणणे नाही. वर्ष दोन वर्ष दूर नजर ठेऊन ठेऊन गुंतवणूक करावी एवढेच. असो.   

अत्यंत महत्त्वाचे असे काही निकाल मागील आठवड्यात जाहीर झाले. त्यातील ‘बजाज फायनान्स’, ‘एचडीएफसी’, ‘अॅक्सिस बँक’ आदी निकाल बाजाराने डोक्यावर घेतले. ‘एचडीएफसी’च्या रिटेल कर्जांनी मार्चमध्ये नवा उच्चांक गाठला. कंपनीचे सर्वेसर्वा केकी मिस्त्री यांनी पुढील वाटचालीचे अत्यंत आशादायक चित्र रंगवले आहे. मध्यमवर्गाच्या बजेटमधील घरांना चांगली मागणी असल्यामुळे वितरित केलेली, अधिकांश व सरासरी कर्जे २९ ते ३० लाखांच्या, एकूण कर्जवाटपाच्या ३३ टक्क्यांच्या, आसपास होती. (सहसा फारशी आकडेवारी द्यायला मला आवडत नाही, कारण त्यामुळे समालोचनाला एक बोजडपणा येतो, तरी आवश्यक तितकीच देत आहे). कर्जवसुलीची क्षमता ९३ टक्क्यांवरून ९६ टक्क्यांवर गेली. यावर्षीच्या एप्रिल महिन्यातच मागील तिमाहीपेक्षा अधिक कर्ज वाटप झाले. एकूण तरतुदी साडेपाच हजार कोटींच्या करणे अपेक्षित होते, त्याऐवजी १३,८०० कोटींच्या केल्या आहेत. साऱ्या समूहाचा नक्त नफा १८,००० कोटी रुपये झाला आहे. त्यातला  फक्त ‘एचडीएफसी’चा नफा १२,००० कोटी रुपये आहे. (सर्व आकडे राउंडऑफ केले आहेत.) मागील वर्षापेक्षा नफा जरी कमी असला तरी बुडीत कर्जांची तरतूद अपेक्षेबाहेर वाढवल्यामुळे बाजार समाधानी आहे. 

गृहवित्त क्षेत्रातील या कंपनीने उपकंपन्यांमार्फत आपला विस्तार वाढवला आहे. सर्वच उपकंपन्या जोरदार व्यवसाय करीत आहेत. आपल्या रडारवर हा शेअर हवाच. कोविडचा कहर शमला तर व्यवसायातील विक्रीची घट कधीही भरून काढता येईल. वर्षभरात ३००० ते ३२००चा भाव येऊ शकतो. ‘टाटा कन्झुमर’चेही निकाल छान होते. नक्त नफा जवळपास दुप्पट झाला आहे. पण चहाची खरेदी किंमत वर्षभरात ५० टक्क्यांनी वाढल्यामुळे ढोबळ नफ्यात थोडा मार बसला आहे. वर्षभर तरी विक्री किमतीत मोठी वाढ करण्याची व्यवस्थापनाची इच्छा नाही. सध्याचा माल संपल्यावर व चहाचे नवे पीक आल्यावर, किमती कमी होऊन ढोबळ नफा सुधारेल अशी आशा व्यवस्थापनाला आहे. आजची चोवीस लाख रिटेल विक्री केंद्रे, तीन वर्षात दुप्पट करण्याची योजना आहे. डिजिटल चॅनेलमध्ये गुंतवणूक करून त्याद्वारे विक्रीवर जोर देण्याची योजना आहे. वसुलीमध्ये लक्षणीय सुधारणा आहे. कंपनी कर्जमुक्त आहे. प्रथमदर्शनी बाजाराने निकालाचे थंडे स्वागत केले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून हा शेअरदेखील आपल्या रडारवर ठेवावा.  

‘बजाज फायनान्स’ हा शेअर मला व्यक्तिशः जरी आवडत असला तरी तज्ज्ञांना तो नेहमीच महाग वाटतो आणि ते खरेही आहे. पुस्तकी किमतीच्या साडे आठ ते नऊपटीला मिळत असल्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार या वाटेला जात नाही. त्यांनी मागील तिमाहीचा जाहीर केलेला आढावा बाजाराला निराशाजनक वाटल्यामुळे, शेअर ४४०० रुपयांपर्यंत खालीही आला होता. ती खरेदीची संधी साधणाऱ्या निवेशकाचे उखळ पांढरे झाले आहे. आढाव्यापेक्षा निकाल स्पृहणीय होते. कोविडमुळे विक्री जेमतेम २ टक्के वाढून नफाही कमी झाला असला तरी व्यवस्थापन त्यांच्या नव्या डिजिटल उपक्रमाबद्दल अत्यंत उत्साही आहे. कोविडमुळे वसुलीवर व विक्रीवर मोठा आघात होणार नाही याबद्दल व्यवस्थापनाला विश्वास आहे. महाराष्ट्रासारख्या व त्या तोडीच्या इतर राज्यात लॉकडाउन शिथिल झाल्यास पुन्हा २५ ते ३० टक्के वृद्धी दाखवू असा विश्वास कंपनीने दिला. स्वतःच्या जोखीमक्षमतेनुसार, अभ्यास करून आपल्या भात्यात हा समभाग प्रत्येक खालच्या पातळीवर जमा करणे हे धोरण फायद्याचे ठरू शकते. रसायन क्षेत्रातील आपली अजून एक शिफारस होती ‘एसआरएफ’. कलेकलेने वाढत गेल्या दोन/अडीच वर्षात हा शेअर तिप्पट झाला आहे. दर वर्षी, पुढील वर्षीचा अत्यंत संयमी अंदाज देऊन प्रत्यक्ष कामगिरी वरचढ करण्यात व्यवस्थापनाचा हातखंडा. कंपनीने यावर्षी कृषी रसायन क्षेत्रात दोन नवे कारखाने उभे केले आहेत. ‘फ्लुरोकेम’, ‘फ्लुरोमिथेन’ तसेच इतरही स्पेशालिटी रसायनांची विक्री व निर्यात मजबूत होती. आजची उत्पादन क्षमता १०० टक्के वापरून नव्या चौथ्या कारखान्याचीही क्षमताही पूर्ण वापरली जाईल असे कंपनीला वाटते. तरी पुढील वर्षी विक्री व नफ्यात किमान १५ टक्के वृद्धी दाखवू असा अंदाज व्यवस्थापनाने दिला आहे. या अंदाजामुळे निरुत्साही होऊन या शेअरला मोठ्या विक्रीला सामोरे जावे लागले. या पडझडीत आपले मात्र या शेअरकडे लक्ष असू द्यावे; ६००० रुपयांच्या खाली त्यात वाव आहे व पुढे वाढीला जागा आहे.

इतरही महत्त्वाच्या समभागांचे तिमाही निकाल आले आहेत. त्यातला मारुतीचा निकाल बाजाराने नापास केला आहे. ‘अल्ट्राटेक’, ‘डीमार्ट’, ‘नवीन फ्लोरिन’ वगैरे निकालांचा ऊहापोह पुढे करू.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर्स अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

संबंधित बातम्या